scorecardresearch

भविष्य विशेष : वार्षिक भविष्य २०२१

यावर्षी २०२१ सालाच्या माध्यमातून येणारा बुध ग्रहाचा ५ अंक देवदूत ठरेल आणि मागील वर्षांची बरीच दु:खे पुसून टाकेल.

भविष्य विशेष : वार्षिक भविष्य २०२१
या वर्षांत मानवजात आपल्या बुद्धीचा उपयोग स्वत:च्या उत्कर्षांसाठी करेल.

उल्हास गुप्ते – response.lokprabha@expressindia.com

२०२० चे भाकीत खरे ठरले!

२०२० मध्ये दोन वेळा २ आणि शून्यही दोन आहेत. हळव्या अंकामागे शून्य आले तर समस्यांमध्ये अधिक भर पडेल. २०२० हे वर्ष दोन अंकाची उपस्थिती आणि त्यावर दोन वेळा येणारे शून्य काहीसे उपद्रवी ठरेल, असे भाकीत गेल्या वर्षांच्या भविष्य लेखात करण्यात आले होते. २०२० मधील घटनाक्रम पाहता, ते भाकीत खरे ठरले!

२०२०हे वर्ष खूप काही शिकवून गेले. संकटाचे अक्राळविक्राळ स्वरूप एखाद्या वादळासारखे अंगावर धावून येते तेव्हा आपणच आपले संरक्षक होतो. सहानुभूती मदत यांची अपेक्षा न करता पुढे जाण्यास आपण सिद्ध होतो. तिथेच एक निर्भयता प्राप्त होते आणि मरणाचे भय नाहीसे होते. ही सुज्ञ संवेदना जपणारा बुध ग्रह माणसाला विशेष बळ प्राप्त करून देतो.

यावर्षी २०२१ सालाच्या माध्यमातून येणारा बुध ग्रहाचा ५ अंक देवदूत ठरेल आणि मागील वर्षांची बरीच दु:खे पुसून टाकेल. या वर्षांत मानवजात आपल्या बुद्धीचा उपयोग स्वत:च्या उत्कर्षांसाठी करेल. अवकाश संशोधन, पर्यावरण आणि अन्न यावर प्रयाग्ेा होऊन त्यातून कुपोषण आरोग्य या विषयावर सकारात्मक विचार होईल. त्यातून समस्या दूर करण्याचे अनेक मार्ग निर्माण होतील.

नुकतीच एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. जगातील एक बलाढय़ राष्ट्र असलेल्या अमेरिकेतील ‘सत्तापालट’ पूर्ण जगाला एक आशेचा किरण दाखवणारा ठरेल. जो बायडेन यांच्या जन्मकुंडलीतील भाग्यातील कर्केचा गुरू त्यांच्या उदारमतवादाची साक्ष देतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्या पत्रिकेत साम्य आहे. हे दोन नेते शांततेचा मार्ग अंगीकारतील. विद्ध्वंसक क्षमता वाढवण्याऐवजी शेतीसारख्या अत्यावश्यक गरजांवर लक्ष केंद्रित केले जाईल. जगातील कोणताच माणूस उपाशी राहू नये, यासाठी प्रयत्न केले जातील. प्राथमिक गरजा भागवण्यास प्राधान्य दिले जाईल.

२०२१ हे वर्ष म्हणजे २+०+२+१ = ५. पाच या अंकावर बुध ग्रहाचा प्रभाव असणार आहे त्यामुळे मन आणि बुद्धी यांचा उत्तम समन्वय साधला जाईल. या अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे सूर्याचे पाचशी असलेले नाते. संख्याशास्त्रातील खाल्डीयन पद्धतीनुसार पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी ३६५ दिवस लागतात. त्याचे ख्वाल्डीयन पद्धतीने मांडलेले हे आश्चर्य अचंबित करते.

३६५= १४= १+४= ५ सूर्य या शब्दाची खाल्डीयन पद्धतीने अक्षराची किंमत ३६५ अशी होते. नि अखेर यांची बेरीज ३+६+५= १४= १+४= ५ होते. असा सकारात्मक स्पंदने असणारा हा अंक नक्कीच पूर्ण जगाला चांगली ऊर्जा देईल. आपला शेजारी देश चीनचे पंतप्रधान क्षी जिनपिंग यांच्या पत्रिकेतील व्ययस्थानी चंद्र-केतू ग्रहणयोग आहे. त्यामुळे ते लहरी, स्वार्थी, अविवेकी होण्याची शक्यता आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० यांच्या पूर्ण जन्मतारखेचा एकांक १+७+९+१+९+५+०= ३२= ३ +२= ५ येतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना हे वर्ष खूपच शुभ ठरेल. तसेच हे वर्ष भारतासाठी खूप यशदायक ठरेल. पण भारतातील अंतर्गत राजकारणात अडचणी निर्माण होतील. गेल्या वर्षी अतिवृष्टी, वणवे अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला होता. अशा संकटांची तीव्रता यंदा कमी होईल.

यावर्षी १, १०, १९, २८ तसेच ४, १३, २२, ३१ आणि ५, १४, २३ या जन्मतारखेच्या व्यक्तींना नवीन परिचय लाभदायक ठरतील. उद्योगधंद्यात नोकरीत यशदायक घटना घडतील. विशेषत: २, ११, २०, २९ आणि ६, १५, २४ तसेच ७, १६, २५ यापैकी जन्मतारीख असलेल्या व्यक्तींना नवीन कामांची संधी लाभेल. या संधींचा त्यांनी चांगला उपयोग करून घ्यावा. नवीन परिचय, प्रेमात अंतर ठेवून रहा म्हणजे मानसिक त्रास जाणवणार नाही. ३, १२, २१ आणि ३० जन्मतारखेच्या व्यक्तींची बौद्धिक कामांतून आर्थिक आवक वाढेल, पण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक आणि अतिहव्यास टाळावा. दूरच्या प्रवासात आरोग्य आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. ८, २६ आणि ९, १८, २७ या व्यक्तींनी अनाठायी साहस टाळावे आणि रागावर नियंत्रण ठेवावे. मेहनतीतून यश लाभेल.

मेष (२१ मार्च ते १९ एप्रिल)

आपला जन्म २१ मार्च ते १९ एप्रिलदरम्यान झाला असेल तर या कालावर नऊ अंकाचा प्रभाव असतो. २०२१ सालचा एकांक २+०+२+१= ५  हा अंक बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. एकूण या वर्षी बुध आणि मंगळ ग्रहांचे वर्चस्व मेष राशीवर असणार आहे. त्यामुळे मंगळ-बुधाच्या सहवासातून निर्माण होणारा अहंकार आपल्याला त्रासदायक ठरू शकेल याकरिता कठोर वागणे, रागाने बोलणे जरूर टाळावे. या सुज्ञ वागण्यातून आपल्याला होणारा विरोध कमी होईल आणि आपले मानसिक संतुलन उत्तम सांभाळले जाईल. मात्र बुध-मंगळाच्या शुभ स्पंदनातून आपल्याला लाभणारी बुद्धिमत्ता, साहस आणि श्रम करण्याची ऊर्जा यांचा आपण यथायोग्य उपयोग आपल्या रोजच्या जीवनात करावा. ते खूप हिताचे ठरेल.

जानेवारी २०२१ : वर्षांच्या सुरुवातीलाच शुक्र-मंगळ शुभयोगात. उद्योगधंद्यात कामात उत्साह वाढेल. मात्र औदार्य, दिलदारपणा यांचा अतिरेक होऊ देऊ नका. मैत्रीत, प्रेमात दिलेला शब्द पाळताना खूप कसरत करावी लागेल. अति विश्वास, भावना यावर संयम ठेवा. कामात दिरंगाई टाळा.

फेब्रुवारी २०२१ : दशमातील शुक्राचे आगमन- मानसिक, भावनिक नात्यात खूप तडजोडी कराव्या लागतील. उद्योग-नोकरीधंद्यात कामाची जबाबदारी वाढेल. नेपच्यून-मंगळाच्या मैत्रीतून राजकारण, सामाजिक कामात आपल्या कामाचे कौतुक होईल; आणि त्यातून नवीन  कामे आणि जबाबदाऱ्या वाढतील.

मार्च २०२१ : आपल्या लाभस्थानात शुभ ग्रहांचा महोत्सव सुरू आहे. यादरम्यान उद्योगधंद्यात, नोकरीत उत्साह वाढेल. नवीन कामे, नव्या योजना यावर विचार करण्यासाठी उत्तम काळ. मात्र सारे काही पारखून घ्या. नको ते साहस टाळा. विशेषत: शेअर बाजारासंबंधातील व्यवहारांत सतर्क राहा.

एप्रिल २०२१ : लाभातील गुरू-नेपच्यून मनाला खूप आधार देतात. अचानक उद्योगधंद्यात नोकरीत आलेल्या जबाबदाऱ्या जरी क्लेशदायक वाटल्या तरी त्या भावी काळात खूपशा लाभदायक ठरतील. या काळात शब्द जपून वापरा. जुळवून घ्या.

मे २०२१ : अकारण आत्मविश्वास कमी होणे, कामातील निर्णयात मागेपुढे होणे या गोष्टींना त्वरित दूर सारा. निर्भयतेने पुढे जा. पराक्रमात आलेला मंगळ आपल्याला उत्तम साथ देईल. अडचणींवर सहज मात करू शकाल. दैव निश्चित साथ देईल.

जून २०२१ : चतुर्थात मंगळाचे आगमन- कौटुंबिक समस्या पुढे येतील, पण लाभातील गुरूचे सहकार्य मोलाचे ठरेल. तसेच येणारा रवी खूपशा उद्योगधंद्यांत, नोकरीत मदतीचा ठरेल. खूप हळवेपणा, कोमलता यापासून दूर राहा. व्यवहार आणि मन दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

जुलै २०२१ : कौटुंबिक वातावरण हळूहळू बदलेल. आरोग्याच्या दृष्टीने काहीसा कठीण काळ. पथ्य आणि वेळेवर औषध यातून प्रकृतीस आराम पडेल. मानसिक स्वास्थ जपा. श्रम आणि साहस यातून अडचणीचा मार्ग सोपा होईल. घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.

ऑगस्ट २०२१ : रवी-मंगळ एकत्र. अशा काळात महत्त्वाचे निर्णय त्वरित घेऊ नका. उद्योगधंद्यात-नोकरीत नफा-तोटय़ाची बाजू ओळखून पुढचे व्यवहार करा. प्रेमात, नात्यात दाखवलेली उदारता त्रासदायक ठरू शकेल. यासाठी सावधतेने वागा. अतिनम्रता हा अवगुण ठरू शकतो.

सप्टेंबर २०२१ : षष्ठातील रवी-मंगळ प्रवेश खूपसा दिलासादायक ठरेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. खूपशा ठरवलेल्या गोष्टींची पूर्तता होईल. नातेवाईक, मित्रमंडळीतून आनंद मिळेल. पैसे जपून वापरा. तब्येतीची काळजी घ्या.

ऑक्टोबर २०२१ : अष्टमातील केतू आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल. पोटाचे विकार विशेषत: मूळव्याध यांसारख्या व्याधी होऊ नयेत. यासाठी विशेष काळजी घ्यावी. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचा ताण वाढेल. भावनिक, मानसिक ओढाताण टाळा. वादविवाद टाळा. नवीन कामे तूर्त नकोत.

नोव्हेंबर २०२१ : रवी अष्टमात. वाहन जपून चालवणे. तसेच शत्रुसंघर्षांत वेळ घालवू नका. लाभात येणारा गुरू खूपशा गोष्टींना पूरक ठरेल. उद्योगधंद्यात-नोकरीत अडलेल्या योजना पुढे सरकतील. बोलण्यातील आत्मविश्वास वाढेल.

डिसेंबर २०२१ : शुक्र-मंगळ शुभयोगात. खूपशा कामांना गती प्राप्त होईल. गुरूचे लाभातील वास्तव्य राजकारण, सामाजिक कार्यात खूप महत्त्वाचे ठरेल. होणारे निर्णय आनंद देतील. मात्र भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे कदापि विसरू नका. न्यायबुद्धी विसरू नका.

वृषभ (२० एप्रिल ते २० मे)

या वर्षी २०२१ चा एकांक २+०+२+१= ५ हा अंक बुध ग्रहाचा, तर वृषभ ही शुक्राची रास आहे. बुध आणि शुक्र हे उत्तम मित्र आहेत. त्यामुळे या वर्षी वृषभ राशीचा प्रवास बुध-शुक्राच्या साहाय्याने होणार आहे. कलेतून वा छंदातून जरी मानसिक आनंद लाभला तरी जगण्यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि नेमके या वर्षी लाभणारा बुधाचा सहवास शुक्राच्या उधळेपणाला व्यवहाराने कसे जगावे याचे भान देईल. आर्थिक आणि मानसिक फसवणुकीला सहज बळी पडणारी ही रास या वर्षी व्यवहाराचे धडे बुधाकडून घेईल. सामाजिक जीवनात जगताना पैसा आणि मनाची गुंतवणूक योग्य रीतीने केल्यास जगणे खूप सोपे होईल. त्यामुळे वृषभ राशीला हे वर्ष नक्कीच आनंद आणि समाधान देईल.

जानेवारी २०२१ : नवमातील शनी, गुरूचा खूप मोठा आधार वाटेल. तर शुक्र-मंगळाचा नवपंचम योग आर्थिक सुबत्ता देईल, पण तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल. मैत्री, प्रेमात प्रलोभने, वचने यात अडकू नका. आपल्या सात्त्विकतेला तडा जाणार नाही याची काळजी घ्या.

फेब्रुवारी २०२१ : दशमात रवी. उद्योगधंद्यात- नोकरीत रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत समाधान लाभेल. सामाजिक कार्यात, राजकारणात आपले नेतृत्व महत्त्वाचे ठरेल. मात्र रवी-मंगळ केंद्र योगामुळे कौटुंबिक वातावरणात जातीने लक्ष द्यावे. गैरसमज दूर करावेत. व्यायाम, चालणे महत्त्वाचे आहे.

मार्च २०२१ : शनी-शुक्र त्रिएकादश योग. एकूण ग्रहांचे पाठबळ उत्तम. या काळात महत्त्वाची कामे उरकून घ्या. आजचे कठोर परिश्रम भावी काळासाठी महत्त्वाचे ठरतील. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांना महत्त्व प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत प्रगती साधाल.

एप्रिल २०२१ : व्ययात शुक्र. खर्चाचे प्रमाण वाढेल. उद्योगधंद्यात, नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात आपल्या बहुमोल कामाची किंमत होईल. आर्थिक लाभाचे प्रसंग येतील. मात्र अतिविचार, गैरसमज टाळा.

मे २०२१ : शनी-शुक्र नवपंचम योग, तर मंगळ धनस्थानात. एकंदरीत ग्रहांची स्थिती संमिश्रित आहे. त्यामुळे स्थिर, शांतपणे प्रसंग हाताळण्याची सवय तुम्हाला उत्तम यश देईल. नवीन योजना, नवीन कल्पना यात सफलता प्राप्त होईल. मात्र खर्चाचे प्रमाण सांभाळा.

जून २०२१ : धनस्थानात शुक्र, पराक्रमात मंगळ. एकूण योग उत्तम जुळून येत आहे. कर्तृत्वाला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल. नवीन ओळखी, नवीन परिचय यातून कार्याची व्याप्ती वाढेल. सामाजिक कार्यात, राजकारणात नवीन जबाबदाऱ्या वाढतील.

जुलै २०२१ : चतुर्थात शुक्र, पराक्रमात रवी. नवीन योजना नवीन कामे यात यश लाभेल. आर्थिक बळ वाढेल. मात्र चतुर्थातील मंगळ कौटुंबिक जुने वाद निर्माण करेल. त्यात खर्चाचे प्रमाण वाढेल. यावर शांतपणे स्थिर राहून परिस्थिती हाताळावी. कोणतेही टोकाचे निर्णय घेऊ नयेत.

ऑगस्ट २०२१ : दशमात गुरू, पंचमात शुक्र. घरातील वातावरणात खूपसा सकारात्मक बदल दिसून येईल. चतुर्थात जरी मंगळ असला तरी वातावरण ठीक राहील. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यात, नोकरीतही सुसंवाद साधला जाईल. कामातील जबाबदाऱ्या वाढतील.

सप्टेंबर २०२१  गुरू-मंगळ नवपंचम योग. व्यवसाय-नोकरीत उत्तम संधी प्राप्त होतील. वेळेचा अपव्यय टाळा. महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे. याचे भान असणे खूप गरजेचे ठरेल. भावनिक गुंतवणूक, वादविवाद या गोष्टी टाळा. आर्थिक बाबतीत पैसे जपून वापरा.

ऑक्टोबर २०२१ : षष्ठात रवी आणि नवमात गुरू. या दोन ग्रहांच्या जोरावर वातावरणात खूपसा सकारात्मक बदल दिसून येईल. त्यात पंचमातील बुधाची बौद्धिकता खूप कामास येईल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ अशा विचारातून कामांना गती प्राप्त होईल नि आळस, मरगळ निघून जाईल.

नोव्हेंबर २०२१ : १६ नोव्हेंबपर्यंत महत्त्वाची कामे उरकून घ्या. अष्टमातील शुक्र जुनी येणी वसूल करेल. एकूण खूपशी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कला-साहित्य-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक होईल. आपल्या नवीन विचारसरणीचे स्वागत होईल. खूपसे गैरसमज दूर होतील.

डिसेंबर २०२१ : अष्टमात रवी आणि सप्तमात मंगळ. एकूण काहीशी संमिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र नवमातील शनीचा एकमेव आधार मनाला दिलासा देईल. वरिष्ठांशी उत्तम संवाद साधला जाईल. गुप्त शत्रूंची मिरासदारी उखडून टाकाल. मात्र चुकूनही तडजोड स्वीकारू नका.

मिथुन (२१ मे २० जून)

ज्यांचा जन्म २१ मे ते २० जूनदरम्यान झाला आहे अशा लोकांवर ५ अंकाचा म्हणजे बुध ग्रहाचा अंमल असतो. या वर्षी २०२१ चा एकांक ५ येतो. एकूण या वर्षी मिथुन राशीच्या लोकांना उद्योगधंद्यात, राजकारणात उत्तम यश लाभणार आहे. मात्र एक लक्षात असू द्या. ग्रहांच्या उत्तम साथीत आपला सद्विवेक जपा. बुद्धी आणि मनाच्या शर्यतीत मन नेहमी मागे असते. कारण मनाला मनातला गोतावळा घेऊन धावावं लागतं. त्यामुळे मन मागे राहते नी बुद्धिमत्तेचा विजय होतो, पण खऱ्या अर्थाने जगायचे असेल तर बुद्धी आणि मनाचा समन्वय साधून स्वत:शी स्पर्धा करा म्हणजे यश-अपयशाच्या पलीकडचे एक निवांत समाधान लाभेल.

जानेवारी २०२१ : लाभात मंगळ, षष्ठात केतू या दोघांचे मिथुन राशीला उत्तम सहकार्य लाभणार आहे. उद्योगधंद्यात-सामाजिक जीवनात, राजकारणात यशाचे झुकते माप आपल्या पारडय़ात असेल. जितके सहनशील आणि संयमाने वागाल तितके यश आपल्या जवळ येईल.

फेब्रुवारी २०२१ : गुरू, शनी ग्रहांचा पूर्णपणे असहकार, मात्र या महिन्याअखेरच्या काळात भाग्यात प्रवेश करणारे शुक्र महाराज खूपसा मोठा दिलासा देतील. विशेषत: उद्योगधंद्यात, नोकरीत आर्थिक समस्या दूर होतील. कोर्टाची प्रकरणे बाहेर मिटतील.

मार्च २०२१ : रवी-शुक्राचे दशमात होणारे आगमन शुभदायक ठरेल. उद्योगधंद्यात, नोकरीत घेतलेली आव्हाने सहज पार पाडू शकाल. नातेवाईक, मित्रमंडळी यांचे सदैव प्रेम लाभेल. मात्र इतरांच्या समस्या सोडवताना आपण त्यातला एक भाग बनू नका.

एप्रिल २०२१ : नवमात गुरू, तर लाभात रवी-शुक्राचा प्रवेश. एक अद्वितीय योग आपल्या जीवनात प्रवेश करीत आहे. मात्र आपल्या स्वराशीत चिकटून बसलेला मंगळ त्याची बिलकूल भीती बाळगू नका. तो या शुभ स्थितीत हतबल ठरेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा.

मे २०२१ : स्वराशीत मंगळ, व्ययात शुक्र जरी असला तरी हर्षल-गुरूच्या शुभयोगातून एक छानसा बदल आपल्या रोजच्या जीवनात दिसून येईल. आर्थिक बाबतीत नको ते खर्च टाळा. भावविवशता बाजूला सारून कृतिशील रहा. त्यातून खूपशा बाजू भक्कम होतील.

जून २०२१ : नोकरी-उद्योगधंद्यात आपण नव्याने मांडलेल्या विचाराचे स्वागत होईल. त्यातूनच नवीन कामांना गती प्राप्त होईल. पैशाचे उधार-उसनवार व्यवहार, जामीन राहणे अशा प्रकरणांत आपण गुंतू नका. कोर्टकचेरीपासून शक्यतो दूर राहाणे.

जुलै २०२१ : पराक्रमात शुक्र-मंगळ, नवमात गुरू. एकूण ग्रहांचा उत्तम पाठिंबा लाभात आहे, पण कुठल्याही बाबतीतला अतिरेक टाळा. शब्द जपून वापरा. नको ते आरोप येणार नाहीत याची काळजी घ्या. आप्तेष्ठांसाठी संबंध सलोख्याचे ठेवा. वाहन वेगाने चालवू नका.

ऑगस्ट २०२१ : पराक्रमात रवी-मंगळ, चतुर्थात शुक्र. एकूण या महिन्यात आपल्या राशीचा प्रवास सुखद होणार आहे. उद्योगधंद्यात नोकरीत उत्तम संधी चालून येतील. मात्र लोकप्रियता, प्रसिद्धी या जाळ्यात बिलकूल अडकू नका. हे सारे क्षणभंगुर ठरेल. ज्येष्ठांचा सन्मान राखा.

सप्टेंबर २०२१ : रवी-मंगळ चतुर्थ स्थानात नी गुरूचा अष्टमातील परतीचा प्रवास यामुळे घरातील वातावरणात लहानसान कुरबुरी चालू होतील. मात्र पंचमातील शुक्र परिस्थितीवर खूपसे नियंत्रण राखू शकेल. भावनिकता दूर ठेवून समजूतदारपणे प्रश्न सोडवा. महिनाअखेर काही शुभवार्ता कानी पडतील.

ऑक्टोबर २०२१ : आपल्या राशीत या महिन्यात होणारा बुध-शुक्र त्रिएकादश योग खूपशा गोष्टींना चालना देईल. अनपेक्षित संधीतून सफलता प्राप्त होईल. त्यात राजकारण, समाजकार्य नी उद्योगधंद्याच्या बाबतीत आळस, कंटाळा आणि पुढे करू अशा सबबींना थारा देऊ नका.

नोव्हेंबर २०२१ : पुन्हा एकदा गुरूचे भाग्यातले आगमन आपल्या यशाला खूपसे मदतीचे ठरेल. नवीन योजना नवीन कल्पना मार्गी लागतील. कामात हुरूप उत्साह वाढेल. त्याबरोबर आर्थिक आवक वाढेल. रखडलेले निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ. खूपसे प्रश्न समेट करून निकालात काढू शकाल.

डिसेंबर २०२१ : गुरू-रवि शुभयोगात. उद्योगधंद्यात, नोकरीत प्रगतीचा काळ. मात्र स्पर्धा बेजबाबदार वागणे या गुणांना आवर घाला. सामाजिक कार्यात राजकारणात झेपेल अशा जबाबदाऱ्या घ्या. शब्द देणे, हमी देणे अशा गोष्टींना थारा देऊ नका. दया, भावविवशता यांतून अडचणीत येऊ नका.

कर्क (२१ जून ते २० जुलै)

आपला जन्म २१ जून ते २० जुलैदरम्यान झाला असेल तर त्या कालावर दोन अंकाचा प्रभाव दिसून येतो. या वर्षी २०२१ साली २+०+२+१ = ५ अंकाचा म्हणजे बुधाचा प्रभाव असणार आहे. मन आणि बुद्धी यांचा एक वेगळा आविष्कार या वर्षी अनुभवयास मिळेल. पोट भुकेने व्याकूळ होते तर मन दु:खाच्या झळीने व्यथित होते. भूक व्यवहार शिकवते, तर मन भावनेत काहूर. या वर्षी मन नि बुद्धीच्या मैत्रीतून भावनेला बुद्धीची साथ लाभणार आहे. ‘मला सहानुभूतीची भिक्षा नको, असा ठाम विश्वास चंद्र नि बुधाच्या समन्वयातून निर्माण होणार आहे. त्यामुळे हे साल कर्क राशीसाठी एक छान संधी म्हणून पाहता येईल.

जानेवारी २०२१ : सप्तमात रवी-गुरू-शनी तर शुक्र षष्ठात अशा विपरीत स्थितीत मनाची एकाग्रता ढळू देऊ नका. वैचारिक गोंधळ टाळा. मंगळ – नेपच्यूनच्या शुभयोगातून मनाची मोठी ताकद निर्माण होईल. ती जरूर तुम्हाला मदतीची ठरेल.

फेब्रुवारी २०२१ : राहू-गुरू नवपंचम योगातून नव्या योजना, नवी कामे सुरू होतील. आर्थिक बाजू उत्तम राहील. वरिष्ठांशी उत्तम संवाद साधला जाईल. मात्र मैत्री प्रेम यात फारसे भरकटत जाऊ नका. त्यातून आरोप-प्रत्यारोपांचे नाटय़ घडेल तसेच अति प्रेमाचा मार्ग मनस्तापाकडे वळतो हे लक्षात असू द्यावे.

मार्च २०२१ : लाभस्थानातल्या मंगळाशी गुरूचा होणारा शुभयोग आपली मानसिकता उत्तम ठेवेल. त्यातूनच काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. उद्योगधंद्यात, नोकरीत पुरेसा वेळ द्या. चर्चा-संवादातून समस्यांचे स्वरूप सोपे होईल. त्यात आपण दाखवलेला सामंजस्यपणा सद्गुण ठरेल.

एप्रिल २०२१ : एकूण या महिन्यात ग्रहांचा असहकार ठळकपणे जाणवेल. त्यात मुख्य म्हणजे आपलं मन:स्वास्थ्य जपा. येणारा प्रत्येक प्रसंग आपली भूमिका वठवून निघून जातो. पण आठवणीच्या रूपात आपण जतन करत असतो. कामे उरकताना श्रम, चिकाटी ठेवा आणि ही ऊर्जा लाभातील राहू आपल्या राशीला जरूर देईल.

मे २०२१ : लाभात बुध, शुक्र, राहू यामुळे उद्योगधंद्यात, नोकरीत, कला-साहित्य क्षेत्रात आपली वाटचाल यशाकडे सुरू राहील. आपल्या कामात आपण केलेली चर्चा-संवाद यशस्वी होतील नि त्यातून लाभ, मानसन्मान घडेल.

जून २०२१ : स्वराशीत मंगळ तर व्ययात रवी एकूण खूूपशा मनाला न पटणाऱ्या गोष्टी घडतील. त्यावर शांत राहणे हा एक नामी उपाय ठरेल. अस्वस्थ शुक्राच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्या. मात्र लाभातील राहू बऱ्याच बाबतीत खूप महत्त्वाचा ठरेल. त्यातून खूपशा समस्या सुटतील.

जुलै २०२१ : जरी रवी, मंगळ स्वराशीत असले तरी धनस्थानात प्रवेश करणारा शुक्र खूपसा लाभदायक ठरेल. अनपेक्षित संधीतून सफलता प्राप्त होईल. तर मंगळाच्या सहवासातून  शिस्त नि वक्तशीरपणा प्राप्त होईल. उद्योगधंद्यात नोकरीत आपले स्थान बळकट होईल.

ऑगस्ट २०२१ : धनस्थानात मंगळाचा प्रवेश खर्चाचे प्रमाण वाढवेल. पराक्रमातील शुक्र कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात नावलौकिक देईल, मात्र भावुकता, सहानुभूती यांची अपेक्षा करू नका. तो मनाचा दुबळेपणा ठरेल. तसेच वादविवादाला पूर्णविराम द्या नि वेळेचीही बचत करा.

सप्टेंबर २०२१ : पराक्रमात रवी-मंगळ, लाभात राहू. एकूण ग्रहांचा उत्तम आशीर्वाद आपल्याला या महिन्यात लाभत आहे. मात्र निर्णय घेताना, पैशाचा वापर करताना तो काळजीपूर्वक करावा. नोकरीधंद्यात तूर्त बदल करू नये. उद्योगधंद्यातील श्रमातून एक वेगळे समाधान प्राप्त होते.

ऑक्टोबर २०२१ : पराक्रमात मंगळ नि पंचमात शुक्र. एकूण ग्रहस्थितीचा आलेख आपल्या कामात बहुमोल ठरेल. आपल्या वागण्या-बोलण्यातील नम्रता, बुद्धिमत्ता या सद्गुणांचा उपयोग आपल्याला उद्योगधंद्यात, नोकरीत खूप होईल. त्यामुळे होणाऱ्या घडामोडी आपल्याला फायद्याच्या ठरतील.

नोव्हेंबर २०२१ : रवी षष्ठात, पंचमात बुध. उद्योगधंद्यात नोकरीत आपल्या कामाचा ठसा हळूहळू दिसू लागेल. पण आपल्या कार्यमग्नतेमुळे घरातील आपली अनुपस्थिती जाणवेल. त्यातून प्रेमाचे वादविवाद घडतील. पण ते फार काळ टिकणार नाहीत.

डिसेंबर २०२१ : १५ डिसेंबपर्यंत रवी षष्ठात, तर शुक्र सप्तमात एकूण उद्योगधंद्यात नोकरीत यांचे शुभ अस्तित्व जाणवू लागेल. मात्र इतर ग्रहांचा असहकार फारसा मनावर घेऊ नका. परिश्रम साहस नि एक लक्ष्य यातून आपला पराक्रम सिद्ध होईल.

सिंह (२१ जुलै ते २० ऑगस्ट)

२१ जुलै ते २० ऑगस्टदरम्यान ज्यांचा जन्म झाला आहे अशा लोकांवर रवीचा म्हणजे १ चा प्रभाव असणार आहे. तर या वर्षांच्या २०२१ = २+०+२+१ = ५ या बुधाच्या अंकाचाही अंमल वर्षभर असणार आहे. रवी, बुधाच्या छायेत सिंह राशीची माणसे वर्षभर वावरणार आहेत. रवीचे नेतृत्व साहस, धैर्य या सद्गुणांबरोबर बुधामधील खूप साधेपणा, विनम्रता, अति बुद्धिमत्ता या गुणांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या वर्षी सिंह राशीचा उत्कर्ष खूप चांगला होईल. प्रयत्न आणि पराकाष्ठा या दोन दुर्मीळ गोष्टींचा सहवास सिंह राशीपाशी असणार आहे. त्यामुळे उद्योगंधद्यात, नोकरीत या गुणांचा चांगला उपयोग होईल नि त्यातून ही माणसे आपली उत्तम प्रगती साधतील.

जानेवारी २०२१ : षष्ठात रवी-शनी त्यामुळे संघर्षांतून आपण सहीसलामत बाहेर पडाल. उद्योगधंदा-नोकरीत जरी सध्या संथपणा जाणवला तरी नवीन योजना, कामे मार्गी लागतील. आळस, हट्टीपणा बाजूला सारून वेळापत्रक आखून कामाची मांडणी करा. कामे अधिक सोपी होतील.

फेब्रुवारी २०२१ : रवी-हर्षल शुभयोगातून उद्योगधंद्यात, नोकरीत नवीन योजना, नवीन कामांचा प्रवेश होईल. राजकारणात, सामाजिक कार्यात आपली मते महत्त्वाची ठरतील. साहित्य, कलाक्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. अतिभावनिकता टाळा. संयमाने वागणे शहाणपणाचे ठरेल.

मार्च २०२१ : जगण्यात हट्टीपणा, हेकेखोरपणा आला की त्यापाठोपाठ संघर्ष उभा राहतो. यातून निर्माण होणारे वाद मनाला क्लेषदायक ठरू शकतात. तेव्हा आपली मानसिकता सांभाळणे गरजेचे ठरेल. शांत आणि स्थिरपणे घेतलेले निर्णय अधिक निकोप नि यशस्वी ठरतील.

एप्रिल २०२१ : एकूण ग्रहस्थिती संमिश्र स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येक प्रसंग, जबाबदारी विचारपूर्वक हाताळा. ती आपली कसोटी ठरेल. जवळपासच्या लोकांशी, नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपले वर्तन खूप महत्त्वाचे ठरेल.

मे २०२१ : रवी-गुरूच्या शुभ संकेतातून उद्योगधंद्यात, नोकरीत आनंद, उत्साह वाढेल. अनपेक्षित संधी चालून येतील. त्यातून आपल्या यशाचा मार्ग मोकळा होईल. व्यापार, राजकारण, कला, विज्ञान क्षेत्रात आपली ओळख खूप महत्त्वाची ठरेल. पण हे सारे करताना श्रम आणि संयम यांना विसरू नका.

जून २०२१ : जरी गुरू-मंगळ यांचा षडाष्टक असला तरी लाभातील  रवीचे पाठबळ खूप मोलाचे ठरेल. उद्योगधंद्यात भीती, संशय यांना थारा देऊ नका. निर्भयतेने वागा. तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला अधिक बळ देईल. सत्य, न्यायीवृत्ती यातून आपल्या कामाचे कौतुक होईल.

जुलै २०२१ : व्ययातील शुक्र-मंगळ यांच्या दुष्ट चक्रापासून दूर रहा. त्यातून गैरसमज, बदनामी यांना सामोरे जावे लागेल. तसेच अर्थप्राप्ती होईल. पण तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रेमप्रकरणातील भावुक प्रसंगाना फसू नका. स्थिर राहून निर्णय घ्या.

ऑगस्ट २०२१ : स्वराशीत रवी-मंगळ जरी फारसे चांगले नसले तरी शुक्राचे धन स्थानातील वास्तव्य खूपशा अडचणी दूर करेल. कामातील उत्साह वाढेल. काही जुनी येणी वसूल होतील. नवीन कामांना गती लाभेल. नोकरीधंद्यात हाताखालील लोकांशी प्रेमाने वागा.

सप्टेंबर २०२१ : धनस्थानात बुध-शुक्र उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. त्यातून आर्थिक लाभ होतील. नवीन घर घेण्यासाठी उत्तम काळ. कोर्टकचेरीच्या कामात यश लाभेल. नातेसंबंधात भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका अथवा निर्णय लादू नका.

ऑक्टोबर २०२१ : पराक्रमात रवी, त्यापाठोपाठ येणारा मंगळ साहस नि कर्तृत्व यातून खूपशा रखडलेल्या कामांना गती प्राप्त होईल. एकूण सुख म्हणजे उत्तम समाधान असा अनुभव एक वेगळा आनंद देईल. खूपशा समस्या परस्पर समजुतीने दूर होतील. पैशाची आवक वाढेल.

नोव्हेंबर २०२१ : रवी-गुरू त्रिएकादश योगातून उद्योगधंदा, नोकरीत नव्या पर्वाची सुरुवात होईल. त्यात शुक्राचे पंचमातील अस्तित्व साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रांत उत्तम नावलौकिक देईल. मात्र साहसी, धाडसी निर्णय तूर्त घेऊ नका. नवीन कामात पैसे गुंतवताना विचार आणि चौकशी करून पुढे सरका.

डिसेंबर २०२१ : रवी-गुरू लाभयोगातून राजकारण, कला, बौद्धिक क्षेत्रात आपला सहभाग यशस्वी ठरेल. आपल्या कामातील तडफदारपणाचे कौतुक होईल. व्यापार-उद्योगधंद्यात आर्थिक गणिते लाभदायक ठरतील. समस्या संपतील. त्यातून नव्या वाटा सापडतील. एकूण प्रसन्नतेचा हा काळ सुखावह ठरेल.

कन्या (२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)

कन्या राशीवर बुध ग्रहाचा अंमल असतो. ५ हा अंक बुधाचा. या वर्षी २०२१ साली २+०+२+१ = ५. एकूण पूर्ण वर्षभर या राशीवर बुधाचा प्रभाव असणार आहे. हा अतिशय सुज्ञ संवेदना जपणारा ग्रह आहे. या राशीच्या लोकांपाशी बुद्धीचा अचूक उपयोग करण्याची क्षमता नैसर्गिकरीत्या आलेली असते. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेऊन आयुष्यातील कठीण प्रसंगातल्या वेदना दूर करण्यात या व्यक्ती यशस्वी होतात. दु:खाकडे बुद्धीच्या नजरेने पाहिले की त्यातले हळवेपण तात्काळ संपते. एकूण या गोष्टी मनात फार काळ रेंगाळत राहत नाहीत. कारण मनाची घडणच अशी आहे. प्रत्येक चांगल्या-वाईट घटना घडून काळाबरोबर पुढे सरकतात नि त्यात आपण जगत असलेली भूमिकाही तिथेच संपते. त्यामुळे प्रेम, भावुकता अशा भावनिक गुंत्यात ही बुधाची रास कधीही दु:खाचा जप करीत बसत नाही. त्यामुळे यांच्यापाशी उत्तम जगण्याचे भान असते.

जानेवारी २०२१ : चतुर्थात शुक्र तर पंचमात बुध. आर्थिक आणि बौद्धिक प्रगतीचा काळ. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचाराचे वर्चस्व कायम राहील. शुक्र-नेपच्यून त्रिएकादश योग. जमीन देण्याघेण्याच्या व्यवहारात तसेच नवीन योजना, कामे यात यश लाभेल.

फेब्रुवारी २०२१ : षष्ठात रवी नि मंगळ-गुरू नवपंचम योग. उद्योगधंद्यात, नोकरीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील नि त्यातून आपण आपली प्रगती साधाल. राजकारणात, सामाजिक कार्यातील संघर्ष संपेल, यश मिळेल नि हे सारे उत्तम संवादातून प्राप्त होईल.

मार्च २०२१ : अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. घरातील मंडळीचे आपसात गैरसमज होतील. मात्र घरातील भांडण जास्त काळ ताणू नका. समेट घडवा. गैरसमज दूर करा. अखेरच्या पंधरवडय़ानंतर घरातील तणाव कमी होईल. वातावरणात फरक पडेल.

एप्रिल २०२१ : पराक्रमातील राहू सोडला तरी बाकीच्या ग्रहांचे पाठबळ फारसे लाभणार नाही. त्यामुळे नम्रतेने, विनयशीलतेने वागणे शहाणपणाचे ठरेल. खूपशा तडजोडीतून पेचप्रसंग सुटतील. आर्थिक बाबतीत पैशाचे व्यवहार चोख ठेवा. इस्टेटीचे वाद कोर्टाबाहेर मिटवणे फायद्याचे ठरेल.

मे २०२१ : नवमात शुक्र-रवी या दोन्ही ग्रहांचे पाठबळ खूपशा गोष्टींना मदतीचे ठरेल. उद्योगधंद्यात, नोकरीत धावपळ वाढेल. पण ती पूर्णपणे आपल्या फायद्याची ठरेल. विशेषकरून कामात आनंद आणि समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

जून २०२१ : लाभात शुक्र-मंगळ, नवमात बुध. या ताकदवान ग्रहांचे पूर्ण पाठबळ महिनाभर आपल्याला लाभणार आहे. त्यात महत्त्वाची कामे उरकून घ्या. नवीन योजना, नवीन कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक वाढेल. जमीन खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ.

जुलै २०२१ : १७ जुलैपर्यंत शुक्र लाभात आहे. तोपर्यंत महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. त्यानंतर लाभात येणारा रवी उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्याला खूप मदतीचा ठरेल. कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. मानसिक स्थैर्य उत्तम लाभेल.

ऑगस्ट २०२१ : १६ ऑगस्टपूर्वी महत्त्वाची कामे उरकून घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. नातेवाईक मित्राला दिलेला शब्द पाळा. त्याचे चांगले परिणाम भविष्यात दिसतील. शाब्दिक चकमकी तसेच कुणाशीही सुडाने वागू नका. सामाजिक कार्यात, राजकारणात वादविवाद टाळा.

सप्टेंबर २०२१ : लाभात शुक्र, पंचमात गुरू. या दोन ग्रहांचे उत्तम सा लाभेल. विशेषत: महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मानसिक संतुलन ठीक राहील. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. उद्योगधंद्यात, नोकरीत आनंद, उत्साह वाढेल. खूपशा कामांना गती प्राप्त होईल.

ऑक्टोबर २०२१ : शुक्र-बुध त्रिएकादश योग. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाची समीकरणे जमून येतील. आपल्यापाशी असलेल्या चौफेर दृष्टीचा उपयोग करा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. घरातील तरुण मुलांना परदेशगमनाची संधी उपलब्ध होईल. आर्थिक बाजू हळूहळू बळकट होईल.

नोव्हेंबर २०२१ : बुध-शुक्र उत्तम स्थितीत. हा महिना फारसा त्रासदायक ठरणार नाही. आपल्यापाशी असलेल्या सुज्ञतेचा उपयोग करा. राजकारण, सामाजिक कार्यातील संघर्ष संपेल. वादापेक्षा संवाद साधा म्हणजे गैरसमज दूर होतील. नवीन कामासाठी उत्तम काळ.

डिसेंबर २०२१ :  पराक्रमात मंगळ, तर पंचमात शुक्र. एकूण शुभ घटनांचे संकेत या वर्षी अखेर आपणास दिसू लागतील. जीवलग गोतावळ्यात आपली माणसे कोण याचा बोध होईल. गैरसमज दूर होतील. नि नात्यातला दुरावा संपेल. आनंदाने नव्या वर्षांचे स्वागत कराल.

तूळ  (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)

या वर्षी २०२१ मध्ये २+०+२+१ = ५ या अंकाचा म्हणजे बुधाचा प्रभाव असणार आहे. तूळ ही रास शुक्राची. या राशीचा अंक सहा येतो. एकूण बुध नि शुक्र या मित्रग्रहांचा प्रभाव वर्षभर या राशीवर राहणार आहे. त्यामुळे न्यायी वृत्तीला उत्तम बौद्धिकतेची जोड लाभेल. नि त्यामुळे ‘मी’पणा काहीसा दूर होईल नि त्यातून स्वत:कडे त्रयस्थ नजरेने पाहण्याची एक वेगळी दृष्टी लाभेल नि सहज राग, लोभ, मत्सर, द्वेष वजा होईल. मनाची सुंदरता पाहण्याचा एक आरसा प्राप्त होईल. त्या आरशात रोज नित्य पाहणे ही एक उपासना ठरेल. त्या आरशात फक्त आपल्या मनाचे स्वच्छ प्रतिबिंब दिसेल आणि त्यातला निखळ आनंद तुम्हाला खूप मोठे सात्त्विक समाधान देईल.

जानेवारी २०२१ : वर्षांरंभी रवी-शुक्र पराक्रमात उद्योगधंद्यात नोकरीत वर्षभर आलेला काळजीयुक्त थकवा दूर होईल नि ठरवलेल्या कामाची पूर्तता होऊ लागेल. व्यवहार सुरू होतील. खूपशा गोष्टींत आशादायक चित्रे उभी राहतील आणि खूपसा दिलासा मिळेल.

फेब्रुवारी २०२१ : एकूण ग्रहकाल संमिश्र स्वरूपाचा राहील. उद्योगध्ांद्यात, नोकरीत स्पर्धेला सामोरे जावे लागेल. वरिष्ठांशी, भागीदारांशी वादविवाद टाळा. रेंगाळलेले प्रश्न कोर्टाबाहेर सोडवणे फायद्याचे ठरेल. महिनाअखेर अष्टमात मंगळ. वाहने बेपर्वाईने चालवणे चुकीचे ठरेल. स्वत:ला आणि इतरांना इजा होणार नाही याची काळजी घ्या.

मार्च २०२१ : पंचमात बुध, षष्ठात रवी. गेल्या महिन्यापेक्षा मनाला खूपसा दिलासा लाभेल. मात्र आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. शक्य तो दगदग ताण येईल अशी कामे टाळा. मन प्रसन्न ठेवा. मनाला मिळणारे समाधान हेच खरे सुख असा अनुभव महिनाअखेरीस येईल.

एप्रिल २०२१ : गुरु-रवी लाभयोगातून आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम संवाद साधला जाईल. त्यातून नवीन योजना, नवीन कामे पुढे सरकतील. मात्र कौटुंबिक समस्या वाढतील. त्यात टोकाची भूमिका घेणे टाळा. वेळ जाऊ द्यावा.

मे २०२१ : सर्व ग्रहांचा असहकार मात्र पंचमातील गुरुचा सहवास खूपशा समस्यांवर एक उत्तम उपाय ठरणार आहे. आपल्या विरोधात चाललेल्या कारवाया थंड पडतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. उद्योगधंद्यात नोकरीत येणाऱ्या संकटांना धीराने तोंड देऊ शकाल. आर्थिक व्यवहारावर लक्ष असू द्या.

जून २०२१ : शनि-मंगळ समोरासमोर. खूप सांभाळून पावले टाका. गरज असेल तिथेच संघर्ष करा नाहीतर वृथा वाऱ्याशी वैर करण्यासारखे ठरेल. राजकारण सामाजिक कार्यात विरोध होईल. तिथे शांत राहा. जेव्हा आपली उणीव भासेल तेव्हा मदतीला जा. तिथेच तुमच्या खऱ्या कामाची सुरुवात होईल.

जुलै २०२१ : बुध-गुरु नवपंचम योग नि एकादशात शुक्र आत्मविश्वास वाढवेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम संवाद साधला जाईल. नवीन योजना, कामे पुढे सरकतील. त्यातून आनंद मिळेल. कौटुंबिक समस्या फारशा मनावर घेऊ नका.

ऑगस्ट २०२१ : रवी, मंगळ, शुक्र , गुरु हे ग्रह विजयोत्सव साजरा करण्यााठी एकत्र आले आहेत की काय? असे आश्चर्य उद्योगधंद्यात, नोकरीत दिसून येईल. आर्थिक आवक वाढेल. मात्र ११ ऑगस्टनंतर शुक्र व्ययस्थानात जातोय. खर्चाचे प्रमाण कमी करा. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करा. फसवणूक टाळा.

सप्टेंबर २०२१ : १५ सप्टेंबपर्यंत खूपशा कामांना गती प्राप्त होईल. त्यानंतर वातावरणात चैतन्य दिसून येईल. उद्योगधंद्यात, नोकरीत गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. कायद्याची चौकट सांभाळून कामे करा. तुमच्यातील आत्मविश्वास तुमचा खरा मार्गदर्शक ठरेल.

ऑक्टोबर २०२१ : हा महिना काहीसा संमिश्र राहील. सुख-दु:खाच्या काळात संयमी माणूस स्थिर राहतो. नि अशा प्रसंगात आपला संयम खूप कामास येतो. मानसिक ताण आणि आनंद या दोघांचाही समान अनुभव येईल. तेव्हा निर्भयतेने वागा.

नोव्हेंबर २०२१ : शुक्र-गुरुचा शुभयोग एकूण या महिनाअखेरीस खूपशा आशादायी घटना घडतील. की ज्यातून मानसिक समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक स्तरावर घडणारे प्रसंग फारसे मनाला लावून घेऊ नका. कोणत्याही चुकीच्या कामात मित्र-नातेवाईकांना मदत करू नका. संयम सावधानता बाळगा.

डिसेंबर २०२१ : वर्षांच्या अखेरच्या महिन्यात रवी-बुध-शुक्राची उत्तम साथ त्यामुळे नोकरी-उद्योगधंद्यात उत्कर्ष साधाल. धनस्थानात मंगळ खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक गरजा टाळा. मात्र तुमची मानसिक स्थिरता तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.

वृश्चिक (२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)

मंगळ ग्रहाच्या दोन राशी. मेष अग्नी तत्त्वाची तर वृश्चिक जल तत्त्वाची. या दोन्ही राशींवर मंगळ ग्रहाचा अंमल असतो. या राशीत एक वेगळे साम्य आहे. या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात नेतृत्व करीत असतात. मात्र या दोन्हींमधील स्वभाव विशेष वेगळे आढळतात. मेष राशीतील साहस, चपळता, राग यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. अगदी शांत तपस्व्यासारखे वागतात. शत्रूला उद्ध्वस्त करून एकांतात किंवा भुयारात स्थिरपणे आत्मचिंतन करतात, अशा स्थिरतेने वागून ‘मी काय केलं, ही वाच्यता कुठेही करीत नाहीत नि यावर्षी तर २०२१ साली २+०+२+१ = ५ म्हणजे बुध नि बुधाच्या बौद्धिकतेचा लाभ या वृश्चिक राशीला होणार आहे. तेव्हा या कर्तृत्ववान बुधाचे योगदान या राशीला अधिक प्रभावशाली करेल. त्यामुळे हे वर्ष यांना अधिक सोयीचे आणि मनासारखे जाईल.

जानेवारी २०२१ : धनस्थानात शुक्र, तर पराक्रमात रवी-शनी. एकूण शुभ ग्रहाचे पारडे आपल्या बाजूने झुकत आहे. त्यामुळे उद्योगधंद्यात, नोकरीत निर्माण झालेल्या पेचप्रसंगांची तीव्रता कमी होत जाईल. सप्तमात आलेला राहू कौटुंबिक सुखात काहीसा त्रासदायक ठरेल.

फेब्रुवारी २०२१ : गुरू-शुक्र-शनी यांच्या सहकार्यातून उद्योगधंद्यात, नोकरीत विशेष प्रगती दिसू लागेल. मात्र सप्तमातील राहू बरोबर मंगळाचे आगमन घरातील वादविवादाला अधिक उत्तेजन दिल्यासारखे ठरेल. पण गुरूच्या दृष्टिक्षेपातून त्याची तीव्रता कमी होईल.

मार्च २०२१ : पंचमातील शुक्राची उत्तम साथ लाभत आहे. साहित्य सिनेमा नाटय़क्षेत्रातील व्यक्तींना खूपसा दिलासा मिळेल. त्यांच्या क्षेत्रातील कामे सुरू होतील. उद्योगधंद्यात, नोकरीत निर्माण झालेले अडथळे दूर होतील. विरोध हळूहळू कमी होईल.

एप्रिल २०२१ : पराक्रमात शनी, तर षष्ठात रवी. दोन बलाढय़ ग्रहांची उत्तम साथ. या ग्रहांचा आपल्या राशीशी उत्तम संवाद साधला जाईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक वाढेल. सप्तमात राहू-शुक्र. मैत्री आणि प्रेमात सावध वागा.

मे २०२१ : अनपेक्षित संधीतून मोठी सफलता प्राप्त होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत कला विश्वात आपली उत्तम प्रगती होईल. मात्र दुर्लक्ष, आळस, कंटाळा या गोष्टींना थारा देऊ नका. जवळ येणारी संधी तिचा स्वीकार करा. त्यातूनच पुढचे यश तयार होईल.

जून २०२१ : गुरू-शुक्र नवपंचमयोग आपल्या इच्छा-आकांक्षा पुऱ्या होतील. शुभ घटनांची मालिका सुरू होईल. यातून सुखद धक्का बसेल. मात्र लोकप्रियता, प्रसिद्धी यांमध्ये फारसे फसू नका. कारण यात खऱ्या कामाचा विसर पडेल. दगदगीत आरोग्याची काळजी घ्या.

जुलै २०२१ : रवी-गुरू उत्तम स्थितीत. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नवीन मित्र परिवार, परिचय यातून आनंद मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात कामाची जबाबदारी वाढेल. विशेष म्हणजे खूपशा समस्या आपण आपल्या कुशल कामातून दूर करू शकाल.

ऑगस्ट २०२१ : या महिन्यात दशमात रवी-बुध. उद्योगधंद्यात, नोकरीत महत्त्वाचे निर्णय ठामपणे घ्या. त्यात चर्चा संवाद यापेक्षा कृतिशील राहणे महत्त्वाचे ठरेल. राजकारण, सामाजिक कार्यात आपले डावपेच यशस्वी ठरतील. पैशाचे व्यवहार, गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्याने फायद्याची ठरेल.

सप्टेंबर २०२१ : आर्थिक नि मानसिक समन्वय उत्तम साधला जाईल. घरांतील नातेवाईक मंडळीत आनंद निर्माण होईल. प्रेमविवाह, नातीगोती अशा जिव्हाळ्याच्या विषयातील उत्तरे सकारात्मक मिळतील. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. आपल्या नियोजनाचे कौतुक होईल.

ऑक्टोबर २०२१ : २१ ऑक्टोबपर्यंत मंगळ लाभात, तर शुक्र धनस्थानात. बरेच चांगले बदल दिसून येतील. पण कामात घाई टाळा. नवीन जागा. स्थावर खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ. पैशाची आवक वाढेल.

नोव्हेंबर २०२१ : गुरू-मंगळ नवपंचम योग. नोकरी, उद्योगधंद्यात नवीन उत्पन्नाचे मार्ग आढळतील. मात्र त्यातील गैरमार्ग कटाक्षाने टाळा. खूपशा कामात दाखवलेला संयम आपल्या कामात खूप मदतीचा ठरेल. आर्थिक बाबतीत आपली रखडलेली कामे मार्गी लागतील.

डिसेंबर २०२१ : लाभात बुध तर पराक्रमात शुक्र एकूण या ग्रहांचा उत्तम पाठिंबा आपले मनोबल वाढवील. नवीन कामे, नवीन योजना यात उत्तम यश. आर्थिक स्थिती चांगली राहील. नको ते खर्च टाळा. नातेवाईकांच्या भेटीगाठीतून आनंद मिळेल.

धनू  (२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)

ज्यांचा जन्म २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेला असेल अशा लोकांवर तीन अंकाचा प्रभाव असतो. या वर्षी २०२१ साली २+०+२+१ = ५ म्हणजे बुधाचा अंमल असणार आहे. वर्षभर बुध नि गुरु ग्रहाची विनम्रता, दानशूरता, विनयशीलता तर बुधाची कुशाग्र बुद्धिमत्ता दिसून येईल. एकूण साडेसातीच्या कठीण काळातही आनंदी राहण्याचे सूत्र या काळात धनू राशीला प्राप्त होईल. सुख-दु:खाच्या पलीकडे लाभणारे वैश्विक समाधान जे अंतर्मनाला भिडते, तो नि:शब्द भाव असेल.

जानेवारी २०२१ : बुध-गुरु धनस्थानात नि नेपच्यून-शुक्र लाभयोग यातून पैशाची आवक वाढेल. कर्तृत्वाला वाव मिळेल. त्यातून नवीन कामे हाती येतील. पंचमात मंगळ, त्यामुळे साहस-धाडस नको त्या ठिकाणी करू नका. वचन देणे, शब्द देणे टाळा. पैसे उसने देणे टाळा.

फेब्रुवारी २०२१ : पराक्रमात रवी, तर धनस्थानात शुक्र. उद्योगधंद्यात, नोकरीत अर्थलाभ होईल. आपल्यापाशी असलेला आत्मविश्वास, हुशारी यातून आपण प्रगती साधू शकाल. नवीन संधी, नवीन कामे यांना पुरेसा वेळ द्या. व्यसनांपासून दूर राहा. आरोग्य सांभाळा.

मार्च २०२१ : चतुर्थात शुक्र, तर षष्ठात मंगळ. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. इस्टेट जागा जमिनीचे वाद कोर्टाबाहेर सोडवणे हिताचे ठरेल. आपल्या सोज्वळ वागण्याचा गैरफायदा घेऊ देऊ नका. शब्द देणे, वचन यातून मनस्ताप घडू शकेल.

एप्रिल २०२१ : शुक्र-गुरु त्रिएकादश योगातून शिक्षण, नोकरी-उद्योगधंद्यात स्थिती उत्तम राहील. सप्तमात मंगळ. कौटुंबिक कलहापासून दूर राहावे. तसेच लोकप्रियता, प्रसिद्धी यामध्ये फारसे फसू नये. त्यामुळे खऱ्या कामाचा विसर पडेल. रोजच्या जीवनातले साधे नियम पाळून पुढे सरका.

मे २०२१ : षष्ठात रवी-गुरु पराक्रमात तात्पुरत्या आलेल्या अडचणींवर सहज मात करू शकाल. वरिष्ठांशी उत्तम संवाद साधला जाईल. गुप्त शत्रूची मिरासदारी सहज दूर करू शकाल. मात्र भावनेच्या भरात हतबलतेतून उगाच तडजोड स्वीकारू नका.

जून २०२१ : सप्तमात रवी-अष्टमात मंगळ यामुळे लहानसहान गोष्टींतून चिंता निर्माण होतील. मानसिक स्वास्थ्य सांभाळा. कामे उरकण्याची गती वाढवा. कोणत्याही दडपणाखाली वावरू नका. वाहने हळू चालवा. बेफिकीरपणे वागू नका. तसेच वरिष्ठांशी विनयाने आणि समजुतीने वागा.

जुलै २०२१ : नवमात शुक्र-मंगळाचा बुधाशी होणारा शुभयोग उत्साह आनंद देईल. कलाक्षेत्रात नावलौकिक होईल. व्यापार, उद्योगधंद्यात, नोकरीत आपले स्थान बळकट होईल. मात्र कुठल्याही गोष्टीत अधिक आक्रमकता टाळा. षष्ठातील राहू आपल्याला उत्तम संरक्षण देईल.

ऑगस्ट २०२१ : अतिभावनिक राहू नका. घरात गैरसमज नि त्यातून वाद होतील, पण हे सारे हास्यास्पद ठरेल. उद्योगधंद्यात कामाच्या बाबतीत सावधतेने वागा. महिनाअखेरीस बऱ्याच समस्या दूर होतील. नवीन घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

सप्टेंबर २०२१ : बुध-शुक्र उत्तम स्थितीत, नवीन कामात यश लाभेल. आर्थिक बळ वाढेल. पंचमातील हर्षलच्या तऱ्हेवाईकपणापासून स्वत: कुठल्याही प्रकरणात गुंतणार नाही याची काळजी घ्या. उधार-उसनवार पैसे देणे बंद करा.

ऑक्टोबर २०२१ : रवी बुध नि शुक्र यांचे उत्तम सहाय्य या काळात लाभणार आहे. त्यामुळे हा महिना खूप आनंददायी ठरेल. अर्थात सकारात्मक विचारांची उजळणी हा एक यशस्वी जप ठरतो. आपल्यापाशी असलेल्या सुज्ञ बुद्धीचा उपयोग करा. मान-अपमान अशा क्षुल्लक वादात न अडकता कामाला महत्त्व द्या.

नोव्हेंबर २०२१ : मंगळ, बुध नि शुक्र यांची शुभ दृष्टी. या काळात खूपशा घटना दिलासा देणाऱ्या घडतील. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाची व्यापकता वाढेल. आर्थिक बाबतीत खूपशी स्थिरता लाभेल. मात्र खिशात पैसे आले की मनाची व्यापकता वाढते, हे मात्र अवश्य टाळा.

डिसेंबर २०२१ : धनस्थानात शुक्र. बाकी ग्रहांनी पाठ फिरवली आहे. मात्र षष्ठातला राहू आपली काळजी उत्तम घेईल. त्यामुळे खूपशा अडचणींचे मार्ग सोपे होतील. उद्योगधंद्यात चढउतार दिसून येतील. आर्थिक बाबतीत वादविवाद टाळा. गैरसमज दूर करा.

मकर (२१ डिसेंबर ते २० जानेवारी)

आपला जन्म २१ डिसेंबर ते २० जानेवारी दरम्यान झाला असेल तर आपल्यावर ८ अंकाचा म्हणजे शनी ग्रहाचा अंमल असतो. २०२१ या वर्षी २+०+२+१ = ५ या अंकाचा म्हणजे बुधाचा प्रभाव वर्षभर असणार आहे. मकर  राशीची माणसे खूप कष्टाळू असतात. तशाच अतिशय चिकित्सक असतात. पण खरंच त्यांची ही चिकित्सक बुद्धी अखेर त्यांना खूप फायद्याची ठरते. बुध आणि शनी या दोन मित्र ग्रहांचा प्रभाव मकर राशीला या वर्षी खूप उत्कर्षदायक ठरणार आहे. शनीचा प्रामाणिकपणा, सचोटी, मेहनत नि बुधाची बुद्धिमत्ता यातूनही रास यशाकडे सहज जाईल.

जानेवारी २०२१ : साडेसातीचे सावट हळूहळू कमी होईल. लाभात केतू त्यामुळे प्रत्येक कामातला नकारात्मक भाव वजा होत जाईल. कौटुंबिक सुखात नातेवाईक, मित्रांचा हस्तक्षेप टाळा. पैसे जपून वापरा. धार्मिक कामात विशेष आनंद मिळेल.

फेब्रुवारी २०२१ : धनस्थानात शुक्र नवीन कामे, नवीन योजना यात यश लाभेल. आर्थिक बळ, त्याचबरोबर उत्साह वाढेल. साहित्य कला क्षेत्रात विशेष प्रगती. नवीन ओळखी-परिचय यातून विशेष आनंद लाभेल. मात्र भावनिक नाते वाढवू नका. पुढे त्यातून वादविवाद निर्माण होतील.

मार्च २०२१ : शुक्र-बुधाचे विशेष सा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उद्योगधंद्यात, नोकरीत आपण आपली कामे चोखपणे पार पाडू शकाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. सार्वजनिक कार्यात विशेष सहभाग आपल्या मनाला आनंद देईल.

एप्रिल २०२१ : धनस्थानात गुरू, तर चतुर्थात शुक्र या पाश्र्वभूमीवर परिस्थिीत खूप बदल दिसून येईल. संकटे आपल्यासोबत संधीही घेऊन येतात, असा मजेदार अनुभव येईल. सामाजिक जीवनात, राजकारणात होणारा विरोध कमी होईल. मात्र अतिविश्वास आणि अवलंबून राहणे टाळा.

मे २०२१ : पंचमात शुक्र, मंगळ, राहू हा महिना खूपसा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. व्यापार-उद्योगधंद्यात चढउतार दिसून येईल. आर्थिक व्यवहारात गैरसमज टाळा. नातेवाईक, आप्तेष्टातला भावनिक तणाव रंगेल. आपण तटस्थ राहणे उत्तम ठरेल.

जून २०२१ : केतू-रवीचे उत्तम सा लाभेल. त्यातून उद्योगधंदा आणि नोकरीतील वातावरण सुधारेल. मात्र स्पर्धा, वादविवाद, आरोप-प्रत्यारोप टाळावेत. शनी-मंगळातील कटू योग, अडथळ्याची शर्यत निर्माण करेल. त्यात आपण आपला सहभाग टाळावा. आरोग्याची काळजी घ्या.

जुलै २०२१ : अष्टमात शुक्र-मंगळ जरी असले तरी षष्ठात येणारा रवी खूप मदतीचा ठरेल आणि त्यातून चालून येणाऱ्या अडचणी माघार घेतील. आपला आत्मविश्वास खूप मोठी ताकद ठरेल. भावनावश होणे. आहारी जाणे या गोष्टींना पूर्णपणे छेद द्या.

ऑगस्ट २०२१ : शुक्र-शनी नवपंचम योगातून आपल्या महत्त्वाच्या कामांना गती प्राप्त होईल. साहित्य, विज्ञान क्षेत्रातील लोकांना उत्तम संधी नवीन योजना, नवी कामे हाती येतील. मोबाईल कानाला लावून रस्त्यात चालू नका. धांदरटपणा सोडा. वाहने चालवताना काळजी घ्या.

सप्टेंबर २०२१ : रवी-गुरू नवपंचमयोगातून उद्योगधंद्यात, नोकरीत खूपशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. लाभातल्या केतूच्या मदतीने त्या आपण उत्तम पार पाडू शकाल. अचानक येणाऱ्या जबाबदारीने गांगरू नका.  स्थिरपणे कामे पार पाडा. मात्र कुठेही वादग्रस्त भूमिका घेऊ नका.

ऑक्टोबर २०२१ : गुरू-शुक्र लाभ योग उद्योगधंद्यात, नोकरीत सहकार्याचे वातावरण निर्माण करेल. त्यातून मेहनतीचे चीज होईल. कामातील नवीन बदल फायद्याचे ठरतील. आत्मविश्वास अधिक वाढेल. आरोग्य चांगले राहील. फक्त नम्रता आणि संयम कायम आपल्यापाशी असू द्या.

नोव्हेंबर २०२१ : धनात गुरूचे आगमन, लाभात रवी, दशमात बुध. एकूण मानसिक स्थितीत उत्तम बदल होईल. आत्मविश्वासाने कामे पार पाडू शकाल. घरातील वातावरण आंनदी राहील. नवीन उद्योगधंद्याच्या सुरुवातीसाठी उत्तम काळ. आर्थिक स्थिती चांगली राहील.

डिसेंबर २०२१ : गुरू धनस्थानात तर १५ तारखेपर्यंत लाभात रवी या दोन ग्रहांचा उत्तम पाठिंबा यातून खूपशा गोष्टींचा मार्ग सोपा होईल. सामाजिक राजकीय जीवनांत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. हे निर्णय तुमचा उद्याच्या जगण्याचा मार्ग सोपा करतील. बुद्धी आणि श्रम यांचा योग्य वापर करा.

कुंभ (२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)

२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी यादरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल  अशा लोकांवर ८ अंकाचा म्हणजे शनीचा प्रभाव असतो. ही वायुतत्त्वाची बौ्द्धिक राशी. या वर्षी २०२१ साठी २+०+२+१ =५ हा बुधाचा अंक शनीच्या सान्निध्यात असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मित्र ग्रह या राशीच्या मदतीला वर्षभर असणार आहेत. अंतर्मनात बुद्धीच्या साह्य़ाने पाहिल्यावर लक्षात येते की मनात ज्या विचारांचे ठसे उमटले जातात, त्या विचाराची सत्यता कृतीत दिसू  लागते. तेव्हा कल्पनाविश्व जसे तयार करू तसा प्रत्यय येतो, अशा तऱ्हेचा अनुभव आला तर तो योगायोग मानू नका. आपण जसे विचार पेरू तसे ते उगवत राहतील, हा वैश्विक नियम आपल्या मनालाही लागू पडतो. तेव्हा या वर्षी सकारात्मक विचार करा. तो आपला जीवनप्रवास अधिक सुखकर करील.

जानेवारी २०२१ : रवी १४ जानेवारीपर्यंत लाभ स्थानात. त्याबरोबर शुक्र-मंगळाची उत्तम साथ. जरी साडेसाती असली तरी फारसा उपद्रव होणार नाही. मंगळाच्या तडफदार वागण्यातून कामे होतील. मात्र संयम नि सहनशीलता असणे जास्त जरुरीचे ठरेल.

फेब्रुवारी २०२१ : शुक्र सोडला तर बाकी ग्रहांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. तरीही खूपशा गोष्टी पुढे सरकतील, मात्र अति भावनिक राहू नका. कौटुंबिक मतभेद फार काळ टिकणार नाहीत.  तरुण मंडळींना उद्योगधंद्यात उत्तम संधी प्राप्त होतील.

मार्च २०२१ : हा महिना संमिश्र स्वरूपाचा. व्यापार-उद्योगधंद्यात काहीसे चढउतार दिसून येतील. देण्याघेण्यावरून गैरसमज टाळा. श्रम जरूर करा. पण त्यातला अतिरेक टाळा. घरातील वातावरण खूपसे शांत होईल. बोलण्यातील आत्मविश्वास खूप मदतीचा ठरेल.

एप्रिल २०२१ : शुक्र रवी पराक्रमात. साहित्य-कलाक्षेत्रात, राजकारणात मानसन्मानाचे योग येतील. हळूहळू रोजच्या जीवनातील समस्या दूर होतील. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या दूरदृष्टीचा फायदा होईल. नवे विचार, नव्या योजना यशदायक ठरतील. आर्थिक लाभाबरोबर खर्चाचे प्रमाण वाढेल.

मे २०२१ : बुध-शुक्र चतुर्थात एकूण कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. खूपशा घटना दिलासादायक ठरतील. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाची व्यापकता वाढेल. त्यातून आर्थिक बळ लाभेल. पैशाबरोबर वेळेचाही अपव्यय टाळा. तारतम्य बाळगून नको तिथे वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या.

जून २०२१ : मंगळ-गुरू नवपंचमय योग. आपण आखलेल्या योजना परिपूर्ण होण्यासाठी योग्य काळ. काही जुनी येणी अचानक हाती येतील. या महिन्यात असे बरेचसे सुखद आश्चर्याचे धक्के जाणवतील. मात्र स्वस्थ बसून ते पाहत राहू नका. त्यातल्या संधी शोधून त्यातून नवीन कामाचे मार्ग तयार करा.

जुलै २०२१ : पंचमात बुध, षष्ठात रवी. उद्योगधंद्यात नोकरीत नवीन योजना उत्तम रीतीने पार पाडतील. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या शब्दाला किंमत येईल. मात्र शब्द जपून वापरा. वागण्यातील संयम खूप मोलाचा ठरेल. त्यातूनच आपल्या कामाचा उत्कर्ष होईल.

ऑगस्ट २०२१ : घरातील वयोवृद्ध नातेवाईकांची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक जीवनात गुप्त शत्रूंचा त्रास होईल. तेव्हा बोलणे-वागणे यात सावधानता बाळगा. कौटुंबिक जीवनात होणारा कलह फार ताणू नका. हे वाद चर्चेतून मिटवू शकाल.

सप्टेंबर २०२१ : नवमातील शुक्र या महिन्यात खरा मदतीचा ठरेल. मात्र अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. अवलंबून राहणे, अपेक्षा ठेवणे, सहानुभूतीची वाट पाहणे या गोष्टींना मनात थारा देऊ नका. अष्टमात रवी-मंगळ. वाहने जपून चालवा.

ऑक्टोबर २०२१ : संघर्षांतून खूपशा गोष्टी समजून येतात. त्यात माणसाची पारख करता येते. मित्र परिवार नि नातेवाईक यांच्यातील सत्यता या वेळेस ओळखू शकाल. पैसे उसने देणे, जामीन राहणे या गोष्टी टाळा. कोणाविषयी उगाच गैरसमज करून घेऊ नका. भावनांवर नियंत्रण असू द्या.

नोव्हेंबर २०२१ : गुरू-मंगळ आणि गुरू-शुक्र शुभयोगात. त्यामुळे स्वीकारलेली कामे चोख पुरी करू शकाल. दशमातल्या रवीच्या साह्य़ने उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या योजना उत्तम रीतीने पार पाडू शकाल. राजकारण, सामाजिक कार्यातला सहभाग आनंद देईल. तूर्त कौटुंबिक मतभेद, गैरसमज यांना फार महत्त्व देऊ नका.

डिसेंबर २०२१ : लाभात रवी, तर मंगळ-शुक्र लाभयोगात. मनातील सकारात्मक विचार कृतीत उतरवण्यासाठी आशावादी असणे खूप गरजेचे ठरेल. प्रेमात, मैत्रीत अकारण अविश्वासाचे वारे वाहू लागतील. स्थितप्रज्ञ राहा. कालांतराने खूपसे गैरसमज दूर होतील. काळ हे त्यावर उत्तम औषध ठरेल.

मीन (२० फेब्रुवारी ते २० मार्च)

२० फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल अशा लोकांवर गुरू ग्रहाचा म्हणजे ३ अंकाचा प्रभाव असतो. धनू ही गुरूची अग्नितत्त्वाची रास, तर मीन ही जलतत्त्वाची रास. ही रास जरी बुद्धिमान असली तरी यांच्यातल्या दयाळू, हळव्या स्वभावामुळे यांच्या वाटय़ाला फसवणुकीचे प्रसंग बरेच येत असात. हे साल २०२१ याचा एकांक ५ येतो. यावर बुधाचा अंमल असतो. एकूण गुरू नि बुध यांच्या सान्निध्यात ही राशी वर्षभर असणार आहे. त्यामुळे यांच्यातल्या सोज्वळतेला, अति हळवेपणाला बुधाचा चौकसपणा, जागृतता लाभली तर खूपशा फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल आणि मीन राशीचा हा प्रवास अधिक सुखाचा होईल. जितक्या पटीने धडपड कराल त्याच्या किती तरी पटीने यश आपल्याकडे धावत येईल. बुधाचा हा संवेदनशील विचार मीन राशीच्या मनाला हळव्या जगातून खूपसा बाहेर काढेल.

जानेवारी २०२१ : लाभस्थानात रवी-बुध-गुरू ग्रहांचे उत्तम सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. सरकारदरबारी कामात यश लाभेल. नवीन उद्योगधंद्याच्या सुरुवातीसाठी उत्तम काळ. आर्थिक बाजू चांगली राहील. धनस्थानात हर्षल, मंगळ. जिभेवर नियंत्रण असू द्या.

फेब्रुवारी २०२१ : पराक्रमात मंगळ-राहू, तर लाभात गुरू-शुक्र या ग्रहांचा खूप मोठा आधार लाभेल. किरकोळ अडचणींचा तिढा सुटेल. मनात विश्वास निर्माण करून कामे करा. साशंकतेला वाव देऊ नका. सकारात्मक ऊर्जा ही मनाची मोठी ताकद आहे, तिचा उपयोग करा.

मार्च २०२१ : मंगळ-शुक्र लाभयोगातून आर्थिक व मानसिक समन्वय उत्तम साधला जाईल. घरातील नातेवाईक मंडळींत आनंद निर्माण होईल. प्रेमविवाह, नातीगोती अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळतील. राजकीय, सामाजिक कार्यात आनंद मिळेल.

एप्रिल २०२१ : शुक्र-गुरू त्रिएकादश योग. उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या योजना पुऱ्या करू शकाल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या कामाचे कौतुक होईल. नवीन ओळखी- परिचयातून कामाचे स्वरूप व्यापक होईल. आरोग्य चांगले राहील.

मे २०२१ : पराक्रमात रवी-राहू. आर्थिक गणिते फार खुबीने सांभाळू शकाल. अनावश्यक खर्च, चुकीच्या जबाबदाऱ्या यापासून दूर राहा. आपल्या भिडस्त स्वभावाचा फायदा कुणालाही घेऊ देऊ नका. नातेवाईकांकडून होणारे दबावतंत्र, हट्टीपणा यांना दूर ठेवा. शांत आणि गंभीरपणे निर्णय घ्या.

जून २०२१ : कौटुंबिक जीवनात होणारे लहानसहान वाद फारसे मनाला लावून घेऊ नका. नात्यात आर्थिक बाबीवरून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. उद्योगधंद्यात, नोकरीत जबाबदारीने वागा. अति उधार- उसनवार देणे, अति भावनिक होणे, दया दाखवणे टाळा. संयमाने वागा.

जुलै २०२१ : लाभात शनी, तर पराक्रमात राहू. मात्र आर्थिक आवक व होणारे खर्च यांचे गणित आखून पुढील उद्योगधंद्यातील धोरणे ठरवा. घरगुती समस्या वाढतील, पण त्या फार काळ टिकणार नाहीत. स्थिर आणि शांत राहा म्हणजे मानसिक गोंधळ होणार नाही.

ऑगस्ट २०२१ : १६ ऑगस्ट रोजी षष्ठात प्रवेश करणाऱ्या रवीचा खूप आधार वाढेल. गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत चाललेले कुटिल राजकारण दूर होईल. त्यातून होणारा मनस्ताप हळूहळू कमी होईल. मात्र मंगळाच्या विशेष प्रभावाने गांगरू नका. त्यातून सहज बाहेर पडाल.

सप्टेंबर २०२१ : राहू-शनी-शुक्र व १६ सप्टेंबपर्यंत षष्ठात असलेले रवीचे वास्तव्य यातून कर्तृत्वाला खूपसा वाव मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मानसिक बळ वाढेल. नवीन योजना, नव्या पद्धतीचा उपयोग वेळेची बचत करील. आरोग्य उत्तम राहील.

ऑक्टोबर २०२१ : लाभात गुरू-शनी, तर नवमात शुक्र एकूण वर्षभरात आलेला हा एक दुर्मीळ शुभयोग आहे. त्यात पराक्रमातल्या राहूचे अस्तित्व अधिक भर घालेल. नवीन विचार, नवीन कल्पना आपल्या सुखात अधिक भर टाकतील. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात आपल्या कामाची किंमत होईल.

नोव्हेंबर २०२१ : शुक्र-गुरू त्रिएकादश योग, तर शनी लाभात. आपले भाग्य उजळण्यात या ग्रहांचा मोठा वाटा असणार आहे. खूपशा कामात आपण दाखवलेला संयम, शांतपणा आपल्या उद्योगधंद्यात मदतीचा ठरेल. आर्थिक बाबतीतली रखडलेली कामे मार्गी लागतील.

डिसेंबर २०२१ : दशमात रवी, तर लाभात शनी-शुक्र. खूप छान योग. नोकरीत बढती, तर उद्योगधंद्यात प्रगती. हाती घेतलेली कामे उत्तम पार पाडतील. आर्थिक बाजू चांगली राहील. व्यवहारात पैशाचे गणित जमून येईल. मात्र हळवेपणा, भीती, नकारात्मक विचार यापासून दूर राहा नि स्वत: सुखी व्हा.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या