13 July 2020

News Flash

ट्रॅव्हलॉग : आपल्याकडचं पिरॅमिड!

पिरॅमिड पाहायचं म्हटलं की कुणालाही आठवतं ते इजिप्त. पण पिरॅमिड पाहायला तिथेच कशाला जायला हवं? अगदी इजिप्तच्याच धर्तीवर आपल्याकडेही पिरॅमिड आहे...

| October 31, 2014 01:04 am

lp55पिरॅमिड पाहायचं म्हटलं की कुणालाही आठवतं ते इजिप्त. पण पिरॅमिड पाहायला तिथेच कशाला जायला हवं? अगदी इजिप्तच्याच धर्तीवर आपल्याकडेही पिरॅमिड आहे…

पूर्वाचलातील सप्तभगिनींची भटकंती करताना मला असम राज्य सर्वात अधिक भावलं.! कारण निसर्गसौंदर्याची अगदी लयलूट केलीय परमेश्वराने या भागात.. काय पाहावं आणि किती पाहावं असं वाटत राहातं अगदी! अरुणाचल प्रदेशमध्ये येणारं, लोहित नदीवरील परशुरामकुंड पाहून दिब्रुगढला परतलो आणि तेथून बसने रात्रीच्या मुक्कामासाठी शिबसागर येथे पोहोचलो. काही झालं तरी शिबसागर पाहाणं चुकवू नका असं असम टूरिझमच्या गुवाहाटी ऑफिसमध्ये सांगण्यात आले होतं.त्यामुळे एक दिवस शिबसागरसाठी राखून ठेवला होता..! फार नाही, फक्त रात्रीचे आठच वाजलेले होते. पण शिबसागर अक्षरश: चिडीचूप झालेले होते.. असम टुरिझमच्या टुरिस्ट लॉजवर पोहोचावे कसे तेच कळेना.! शेवटी एका मारुती कारवाल्याने शंभर रुपये घेऊन पाच मिनिटांच्या अंतरावरील लॉजमध्ये सोडलं आणि अक्षरश सुटकेचा श्वास सोडला.

शिबसागर फार मोठं शहर नाहीय, पण आवर्जून भेट द्यावी अशी लहानमोठी अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत या गावात. कधी काळी पूर्वाचलातील अत्यंत बलशाली अहोम राजाच्या राजधानीचे शहर असलेले शिबसागर आजही आपल्या अंगा-खांद्यावर वैभवशाली अथितीच्या खाणाखुणा मोठय़ा अभिमानाने मिरवताना दिसते. ज्याच्यामुळे शहराला नाव मिळाले तो शिबसागर तलाव खरोखरीच दोनशे वर्ष जुना असून अंदाजे एकशेतीस एकर जागेत सामावलेला आहे. हा तलाव आणि तलावाच्या सभोवताली हाकेच्या अंतरावर असणारी तीन मंदिरे पाहाण्यासारखी आहेत. अहोम राजा शक्ती सिंह याच्या राणीने, मदांबिका देवीने शिवसागर हा तलाव आणि शिवाडोल, विष्णू डोल तसेच देवी डोल ही तीन मंदिरे इ.स. १७३७ मध्ये बाधून घेतली. यापकी शिवाडोल हे शिवमंदिर एकशे चार फूट उंच असून असममधील सर्वात उंच मंदिर आहे असे मानन्यात येते. खास असमीया स्थापत्यशैलीत बांधलेले हे तीन डोल म्हणजेच मंदिरे विटामातीच्या साहाय्याने बाधलेली असून अतिशय वेगळ्या धाटणीची आहेत.

अहोम राजे अत्यंत बलशाली आणि प्रभावशाली राज्यकत्रे होते. अहोम साम्राज्याने असमच्या भूमीवर जवळ जवळ सहाशे वष्रे अर्निबध सत्ता उपभोगली. अगदी इ.स. १८३८ मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेईपर्यंत! शिबसागर शहरापासून अवघ्या चार कि.मी.अंतरावर असलेला सातमजली करेंगघर हा राजवाडा आणि जवळच असलेले ‘रंगघर’ म्हणून ओळखले जाणारे प्रेक्षागृह अहोम राजांच्या वैभवशाली परंपरेची तसेच कलाप्रियतेची ग्वाही देते. शिबसागरमधील ही मोजकी प्रेक्षणीय स्थळं पाहून झाल्यानंतर तिथं थांबल्याचं समाधान मिळालं खरं. पण उरलेली दोन ठिकाणं पाहायला जाण्यासाठी वाहान उपलब्ध होईना. शेवटी तीस कि.मी. अंतरावरील चराईदेव ही जागा पाहाण्यासाठी आम्ही साधी बस पकडली. खरंतर चराईदेवला जाऊन काय पाहायचे आहे याची कल्पनाच येत नव्हती. तासाभरातच चराईदेवला पोहोचलो. एका विस्तीर्ण अशा शांत, निसर्गरम्य, वनराईमध्ये!

चराईदेव ही ‘अहोम’ राजांची पहिलीवहिली राजधानी! अहोम साम्राज्याची स्थापना सुखपा या राजाने इ.स. १२२९ साली केली होती. हा पहिला अहोम राजा, ‘चाऊ लुंग सिउ का फा’ चीनच्या नर्ऋत्य युनान प्रांतातून, उत्तरपूर्व हिमालयाच्या अति उंच पर्वतरांगा ओलांडून असमच्या हिरव्यागार निसर्गरम्य भूप्रदेशात येऊन स्थिरावला. लहानखुऱ्या डोंगररांगांनी नटलेल्या चराईदेव या भूमीलाच त्याने आपल्या पहिल्या राजधानीचा दर्जा दिला. वास्तवात अहोम राजांनी त्यानंतर अनेक वेळा आपल्या राजधानीचं स्थित्यंतर केलं. पण चराईदेवचं महत्त्व त्यांच्यालेखी कधीच कमी झालं नाही. कारण एकतर नागा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेलं चराईदेव अत्यंत निसर्गरम्य स्थळ आहेच, पण हे स्थळ आपल्या पूर्वपरंपरागत देवदेवतांचं निवासस्थान आहे, असा अहोम राजांचा दृढ विश्वास होता. त्यांच्या पूर्वजांचा देव लांकुरी, जो खरं तर भगवान शिवाचंच रूप होतं, त्याचा निवास त्याच परिसरात आहे असा ठाम विश्वास असल्यामुळे अहोम साम्राज्याच्या पहिल्या राजाच्या मृत्यूनंतर त्याला चिरविश्रांती देण्यासाठी चराईदेवची निसर्गरम्य वनराई निवडण्यात आली.

‘चराईदेव मदाम’ म्हणून ओळखले जाणारे हे निसर्गरम्य स्थळ पाहिल्यानंतर खरंतर आश्चर्यानं थक्कच झाले मी! कारण घनदाट वृक्षराजीनं नटलेल्या या घनगर्द हिरव्या परिसरात विस्तीर्ण जागेत लहान-मोठय़ा आकाराच्या अनेक अर्धगोलाकार टेकडय़ा होत्या. त्यावर हिरव्यागार हिरवळीचे आच्छादन होतं. सभोवताली फरसबंदी होती. प्रत्येक टेकडीच्या सभोवती अष्टकोनी आकाराची लहान उंचीची िभत होती. विशेष म्हणजे या सर्व अर्धगोलाकार टेकडय़ा म्हणजे अहोम राजाची आणि त्यांच्या कुटुंबीयांची थडगी होती. इजिप्तमधील lp56पिरॅमीडच्या धर्तीवर बांधण्यात आलेली! अगदी त्याच संकल्पनेवर आधारित बांधण्यात आलेली ही थडगी, ज्याला असमीया भाषेत ‘मदाम’असं म्हटलं जातं ती त्या प्रत्येक टेकडीच्या आत होती. आश्चर्याइतकंच नवलही वाटत होतं. असं म्हणतात की सुखपा राजाच्या इच्छेनुसार चराईदेवमध्ये पहिले थडगं बांधण्यात आलं. साधारणपणे जमिनीच्या खाली, घुमटाच्या आकारात विटामातीने बांधलेल्या मदाममध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक कक्ष असत. राजाच्या मृत शरीराबरोबर प्रसंगी राणी, नोकर, दासदासी, आवडते पाळीव प्राणी, आवडत्या वस्तूंसहित मौल्यवान गोष्टीही ठेवल्या जात असत आणि तद्नंतर थडगं बंद करण्यात येत असे. या घुमटाच्या मध्यभागी एखादा झरोकाही असे. थडग्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावर माती टाकून त्याला गोलाकार टेकडीसारखा आकार देण्यात येत असे. अशा अनेक टेकडय़ा या परिसरात पाहायला मिळतात. सुखपा राजाच्या मृत्यूनंतर अहोम राजघराण्यातील सर्वच राजांना आणि राजकुटुंबीयांना याच ठिकाणी चिरविश्रांती देण्याची परंपरा या राजघराण्यात चालू राहिली. असं म्हणतात की चराईदेवमध्ये एकूण एकशेपन्नासच्या वर मदाम होती. पण पुरातत्त्व विभागातर्फे फक्त तीस मदाम टेकडय़ांचं जतन केलं जात आहे.

या गोलाकार टेकडय़ा म्हणजे इजिप्तमधील पिरॅमीडसारखी थडगी आहेत हे ब्रिटिशांना कळल्यानंतर त्यांनी यापकी एका टेकडीला छेद देऊन, त्यातील थडग्याचे वास्तव स्वरूप पाहाण्यासाठी या थडग्याचं उत्खनन केलं होतं, ते थडगं आजही आपल्याला पाहता येतं. बहुतेक थडग्यांमधील मौल्यवान वस्तू ब्रिटिशांनी काढून घेतल्या असं म्हटलं जातं.! आजही लोक या ना त्या कारणाने, जाणता अजाणता, मदामांची नासधूस करतात. त्यामुळे उर्वरित मदामांची अवस्थाही फारशी चांगली नाही. पुरातत्त्व विभागातर्फे फक्त काही मदामांचं संरक्षण केलं जातं. त्यामुळेच असम राज्यातील हा एक विलक्षण सांस्कृतिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या थडग्यांचं योग्य प्रकारे जतन होणं ही खरं तर काळाची गरज आहे.

चराईदेव पाहून परतताना वाटेत ‘गारगाव’ या आणखीन एका राजधानीमधील एक राजवाडा पाहून शिबसागरला परतलो. शिबसागरला थांबल्याचा मनस्वी आनंदच झाला होता. स्वतला िहदू म्हणवणाऱ्या अहोम राजांना, इजिप्तच्या फरोह राजांप्रमाणे स्वतची थडगी बांधण्याची ही संकल्पना कशी सुचली असावी याचे मात्र राहून राहून आश्चर्य वाटत राहिले. आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये एवढं वैचित्र्य आणि वैविध्य दडलेलं आहे की या विशाल देशाच्या कानाकोपऱ्यात भटकताना कधी, कुठे काय पाहायला मिळेल हे मात्र खरंच सांगता येत नाही.!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2014 1:04 am

Web Title: ahom pyramid in assam
Next Stories
1 ट्रेकर ब्लॉगर : दिवे लागले रे…
2 डोकं लढवा
3 वाचक प्रतिसाद : नवरात्र विशेषांकातून दुर्गापूजा
Just Now!
X