lp66हल्ली बरेचजण अमेरिका, कॅनडा असे पर्यटन करतात. त्याऐवजी जरा वाट वाकडी करून या झगमगत्या शहरांमधल्या अनोख्या निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर तिथल्या बान्फ आणि जास्पर नॅशनल पार्कला भेट द्यायलाच हवी.

थ्री ननस् या पॉइंटपासून जवळच म्हणजे साधारण २० कि. मी. अंतरावर आपण निसर्गाने नटलेल्या बान्फ शहरात प्रवेश करतो. बान्फ हे बो रिव्हर व स्प्रे रिव्हर यांच्या संगमावर आणि कॅस्केड, रंडल, नॉरके व सल्फर माऊंटन यांच्या व्हॅलीत समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंचीवर वसलेले नॅशनल पार्कमधील टुमदार शहर. येथे आपण रेल्वेनेही येऊ शकता. १८८३ साली कॅनेडिअन पॅसिफिक रेल्वेबांधणी चालू असताना स्टीफन व स्मिथ हे दोन कर्मचारी फिरत फिरत सल्फर माऊंटन येथे आले. त्यांना तो परिसर फार आवडला व तिथे त्यांनी आपला मुक्काम ठोकला. स्टिफन यांना ही जागा फारच आवडली व त्यांनी या जागेला स्कॉटलंडमधील आपल्या जन्मगावाचे नाव दिले, ‘बान्फ’. शहर हळूहळू वसू लागले. रम्य स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली. कामधंदा सुरू करावा या विचाराने वेगवेगळ्या स्तरातले लोक येऊ लागले. काही तिथेच स्थायिक झाले. तेव्हा सुरू झालेल्या लहानमोठय़ा व्यवसायांचे रूपांतर आता प्रचंड इंडस्ट्रीजमध्ये झाले आहेत.
त्या काळी कॅनेडिअन पॅसिफिक रेल्वेचे मॅनेजर विल्यम कॉर्नेलीअस व्हॅन हॉर्न यांनी पर्यटनाची दूरदृष्टी ठेवून भव्य असे ५०० खोल्या असलेले ११ मजली लाकडी हॉटेल बांधले. तेव्हा विजेची सोय नसल्याने कंदिलाचा वापर होत असे. त्या हॉटेलची खुबी अशी की कोणत्याही खोलीतून रॉकीज्चे नयनरम्य दृश्य दिसावे म्हणून सर्वच खिडक्या एकाच दिशेने ठेवल्या. समोरच बो नदीवरील बो फॉल आहे. आता तेच हॉटेल पंचतारांकित बान्फ स्प्रिंग हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. कॉर्नेलीअसचे म्हणणे असे होते की ‘‘वुई कॅन नॉट एक्स्पोर्ट सिनरी, बट वुई विल इंपोर्ट व्हिजीटर्स’’. हॉटेलच्या आवारातच त्याचा हॉटेलकडे अंगुली निर्देश केलेला पुतळा आहे.
१८९५ साली बान्फ नॅशनल पार्क हे कॅनडातील पहिले नॅशनल पार्क स्थापन झाले. आज तेच जगभरातील पर्यटकांचा मस्ट व्हिजीट स्पॉट झाला आहे. आणि खरंच तशीच ही जागा आहे. रिझव्‍‌र्ह पार्क असल्याने प्राण्यांना अभय आहे. हायवेवर प्राण्यांनी येऊ नये म्हणून दुतर्फा असलेल्या हिरवळीवर तारांचे कंपाऊंड व ओव्हर हेड ब्रीजवर देखील हीच व्यवस्था. त्यामुळे वाहतुकीसाठी अजिबात अडथळा नाही. इथे आणखीन नवीनच व्यवस्था पाहायला मिळाली. ती म्हणजे हमरस्ता ओलांडताना सर्वच दिशांमधील पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल एकाच वेळी सुरू होऊन आपण कोणत्याही दिशेला जाऊ शकतो.
lp71
‘बान्फ’ हे या नॅशनल पार्कमधले छोटेसे गाव. रॉकीज्ने नटलेला निसर्ग, डोंगराळ भागांमुळे हायकिंग, माऊंटन बाइकिंग, स्की अशा विविध अ‍ॅक्टीव्हिटीजसाठी अनुकूल आहे. अमेरिका कॅॅनडामधील फेव्हरीट डेस्टीनेशन असलेल्या प्रसिद्ध सल्फर माऊंटनवर गंडोलाने जाऊन पाहायलाच हवे. चौफेर असलेल्या बाल्कनीतून केकच्या स्लाइसप्रमाणे दिसणारा माऊंट रंडल्, उंचसखल कडे असलेला कास्केड माऊंटन, माऊंट नॉरके सारं काही मनोरम असेच आहे. कॅनेडिअन पॅसिफिक रेल्वेच्या बांधकामासाठी डोंगरात बोगदा खोदायचा होता, काही कारणास्तव तो करता आला नाही त्यामुळे त्याच नावाने ओळखला जाणारा टनेल माऊंटन, बाजूलाच मिनेवांका लेक आणि एकीकडे बान्फ गाव. सल्फर माऊंटनवरील हॉट स्प्रिंगमधील गरम पाण्याच्या पूलमध्ये बसण्याची मजा औरच. पण पंधरा मिनिटांपेक्षा जास्त बसता येत नाही.
लेक लुईस, मोरेन, मलीन, पिटो लेक, अ‍ॅथबास्का ग्लेशिअर व कोलंबिअन आइस फिल्ड हे अनुक्रमे बान्फ व जास्पर पार्कमधील नक्कीच पाहण्याची ठिकाणं. मोरेन लेक हा समुद्रसपाटीपासून १८४० फूट उंचीवरील हिरवट झाक असलेला लेक. हिवाळ्यात पडलेले हिम उन्हाळ्यात वितळल्याने पाण्याची पातळी वाढते, पण हे वाढते पाणी बाहेर जायला वाव नसल्याने तसेच राहते. सतत होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्यातील घटकांची तीव्रता वाढून त्याला हिरवट निळा रंग येतो. सतत घसरणारे हिम पाण्यातील गाळात अडकल्याने त्याचे वेगवेगळे रंग व आकार दिसतात. त्यांना रॉक फ्लोअर म्हणतात. लेकमध्ये आपल्याला ठिकठिकाणी रॉक फ्लोअर तरंगताना दिसतात. सभोवार दहा डोंगर शिखरे असल्याने त्याला ‘लेक ऑफ टेन पीकस् व्हॅली’ असे म्हणतात. रस्त्यावरून ही शोभा पाहण्यापेक्षा ज्यांना जमेल त्यांनी जवळच लहानमोठय़ा दगडांनी झालेल्या उंचवटय़ावर जाऊन नजारा पाहावाच. काय मस्त दिसतो. एकेकाळी मोरेन लेक हे कॅनेडिअन २० डॉलरच्या नोटेवर दिमाखात मिरवत होते.
lp67
जवळच लेक लुईस व्हिलेज आहे. समुद्रसपाटी पासून १७३२ फूट उंचीवरील तलावाला व्हिक्टोरिआ राणीची मुलगी लुईस आल्बर्टा हिचे नाव दिले आहे. लेकच्या मागील बाजूस व्हिक्टोरिआ ग्लेशिअर आहे. या भागाला शातू लेक लुईस असे म्हणतात. मोरेनपेक्षा क्षेत्रफळाने दुप्पट असणाऱ्या या लेकच्या काठाने चालण्यासाठी मस्त ट्रॅक आहे. इथले पाणी लुईस क्रीकमधून बो रिव्हरमध्ये वाहत असल्याने त्याचा रंग निळा आहे. सुरुवातीलाच पंचतारांकित फेअर माँट हॉटेल आहे. पूर्वी रेल्वेने प्रवास करणाऱ्या धनिकांसाठी हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून हे हॉटेल बांधण्यात आले होते. पण पुढे विमानसेवा सुरू झाल्याने रेल्वे प्रवास कमी झाला, पण हे अजूनही आपला आब ठेवून आहे.
lp70
जवळच्या ग्लेशिअरवरून घोंघावत येणाऱ्या व अ‍ॅथबास्का नदीशी मिळून सदैव खळाळणाऱ्या विकेड रिव्हरमुळे झालेला लेक मलीन. रौद्र रूप असणाऱ्या नदीवर प्रवास करताना फ्रेंच व्यापाऱ्यांनी क्लेशकारक किंवा त्रासदायक म्हणून तिला विकेड रिव्हर म्हटलं. एव्हढंच नाही तर ही नदी डोंगर पोखरून आजुबाजूला पसरत वाहत गेली आहे. त्यामुळे २३ कि. मी. लांब व ६० मी. खोल असा ‘मलीन लेक’ झाला आहे. इथले पाणी सतत वाहत असल्याने नीळसर दिसते. ही नदी एका दिशेन वाहत येऊन दुसऱ्या दिशेने जमिनी खालून नऊ किलोमीटर वाहत बाहेर पडते. हा नदीचा प्रवास पाहण्यासाठी मलीन कनाल येथे आपल्याला थोडेफार खोलवर उतरावे लागते. जमिनी खालून वाहत येणाऱ्या हे पाणी ५५ मीटर खोल घळीत पडणाऱ्या पाण्याचा वेग सेकंदाला लाखो गॅलन असा अतिप्रचंड असतो. हे सारे अद्भुत पाहण्यासाठी छानपैकी ब्रीज आहे. खोलवर कोसळणाऱ्या धबधब्यातून उडणाऱ्या पाण्याच्या तुषारांमुळे इंद्रधनूची कमान दृश्ये आणखीनच उठावदार करते. अशा विकेड मलीन रिव्हरचा मलीन लेक हा जास्पर नॅशनल पार्कचा मस्ट सी पॉइंट आहे.
lp69
अलास्का ते पॅतेगोनियन रेंजेसपर्यंत पसरलेले कोलंबीअन आइसफिल्ड हे अमेरिकन काँटिनेंटल डिव्हाइड लाइनच्या दोनही बाजूस असल्याने त्यावरील ग्लेशिअर्स तीनही दिशांना आर्टीक, पॅसिफिक व अटलांटिक महासागरांपर्यंत पसरलेली आहेत. या प्रचंड आइसफिल्डचे क्षेत्रफळ ३२५ चौरस किलोमीटर आहे. ३०० मीटर खोली असणाऱ्या या आइसफिल्डमध्ये दरवर्षी साधारणपणे ७ मीटर स्नो फॉलची भर पडते. आइस फिल्डवर चालण्यासाठी स्नो कोचने अगदी हायवे जवळून, पण मातीने झाकलेल्या ग्लेशिअरपासून ते पांढऱ्या स्वच्छ हिमपृष्ठावर येतो. आजुबाजूला अ‍ॅथबास्का, ब्राइस, स्नो डोम अशी बरीच बर्फाच्छादित शिखरे आहेत. शिवाय काही शेकडो वर्षांपूर्वीची झाडे ही आहेत.
lp68
बान्फसारखेच जास्पर हेदेखील रॉकीजमधले एक टुमदार शहर. अ‍ॅथबास्का नदीच्या खोऱ्यात ट्रान्स पॅसिफिक रेल्वेचे १९०७ मध्ये बांधकाम सुरू होते त्यावेळी यार्डमध्ये इंजिन ठेवण्यासाठीची ही जागा. पण भविष्यात पर्यटकांचा ओघ वाढणार या विचाराने त्यावेळचे अध्यक्ष फिहाू यांनी गावाची आखणी केली. पुढे नॅशनल पार्क झाल्यावर या गावाचे नामकरण जास्पर असे करण्यात आले. बो व्हॅली येथे ट्रेकिंगच्या निमित्ताने नेहमी भेट देणारा बिल पिटो याने गर्द वनराईतला लेक शोधल्याबद्दल तो त्याच्या नावाने ओळखला जातो. उन्हाळयात पिटो ग्लेशिअरवरून येणारे पाणी आपल्याबरोबर स्नो घेऊन येत असल्याने पृष्ठभागावरील रॉक फ्लोअर लेकला निळा रंग देते. पुढे हे पाणी मिस्ताया रिव्हरमध्ये जाते. बाजूनेच चालण्याचा आखीव मार्ग आहे. पण हा लेक पाहायचा तो आइस फिल्ड हायवेवरील बो पॉइंट या जागेवरूनच. वर निरभ्र आकाश, मागे ग्लेशिअर, सभोवार हिरवीगार वनराई कसे दृश्य असेल ते प्रत्यक्षच अनुभवयाला हवे.
गौरी बोरकर