29 January 2020

News Flash

ट्रॅव्हलॉग : परंपरेचे ‘आमिष’

अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात राहणारी आमिष जमात वीज, वाहनं यांचा वापर न करता अत्यंत पारंपरिक पद्धतीने जगते. शेती हेच त्यांचं उत्पन्नाचं मुख्य साधन.

| January 9, 2015 01:06 am

अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात राहणारी आमिष जमात वीज, वाहनं यांचा वापर न करता अत्यंत पारंपरिक पद्धतीने जगते. शेती हेच त्यांचं उत्पन्नाचं मुख्य साधन. या जमातीच्या वस्तीमध्ये मारलेला फेरफटका

अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीच्या दौऱ्यात दोन दिवसांचा मुक्काम लँकेस्टर कौंटीमध्ये होता. त्याबद्दल मोठे औत्सुक्य होते. कारण साऱ्या जगात कुतूहलाचा एक विषय असलेल्या ‘आमिष’ जमातीच्या कुटुंबीयांसमवेत मी व माझी पत्नी दोन दिवस घालवणार होते. जगातील सर्वात प्रगतिशील देशात राहूनही आधुनिक तंत्रज्ञान, वीज, टेलिफोन यांपासून पूर्णत: दूर राहणारी, दोनशे वर्षांपूर्वीच्या पद्धतीनेच आजही शेती करून भरपूर उत्पादन काढणारी ही आगळीवेगळी जमात. त्यांची माहिती करून घेण्याची संधी या वेळी मिळणार होती.lp56
केवळ संपूर्ण समाजाच्या एकीच्या जोरावर, प्रगतीची घोडदौड चालू ठेवूनही, आपल्या परंपरा, संस्कृती, चालीरीती वर्षांनुवर्षे तशाच ठेवावयाच्या, नव्हे आजही त्यांचा अभिमान बाळगायचा हे त्यांचे खास वैशिष्टय़. त्यांच्यावर बी.बी.सी.ने केलेली एक खास फिल्म पाहिली होती. नंतर त्यांच्यासंबंधी आणखी काही माहिती मिळवली. आता तर प्रत्यक्ष त्या जमातीमधील कुटुंबीयांसमवेत दिवस घालवावयास मिळणार होते.
ही आमिष जमात मूळची ब्रिटिश. पण तेथे त्यांचा प्रचंड छळ होऊ लागला. त्याच वेळी पेनिसिल्वानिया येथे धार्मिक स्वातंत्र्याची घोषणा झाली. त्यामुळे १७३०च्या सुमारास ती कुटुंबे प्रथम येथे आली. संपूर्ण अमेरिकेत आज जवळजवळ दीड-दोन लाखांच्या आसपास त्यांची वस्ती आहे आणि लँकेस्टरमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाने सर्वात जास्त म्हणजे तीस-पस्तीस हजारांच्या घरात आढळते. या लोकांचे राहणीमान, कुटुंबव्यवस्था, समाजपद्धती, चालीरीती अगदी वेगळ्या आणि विशेष म्हणजे त्यांचा त्याग करावा, असे त्यांच्यातील लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही वाटत नाही. किंबहुना, या जमातीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण त्यांच्यातील ९० टक्के स्त्री-पुरुष याच समाजात कायम राहणे पसंत करतात.
सतराव्या शतकात ब्रिटिशांकडून त्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला, त्यांचा छळ झाला. ती सल आजही त्यांच्या मनात कायम आहे. त्यांच्या दृष्टीने या जगात दोनच जमाती अस्तित्वात आहेत. एक ‘आमिष’ आणि राहिलेले सर्व ‘ब्रिटिश’. त्यांच्या मते अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, आशियाई असे कोणीही नसते. ते सर्व ब्रिटिश म्हणजे जणू त्यांचे शत्रूच!
लँकेस्टर कौंटीमध्ये प्रवेश केला आणि आमची स्थानिक गाइड मायका हिने माहिती देण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण जमात सरकारकडून काहीही फायदे घेत नाही. कोणी बेकार असेल, तर बेकारभत्ताही स्वीकारला जात नाही. अगदी वैद्यकीय विमासुद्धा नाही. किंबहुना, सार्वजनिक आपत्तीच्या वेळी शासनाने काही मदत दिली तरीसुद्धा त्याला नकार देण्यात येतो. देशातील अन्य जनता सरकारला जो कर देते, त्यातून आम्हाला काहीही साहाय्य नको, ही त्यामागची भूमिका असते. पण त्याचबरोबर शासनाला भरावयाच्या करांमध्ये मात्र कोणतीही बनवेगिरी केली जात नाही. प्रत्येकजण आपले खरे उत्पन्न दाखवून, प्रामाणिकपणे त्यावरील प्राप्तिकर भरतो.
आमिष मुले फारशी शिकत नाहीत. शाळेत जातात, पण प्राथमिक शिक्षणाच्या पुढे त्यांची मजल नसते. जगण्यासाठी, व्यवहारांसाठी एवढे शिक्षण पुरेसे असते, ही त्यांची भावना. पुढच्या शिक्षणाची जरुरीच त्यांना वाटतच नाही. समाजातील मुला-मुलींसाठी एका खोलीत ही शाळा भरते. शिकविण्याकरिता महिला शिक्षिका असते. या शाळेला भेट दिली. बैठी इमारत. शाळेत विशेष असे काही आढळले नाही. (याच शाळेत काही वर्षांपूर्वी एका माथेफिरूने गोळीबार केला होता व त्यात चार-पाच निष्पाप मुले मृत्युमुखी पडली.) एक-दोन शिक्षिका शिकविण्याचे काम करीत होत्या. लग्न होईपर्यंत महिला ही जबाबदारी स्वीकारतात. लग्न झाल्यानंतर कोणतीही आमिष स्त्री घराबाहेर जाऊन नोकरी करीत नाही. मग त्यांची जागा दुसऱ्या अविवाहित स्त्रिया घेतात.
आमिष कुटुंब प्रचंड मोठे असते. १५०-१६० जणांचे कुटुंब. कुटुंबात प्रत्येकाला आठ-दहा मुले असतात. सुरुवातीला एकत्र कुटुंब. नंतर प्रत्येकजण सोयीनुसार स्वतंत्र होतो. आमच्या टूरगाइडच्या परिचयाची ९६ वर्षांची एक आमिष वृद्धा नुकतीच मरण पावली. तिची १८ मुले जिवंत असून, १२६ नातवंडे आणि एक हजार पतवंडे आज अस्तित्वात आहेत. आमिष कुटुंबातील अनेकांची आडनावे सारखी आढळतात. लँकेस्टरमध्ये सहा ते सात हजार कुटुंबे एकाच आडनावांची आहेत.
त्यांच्यातील लग्न जमविण्याची पद्धत मात्र आधुनिक आहे. जवळजवळ ९९ टक्के आमिष मुलं-मुली आपल्याच समाजात लग्न करणे पसंत करतात. पण लग्न पालकांनी ठरवून मात्र अजिबात होत नाहीत. दर रविवारी दुपारी व संध्याकाळी आमिष जमातीतील तरुण मुला-मुलींचे स्नेहसंमेलन भरते व त्यातून लग्ने जमतात. ही लग्न साधारणत: ऑक्टोबरअखेर ते नाताळ या कालावधीत होतात. कारण त्या वेळी शेतात काम नसते. मंगळवार व गुरुवार लग्नाचे दिवस. लग्न मुलीच्या घरी होते. पण त्याची सर्व व्यवस्था समाजातर्फे करण्यात येते. चर्च-व्हॅनमधून सर्व सामान आणण्यात येते. अगदी जेवणाची भांडी, टेlp57बल, खुच्र्या वगैरे सारे.. लग्नाला ४०० लोकांपर्यंत आमंत्रणे दिली जातात आणि प्रत्येकजण हा जणू आपल्याच कुटुंबातील सोहळा आहे, या भावनेने पडेल ते काम अगदी आनंदाने करीत असतो. लग्नात नववधू पांढरा ड्रेस घालते. व्हाइट एप्रन व केप (जॅकेट) हा वेश लग्नानंतर जतन करून ठेवण्यात येतो. त्या स्त्रीचे जेव्हा निधन होते, त्या वेळी तो ड्रेस तिच्या पार्थिवावर घालण्यात येतो. आमिष स्त्रिया कधीही केस कापत नाहीत. पण त्यांच्या डोक्यावर पांढरी कॅप असते.
आमिष जमातीबद्दल आता थोडी माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांचे घर, शेत अन्य उद्योगव्यवसाय प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता होती. सर्वप्रथम एका आमिष कुटुंबाच्या घराला भेट दिली. या घरावर स्टार होता. याचा अर्थ तुमचे स्वागत असो. त्या आमिष कुटुंबानेही आमचे स्वागत केले, पण ते फारसे बोलत मात्र नाहीत. संपूर्ण घरात वीज, टेलिफोन अजिबात नाही. त्यांच्या शेजारीच अमेरिकन कुटुंबाचे घर होते. तेथे वीज व सर्व अद्ययावत उपकरणे होती. पण उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या आमिष माणसाच्या घरात कंदिलाचा प्रकाश. घरातील फ्रिज, शेगडी, गॅस, एअर पॉवरवर चालतात. बहुतेक घरे एक मजली. अगदी जुन्या पद्धतीचे, पण मोजकेच फर्निचर. सर्वत्र कमालीची स्वच्छता, फ्रिज, गॅस वगळता अन्य कोणतीही आधुनिक यंत्रे घरात आढळली नाहीत. आमिष माणसाचे घर हे ‘डॅडी हाऊस’ म्हणून ओळखले जाते. कारण कुटुंबातील वृद्ध, अपंग यांची उत्तम काळजी घेण्यात येते. विशेषत: वयोवृद्धांचा आदर केला जातो.
आमिष पुरुषांच्या पँटला बांधण्यासाठी खांद्यावरून दोन पट्टे असतात. पँट काळ्या रंगाची व तो रंग सक्तीचा असतो. विशेष म्हणजे त्या पँटला झिप नसते. तर चार बटणे लावलेली असतात. वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून त्याने डोक्यावर हॅट घातलीच पाहिजे असे बंधन असते. भडक किंवा रंगीबेरंगी शर्ट घालता येत नाही. वयाच्या ४० वर्षांनंतर दाढी ही सक्तीची. एकंदरीत आमिष पुरुषांची राहणी ही खूपच साधी म्हणावी लागेल.

बहुतेक आमिष कुटुंब शेतीचाच व्यवसाय करतात आणि तोही अगदी पारंपरिक पद्धतीने. मायका त्याबाबत बऱ्याच उत्साहाने सांगत होती. त्यामुळे त्यांच्या शेतावरच गेलो. मक्याची व तंबाखूची हिरवीगार शेतं. त्याचे मोठे उत्पादन काढले जाते. पण शेतात ट्रॅक्टर किंवा अन्य कोणत्याही आधुनिक साधनांचा अजिबात वापर केला जात नाही. घोडे व त्याच्या मागे जोडलेल्या गाडीनेच शेतीची सर्व कामे केली जातात. या भागात चांगला पाऊस पडतो. जमीन सुपीक आहे. त्यामुळे भरपूर उत्पादन घेतले जाते. आमिष शेतकरी, शेतावरच छोटेसे घर बांधून राहणे पसंत करतो. घोडागाडी हे त्यांचे महत्त्वाचे वाहन. सर्वच कामांसाठी त्याचा वापर केला जातो. शेतीपासून, मालाची ने-आण, स्त्री-पुरुष, लहान मूल सर्वाना कोठेही जाण्यासाठी त्याचाच उपयोग होतो. किंबहुना घोडागाडी हेच आमिष जमातीचे प्रतीक मानण्यात येते. (मुक्कामाच्या अखेरीस मायकाने आम्हाला आमिष जमातीची आठवण म्हणून एक लाकडाची छोटी घोडागाडीच भेट म्हणून दिली.)
तंबाखूचे उत्पादन म्हणजे कॅशक्रॉप. सिगरेट कंपन्या त्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. जवळच ‘हषरे’ नावाचे गाव होते. ते चॉकलेटसाठी प्रसिद्ध. तेथील चॉकलेटस्, आमिष शेतकऱ्यांच्या डेअऱ्यांमधील दुधापासून बनविण्यात येतात. दुधाचे अन्य पदार्थही विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यांच्या दुधाचा भाव सरकार ठरविते. पण आमिष शेतकऱ्यांनी त्याबाबत कधीही तक्रार केलेली नाही. शेती, डेअरी यांबरोबर अन्य व्यवसायही आमिष लोक आता करू लागले आहेत. त्यात प्रामुख्याने सुतारकामाचा समावेश आहे. अत्यंत सुबक फर्निचर बनविण्यात त्यांचा हातखंडा असतो.
आमिष महिलाही अत्यंत मेहनती व उद्योगी असतात. विवाहानंतर त्या कामासाठी घराबाहेर पडत नाहीत, पण घरात बसून विविध वस्तूंचे उत्पादन करीत असतात. अत्यंत आकर्षक, उबदार अशी ‘क्विल्ट्स’ (गोधडय़ा) बनविण्याचा व्यवसाय हे आमिष स्त्रियांचे खास वैशिष्टय़. या क्विल्ट्सना ठिकठिकाणी जबरदस्त मागणी असते. त्यांना किंमतही चांगली मिळते. आमिष लोकवस्तीमध्ये स्टॉल्स उभारून या क्विल्ट्सची विक्री केली जाते. थोडय़ा अंतरावर असलेल्या ‘किचन केटल’ नावाच्या खेडय़ाला आम्ही भेट दिली. तेथे असे अनेक स्टॉल्स होते. क्विल्ट्स तसेच घरी बनविलेली बिस्किटे, कुकीज, आइस्क्रीम, चॉकलेट्स खरेदी करण्यासाठी पर्यटकांबरोबरच आजूबाजूच्या स्थानिक अमेरिकनांचीही तेथे गर्दी उसळली होती. निरनिराळया फ्लेवर्सच्या ‘होम मेड’ आइस्क्रीमच्या कोन किंवा कँडी हातात घेऊन त्या अत्यंत सुंदर, स्वच्छ खेडय़ात फेरफटका मारावयास मजा न आली तरच नवल! आमिष महिला या सर्वातून चांगले उत्पन्न मिळवितात.
आमिष जमातीची एकी ही त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. यासंदर्भात नुकतीच घडलेली एक घटना मायकाने सांगितली. येथील आमिष कुटुंबीयांच्या धान्याच्या ४५ मोठय़ा गोदामांना भीषण आग लागली. पण अग्निशामक दलाचे बंब बिलकूल बोलविण्यात आले नाहीत. सुमारे ५० फूट उंचीच्या त्या गोदामांना लागलेली आग विझविण्याचे काम त्या समाजातील ३५० पुरुष अहोरात्र करीत होते आणि त्यात त्यांना यशही आले. हे काम एवढय़ापुरतेच मर्यादित नव्हते. पुढच्या चार दिवसांत ती सर्व गोदामे याच लोकांनी स्वत:च्या कष्टांनी पुन्हा उभी केली.
त्यांच्यात बिशपचा शब्द हा अखेरचा मानण्यात येतो. विविध थरांवर हे बिशप असतात व त्यांचे स्थान सर्वोच्च असते. या जमातीच्या चर्चेसच्या स्वतंत्र इमारती दिसल्या नाहीत. एखाद्याच्या घरी चर्च भरते व प्रार्थना वगैरे म्हटली जाते. आम्ही तेथे रविवारी होतो. त्या दिवशी सकाळी एकाच्या घरी चर्च भरणार होते. प्रथम मोटारीतून खुच्र्या, टेबले आली. तरुण आमिष मुलांनी ती खाली उतरवली. त्यानंतर घरातील मोठय़ा खोलीतील सामान त्यांनी दुसरीकडे हलविले. तेथे टेबले-खुच्र्या मांडण्यात आली. प्रार्थनेचा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा सामान व्यवस्थित ठेवण्यात आले आणि खुच्र्या-टेबले त्याच मोटारीतून परत नेण्यात आली.
वैद्यकीय विमा पद्धतीवर आमिष लोकांचा अजिबात विश्वास नाही व त्या दृष्टीने सरकारकडून ते काही मदतही घेत नाहीत. स्त्रीचे बाळंतपण शक्यतो घरीच होते. अगदी फारच गरज पडली तरच रुग्णास रुग्णालयात हलविण्यात येते. मात्र व्हेंटिलेटरवर ठेवण्यास अजिबात परवानगी नाही. कारण त्यासाठी विजेचा वापर केला जातो. आमिष जमातीचा ‘आमिष एड फंड’ आहे. कुटुंबातील कोणी गंभीर स्वरूपाचे आजारी पडले तर, सुरुवातीचा दोन हजार डॉलर्सपर्यंतचा खर्च त्याने स्वत: करावयाचा. अधिक मदत लागली तर या निधीतून मदत केली जाते.
परंपरा, जुन्या चालीरीती आजही जपणाऱ्या या आमिष कुटुंबांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारते आहे. ते सर्व जण सरकारला प्राप्तिकर भरतात. अर्थात सरकारकडून मदत मात्र घेत नाहीत. आमिष कुटुंबीयांची घरे, फार्म पाहताना ते तुमचे स्वागत करतात. आपल्या वस्तूंची विक्री करण्याचे कसबही त्यांच्यात उत्तम आढळते. पर्यटकांचे महत्त्व आता त्यांना चांगलेच समजले आहे. आपल्या जमातीची जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी यासाठीही त्यांचे खास प्रयत्न असतात. त्यामुळेच त्यांच्या घरांची, शेतांची, तबेल्यांची छायाचित्रे काढण्यास परवानगी मिळते. पण कुटुंबातील व्यक्तींचे फोटो काढता येत नाहीत. ते त्यांना अजिबात आवडत नाही. तशा सूचना मायकाने आम्हाला आधीच दिल्या होत्या.
रात्री आमिष कुटुंबाच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण होते. चिकन हा त्यांचा सर्वात आवडीचा पदार्थ. प्रत्येक समारंभात चिकन हवेच. मद्यप्राशन मात्र पूर्णत: वज्र्य. आमचा रात्रीचा मुक्काम ‘लिओला व्हिलेज’ या अतिशय सुंदर व्हिलामध्ये होता. आमिष समाजाची वैशिष्टय़े येथे ठिकठिकाणी आढळून येत होती. अँटिक पलंगावरील क्विल्ट् अगदी उठून दिसत होते. त्याला ऊबही चांगली होती. त्याची रंगसंगती कमालीची आकर्षक. उंची फर्निचर, गालिचे, टेबल लँप सारेच मनात भरेल असे होते. पर्यटक म्हणून आमच्या स्वीटमध्ये वीज खेळत होती.. टेलिफोन सुरू होता.. या व्हिलाच्या आमिष मालकाचा बंगला लागूनच होता.. तेथे मात्र मिणमिणते दिवे दिसत होते.
जयप्रकाश प्रधान

First Published on January 9, 2015 1:06 am

Web Title: amish community
टॅग Tour
Next Stories
1 पर्यटन : ख्रॉनिंगन.. पुरातन तरीही आधुनिक
2 दि. ९ ते १५ जानेवारी २०१५
3 वाचक प्रतिसाद : मार्गदर्शक विशेषांक
Just Now!
X