मेष सप्ताहाच्या शेवटी सूर्यग्रहण तुमच्याच राशीत होणार आहे. आपण जे नियोजन करतो त्याला फारसा अर्थ नसतो, हे दर्शविणारे ग्रहमान आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत वाटचाल करणे चांगले. व्यापार उद्योगात लक्ष्मी चंचल असते हे कळून चुकेल. हातात पडलेल्या पैशांना बऱ्याच वाटा फुटलेल्या असतील. नोकरीमध्ये तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर वरिष्ठ त्यावर बोट ठेवतील. घरामधील मोठय़ा व्यक्तींच्या समस्येमुळे चिंतेत पडाल. स्वत:चे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सांभाळा.

वृषभ सप्ताहाखेरीस सूर्यग्रहण व्ययस्थानात होणार आहे. एकाच वेळी अनेक योजना आणि बेत तुमच्या मनात असल्यामुळे विचारांचे काहूर माजलेले असेल. कामाचा डोंगर पुढे असला तरी मधूनच मौजमजा करण्यासाठी मन बंड करून उठेल. व्यवसाय उद्योगात ज्या व्यक्तीकडून तुम्हाला काम करवून घ्यायचे आहे त्या व्यक्तीची मनधरणी करावी लागेल. नोकरीमध्ये सतत वरिष्ठांची टांगती तलवार असल्यामुळे कंटाळा येईल. घरामध्ये कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागल्यामुळे विरंगुळेचे महत्त्व समजेल.

मिथुन सप्ताहाच्या शेवटी सूर्यग्रहण लाभस्थानात होईल. चांगली बुद्धिमत्ता हे तुमच्या राशीला लाभलेले वरदान आहे; परंतु व्यवहाराचा प्रश्न आला की तुमची गल्लत होते. या आठवडय़ात मैत्री आणि पैसा या दोन गोष्टींशी गल्लत करू नका. व्यवसाय उद्योगात शक्यतो मोठय़ा आर्थिक उलाढाली आणि करार टाळा. नोकरीमध्ये मित्रांच्या नादाने कर्तव्यात कसूर होऊ देऊ नये. घरामध्ये आवडत्या व्यक्ती आणि नातेवाईक यांच्या विचित्र वागण्यामुळे तुम्हाला कोडय़ात पडल्यासारखे वाटेल.

कर्क राशीच्या दशमस्थानात सूर्यग्रहण होणार आहे. वाहन चालविताना किंवा मशीनवर काम करताना बेसावध राहू नका. व्यापार उद्योगामध्ये अचाट, अफाट धाडस करण्याचा मोह अनिवार्य होईल. परंतु ते खरे नाही. सरकारी नियम आणि कायदे यांच्याकडे लक्ष असू द्या. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नसते याची सतत आठवण ठेवा. आणि वरिष्ठांची आज्ञा तंतोतंत पाळा. घरातील मोठय़ा व्यक्तीचे प्रकृती आणि इतर तंत्र सांभाळावे लागेल. त्याकरता वेळ आणि पैसे राखून ठेवा. तरुणांनी साहस करू नये.

सिंह राशीच्या भाग्यस्थानात सूर्यग्रहण होणार आहे. सभोवतालच्या माणसांशी कसे वागायचे हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. व्यापार उद्योगात शक्यतो महत्त्वाच्या कागदपत्रांवर किंवा करारांवर सह्य़ा करण्यापूर्वी सखोल माहिती निष्णात व्यक्तीकडून घ्या. नोकरीमध्ये मौजमजेच्या वेळी सर्वजण पुढे असतील, पण कामावेळी कोणाचाही उपयोग होत नाही, असे लक्षात येईल. नवीन नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी गोंधळ करू नका. घरामधील व्यक्तींशी समंजसपणे वागा. तरुणांनी विवाहाचे निर्णय लांबवावेत.

कन्या सूर्यग्रहण राशीच्या अष्टमस्थानात होणार आहे. एकंदरीत ग्रहमान तुम्हाला स्फोटक बनवणारे आहे. जे काम करायला जाल त्यात अडथळे दिसायला लागल्यावर तुमची चिडचिड होईल. व्यापार उद्योगात जेवढी जमतील तेवढीच कामे करा. पैशासंबंधी कोणताही धोका पत्करू नका. नोकरीमध्ये एखादी गोष्ट पटली नाही तरी सत्तेपुढे शहाणपण नसते असा विचार करून गप्प राहा. घरामधल्या वयोवृद्ध व्यक्तींच्या आणि स्वत:च्या आजारांविषयी काळजी वाटेल. विद्यार्थ्यांनी कोणताही धोका पत्करू नये.

तूळ सूर्यग्रहण राशीच्या सप्तमस्थानात होणार आहे. तुमच्याकडे अनेक चांगल्या कल्पना असतील, पण त्यातील यशाची भिस्त सभोवतालच्या व्यक्तींच्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे. व्यापार उद्योगात आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारातील परिस्थिती यामुळे तुम्हाला तुमचा निर्णय बदलणे भाग पडेल. नोकरीमध्ये छुपे शत्रूंमुळे वरिष्ठांचा तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल. घरामध्ये जोडीदाराच्या प्रकृतीची, भावनांची काळजी घ्या. शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा. विद्यार्थ्यांनी मित्रांवर विसंबून राहू नये.

वृश्चिक सूर्यग्रहण राशीच्या षष्ठस्थानात होणार आहे. मन आणि शरीर या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. एक बिघडले तर दुसरे बिघडायला वेळ लागत नाही. तुमच्या विरुद्ध काही घडले तरी डोके शांत ठेवा. प्रकृतीच्या काही जुन्या तक्रारी असतील तर त्याची जाणीव होईल. जुने कोर्ट किंवा कायदे व्यवहार नव्याने उत्पन्न होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे वागणे आणि सूचना तुम्हाला पटणार नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे स्वास्थ्य आणि मुलांच्या उपद्व्यापाकडे लक्ष ठेवा.

धनू सूर्यग्रहण राशीच्या पंचमस्थानात होईल. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने त्यासंबंधीचे वेध आणि नियम पाळण्याची गरज नाही. सभोवतालच्या व्यक्तींच्या बाबतीत चेहरा व मुखवटा यातील भेद काय असतो हे दाखवून देणारे हे ग्रहमान आहे. तुम्ही थोडेसे बिनधास्त राहाल. पण या तुमच्या स्वभावामुळे तोटा होण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगामध्ये भावनेच्या भरात जास्त धोका पत्करू नका. नोकरीमध्ये आधी कर्तव्य आणि नंतर मौजमजा असा कामाचा क्रम ठरवाल. मुलांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे लागेल.

मकर सूर्यग्रहण चतुर्थस्थानातूनच होणार आहे. तुमचे घर, घरामधले सदस्य यांच्या बाबतीत तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक असतो. घरगुती गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. घरामध्ये एखादा कार्यक्रम ठरणार असेल तर नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यात वाद निर्माण होतील म्हणून त्यांच्याशी जपून बोला. डागडुजी, वाहनांची दुरुस्ती अपरिहार्य होईल. नवीन जागेसंबंधीचे करार शक्यतो करू नका. व्यवसाय उद्योगात कामाचा आळस येईल. पण कामगारांवर लक्ष ठेवणे गरजेचे असेल. विद्यार्थ्यांनी आळस टाळावा.

कुंभ सूर्यग्रहण तृतीयस्थानात होणार आहे. कोणतेही काम तुम्ही करता तेव्हा त्याचे नियोजन खूप आधीपासून करता. पण आता आयत्यावेळी घडणाऱ्या घडामोडींमुळे तुमच्या नियोजनाला अर्थ राहणार नाही. व्यापार उद्योगातील नवीन करारांवर शक्यतो सही करू नका. तसेच घाईने कोणावरही विश्वास ठेवू नका. परदेश व्यवहारात सावधता बाळगा. नोकरीमध्ये वरिष्ठांची आज्ञा वगळता इतरांच्या नादी लागू नका. घरामध्ये सर्व सदस्यांशी जपून बोला म्हणजे गैरसमज टळतील. विद्यार्थ्यांनी स्मरणशक्तीवर अतिताण देऊ नये.

मीन सूर्यग्रहण राशीच्या धनस्थानात होणार आहे. दैनंदिन कामाचा तुम्हाला मनस्वी कंटाळा येईल. परंतु जबाबदाऱ्यांमध्ये जखडले गेल्यामुळे त्याला म्हणावा तसा वेळ देता येणार नाही. व्यापार धंद्यात जे पैसे अपेक्षित होते ते तुमच्या हातात पडतील, पण त्याकरता बरीच निर्थक धावपळ करावी लागेल. नोकरीमध्ये शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवून तुमची मर्यादा सोडू नका. घरामध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा जुन्या प्रश्नावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे.