|| पद्मजा पाठक

ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटीचं प्रतीक ठरलेलं जालियनवाला बाग हत्याकांड घडलं त्याला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली. अमृतसरमध्ये या इतिहासाला उजाळा देतानाच सुवर्णमंदिर आणि अटारी-वाघा सीमेवरची कवायत या आवर्जून अनुभवायच्या गोष्टी आहेत.

‘वंदेमातरम्’, ‘हिंदुस्ताँ झिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमत होता. सीमा सुरक्षा दलाचे जवान गर्दीचे नियोजन करीत होते. ना तेथे कोणी महाराष्ट्रीय होता, ना गुजराती, ना दक्षिण भारतीय.

सगळे प्रेक्षक भारतीय होते..

हे वर्णन आहे, अटारी वाघा सीमेवरच्या उत्साहाचे. दुपारी तीन वाजता अमृतसरपासून २८ कि. मी. अंतरावर असलेल्या अटारी-वाघा या भारत-पाकिस्तान सीमेवर आमची गाडी निघाली. गाडीत उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर गीते सुरू झाली. साधारण अर्धा तास प्रवास केल्यावर भारताची सीमा असलेले अटारी रेल्वे स्टेशन आले. अटारी रेल्वे स्टेशनपासून थोडे अंतर पार केल्यानंतर पाìकगमध्ये गाडी लावून भल्यामोठय़ा रांगेतून स्टेडियमवर पोहोचलो. अमृतसरच्या मे महिन्याच्या दुपारच्या चारच्या टळटळीत उन्हातदेखील प्रेक्षकांनी तुडूंब भरलेली गॅलरी बघून ऊर अभिमानाने भरून आला.

दररोज सूर्यास्ताच्या दोन तास आधी वाघा-अटारी सीमेवर ध्वजावतरणाचा कार्यक्रम सुरू होतो. उपस्थित प्रेक्षकांना सीमेजवळील मोकळ्या माíगकेवर भारतमातेचा ध्वज उंचावण्याची संधी दिली जाते. ध्वजावतरणाचा मुख्य शानदार कार्यक्रम सुरू  झाला. एकामागून एक गणवेशधारी जवानांच्या कवायतींचा जोश पाहून उपस्थित प्रेक्षक उत्स्फूर्तपणे भारतमातेचा जयजयकार करीत होता.

भारताची सीमा अटारी आणि पलीकडे पाकिस्तानची सीमा वाघा. भारतातील अटारीची गॅलरी प्रेक्षकांनी भरलेली होती, तर वाघा सीमेवरच्या गॅलरीमध्ये तुरळक लोक दिसत होते. हळूहळू सूर्य क्षितिजाकडे कलू लागला. दोन्ही सीमेवरील जवानांनी मनोवेधक कवायती केल्या आणि ध्वजावतरणानंतर दोन्ही देशांच्या सीमेवरील दरवाजे हळूहळू बंद झाले. आम्ही सगळा कार्यक्रम मनात साठवत परतलो.

अमृतसर हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील अखंड पंजाब राज्यातील सर्वात मोठे शहर होते. या शहराच्या कुशीत इतिहासाच्या अनेक आठवणी दडलेल्या आहेत. अमृतसर म्हटले की सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, पार्टिशन म्युझियम, दुर्गाणा मंदिर, अटारी-वाघा बॉर्डर, गोबिंदगड, महाराजा रणजित सिंग मंदिर या वास्तू डोळ्यासमोर येतात. या वास्तूंशी, त्यांच्या इतिहासाशी जोडलेल्या घटनांची आठवण जागृत होते. तसेच येथील जोशपूर्ण भांगडा नृत्य, साजूक तुपातले पराठे, महिलांचे रंगीबेरंगी पटियाला, पंजाबी स्त्री-पुरुषांच्या वैशिष्टय़पूर्ण निरनिराळ्या पगडय़ा मनात घर करतात.

सकाळी लवकर उठून सुवर्णमंदिराकडे जाण्याआधी प्रथम जालियनवाला बागेत जाण्याचे ठरले. १० एप्रिल, १९१९ रोजी ब्रिटिश सरकारने सत्यपाल आणि सफुद्दीन या दोन वीरांच्या तडीपारीचा आदेश जारी केला होता. त्यांच्या सुटकेसाठी सकाळी एक घोळका अमृतसरच्या उपायुक्तांच्या घराकडे जात असताना या त्याच्यावर सन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटून ब्रिटिश सरकारच्या इमारतींना आगी लावण्यात आल्या. तेव्हा ब्रिटिश सन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात साधारण १८ ते २० स्वातंत्र्यसनिक धारातीर्थी पडले. या प्रक्षोभक दंग्यांमुळे १३ एप्रिल १९१९ रोजी तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओ डावरच्या आदेशाने पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. नेमका त्याच दिवशी म्हणजे १३ एप्रिल रोजी पंजाबी जनतेचा बसाखी हा मोठा सण होता. बसाखीचे औचित्य साधून रौलट अ‍ॅक्टचा विरोध करण्याकरिता शीख आणि हिंदू बांधव प्रचंड प्रमाणात जालियनवाला बागेत जमले. त्याच वेळेस ब्रिगेडियर जनरल डावर सशस्त्र सनिकांच्या तुकडीसह तेथे पोहोचला आणि त्याने बागेतील नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबाराचा आदेश दिला. एक चिंचोळा रस्ता सोडला तर बागेतून बाहेर पडण्याकरिता दुसरा मार्ग नव्हता. बाहेर पडण्याच्या मार्गावरच उभे राहून ब्रिटिश सनिक अंदाधुंद गोळीबार करत होते. अनेकांनी जीव वाचविण्यासाठी बागेतील विहिरीत उडय़ा मारल्या. या हत्याकांडात एक हजार निरपराध भारतीय मरण पावले आणि १५०० लोक जखमी झाले. या घटनेला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. बागेतील िभतींवरील ब्रिटिश सनिकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या खुणा पाहून डोळे पाणावतात. सरदार उधमसिंगाने मार्शल लॉ जारी करणाऱ्या मायकेल डावरची इंग्लंडमध्ये जाऊन हत्या केली आणि जालियनवाला बागेच्या हत्याकांडाचा बदला घेतला. त्या स्मृतिप्रीत्यर्थ बागेच्या प्रवेशद्वारावर सरदार उधमसिंगांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

अमृतसर येथे शीखांचे पवित्र धर्मस्थळ दरबार साहिब म्हणजेच सुवर्णमंदिर हा सर्वात प्रमुख गुरुद्वारा आहे. सुवर्णमंदिराच्या चौफेर अमृतसर शहर वसलेले आहे. हे सुवर्णमंदिर हरिमंदिर साहिब नावानेदेखील प्रसिद्ध आहे. इतिहासातील नोंदींनुसार डिसेंबर, १५८८ मध्ये शीखांचे पाचवे गुरू अर्जुनदेव यांनी लाहोरचे एक सूफी संत साई मियाँ मीरजी यांना पाचारण करून त्यांच्या हस्ते दरबार साहिब गुरुद्वाराच्या बांधकामास सुरुवात केली. गुरुद्वाराचे बांधकाम सन १६०१ मध्ये पूर्ण झाले. हा गुरुद्वारा नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु शीखांची असीम भक्ती आणि धर्माप्रति असलेल्या आस्थेमुळे सन १७६० मध्ये महाराज सरदार जस्सा सिंह अहलुवालिया यांनी आणि १९व्या शतकात महाराजा रणजित सिंह यांनी पुन्हा त्याचे बांधकाम केले. पहिला संपूर्ण गुरु ग्रंथ साहिब सुवर्णमंदिरात ठेवण्यात आला. या गुरुद्वाराच्या चारही बाजूंनी भव्य प्रवेशद्वारे आहेत. सुवर्णमंदिराचे बांधकाम सुरू होते तेव्हा मंदिराचे प्रथम पुजारी बाबा बुड्डा परिसरातील बोराच्या वृक्षाखाली बसून बांधकामावर नजर ठेवत असत. तो बोराचा वृक्ष आजही मंदिर परिसरात आहे.

संगमरवरी दरबार साहिब सुवर्णमंदिराच्या नक्षीकामाची सजावट सोन्याच्या पत्र्याने मढवलेली आहे. मंदिराच्या चारही बाजूला अर्जुनदेवनिर्मित पवित्र सरोवर असून मंदिराचा गाभारा सुंदर नक्षीकामाने नटलेला आहे. गुरुद्वारात कोणत्याही जाती-धर्माच्या भक्तांना प्रवेशासाठी अटकाव केला जात नाही. गुरुद्वारात प्रवेश करताना आणि आतील परिसरात वावरताना शीख धर्मसंस्थेचे काही नियम मात्र पाळावे लागतात.  आम्ही डोक्यावर दुपट्टा, रुमाल गुंडाळून चप्पल-बूट मंदिराच्या बाहेर काढून गुरुद्वारात प्रवेश केला. अमृत सरोवराच्या स्वच्छ, नितळ पाण्यात पाय धुवून पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश करावा लागतो. भक्तिरसाने ओथंबलेल्या गुरबाणी म्हणजेच गुरुवाणीच्या स्वरांनी मन प्रसन्न होते. ग्रंथ साहिबला नमस्कार करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्याकरिता बाहेर पडलो.

गुरुद्वारामध्ये पावलोपावली शिस्त आढळून येते. साजूक तुपातला प्रसाद हाताच्या ओंजळीतच घ्यावा लागतो. भाविकांमध्ये प्रसादाच्या माध्यमातून नम्रता आणि पावित्र्याची भावना नकळत निर्माण होते. गुरुद्वाराच्या परिसरात चारही दिशांना पिण्याच्या पाण्याची सोय असून कारसेवेद्वारे सर्वाना पाणी पुरविण्यात येते. तसेच येथील नि:शुल्क लंगर वैशिष्टय़पूर्ण आहे.

बसाखी, लोहडी (मकरसंक्रांत), शहीददिन, दिवाळी इत्यादी सणांना सुवर्णमंदिराला करण्यात येणारी सजावट मनोहारी असते. त्यात विशेषकरून खालसा पंथाची स्थापना झालेल्या दिवशी म्हणजे बसाखीला मंदिराचे मनोहारी रूप बघून डोळ्यांचे पारणे फिटते.

या आठवणी मनात साठवत आम्ही अमृतसरमधील आणि जगातील पहिले पार्टिशन म्युझियम पाहण्यास निघालो. सन १९४७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीची सर्वात जास्त झळ पंजाबला पोचली.     पूर्व पंजाब आणि पश्चिम पंजाब अशा दोन भागात पंजाब प्रांत विभागला गेला. तेव्हा झालेल्या दंगलीत इतिहासातील नोंदीनुसार आठ लाखापेक्षा जास्त हिंदू, शिख आणि मुस्लीम मारले गेले, तर १४ लाखापेक्षा जास्त नागरिक निर्वासित झाले. फाळणीच्या दु:खद स्मृतींचे दर्शन पार्टिशन म्युझियममध्ये आपल्याला घडते. सुवर्ण मंदिराच्या नजिक टाऊन हॉलमध्ये ‘द आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज ट्रस्ट’ च्या वतीने बांधण्यात आलेल्या या पार्टिशन म्युझियमचे उद्घाटन पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या हस्ते सन २०१६ मध्ये झाले.

पार्टिशन म्युझियममध्ये फाळणीच्या काळातील वृत्तपत्रे, छायाचित्रे, दुर्मीळ लेख, दस्तऐवज, पेहराव पाहावयास मिळतात. संग्रहालयात बघण्यासारखी दुर्मीळ आणि मौल्यवान वस्तू म्हणजे त्या काळातील खिशात ठेवण्याचे घडय़ाळ. त्याची आख्यायिका संग्रहालयात उपलब्ध असलेल्या दृक्श्राव्य माध्यमातून जरूर ऐकण्यासारखी आहे.

पार्टिशन म्युझियममध्ये नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आलेला आहे. दृक्श्राव्य माध्यमातून फाळणीग्रस्तांच्या व्यथा, सर्वस्व गमावल्यानंतर जीवनाची नव्याने केलेली सुरुवात आपणास पाहण्या-ऐकण्यास मिळते. त्यापकी मिल्खा सिंग, एम. डी. एच. मसाल्याचे मालक धरमपाल गुलाटी, हिरो सायकलचे संस्थापक ओमप्रकाश मुंजाल इत्यादींचे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकणे प्रेरणादायी आहे. तसेच शमशाद बेगम, लतादीदी यांची भारत-पाकिस्तान सीमेवरील हृद्य भेट दृक्श्राव्य माध्यमातून प्रत्यक्ष लतादीदींच्या तोंडून ऐकताना-पाहाताना अंगावर रोमांच उभे राहातात.

अमृतसर शहराच्या मध्यभागी दक्षिण-पश्चिम भागावर गोबदगड किल्ला आहे. हा ऐतिहासिक किल्ला पूर्वी सन्याच्या ताब्यात होता. १८ व्या शतकातील स्थानिक सरदार गुज्जरसिंह भंगी यांनी बांधलेला हा किल्ला भांगिया दा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याचे बांधकाम पूर्णत: विटा आणि चुनखडीचे आहे. किल्ल्यात २५ तोफा आहेत.

अमृतसरच्या मध्यभागी वसलेल्या गोबिंदगडाचे नूतनीकरणानंतर अनोख्या अशा संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आणि तो  १० फेब्रुवारी २०१७ पासून जनतेसाठी खुला करण्यात आला. या किल्ल्यात पंजाबच्या इतिहासाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. तेथे पहायला मिळणारा महाराजा रणजित सिंह यांच्या जीवनावरील दृकश्राव्य कार्यक्रम आपल्याला थेट १९ व्या शतकातच नेतो. किल्ल्यात वॉरफेअर, दुर्मीळ नाण्यांचे संग्रहालय, विविध यंत्रे, युद्धात वापरल्या जाणाऱ्या पेहरावाचे संग्रहालय आहे. येथे सूर्यास्तानंतर दाखविण्यात येणारा लेझर शो अप्रतिम आहे. येथे पंजाबच्या विविध कलाकृती विकत घेण्याचे दालनही आहे. पंजाबी स्त्री-पुरुष वापरत असलेल्या सर्व प्रकारच्या पगडय़ांचे स्वतंत्र दालन विशेष लक्ष वेधून घेते.

अमृतसरमध्ये असंख्य ऐतिहासिक वास्तू दिमाखात उभ्या आहेत. त्यापकी गुरु हरसाईमल कपूर यांनी सन १९२१ मध्ये बांधलेले आणि सुवर्ण मंदिराप्रमाणेच वास्तुरचना असणारे लक्ष्मी-नारायणाचे दुíगयाणा मंदिरदेखील आवर्जून पाहण्यासारखे आहे.

पासियान चौक येथील लाला केसरमल यांच्या केसर-दा-ढाबा हे चुकवू नये असे ठिकाण आहे. लाला केसर मल यांनी लाहोर येथील शेखपुरा येथे सन १९१६ मध्ये छोटेसे हॉटेल सुरू केले. फाळणीनंतर ते अमृतसरला  स्थलांतरित झाले. तेव्हाच्या छोटय़ाशा गल्लीतील लाला केसर मल यांचे हॉटेल म्हणजेच आताचा केसर-दा-ढाबा. येथील साजूक तुपातील पराठा, दाल मखनीची चव लाजवाब आहे.

अमृतसरमध्ये साजूक तुपातल्या विविध प्रकारच्या पराठय़ांचा आस्वाद घेणे हा एक सोहळाच आहे. अमृतसरी कुलचा, सरसों दा साग आणि मक्के दी रोटी, ग्लास भरुन चविष्ट लस्सी या सगळ्याची चव जिभेवर रेंगाळत रहाते. मातीच्या भांडय़ातील फिरनी, कुल्फी आवर्जून खावी अशी. त्याबरोबर इथले वैशिष्टय़पूर्ण दागिने, खास फुलकारी नक्षीकाम केलेले पंजाबी सूट, पंजाबी मोजडय़ा यांची खरेदी केल्याशिवाय इथून पाय निघत नाही. असे हे विविधरंगी अमृतसर इतिहासातील सुखदु:खाच्या आठवणींसह आपल्या रांगडय़ा जोशासहित पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार असते.

response.lokprabha@expressindia.com