दिवाळी २०१४
चि. आलिया, म्हणजे आपल्या भटांची हो.. हिला आम्ही खूप पूर्वीपासून ओळखतो!
तसे आम्ही काही सिनेपत्रकार नाही. म्हणजे आता नाही. पूर्वी होतो. आपल्या मराठी पत्रकारितेतील उज्ज्वल आणि प्रदीर्घ कारकिर्दीच्या प्रारंभी बरेच जण सिनेपत्रकार असतात. इंग्रजी वा हिंदी पेपरे व साप्ताहिके व मासिके यांतील नटय़ांच्या गुळगुळीत मुलाखती वाचायच्या. त्या सुळसुळीत मराठीत अनुवादायच्या. छान छान इस्टमनकलर नट-नटय़ांची चित्रे घ्यायची. त्यांभोवती हा आपला बायलाइनांकित मजकूर फिरवायचा आणि चित्रपटांच्या पुरवण्यांचे फुलोरे फुलवायचे. ही आजच्या अनेक आघाडीच्या विचारवंत पत्रकारांच्या पत्रकारितेची सुरुवात राहिलेली आहे हे आम्ही आमच्या या चर्मचक्षूंनी पाहिलेले आहे (त्यात अर्थातच आमचाही समावेश आहेच. त्यात काय लाजायचे?). तेव्हा सिनेपत्रकारितेसाठी सर्वात आवश्यक गुण कोणता असेल तर तो म्हणजे भाषांतर इन्टू गुड्ड मराठी. आता तेही ज्यांना जमत नाही ते राजकीय व सामाजिक पत्रकारितेत हातपाय मारतात. पुढे जे शहाणे निघतात ते अन्य बिटांकडे वळतात. बाकीचे शहाणे सिनेपत्रकार वा राजकीय बातमीदार राहतात. उरलेले पानलावे उपसंपादक बनतात! आम्ही ते उरलेले शहाणे!
पण म्हणून चित्रपट या विषयाचा अभ्यास आम्ही सोडलेला नाही. आजही आम्ही चित्रपट व तद्नुषंगिक बाबी- उदाहरणार्थ नटय़ांच्या तसबिरी- यांचे नित्यनेमे मनन व चिंतन करतो! दूरचित्रवाणीवर रोज रात्रसमयी एक तरी साऊथचा डब चित्रपट पाहिल्याशिवाय आमच्या पापण्यांत नींद येत नाही! साऊथचे चित्रपट म्हणजे तुम्हांस सांगतो, सगळेच कसे भरगच्च! अहाहा.. असो! (हा यू/ए दिवाळी अंक आहे म्हणून माइंडिट करतो. अन्यथा तुम्हांस दाखविला असता आम्ही आमचा साऊथचा अभ्यास!)
तर काय सांगत होतो?
हां. आजही आम्ही चित्रपट या विषयाशी जवळीक ठेवून आहोत. त्यामुळे आपोआपच ओळखी होतात. पहेचान वाढतेय. आता आपली ती ही माधुरी, कतरिना, बहेन प्रियांका (मोदीजींची स्वच्छतादूत!), दोन्ही सनी (म्हणजे देओल आणि लिऑन!), सल्लूभाई, लास्ट बट नॉट लिस्ट अमितजी (यांना आम्ही प्रेमाने अमिताबच्चनच म्हणतो!) अशा अनेकांना आम्ही अगदी जवळून ओळखतो. ते राहतात कुठे, त्यांच्या बंगल्यांची नावे, त्यांचे दूरध्वनी क्रमांक हे सगळे सगळे आम्हाला ठावे आहे. (वाचकांस विनंती, कृपया कोणत्याही नट वा नटीचा पत्ता वा दूरध्वनी क्रमांक यांकरिता आमच्याशी संपर्क साधू नये. ते मायापुरी, माधुरी आदी ठिकाणी उपलब्ध असतात. तेथून घ्यावेत. आम्हीही ते तेथूनच घेतले!) तर महेश भटसाब हेही असेच आमच्या ओळखीतले (आता ही मंडळी आम्हांस कदाचित ओळखतही नसतील, पण त्याला त्यांचाही नाइलाज आहे. कोटय़वधी प्रेक्षक असतात. ते तरी कोणा-कोणाची याद ठेवणार? पण म्हणून आपण काही लगेच आखडून ओळख विसरायची नसते!).
तर सांगत काय होतो, की चि. आलिया हीस आम्ही लहानपणापासून ओळखतो. आठवते, ती ‘संघर्ष’मध्ये होती. बाल प्रीती झिंटाची भूमिका केली होती तिने. तेव्हाच तिच्या अभिनयाची चमक पाहून आम्ही महेशसाहेबांना फोनही केला होता, की पोरगी अगदी आईवर गेलीय. काय काम केलंय तिने! तिची आधी मीठ-मिरच्यांनी दृष्ट काढा! सोसायटीच्या वॉचमनने – कौन महेशशाब? राँग नंबर- म्हणून फोन आपटला. सोसायटीची मालमत्ता. त्याच्या बापसाचे काय जाते आपटायला? तेव्हा महेशजी भेटले असते, तर त्यांना आम्ही सांगणार होतो की पोरगी अत्यंत बुद्धिमान निपजणार बघा!
पुढे ती शाळेत फार नाही चालली!
पण तिची बुद्धिमत्ता, तिची प्रज्ञा बघा, ‘स्टुडंट ऑफ द इअर’मध्ये काम मिळाले तिला!
आणि काय काम केलेय तिने! व्वा! डिस्को दिवाने या द्रूतलयीतील भावगीतामध्ये नर्तनाचा अभिनय करणे हे काही साधेसिम्पल काम नव्हते! पण तिने ते मोठय़ा आत्मविश्वासाने केले! (एवढय़ा आत्मविश्वासाने आणि कष्टाने अभ्यास केला असता ना, तर बारावीला ४५ टक्के मार्क तर कुठेच गेले नसते!)
तेव्हाच आम्ही मनोमनी म्हणालो, की ही पोरगी तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्य करणार चित्रपट उद्योगावर. भटसाहेबांना आम्ही तसा फोनही केला. पण तो वॉचमन.. पुन्हा तडमडला!
पण हम एक सोचतें है और होता कुछ और है! (डायलॉग सौजन्य- राखी सावंत, बिग बॉस पर्व दुसरे!)
पोरगी अभिनयात हुशार पण बाकी सामान्य ज्ञानात अगदीच कच्ची निघाली.
त्या दिवशी आम्ही असेच दूरचित्रवाणीवर ‘होणार सून मी या घरची हांऽऽऽ’ या अभिजात मालिकेतील जान्हवीच्या अभिनयाचा अभ्यास करीत होतो, तर अचानक एका जाहिरातीत चि. आलिया दिसली. त्या मुग्ध चंचलेस पाहून आमुच्या वदनी अचानक मोद विहरला.
आता आपुला पती आनंदला हे पाहून कोणत्या सुगृहणीस बरे वाटेल बरे?
त्या बालिकेस पाहून आधी तिने तोंड व नाकास एकसमयावच्छेदेकरून व्यायाम दिला. मग कचकचली- बाव्वळटच आहे मेली! साधे राष्ट्रपतींचे नावसुद्धा माहीत नाही.. अब्दुल कलाम आझाद! पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रपती आहेत म्हणाली!
आमचा तर प्रथम विश्वासच बसला नाही. चि. आलियाने इतके चुकीचे उत्तर द्यावे? मग समजले की मोदींचे पहिले नाव ‘अब की बार’ असल्याचेही ती म्हणाली!
छे छे! अशी कशी चुकली ती? एवढी चित्रपटांत काम करते ती. तिला किमान भारताचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, झालेच तर सामान्य विज्ञान, बीजगणित एवढे तरी माहीत असायला हवे ना!
उद्या समजा तिला आमच्या ‘मैं तुलसी भाजपके आंगन की’फेम स्मृती इराणी भेटल्या आणि त्यांनी पुसले की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? तर आलियाला त्याचे अक्षांश-रेखांश सांगता यायला नकोत?
बोमन इराणी म्हणून आमचे असेच एक ओळखीचे अभिनेते आहेत. तेसुद्धा सांगत होते, की त्यांनी आलियाला सहज विचारले की, ‘बेटा, डू यू नो एमएस ऑफिस?’
तर पोरीने काय म्हणावे? म्हणाली- तुम्ही पत्ता दिला तर माहीत पडेल!
म्हणजे आले ना लक्षात तुमच्या? साधे इंटरनेटसुद्धा तिला वापरता येत नाही. गुगल केले असते, तर लगेच पत्ता नसता मिळाला? इराणींनाच पत्ता विचारायची काही गरज होती का? अशाने आपले अज्ञान उघडे पडते एवढे सामान्य ज्ञानसुद्धा नाहीये तिला.
आता सामान्य ज्ञानच नाही म्हटल्यावर विज्ञानाची तर बोंबच असणार. त्यामुळे आकाशात वीज चमकल्यावर आधी प्रकाश दिसतो आणि मग आवाज ऐकू येतो असे का, या प्रश्नावर तिने डोळे पुढे असतात आणि कान मागे असे उत्तर दिले म्हणून आपल्याला आश्चर्य वाटायला नको.
आम्हाला तर आता काळजीच लागून राहिलीय तिची. कसे होणार या पोरीचे पुढे?
आमचे सोडा! पण ते अमरिश पुरीसाहेब. माणूस केवढा मोगॅम्बो. पण तेसुद्धा हतबल होते या पोरीपुढे. एकदा म्हणे भर पार्टीत तिने त्यांना विचारले होते, की शेवपुरी, पाणीपुरी हे तुमचे सख्खे भाऊ का म्हणून?
हे सगळे पाहिल्यानंतर आम्ही भटसाहेबांना खडसावून पत्रच लिहिणार होतो. मुलीच्या अभ्यासावर लक्ष नको ठेवायला पालकांनी? आपल्याला नाही वेळ, तर निदान टय़ूशन तरी लावायची. पोरगी सारखी मोबाइलवर खेळत असते आणि मग भारतीय क्रिकेट संघातला कोणताही फलंदाज बाद झाला की म्हणते- सहारा आऊट झाला!
पत्र लिहायला घेतलेसुद्धा आम्ही. पण मग सहजच मनात विचार आला, की आलिया खरोखरच अशी आहे का? जी मुलगी आपल्यावरचे विनोदसुद्धा हसण्यावारी नेते ती वेडी कशी? मग ती वेडी आहे की आपणच जरा जास्त शहाणे आहोत?
आपण असे शहाणे वगैरे असल्याने तर आपल्याला जास्त त्रास होत नाही ना?
खरेच की! तसेच तर आहे!
आपण बऱ्यापैकी शहाणे असतो म्हणून पदोपदी वेडे ठरल्याचे दु:ख होते.
आपण बऱ्यापैकी शहाणे असतो म्हणून क्षणोक्षणी फसविले गेल्याची वेदना होते.
या वेदना, हे दु:ख, हे कष्ट टाळायचे.. आलिया भोगासी कधीही सादर असायचे..
तर त्यावर उपाय एकच.
आपल्या मनातही अशीच एक आलिया हवी!
अल्लड, अबोध, कोमल, निर्मल, चंचल आलिया..
जगाकडे निरागसतेने पाहणारी.. हसवणारी.. स्वत:लाही हसणारी..
आलिया!!