मोदींनी साडेचार वर्षांत देशाची केलेली प्रगती काँग्रेसच्या सर्व पंतप्रधानांनाही जमली नाही!

‘काँग्रेसला सत्ता मिळाल्यास प्रत्येक नागरिकाला किमान उत्पन्न हमी दिली जाईल, तसेच देशातून भूक आणि गरिबी हद्दपार करणे हे आमचे ध्येय व वचन आहे – राहुल गांधी’ हे वृत्त (२९ जाने.) वाचले. देशावर सत्तर वर्षे राज्य करूनही अशा घोषणा कराव्या लागतात यातच काँग्रेसने इतक्या वर्षांच्या सत्तेत काहीही केले नसल्याची प्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. तसेही लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लीम लांगूलचालन हेच तर काँग्रेसचे प्रमुख कर्तृत्व होते. आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साडेचार वर्षांत देशाची जेवढी प्रगती केली व आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला जेवढी प्रतिष्ठा मिळवून दिली तेवढी प्रगती काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांना मिळून करता आलेली नाही हे कटू सत्य आहे. फक्त हे मान्य करायला सदसद्विवेकबुद्धी आणि मनाचा सच्चेपणा हवा. वृत्तपत्रांकडून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून या प्रगतीची प्रशंसा तर सोडाच, साधी दखल घेतली जाण्याचीसुद्धा भारतप्रेमी नागरिकांची यित्कचितही अपेक्षा नाही. त्यामुळेच येत्या निवडणुकीनंतर जर आपण नरेंद्र मोदींना पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून पाहू शकलो नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच. कारण नुकसान शेवटी देशाचेच होणार आहे.

– विजय चव्हाण, ठाणे</p>

‘टिस्को’ प्रकरण कसे विसरता येईल?

‘जॉर्ज आंधळे समाजवादी नव्हते’ हे अर्धसत्य आहे, असेच वाटते. आयुष्याच्या पूर्वार्धात ते नक्कीच आंधळे समाजवादी होते, हे आयबीएम व कोकाकोला यांच्या उदाहरणांवरूनच सिद्ध होते. ‘खेडय़ापाडय़ांत पिण्याचे पाणी मिळत नाही, पण कोकाकोला मिळते’ ही त्यांची तद्दन समाजवादी आगपाखडच नव्हती का? तसेच त्यांनी ‘टिस्को’चे राष्ट्रीयीकरण करण्याचा अगोचर प्रयत्नही करून पाहिला होता. ‘टिस्को’च्याच ५० हजार कामगारांनी भव्य मोर्चा काढून ‘टिस्को’चे राष्ट्रीयीकरण करू नये, अशी मागणी केली व या धडाडीच्या कामगार नेत्याला जबरदस्त चपराक दिली, हे कसे विसरता येईल? कदाचित त्यामुळे असेल किंवा इतर काही कारणांनी समाजवादाचा फोलपणा लक्षात आल्यामुळे असेल, पण उत्तरायुष्यात त्यांचा समाजवादी कडवेपणा कमी झाला असावा. हे खरे असेल, तर मात्र त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद द्यायलाच हवी!

– सुहास वसंत सहस्रबुद्धे, वडगाव धायरी (पुणे)

ही कौतुक करण्याजोगी गोष्ट आहे?

जॉर्ज फर्नाडिस यांच्यावरील ‘रोमॅन्टिक आणि रसरशीत’ या अग्रलेखात (३० जाने.) त्यांच्या रसिकतेने जगण्याचा उल्लेख आहे. ‘गोवा, मुंबई ते दिल्ली या मोठय़ा प्रवासात त्यांच्या रसिकतेचे अनेक साक्षीदार आहेत,’ असेही कौतुकाने अग्रलेखात लिहिले आहे. वाजपेयी यांच्यावरील मृत्युलेखातसुद्धा अनेकांनी असा सूर लावला होता. खरोखर ही कौतुक करण्याजोगी गोष्ट आहे का? एखादी तनुश्री यांना भेटली असती तर याच माध्यमांनी या दोघांना फाडून खाल्ले असते. एम. जे. अकबर किंवा नारायण दत्त तिवारी यांचे काय झाले हे आपण पाहतोच. अभिषेक मनु संघवी यांनासुद्धा या कारणासाठी कारवाईला तोंड द्यावे लागले  होते. त्यांचे रसिक म्हणून कौतुक का नको? माध्यमे याबाबत दुहेरी मापदंड लावत आहेत.

– श्रीराम बापट, दादर (मुंबई)

बापूंच्या विचारांचे आचरण किती देश करतात? 

‘मरून उरलेले महात्मा’ हा डॉ. विवेक कोरडे यांचा लेख (३० जाने.) वाचला. जगात नुसते आदर्श असून चालत नाही, तर त्या व्यक्तीचा आदर्श त्यांच्या अभ्यासकांनी व कार्यकर्त्यांनी समाजात किती उतरवला याला फार महत्त्व आहे. आज भारतातील सर्व पक्ष; समाज या बाबतीत किती प्रामाणिक आहेत? स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी गांधीजींना अपेक्षित असलेला भारत अस्तित्वात आला आहे का? जर तो नसेल तर का नाही? यावरही आपल्यासारख्या अभ्यासकाने जरूर विचार मांडावेत.  अपकारांची फेड उपकाराने करावी असा विचार अमलात आणणारे आज जगात किती देश आहेत? जगातील १८० देश महात्माजींचे १५० वे जन्मवर्ष साजरे करीत आहेत; पण महात्माजींच्या विचारांचे आचरण किती देश करतात?

-जयंत ओक, पुणे

हे शाळाबाह्य़ उपक्रम राजकीय स्वार्थासाठीच!

‘पंतप्रधानांची परीक्षा पे चर्चा’ ही बातमी (३० जाने.) वाचली. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला खुशीत सामोरे जा, तुमची परीक्षा स्वत:शीच आहे, परीक्षेला एक संधी म्हणून बघा, दहावी किंवा बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नाही..असे एक ना अनेक जे काही अनमोल ‘धडे’ दिले ते एक प्रकारे योग्यच. देशाचा पंतप्रधानच असं समाजहिताचं ‘शैक्षणिक’ काम करत असेल तर बरंच झालं असं म्हणावं लागेल. मात्र एक प्रश्न अनुत्तरितच राहतो की त्यांनी ही जी काही चर्चा घडवून आणली ती कोणत्या आधारावर? भारताचे पंतप्रधान म्हणून की भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी म्हणून? शालेय जीवनात ते एक उत्कृष्ट विद्यार्थी होते किंवा काय हे जाणकारांनी एकदा स्पष्ट करावे. आपण प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रातच वावरावं हा सर्वसामान्य नियम. सचिन तेंडुलकरने गोल कसा करावा हे सांगू नये किंवा षटकार कसा मारावा हे अमिताभ या महानायकाच्या तोंडून ऐकण्याची आमची अजिबात इच्छा नाही. ही शंका उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे, एरवी नोटाबंदीवरील रिझव्‍‌र्ह बँकेचा अहवाल असेल किंवा झुंडशाहीने संस्कृतिरक्षणाच्या स्वार्थी कर्तव्यापोटी हकनाक मारलेल्यांचे बळी असोत – अशा महत्त्वाच्या मुद्दय़ावर सोयीस्करपणे मौन बाळगून असलेले पंतप्रधान अशा ‘परीक्षा पे चर्चा’ मात्र आवर्जून घेतात. त्या टाइमपास चर्चेची सक्तीसुद्धा केली जाते. बरं त्यांना विद्यार्थ्यांची जाणीव आहे असं म्हणावं तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे असे उपक्रम घेतले की काय तेही एकदाचं स्पष्ट करावं. या चच्रेमागचा त्यांचा व संबंधितांचा छुपा (राजकीय) उद्देश मात्र ते हेतुपूर्वक लपवण्यात पुरते यशस्वी झालेले दिसतात. दहावी किंवा बारावीचे विद्यार्थी म्हणजे एकदम कोरी पाटी. आपल्याला त्यावर जे काही लिहायचं ते अगदी मोकळेपणाने आपण बिनदिक्कतपणे लिहू शकतो.  या राजकीय स्वार्थापोटीच कदाचित त्यांनी या अराजकीय उपक्रमाचा घाट घातला असावा. नवमतदारांवर त्यांची छाप नक्कीच पडेल हे आयोजकांनी पुरतं हेरलेलं असेल. तसे नसते तर हा कार्यक्रम दाखवायचा किंवा नाही याचं स्वातंत्र्य संबंधित शाळांना दिलं गेलं असतं. कळस म्हणजे शाळांना कार्यक्रमाचा अहवालदेखील ठरावीक वेळेत पूर्ण करायला सांगितलाय. निवडणुकीच्या तोंडावर या (अ)राजकीय शाळाबाहय़ शैक्षणिक उपक्रमातूंन त्यांना त्यांचा हेतू नक्कीच पूर्ण करता येईल. प्रश्न असा आहे की पालक हा राजकीय हेतू ओळखून आपला सुज्ञपणा कसा आणि किती दाखवतील?

-राहुल काळे, बुलढाणा

 मोबाइलचा गैरवापर वाढतच आहे..

‘तुमचा मुलगा पबजी खेळतो का?’ असा प्रतिप्रश्न ‘परीक्षा पे चर्चा’च्या दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमात एका मोबाइलने त्रस्त झालेल्या पालकांनी ऑनलाइन गेमविषयी विचारताच पं्रतप्रधान मोदींनी उत्तर दाखल करताच सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. पण ही गोष्ट खरंच हसण्याजोगी आहे का याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. एखादा विषय निबंधात ‘मोबाइल : शाप की वरदान’ म्हणून आला की समजावं लागतं त्याच्या फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होतं आहे. याच चच्रेत मोदींना आणखी एका पालकाने ऑनलाइन गेमच्या वाढत्या क्रेझविषयी विचारलं असता त्यांनी मोबाइलच्या वापरातून माहितीही मिळवता येते हे मुलांना पटवून सांगण्यास सांगितले. पण माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या मोबाइलचाच नंतर गैरवापर वाढत आहे. आज रेल्वे स्थानक, बस कोणत्याही ठिकाणी नजर जाईल तिथे शालेय मुलेच नाही तर प्रत्येक वयातील पिढी मोबाइलमध्ये गुंतलेली दिसते.

– मयूर प्रकाश ढोलम, जोगेश्वरी (मुंबई)

तथाकथित आक्षेपार्ह दृश्ये मनावर  घेऊ नयेत

‘‘भाई’ चित्रपटात हिराबाईंचे चारित्र्यहनन’ ही बातमी (३० जाने.)वाचली. मुळात फिक्शन या सिनेप्रकाराबद्दल असा आक्षेप घेणे हे माध्यमाचे पुरेसे आकलन नसल्याचे लक्षण आहे. एखाद्या कादंबरीत लेखकाने /सिनेमात दिग्दर्शकाने एखाद्या व्यक्तीला कसे रंगवायचे हा त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. त्यात आपण लुडबुड करू नये. राहता राहिला प्रश्न चारित्र्यहननाचा. प्रभाताई, खरं सांगा दारू किती निषिद्ध आहे हो गानवर्तुळात? चित्रपट, नाटक, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गजांची वारुणी ही सखी होती आणि आहेही. त्यांच्या अनेक सुरस कथा आपण ऐकल्या आहेत. त्यामुळे ही तथाकथित आक्षेपार्ह दृश्ये फारशी मनावर घेऊ नका .

– गार्गी बनहट्टी, मुंबई

नेहरूंचा त्याग लक्षात घ्यावा

‘आगामी नेतृत्व सहमतीचे हवे’ हे पत्र (लोकमानस, ३० जाने.) वाचले. नितीन गडकरी यांच्या वाक्याचा संदर्भ जरी बरोबर असला तरी या पत्रात गांधी घराण्याने देशाचे वाटोळे केले आहे, असे पत्रलेखक म्हणतात. वास्तविक देश स्वतंत्र झाला तेव्हा व नंतर ज्या योजना काँग्रेसने सुरू केल्या त्यामुळे अद्यापही भारताला कधी भीक मागत कारभार करावा लागला नाही. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरूंनी कैक वेळा तुरुंगवास भोगला, हा इतिहास बहुधा पत्रलेखकाला ध्यानात नसावा. केवळ सध्याच्या नेतृत्वावरून नेहरू किंवा गांधी घराण्यावर टीका करताना त्यांनी त्याग केला आहे हे लक्षात घ्या.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>