‘साग्रसंगीत मुखभंग’ हा अग्रलेख आणि ‘दु:साहस अंगलट’ या दोन्ही (२० मे) बातम्या वाचल्यावर यश डोक्यात गेले की व्यक्ती आणि संस्था आंधळ्या होतात याचा प्रत्यय भाजपला कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने आला असेल. परंतु मिशीला पीळ भरून तुच्छतेने इतर पक्षांकडे पाहण्याच्या संस्कृतीमुळे असे होण्याची शक्यता कमी वाटते. ‘कारण हरलो तरी माझीच तंगडी वर’ अशा वृत्तीने वागण्याची वृत्ती जोपर्यंत पक्षांत प्रबळ आहे तोपर्यंत पक्षांतल्या जुन्या जाणकार धुरीणांकडून तसेच अति मस्तीमुळे ओढवलेल्या नामुष्कीच्या परिस्थितीतून काही शिकण्यासाठी जी लीनता आणि ‘आपले चुकले’ हे कबूल करण्याचे धैर्य पक्ष सध्याच्या काळात गमावून बसला आहे असे वाटते. त्यामुळेच सतत स्वत:ची पाठ थोपटून आपल्या चुकाही जणू फार मोठी कामगिरी असल्याचे जनतेला भासवण्याचे उद्योग चालू आहेत. पण हे असेच चालू राहिले तर थंड पडलेले लहानसहान पक्षही एकत्र यायला वेळ लागणार नाही. याचे भान आले नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानच्या निवडणुका आणि २०१९ची सार्वत्रिक निवडणूक गमावण्यात या आढय़तेची परिणती होईल हे निश्चित! अजूनही वेळ गेलेली नाही. पण दोनच व्यक्तींना सगळे कळते ही वृत्ती प्रथम बदलली पाहिजे. तसेच विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नव्हेत हेही ध्यानांत घेतले पाहिजे.

– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

 

सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्यांना चपराक

‘साग्रसंगीत मुखभंग’ हे विशेष संपादकीय आणि ‘औटघटकेचे सत्तांतर’ ही बातमी (२० मे) वाचली. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या मोदी-शहा प्रवृत्तींना कर्नाटकच्या जनतेने सणसणीत चपराक लगावली आहे. सत्ता, संपत्ती आणि माध्यमांच्या जिवावर आपण काहीही करू शकतो या भाजपच्या वृत्तीचा कन्नड भूमीत दणदणीत पराभव झाला आहे. बहुमत नसतानाही आणि विशेष म्हणजे विरोधी आघाडीकडे बहुमत असतानाही सत्ता स्थापनेचा दावा करणे आणि सर्व लोकशाही संकेत गुंडाळून भाजपला सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी पाचारण करणे हा लोकशाहीचा खूनच होता. सत्ता मिळवण्यासाठी आज आवश्यक असलेले सर्व घटक आपल्याकडे असल्याने आपण लीलया बहुमत सिद्ध करू, असा आत्मविश्वास भाजपस होता. गोवा, मणिपूर, मेघालय, बिहार आदी राज्यांत या सूत्राचा यशस्वी वापर केला आहे. भाजपने आणि त्यांच्या भाटांनी गत ६० वर्षांतील काँग्रेसच्या अशा अनैतिक वर्तनाचे दाखले देत विरोधकांची तोंडे बंद आणि आपल्या चुकीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. लोकशाही मूल्यांना हरताळ फासत जनतेची दिशाभूल करणारी भाजपची भूमिका अतिशय योग्य शब्दात या संपादकीयातून मांडली आहे.

– राजकुमार कदम, बीड

 

हा मोदी-शहा यांच्या धटिंगणशाहीचा पराभव

सत्तेच्या मोहापायी एखादा पक्ष किती ताळतंत्र सोडून वागू शकतो हे ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून मिरविणाऱ्या भाजपने कर्नाटकात दाखवून दिले. पूर्वी निदान सभ्यतेची, नैतिकतेची वस्त्रे लेवून तरी राजकारण केले जात होते; पण आता अशी वस्त्रे परिधान करण्याची कोणाला गरजच वाटत नाही. सगळाच खुल्लमखुल्ला मामला- मग चित्रपटसृष्टी असो की राजकारण.

चुकीच्या, अनैतिक कामांमध्ये लागोपाठ यश मिळत गेले की कर्त्यांला आपण जे करीत आहोत तेच योग्य आहे असे वाटू लागते आणि तो निर्ढावतो. भाजपचेही तेच झाले होते. तोच अतिआत्मविश्वास भाजपला नडला. त्यात राज्यपालांनी सर्व संकेत गुंडाळून ठेवत बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्यामुळे तर भाजपला आकाशच ठेंगणे वाटू लागले होते. त्यांचे पाय जमिनीवर टेकवले ते सर्वोच्च न्यायालयाने! सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली १५ दिवसांची मुदत २४ तासांवर आणून ठेवली नसती तर साम, दाम, दंड, भेद नीतीचा पुरेपूर वापर करून भाजपने आपले बहुमत सिद्ध केलेच असते. येडियुरप्पांना बहुमत ठराव मांडण्याआधीच जो राजीनामा द्यावा लागला तो त्यांचा पराभव नव्हता, तर अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या धटिंगणशाहीचा होता!

– मुकुंद परदेशी, धुळे</strong>

 

भाजपला अतिआत्मविश्वास नडला

‘साग्रसंगीत मुखभंग’ हे विशेष संपादकीय भाजपच्या धुरीणांना खडे बोल सुनावणारे आहे.. मराठीत ‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो’ अशी एक म्हण आहे. कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासंदर्भात भाजप नेतृत्वाने काँग्रेससह इतर विरोधी पक्ष, टीकाकार, माध्यमे अशा सर्वानाच असा काळ सोकावण्याची संधी दिली असे म्हणावेसे वाटते. या सर्व प्रकरणात भाजपकडून जो अतिआत्मविश्वास दाखविण्यात आला तो त्यांना नडला असे दिसून येत आहे.

– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>

 

राज्यपालांनी यापुढे तरी योग्य निर्णय द्यावेत

कर्नाटकच्या निमित्ताने एकूणच राज्यपालांच्या ‘विशेषाधिकाराच्या’ निर्णयांचा मुद्दा पुढे आला. हे एक बरेच झाले. बहुतेक वेळा संवैधानिक पदांवरील व्यक्तींकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांबद्दल पक्षपातीपणा केल्याचे आरोप होत आले आहेत. आपल्या अधिकारांचा गैरवापर होऊ  न देणे आणि पक्षपातीपणा न होता निर्णय घेणे अपेक्षित असते.  कर्नाटकच्या निमित्ताने संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून यापुढे तरी सदसद्विवेकबुद्धीचा वापर होऊन योग्य निर्णय होतील अशी आशा आहे.

– अनंत बोरसे, शहापूर

 

माणूस प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधतोच..

‘रिकाम्या हातांची स्वप्नं..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, १९ मे) वाचला. कामकरी कष्टकरी हातांना बिनकामी बनवणाऱ्या यांत्रिकतेचे स्वागत. आता प्रश्न उरलाय तो रिकाम्या हातांच्या कामांचा! तर, माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला कळून येतं की यंत्र हाच मानवाच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा द्योतक ठरलेला आहे. त्याची सुरुवात चाकापासून आज रोबोटपर्यंत येऊन ठेपलेली आहे. जसजशी बेरोजगारी वाढत गेली तसतशी नवीन क्षेत्रं माणूस शोधत आलाय. त्यामुळेच बेरोजगारीच्या प्रश्नाला इतिहासाच्या विविध टप्प्यांवर उत्तरं मिळत गेली. पण चाकापासून सुरू झालेल्या या प्रवासानं मानवाचं जीवन मात्र यंत्रानं व्यापलं. फक्त त्याचा अनिष्ट असा परिणाम माणसाच्या भावनिक जीवनात व्हायला नको. बाकी माणूस हा प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधणारा बुद्धिमान प्राणी आहे. ‘गरज ही शोधाची जननी’ हेच आपलं बोधवाक्य सफल ठरवणारा तो एक शोधक आहे आणि  गतिरोधकालाही पार करून पुन्हा आपली गती पूर्ववत आणणारा तो चालक आहे.

– करणकुमार जयवंत पोले, पुणे

 

निवडूया ते सत्त्व आता निके!

‘इमोजींची बखर!’ हे संपादकीय (१९ मे) वाचले. भाषा हे दैनंदिन जीवनात व्यावहारिक संवादाचे साधन आहे. पण  त्याबरोबरच प्रतिभाशाली लेखक कवींच्या आविष्काराचे ते माध्यम आहे. काळाच्या ओघात टिकून राहणाऱ्या साहित्याला त्यातील गुणवत्तेएवढीच रसिक वाचकांची सक्रिय साथ असणेही महत्त्वाचे असते. आजच्या आत्यंतिक उपयुक्ततावादाच्या काळात शाळा व महाविद्यालयांतून दिल्या जाणाऱ्या भाषाशिक्षणात साहित्याला दुय्यम स्थान मिळत असलेले दिसते. नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा हे शिकवणे गरजेचे आहे पण ‘कशासाठी पोटासाठी’ इथेच थांबायचे? ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ हे विसरून जायचे? वाङ्मयाच्या अभ्यासाने भावनांचे पोषण होते, त्यांचे उन्नयन होण्याची शक्यता निर्माण होते यावर विश्वास नसल्यासारखे वातावरण जर मुलामुलींच्या अवतीभवती असेल तर भाषेची अवस्था काळजी वाटण्यासारखी होणार यात नवल ते काय? ‘फोले पाखडिता तुम्ही’ असे म्हणणाऱ्या केशवसुतांचे ‘निवडितो ते सत्त्व आम्ही निके’ हे शब्द आपण विसरलो की काय?

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

 

चरित्र, आत्मचरित्र हे मानवी मन समृद्ध करणारे नाही?

‘इमोजींची बखर!’ या संपादकीयात उपस्थित केलेले मुद्दे चिंतनीय आहेत. त्यातील फक्त एका मताशी असहमती दर्शवण्यासाठी हा पत्रप्रपंच. कथा, कादंबऱ्या, कविता या ललित साहित्याचा वाचक वर्ग कमी आहे. ‘हे वाङ्मय भाषा समृद्ध करणारे व मानवी मन सुसंस्कृत करणारे आहे. तुलनेत चरित्र, आत्मचरित्र म्हणजे एका अर्थाने माहितीपर प्रेरणादायी लिखाण याचा वाचकवर्ग मोठा आहे’. माझा प्रश्न असा की चरित्र, आत्मचरित्र हे वाङ्मय भाषा, मानवी मन समृद्ध, सुसंस्कारित करणारे नाही का? त्यातूनही आपल्याला त्या त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणाचे ज्ञान होतेच. त्यामुळे मराठी भाषेचे व पर्यायाने समाजाचे भवितव्य या कारणामुळे (इतर अनेक कारणांपैकी एक) कठीण आहे, असे मला अजिबात वाटत नाही.

– सुनीती देव, नागपूर

 

नोकरभरतीत तरी पारदर्शकता ठेवा

राज्यातील विविध शासकीय विभागांत आता कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. आर्थिक कुवत नसतानाही सरकारी नोकरीच्या आशेने दिवसरात्र अभ्यासिकांमध्ये दिसणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थीसाठी ही सुखावह बातमी असली तरी आता खरा प्रश्न हा आहे की ही  भरती किती पारदर्शकतेने होणार? पोलीस भरतीतील गैरप्रकार सतत वाचनात येताहेत. सरकारी नोकरभरतीवर पैसेवाल्यांची व राजकारण्यांची नजर असते.  प्रत्येक पदाचे अगदी रेट ठरलेले असतात. त्यामुळे फडणवीस सरकारला एवढीच विनंती आहे की आताची ३६ हजार पदे अगदी ‘पारदर्शक’ पद्धतीने भरली जावीत; नसता हेच बेरोजगार परीक्षार्थी येत्या विधानसभेत तुम्हालाही बेरोजगार करून टाकतील!

– रवींद्र अण्णासाहेब देशमुख, मु. ढोकसाळ, ता. मंठा (जालना)