26 October 2020

News Flash

कालगणना : अधिक मास

अधिक महिना पावसाळ्याइतका नियमित नसला तरी चांद्रमासावर आधारित शकसंवत कालगणनेनुसार साधारणपणे ३० ते ३३ महिन्यांतून एकदा येतो.

आपले सर्व सणवार व्रते इत्यादी चांद्रमासावर आधारित ऋतू, वार, तिथीदिवस याच्याशी निगडित असतात म्हणून या अधिकमासाचे महत्त्व.

दिवाकर गोडबोले – response.lokprabha@expressindia.com

‘नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ हे वचन शाळेत असताना घोकले होते. अधिक महिना पावसाळ्याइतका नियमित नसला तरी चांद्रमासावर आधारित शकसंवत कालगणनेनुसार साधारणपणे ३० ते ३३ महिन्यांतून एकदा येतो. हे का घडते याचा उलगडा करायचा हा प्रयत्न. व्यवहारात आपण ख्रिस्ताब्द कालगणनेचा (इसवी सन) वापर करतो. या कालगणनेत पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला सुमारे ३६५ दिवस ६ तास इतका कालावधी लागतो. प्रत्येक नवीन दिवसाची तारीख मध्यरात्री बारा वाजता सुरू होते. चंद्राच्या प्रदक्षिणेचा मार्ग गोलाकार नसून लंबवर्तुळाकार आहे. तसेच पृथ्वीचा दक्षिणोत्तर अक्ष साडेतेवीस अंश कललेला आहे आणि चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्गदेखील तिच्या विषुववृत्तीय अक्षाशी सुमारे पाच अंश इतका कललेला आहे. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्येला ग्रहणे होत नाहीत. प्रत्यक्षात चंद्र पृथ्वीभोवती आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी आपल्याला पृथ्वी स्थिर असून सूर्य आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतात असेच वाटते. सूर्य आणि चंद्राचा आकाशात फिरण्याचा भासमान मार्ग निश्चित आहे. या मार्गावर जे तारकासमूह अथवा नक्षत्रे दिसतात त्यांची संख्या २७ आहे. अश्विनी, भरणी, कृत्तिका, पूर्वा, भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नावाने हे नक्षत्र समूह ओळखले जातात. या २७ नक्षत्रसमूहांच्या १२ राशी कल्पिल्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर सूर्य या १२ राशी ओलांडतो. प्रत्येक राशी ओलांडायला सूर्याला सुमारे ३० दिवस लागतात, परत आकाशात त्याच राशिस्थानात पोचायला वर म्हटल्यानुसार ३६५ दिवस ६ तास वेळ लागतो. प्रत्येक इंग्रजी महिन्याच्या १४, १५ वा १६ तारखेच्या सुमारास सूर्य राशिसंक्रमण होते.

चंद्राची आकाशात फिरण्याची गती सूर्याच्या गतीपेक्षा जास्त आहे. चंद्र आपल्या गतीनुसार रोज एक नक्षत्र इतके अंतर ओलांडतो आणि २७ नक्षत्रे अंतर ओलांडायला त्याला २७ दिवस लागतात. तेवढय़ाच वेळात त्याची पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होते, मात्र पृथ्वीदेखील सूर्याभोवती फिरत असल्याने या सुमारे २७ दिवसांच्या कालावधीत ती आपले स्थान सोडून पुढे गेलेली असते म्हणून तेवढे अंतर पार करायला चंद्राला सुमारे अडीच दिवस जास्त वेळ लागतो आणि आकाशातील त्याच नक्षत्रस्थानी तो साडेएकोणतीस दिवसांनी दिसतो. हा एका चांद्रमासाचा कालावधी आहे. याप्रमाणे चंद्राच्या पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणांबरोबर सूर्याभोवती पृथ्वीची जवळपास एक प्रदक्षिणा पूर्ण होते. चंद्राच्या या १२ प्रदक्षिणांचा वेळ ३५४ दिवस होतो.

पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला सुमारे ३६५ दिवस सहा तास इतका वेळ लागतो. प्रत्येक वर्षांतील सहा तासांचा हा फरक दर चौथ्या वर्षी एक दिवस जास्त योजून नाहीसा करतात ते वर्ष लिप वर्ष म्हणून ओळखले जाते त्याच धर्तीवर चंद्राच्या पृथ्वी आणि पर्यायाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणारा ३५४ दिवस आणि पृथ्वीला सूर्य प्रदक्षिणेसाठी लागणारा ३६५ दिवस यातील सव्वाअकरा दिवस इतका फरक अंदाजे ३०-३२ महिन्यांनंतर एका जास्तीच्या चांद्रमासाची योजना करून नाहीसा करतात. हा तो अधिक मास! त्यामुळे सौरमानावर आधारित ऋतुचक्र (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) आणि चांद्रमासाच्या १२ महिन्यांचे ऋतुचक्र यांची सांगड घातली गेली आहे. अशा या अधिक मासाची निश्चिती करण्यासाठी पृथ्वीच्या आणि चंद्राच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना ते ज्या नक्षत्र/ राशीतून भ्रमण करताना दिसतात त्यात गती फरकामुळे चंद्र आणि पृथ्वीच्या स्थानात भासमान दिसणाऱ्या बदलाचा उपयोग केला आहे. त्यामुळे आपल्या देशात सौरवर्ष आणि चांद्रमास वर्ष यात ताळमेळ राखला गेला आहे.

कोणत्याही दिवशी सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी होय. अमावास्येनंतर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये सुमारे १३ अंशात्मक अंतर झाले म्हणजे तिथीबदल होतो. तिथी साधारणपणे २४ तास कालावधीची असली तरी हा कालावधी काही तास/ मिनिटे इतका कमीजास्त असू शकतो. याचे कारण म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर, त्यांच्या फिरण्याच्या कक्षा लंबवर्तुळाकार आहेत म्हणून त्यांच्यातील अंतर रोज बदलत असते, परिणामी त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण प्रभावदेखील बदलता असतो, म्हणून त्यांची एकमेकांभोवती आणि स्वत:भोवतीदेखील फिरण्याची गती सूक्ष्म प्रमाणात बदलते. त्यमुळे पंचांगात काही वेळा एकच तिथी लागोपाठच्या दोन दिवशी दिसते त्याला वृद्धितिथी, तसेच काही वेळा एका तिथीनंतर दुसऱ्या दिवशी क्रमाने येणाऱ्या तिथीऐवजी त्यापुढील दिवशीची तिथी दाखवलेली असते त्याला क्षय तिथी म्हणतात. प्रतिपदा ते चतुर्दशी व पौर्णिमा व त्याच क्रमाने, मात्र शेवटच्या दिवशी अमावास्या हा चांद्रमासाचा तिथीक्रम आहे. अमावास्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र सकाळी साधारणपणे एकाच वेळी उगवतात आणि सायंकाळी एकाच वेळी मावळतात. चंद्राची गती जास्त आहे. अमावास्येनंतर चंद्र आधीच्या दिवसापेक्षा साधारणपणे ५० मिनिटे सूर्यापेक्षा उशिरा उगवतो आणि सूर्यास्तानंतर मावळतो. पौर्णिमेला चंद्र साधारणपणे सूर्यास्तावेळी उगवतो व दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर मावळतो.

एखाद्या राशीत सूर्य असताना त्या महिन्यात जी अमावस्या होते त्यावरून त्या चांद्रमासाचे नाव निश्चित केले आहे. उदा. मेष राशीत सूर्य असताना जो चांद्रमास संपला तो चैत्र, कर्क राशीत सूर्य असते वेळी संपलेल्या चांद्रमासाचे नाव आषाढ. याचे अजून एक कारण संभवते ते म्हणजे चांद्रमासाचे पौर्णिमेच्या वेळी रात्रभर चंद्राबरोबर त्या महिन्याचे नक्षत्र दिसते. विशाखा नक्षत्र वैशाख महिन्यात तर कृत्तिका नक्षत्र कार्तिक महिन्यात. कोणत्याही राशीतील सूर्य संक्रमणाच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात दिसतो त्यापेक्षा गती जास्त असल्यामुळे तीन-चार नक्षत्रे ओलांडून पुढच्या नक्षत्रात पुढील सूर्य राशिसंक्रमणाच्या वेळी दिसतो. या आवर्तनात एखादे सूर्य राशिसंक्रमण वद्य चतुर्दशी, अथवा अमावास्येला मात्र अमावास्या कालावधी पूर्ण होण्याआधी घडते आणि त्यापुढील सूर्य राशिसंक्रमण पुढील चांद्रमासाचा कालावधी तिथी क्षय-वृद्धी तिथीमुळे साडेएकोणतीस दिवसांऐवजी काही तास कमी अवधीचा असल्यास त्यामुळे सूर्य राशिसंक्रमण अमावास्येला न घडता प्रतिपदा सुरू झाल्यावर काही वेळाने होते. त्यामुळे त्या मासात अमावास्या झाली मात्र सूर्य राशिसंक्रमण घडलंच नाही. अशा परिस्थितीत अमावास्येनंतर सुरू झालेल्या महिन्याला कोणते नाव द्यायचे असा पेच असल्याने प्राचीन पंचांगकर्त्यांनी सूर्य राशिसंक्रमण न घडलेल्या महिन्याला पुढील चांद्रमासाचेच नाव दिले, मात्र त्यास अधिक असे उपपद जोडले आणि तो त्या वर्षीच्या चांद्रवर्षांत अधिक म्हणजे जास्तीचा महिना असे म्हणून त्या चांद्रमासात १२ ऐवजी १३ महिने असतील अशी योजना ठरविली. अशी वेळ साधारणपणे तीस चांद्रमासानंतर अथवा त्यापुढील दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत येते.

शालिवाहन शके १९४२ साठी काही महिन्यातीन तिथी, सूर्य संक्रांतीसंबधी वेळा उदाहरणादाखल..  यापुढील चांद्रमास १६/१०/२०२० रोजी संपतो. त्या दिवशी अमावास्या समाप्ती मध्यरात्रीनंतर ०१.०१ वाजेपर्यंत आहे, मात्र १६/९/२०२० ते १६/१० २०२० रोजी अमावास्या कालावधी संपेपर्यंत म्हणजेच त्या चांद्रमासाच्या अवधीत सूर्य संक्रांत नाही. म्हणून त्या महिन्याचे नाव (अधिक) आश्विन असे असणार.

आपले सर्व सणवार व्रते इत्यादी चांद्रमासावर आधारित ऋतू, वार, तिथीदिवस याच्याशी निगडित असतात म्हणून या अधिकमासाचे महत्त्व. चैत्र ते आश्विन हे महिने अधिकमास म्हणून येतात कारण त्यांचा कालावधी तीस दिवसांपेक्षा कमी असतो. कार्तिक महिना क्वचित अधिकमास होतो. मार्गशीष, पौष व फाल्गुन या महिन्यांचा कालावधी तीस दिवस अगर काही तास इतका जास्त असू शकतो म्हणून ते कधीच अधिकमास नसतात. मात्र या तीन महिन्यांचा कालावधी ३० दिवसांपेक्षा थोडा जास्त असल्यामुळे बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर असे घडू शकते की मार्गशीर्ष, पौष अथवा फाल्गुन महिन्यात सौर राशिसंक्रमण त्या महिन्याची शुद्ध प्रतिपदा झाल्यानंतर लगेच होते आणि त्याच महिन्याची अमावास्या संपण्यापूर्वी दुसरे सूर्य राशिसंक्रमण होते. अशा एका चांद्रमासात दोन वेळा सूर्य राशिसंक्रमण झालेला महिना पंचांगकर्त्यांनी क्षयमास म्हणजे तो महिना त्या वर्षांत लोप पावला असे मानले आहे, मात्र अशा लोप पावलेल्या चांद्रमासाचे वर्षी एक अधिक महिनादेखील येतो म्हणून ते चांद्रवर्षदेखील १२ महिन्यांचेच असते.

आता यापुढील अधिकमास श्रावण शके १९४५ , त्यानंतर शके १९४८ ज्येष्ठ असे असतील, मात्र यानंतर क्षयमास असलेले चांद्रवर्ष इसवी सन २१२४ असणार अर्थात आपणापैकी कोणाला त्याची अनुभूती मिळणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 7:29 am

Web Title: adhik mas kalaganana dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ९ ते १५ ऑक्टोबर २०२०
2 मुंबईच्या रस्त्यांवर तो धावला लंडन मॅरेथॉन…
3 त्याची जगात कुठेही ‘शाखा’ नाही…
Just Now!
X