सावध ऐका पुढल्या हाका..

‘जीवघेण्या शांततेतला प्रश्न..’ या रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या लेखाने (२८ फेब्रुवारी) कित्येकांच्या मनातील अस्वस्थता नेमकी टिपली आहे. मागील आठवडय़ातील दिल्लीतील घटनाक्रम ही अस्वस्थता वाढवणाराच आहे. जेव्हा काही समाजकंटक रस्त्यावर येऊन काही विघातक करू धजतात, त्या वेळी त्यांचे यश हे फक्त आणि फक्त पोलीस व सरकारचे अपयशच सिद्ध करते. अशा वेळी तातडीची उपाययोजना काय केली याचे स्पष्टीकरण न्यायालय मागते, यात गैर ते काय? यावर सुनावणी घेणाऱ्या, पोलिसांना २४ तासांत उत्तर मागणाऱ्या न्यायाधीशाची बदली होते आणि यावर कडी म्हणजे नंतर सुनावणी घेणारे न्यायवृंद सरकारला उत्तरासाठी चार आठवडय़ांची मुदत देते! हे सारेच धक्कादायक व निराशा वाढवणारे आहे. खरे तर लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि न्यायपालिका यांच्या निष्पक्ष आणि क्रियाशील असण्यानेच लोकशाही जिवंत राहू शकते. मात्र गेल्या काही वर्षांत या सर्व संस्थांच्या स्वतंत्र अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटत आहे. या सर्व संस्था व लोकांनी निवडून दिलेले सरकार हे शेवटी जनतेलाच उत्तरदायी असतात. त्यामुळे आता लोकांनीच वैधानिक मार्गाने यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात करायला हवी. अन्यथा, हे असेच चालू राहिले तर येत्या काही वर्षांत याचे घातक परिणाम दिसून येतील. एकुणात, सावध ऐका पुढल्या हाका..

– डॉ. स्वाती लावंड, मुंबई</p>

जखमा चिघळवणारी वक्तव्ये नकोत

न्या. एस. मुरलीधर यांच्यावरील ‘व्यक्तिवेध’ (२८ फेब्रुवारी) आणि ‘न्यायमूर्ती मुरलीधर बदलीबाबत दक्षता आवश्यक होती; माजी सरन्यायाधीश बाळकृष्णन यांची स्पष्टोक्ती’ ही बातमी (लोकसत्ता, १ मार्च) वाचल्यावर न्या. मुरलीधर यांच्या बदलीचा संबंध मारूनमुटकून दिल्ली दंगलीशी जोडून त्यावर बुद्धय़ा विवाद्य वक्तव्य करण्याकडे तथाकथित विचारवंतांचा कल दिसून येतो. मुरलीधर यांच्या बदलीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने १२ फेब्रुवारी रोजी, म्हणजे दिल्ली दंगलीच्या पूर्वी बरेच दिवस आधी केलेली आहे. त्यांच्या बदलीच्या निर्णयास खुद्द मुरलीधर यांचीही संमती आहे. अशा परिस्थितीत ओढूनताणून त्यांच्या बदलीच्या निर्णयाचा संबंध दिल्ली दंगलीसंबंधी पोलीस कारवाईवरील त्यांच्या विधानांशी लावणे, हा आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न वाटतो. जे विचारवंत देशातील सद्य:स्थितीमुळे अस्वस्थ असल्याचा दावा वारंवार करतात, त्यांनी जनतेच्या जखमा चिघळवणारी वक्तव्ये करणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

वाचाळवीरांच्या मुक्ताफळांमुळे शंका येणारच!

‘राजकारणापलीकडचे ‘नागरिकत्व’’ (२६ फेब्रुवारी) या माधव गोडबोले यांच्या लेखावरील ‘बेकायदा स्थलांतरितांना कुठल्याही स्वरूपात ‘समाविष्ट’ करणे तार्किकदृष्टय़ा अयोग्यच’ या मथळ्याखालील वाचकपत्र (लोकमानस, २८ फेब्रु.) वाचले. पत्रलेखकाने- ‘मोदी सरकारने आणलेली ‘नागरिकत्व कायदादुरुस्ती’ ही भारत हिंदू राष्ट्र बनवण्याच्या ध्यासापायी आल्याचे का वाटावे?’ असा प्रश्न केला आहे. परंतु मोदी-शहा यांची निवडणूक प्रचारादरम्यानची वक्तव्ये व भाजपच्या वाचाळवीर नेत्यांची मुक्ताफळे ऐकल्यावर कुणाच्याही मनात- ‘रा. स्व. संघाला अभिप्रेत असलेले हिंदू राष्ट्र सरकारला प्रत्यक्षात आणावयाचे आहे,’ अशी शंका येणे साहजिक आहे. भारतात दाखल झालेले घुसखोर देशाबाहेर काढले पाहिजेत हे मान्य केले; तरी त्यासाठी घाईघाईत, संसदेत सखोल चर्चा न करता आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने सरकारच्या हेतूंवर संशय निर्माण होतो. त्याचे स्पष्टीकरण देताना, सरकारने- ‘यामुळे कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही,’ अशी दिलेली आश्वासने म्हणजे ‘जुमलेबाजी’ तर नाही ना, अशी रास्त शंका घ्यायला जागा आहे. कारण याद्वारे शेजारच्या देशांतील गैरमुस्लीम नागरिकांना भारतात सामावून घेत आपली हिंदुत्ववादी मतपेढी बळकट करून हिंदू राष्ट्रनिर्मितीला चालना देण्यासाठी याचा वापर केला जाणार नाहीच, असे खात्रीने म्हणता येत नाही. नपेक्षा आधीच लोकसंख्यावाढीमुळे देशासमोर कैक आव्हाने उभी असताना असल्या अव्यापारेषु वृत्तीचे समर्थन होऊ शकत नाही.

– डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)

मनेच स्वच्छ नाहीत; देश कसा स्वच्छ होणार?

दिल्ली येथील हिंसाचाराच्या बातम्या वाचताना नानी पालखीवाला यांच्या ‘वुई, दी नेशन : दी लॉस्ट डीकेड्स’ या १९९० साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील एक परिच्छेद आठवला. त्याचा भावानुवाद असा : ‘भारतासमोरची सर्वात मोठी अडचण ही आहे की, विद्वान, चांगल्या चारित्र्याचे आणि दूरदृष्टी असलेले लोक राजकारणात नाहीत आणि सध्याच्या अंध:कारमय राजकारणात ते निवडून येणेही अवघड. जात आणि धर्म हा आजच्या सार्वजनिक जीवनात एक राजकीय फुटबॉलचा खेळ झाला आहे. दुर्दैवाने फुटीरता हा एक भारतीय रोग झाला आहे. फुटीरतेचा हा रोग ‘एड्स’सारखा वेगाने आणि सर्वत्र पसरत आहे, सर्वसामान्यांची मने कलुषित करीत आहे आणि यावर कोणताच उपाय दृष्टिक्षेपात नाही. जातीयवाद, भाषिकवाद आणि प्रांतवाद यांमुळे राष्ट्रीय एकता आणि अखंडता धोक्यात आहे. वाढत्या दहशतवाद्यांना आणि पोसलेल्या गुंडांना जात आणि कूळ, भाषा आणि धर्म हे भेद आपल्याच देशबांधवांची हत्या करण्यास पुरेसे आहेत. यावर त्वरित उपाय म्हणून लोकांच्या भावना आणि मने साफ केली पाहिजेत. नैतिकता हा भारतीय समाजाचा पाया आहे, त्याचा लाव्हारसामध्ये रूपांतर होऊ देता नये. एकतेची भावना आणि निरनिराळ्या विचारधारांमधला सुसंवाद हाच सर्व धर्माचा पाया आहे आणि हाच आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा गाभा आहे.’

हरी नारायण आपटे यांच्या कादंबरीच्या शीर्षकाप्रमाणे ‘पण लक्षात कोण घेतो?’ हा प्रश्न आहे. नेत्यांची मनेच स्वच्छ नाहीत आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत आहेत. देश कसा स्वच्छ होणार?

– अशोक वासुदेव बक्षी, सातारा</p>

जगणे एकविसाव्या शतकात, मन मात्र सोळाव्या शतकात

‘घरचे वारेच बदलले पाहिजे!’ या संपादकीयात (२९ फेब्रुवारी) लिहिल्याप्रमाणे, आपल्या भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे आधुनिक तंत्रज्ञान वापरून परंपरांचे समर्थन करणारा अंतर्विरोध ठळकपणे दिसतो. याचे कारण आपण वैज्ञानिक सृष्टी घेतली, पण वैज्ञानिक दृष्टी नाही घेतली, हे आहे. म्हणून- ‘महाभारतातील कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाचा संजयाने ‘आँखोदेखा हाल’ बसल्या जागेवरून अंध धृतराष्ट्राला सांगितला, हे म्हणजे आजचे दूरदर्शन.. ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉम्ब.. अग्निअस्त्र म्हणजे आजचे मिसाइल्स.. पर्जन्यास्त्र म्हणजे कृत्रिम पाऊस पाडण्याची क्रिया.. एवढेच काय, गणपतीला हत्तीचे मुंडके लावणे म्हणजे माणसाच्या धडावर प्राण्याचे शीर जोडणे, ही तर जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी.. हे सगळे आपल्या वेदातील आणि रामायण-महाभारतातील ज्ञान जर्मनांनी पळवले, मग या पाश्चात्त्यांनी शोध लावून आपल्याच नावावर खपवले,’ अशा पद्धतीचा आक्रोश करून आपले पंतप्रधान आणि काही तथाकथित शास्त्रज्ञ पूर्वजांच्या वैज्ञानिक प्रगतीच्या (?) नावाने आपले वर्तमानातील अपयश दडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे भलेही आपली अस्मिता सुखावत असेल, पण वैज्ञानिक कृती मात्र शून्यच होते. ज्या देशात पंतप्रधानांची विज्ञान सल्लागार समिती बरखास्त केली जाते आणि मूलभूत संशोधन करणाऱ्या विज्ञान संस्थांच्या संशोधन निधीत कपात करून त्याऐवजी गोमूत्र व गोमयावर संशोधन करणारी तथाकथित वैज्ञानिकांची समिती स्थापून त्यांना भरपूर निधी उपलब्ध करून दिला जातो, आणि खऱ्या वैज्ञानिकांना मोर्चा काढावा लागतो, अशा देशाचे भवितव्य किती अंधकारमय असेल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही.

वैज्ञानिक पद्धत पूर्वग्रहरहित असते; पण वैज्ञानिक हा हाडामांसाचा माणूस असल्यामुळे तो पूर्वग्रहदूषित असू शकतो. त्याला प्रलोभने भुलवू शकतात, स्वार्थ तर्कदुष्टतेकडे नेऊ शकतो. विज्ञानाचा विकास हा वैचारिक खुलेपणाच्या अवकाशात व विवेकाच्या चौकटीत होत असतो; त्याचा गाभा मानवकेंद्रित आहे, हे भान राखले तरच आपली वाटचाल अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे होऊ शकेल. विज्ञानाची रीती (आधुनिक तांत्रिक उपकरणे) आपण सहजच उचलली, पण विज्ञानाची नीती (निरीक्षण, प्रयोग, कारणमीमांसा आणि निष्कर्ष) नाही स्वीकारली. म्हणूनच भारतीय समाजात विसंगती भरली. म्हणूनच जगणे असते एकविसाव्या शतकात, पण मन मात्र सोळाव्या शतकात!

– जगदीश काबरे, सीबीडी (नवी मुंबई)

आणखी काही गंमत.. आणखी काही विषाद..

‘घरचे वारेच बदलले पाहिजे!’ हे शनिवारचे संपादकीय (२९ फेब्रुवारी) वाचले. गंमत किंवा विषाद वाटण्याजोगी आणखी एक बाब अशी की, कुठल्याही वैज्ञानिक प्रयोगाची सुरुवात शालेय शिक्षणात ‘साहित्य’ लिहून होत असे (आणि त्यानंतर अर्थातच ‘कृती’)! परंतु त्यानंतर जसजसा दहावी / बारावीचा दबाव वाढू लागतो, तसतसे ‘साहित्या’चे महत्त्व कमी करून विज्ञानाकडे लक्ष वळवावे लागते. तेव्हापासूनच साहित्य आणि एकूणच कला एका बाजूला आणि विज्ञान/गणित दुसऱ्या बाजूला, अशी विभागणी मनोमन होऊन त्यातून एक निवडावे लागते. भविष्यात ही फारकत आणखी वाढत जाऊन मग संपादकीयात वर्णन केलेली परिस्थिती उद्भवते. वास्तविक साहित्यनिर्मिती करण्यामागची आणि नवीन वैज्ञानिक शोध लावण्यामागची प्रेरणा मूलत: एकसारखीच असते असे वाटते. त्या नवनिर्मितीकरता आवश्यक असलेल्या इतर गोष्टीसुद्धा (उदा. निरीक्षणशक्ती, जिज्ञासू वृत्ती, चिकाटी, इत्यादी) दोन्हींकडे तशाच असाव्या लागतात. मूळ शिक्षण कलाशाखेत घेऊन नंतर विज्ञान वा व्यवस्थापनशास्त्रात उच्चशिक्षण घेऊन मोठमोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अनेक व्यक्ती पाश्चात्त्य देशांत दिसतात; परंतु आपल्याकडची मानसिकता मात्र या दोन्हींची लहानपणापासून फारकत करणारीच आहे.

आणखी एक गंमत म्हणा वा विषाद म्हणा, पण आपल्याकडे चौसष्ट कलांचा अधिपती असलेली देवताच विज्ञानाचीही देवता आहे, पाश्चात्त्य समाजात नाही.. आणि त्याची प्रार्थना ‘त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:’ आणि ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि’ अशी दोन्हींची सांगड घालत आपणच करतो.. पाश्चात्त्य समाज नाही! घरचे वारेच बदलले पाहिजेत ते हे असे!

– प्रसाद दीक्षित, ठाणे</p>