कलिका गोखले – response.lokprabha@expressindia.com
गेल्या वर्षी याच सुमारास आपण सर्व जण नववर्षांच्या स्वागतासाठी उत्सुक होतो. त्याच वेळी आपल्या शेजारच्या चीनमध्ये मात्र करोनाची लागण झपाटय़ाने होत होती. पण त्याचे गांभीर्य त्या वेळी कोणाच्याच लक्षात आले नाही. त्यानंतर वर्षभरात काय उलथापालथ झाली हे सर्व जण जाणताच. करोनाच्या या महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, पगारकपात झाली, काहींचे व्यवसाय बंद पडले, काहींना मोठे नुकसान सहन करावे लागले. पुढे काय, हा प्रश्न आज जवळपास प्रत्येकालाच भेडसावत आहे. या भीषण परिस्थितीचा ज्योतिषीय दृष्टिकोनातून आढावा घेऊ या..
मेष रास / लग्न : मेष रास असणाऱ्या व्यक्तींसाठी षष्ठस्थानी कन्या ही रास येते, तर दशमस्थानी मकर रास येते. दोन्ही राशी पृथ्वी तत्त्वाच्या आहेत. जानेवारी २०२० पासून शनीचे स्थित्यंतर मकर राशीत झाले असल्याने कन्या रास मोकळी झाली आहे. त्यामुळे नोकरीमधले ताणतणाव कमी होणार आहेत. या राशीच्या व्यक्तींना आता काहीसा सुटकेचा निश्वास टाकता येईल. व्यावसायिकांच्या बाबतीत दशमेश शनी व्यवसायाच्या स्थानी आल्याने व्यवसायाच्या संधी वाढतील हे नक्कीच, मात्र त्याच प्रमाणात कष्टही वाढतील. भाग्येश गुरू शनीबरोबर मार्च २०२० पर्यंत असल्याने व्यवसायात भाग्याची साथ मिळेल. मात्र सप्टेंबर २०२० पासून बदललेले राहू-केतूचे स्थान मात्र आर्थिक बाबींमध्ये त्रासदायक ठरू शकते.
वृषभ रास / लग्न : या व्यक्तींच्या षष्ठस्थानी म्हणजेच नोकरीस्थानी तूळ रास येते तर दशमस्थानी म्हणजेच व्यवसायाच्या स्थानी कुंभ ही शनीची रास येते. जानेवारी २०२० पासून शनी महाराजांची दृष्टी तुळेवर येत आहे. त्यामुळे करोनाकाळात बऱ्याच वृषभ जातकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सप्टेंबर २०२० पर्यंत राहू वृषभेच्या धनस्थानी मिथुनेत असल्यामुळे आर्थिक स्रोत वाढून आर्थिक ओझे मात्र नक्कीच कमी होणार आहे. नोकरी गमावलेल्या जातकांना नोकरीच्या संधीही मिळतील; परंतु त्यात तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत खर्च जास्त होणार आहे. तरीही व्यवसायात चांगल्या संधीही मिळतील. शनी कष्ट देईल, पण मार्गही दाखवेल. राहू आता वृषभेत आला आहे तसेच अष्टमेश गुरू मार्चपर्यंत वृषभेवर दृष्टी टाकणार आहे. त्यामुळे मानसिक त्रास येत्या काळात संभवतील.
मिथुन रास / लग्न : जानेवारी २०२० पासून मिथुनेचे धनस्थान शनी महाराजांच्या दृष्टीत आलेले आहे. त्यामुळे आर्थिक आवकीत घट होणार हे निश्चित. यांच्या नोकरीच्या स्थानी वृश्चिक ही मंगळाची रास येते तर दशमस्थानी मीन ही गुरूची रास येते. करोनाच्या काळात पगारकपातीचे सावट या जातकांच्या नोकरीवर आलेले असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी केतू आला असल्याने नोकरीत त्रास होणे क्वचित नोकरकपातीमध्ये नोकरी गमवावी लागणे असे प्रकार घडू शकतात. व्यवसायाच्या स्थानी मीन रास आहे. त्यावर शनीची तिसरी दृष्टी आहे. आणि हा शनी अष्टमेश आहे, त्यामुळे कष्टाच्या प्रमाणात फळ न मिळणे, क्वचित असलेला सेटअप बंद करावा लागणे अशी फळे मिळू शकतात. कोविडचे प्रमाण ओसरत असले तरी त्याने केलेल्या नुकसानीचे फळ मात्र अजून काही काळ भोगावे लागणार आहे.
कर्क रास / लग्न : जानेवारी २०२० मध्ये मकरेत आलेल्या शनीची कर्केवर सरळ सातवी दृष्टी आलेली आहे. यांच्या नोकरीच्या स्थानात धनू रास तर व्यवसायाच्या स्थानी मेष ही मंगळाची रास आहे. नोव्हेंबरमध्ये झालेला गुरुपालटामुळे षष्ठेश गुरू आणि त्याबरोबर असलेला केतू हे दोघेही जण आता तिथून हलले आहेत. केतू मागे वृश्चिकेत गेल्यामुळे नोकरीतला त्रास कमी होणार हे निश्चितच आहे; परंतु षष्ठेश गुरू मार्च २०२० पर्यंत शनीबरोबर मकरेत राहील, तो जबाबदारी आणि कष्ट वाढवणारा असणार आहे. व्यवसायाच्या ठिकाणी मेष राशीचा स्वामी मंगळ नुकताच प्रवेश करता झाला आहे. तो व्यवसायात नवीन संधी उपलब्ध करून देईल. धडाडीने काम करण्यासाठी ऊर्जाही देईल हे नक्की. फक्त या जातकांनी मनाला निराशेच्या ताब्यात देऊ नये.
सिंह रास / लग्न : वर्षांच्या सुरुवातीला कोविडचा त्रास आपल्या जगात अवतरला तेव्हा सिंहेच्या धनस्थानात असलेल्या कन्या राशीवरून शनीची दृष्टी हलली होती. यांच्या नोकरीच्या ठिकाणी मकर ही शनीची रास येते तर व्यवसायाच्या ठिकाणी वृषभ ही शुक्राची रास येते. वर्षांच्या सुरुवातीलाच षष्ठेश शनी षष्ठात आल्यामुळे यांच्या नोकरीवर फारसा परिणाम झाला नव्हता. कारण शनी महाराज मेहरबान होते. पुढेही ते तसेच राहतील. पण मार्च २०२० पर्यंत अष्टमेश गुरूही नोकरीच्या ठिकाणी असेल. त्यामुळे मानसिक त्रास नोकरीत होणार आहे. स्वाभिमानाला धक्का लागण्याचे प्रसंग येतील. काही जातकांना नवीन नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील. व्यवसायाच्या ठिकाणी वृषभ ही रास आहे. नुकताच सप्टेंबर २०२० मध्ये तिथे राहूने प्रवेश केला आहे. दशमातला राहू नवीन संधी देतो. त्यामुळे व्यवसायात या जातकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. कोविडमुळे बदललेल्या परिस्थितीत व्यवसायाची वेगळी रूपे संधी म्हणून यांच्यासमोर येतील.
कन्या रास / लग्न : वर्षांच्या सुरुवातीलाच शनी महाराजांनी कन्येवरची आपली दृष्टी हलवली आहे, त्यामुळे कन्या जातकांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल, पण ही दृष्टी आता कन्येच्या धनस्थानावर आली आहे. त्यामुळे पुढची साधारण दोन वर्षे आर्थिक प्रश्न यांना सतावणारच आहेत. कन्या जातक व्यावसायिकांपेक्षा नोकरदार असलेला जास्त आढळतो. यांच्या नोकरीच्या स्थानात कुंभ ही रास येते. तर व्यवसायाच्या स्थानी मिथुन ही रास येते. कुंभेचा स्वामी शनी मकरेत स्वगृही असला तरी तो षष्ठेच्या व्यय स्थानी आहे. त्यामुळे नोकरीवर परिणाम झाला असेलच. पगारकपातीचे संकट यांनाही सहन करावे लागले असेल. करोना जरी निवळत असला तरी त्यामुळे झालेले नुकसान मात्र अजून काही दिवस यांना त्रास देणारच आहे.
व्यवसायासंदर्भात सप्टेंबपर्यंत तिथे असलेल्या राहूने यांना वेगवेगळ्या संधी दिल्या असतील. मुळात कन्या आणि मिथुन या द्विस्वभावी राशी आहेत. त्यामुळे व्यवसाय असलाच तर दोन-तीन प्रकारचा असण्याची शक्यता असते. यांच्या अंगभूत हुशारीमुळे परिस्थितीचा अभ्यास करून योग्य पावले उचलून व्यवसाय निवडला असणार. पुढचा काळ या संदर्भात यांना चांगला राहणार आहे.
तूळ रास / लग्न : या वर्षांच्या सुरुवातीपासूनच तूळ राशीवर शनी देवाची दृष्टी आहे. तुळेच्या धनस्थानी वृश्चिक ही मंगळाची रास आहे. सप्टेंबरपासून तिथे केतू महाराजांचे भ्रमण सुरू झाले आहे ते पुढे दीड वर्ष चालेल. त्यामुळे आर्थिक बाबतीत सावधानता बाळगणे खूप गरजेचे राहील. गुंतवणूक करताना सर्वागीण विचार करावा लागेल. तुळेच्या नोकरीच्या स्थानात मीन ही गुरूची रास, तर व्यवसाय स्थानात कर्क ही चंद्राची रास आहे आणि योगायोग म्हणजे या दोन्ही राशी शनीने दृष्ट आहेत. करोनाच्या या कहरात नोकरी जाणे किंवा अतिशय त्रास होणे असे प्रकार घडले असतील. नोकरी असेल तर त्या ठिकाणी होणाऱ्या त्रासामुळे नको ती नोकरी आणि नको तो त्रास अशी काहीशी मानसिकता या जातकांची झाली असेल. करोना संपून सगळे नीट होतानासुद्धा या जातकांना नोकरीचा किंवा नोकरीत त्रास होणारच आहे. त्या त्रासामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता दिसते. या जातकांनी आरोग्य काटेकोरपणे सांभाळावे. बदलत्या परिस्थितीत बदली होणे, कामाचा ताण वाढणे, कामाचे स्वरूप बदलणे अशा गोष्टी घडण्याची शक्यता राहते. व्यवसायाच्या संदर्भात ही शनीची दृष्टी कष्टदायकच आहे. नोकरांचा त्रास होणे, वेळेवर कामाला माणसे न मिळणे, मिळाली तर चढय़ा मागण्या करणे असे प्रकार पुढचे काही दिवस घडणार आहेत. स्वत: खंबीर राहणे, निराशेच्या आहारी न जाणे गरजेचे राहते.
वृश्चिक रास / लग्न : वृश्चिक ही अतिशय मनस्वी आणि अंतर्गामी रास समजली जाते. जानेवारी २०२० पर्यंत यांच्या धनस्थानात शनी ठाण मांडून बसला होता. त्यामुळे आर्थिक आवकीत घट आली असेल. शनीने स्थान बदलले आणि थोडा मोकळा श्वास मिळतोय तोवर करोनाचे संकट सामोरे आले. यांच्या नोकरीच्या स्थानात मेष ही मंगळाची रास, तर दशमस्थानी सिंह ही रवीची रास येते. मंगळाचे भ्रमण जूनपर्यंत चांगले असल्याने यांना नोकरीत फार त्रास झाला नाही आणि आताही मंगळ मेषेत असल्यामुळे नोकरीच्या संदर्भात चांगल्या घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी काही विचित्र घटना घडण्याची शक्यता हर्षल दाखवतो, परंतु एकंदर परिस्थिती संयमाने हाताळण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यवसायाच्या संदर्भात दशमातली राजस रास सिंह ही नेतृत्व दाखवते. सिंहेवर कुठल्याच पापग्रहाची दृष्टी नाही, त्यामुळे व्यवसायात फार त्रास होणार नसला तरी व्यावसायिक बाजूंचा फेरविचार यांनाही करायला लागणारच आहे. व्यवसायातली गुंतवणूक उशिरा फलदायी होईल.
धनू रास / लग्न : धनू ही गुरूची आवडती रास. करोनाच्या सुरुवातीला गुरूचे भ्रमण अतिचर गतीने मकरेतून सुरू होते. ते ३० मार्चला वक्री होऊन धनूत आले. धनूच्या धनस्थानातून चाललेले हे गुरुभ्रमण आर्थिक बाबतीत त्यांना त्रासदायक झाले नाही. त्रास झाला तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळाला. धनूच्या नोकरीच्या स्थानी वृषभ ही शुक्राची रास, तर व्यवसायाच्या स्थानी कन्या ही बुधाची रास येते. सप्टेंबर २०२० पासून वृषभ राशीत राहू भ्रमण सुरू झाले आहे. हे भ्रमण नोकरीत त्रास देणारे ठरू शकेल. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज होणे, सोबतच्या लोकांनी कारस्थाने करणे अशी फळे नशिबात येऊ शकतात. या जातकांनी आरोग्य मात्र सांभाळणे फार गरजेचे आहे. व्यवसायाच्या ठिकाणी असलेली द्विस्वभावी कन्या रास एकापेक्षा जास्त व्यवसाय दाखवते. शनीची दृष्टी हटल्यामुळे कष्ट जरी कमी झाले असले तरी सावधानता बाळगणे गरजेचे राहणार आहे, परंतु वाईट परिस्थिती येण्याची शक्यता दिसत नाही.
मकर रास / लग्न : वर्षांच्या सुरुवातीला राशी स्वामी शनी स्वराशीत आला आहे. यांच्या धनस्थानी कुंभ रास येते आणि स्वामी शनी धनाच्या व्ययात मकरेत आहे. त्यामुळे स्वत:वरील खर्च त्याने वाढवला असेल. यांच्या षष्ठ स्थानी म्हणजेच नोकरीच्या स्थानी मिथुन रास, तर व्यवसायाच्या स्थानी तूळ रास येते. सप्टेंबर २०२० पर्यंत नोकरीच्या स्थानातून चाललेल्या राहू भ्रमणाने आरोग्याचे अनेक त्रास दिले असतील. कामाच्या ताणाने होणारे शारीरिक त्रास, नोकरीच्या ठिकाणी वाईट वातावरणाचा त्रास झाला असेल, पण आता बदललेल्या राहूमुळे मात्र या परिस्थितीत सुधारणा होणार हे निश्चित आहे. केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचे दिवस आता येतील. व्यवसायासंदर्भात तुळेवर असलेल्या शनीच्या दृष्टीमुळे कामाचा ताण वाढेल. बंद पडलेले व्यवसाय सुरू करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.
कुंभ रास / लग्न : राशिस्वामी शनी वर्षांच्या सुरुवातीलाच स्वगृही आला आहे, पण तो व्ययात आहे आणि तिथूनच धनस्थानावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे नको तिथे खर्च होणे, गरज नसताना पैसे खर्च होणे असे प्रकार होतात. यांच्या नोकरीच्या ठिकाणी कर्क ही चंद्राची रास, तर दशम स्थानी वृश्चिक ही मंगळाची रास येते. कर्केवर शनीची दृष्टी असल्याने नोकरीत कामाचा ताण वाढणे, नोकरी टिकण्यासंदर्भात भीती वाटणे, आजारपणामुळे काम करण्यास असमर्थ ठरणे अशी फळे बघायला मिळतात. पुढची दोन वर्षे या जातकांनी नोकरीच्या ठिकाणी लक्षपूर्वक काम करावे. त्या ताणाचा परिणाम आरोग्यावर होऊ देऊ नये. व्यवसायासंदर्भात वृश्चिकेत सप्टेंबरमध्ये आलेला केतू भविष्यात काही त्रासदायक फळे देईल असे दिसते. या जातकांनी व्यवसायात कुठलेही बेकायदा काम करू नये. आपल्या मूल्यांशी तत्त्वांशी तडजोड करून मिळणारा फायदा स्वीकारू नये.
मीन रास / लग्न : वर्षांच्या सुरुवातीला शनीचा राशिपालट या गुरूच्या राशीवर पुढची दोन वर्षे दृष्टी ठेवून राहणार आहे. सध्या यांचा धनेश मंगळ मेषेत स्वगृही असल्याने आर्थिक बाबी समाधानकारक राहतील. नोकरीच्या ठिकाणी सिंह ही रवीची रास, तर दशम स्थानी व्यवसायाच्या ठिकाणी धनू ही गुरूचीच रास येते. सिंहावर सध्या तरी कुठल्या पापग्रहाची दृष्टी नसल्याने नोकरीच्या ठिकाणी या जातकांना फार त्रास होण्याची शक्यता दिसत नाही. षष्ठेश रवीचे जानेवारी २०२१ मधले मकर भ्रमण नोकरीत चांगली घटना घडवेल असे दिसते. व्यवसायासंदर्भात नोव्हेंबर २०२० पर्यंत दशमेश लग्नेश गुरू तिथेच असल्यामुळे फार त्रास झाला नसावा. मात्र केतूच्या सान्निध्याने मात्र व्यवसायात त्रासाचे सावट पसरले असणार, हे नक्की; परंतु आता केतू तिथून मागे गेला आहे आणि गुरूही लाभेश शनीबरोबर लाभात आहेत. त्यामुळे व्यवसायात चांगले दिवस आता नक्कीच दिसतील. फक्त निराशेला या जातकांनी थारा देऊ नये. अशा तऱ्हेने प्रत्येक राशीच्या नोकरी- व्यवसायाबद्दलचे हे विवेचन ढोबळमानाने केलेले आहे. प्रत्येकाच्या स्वत:च्या कुंडलीनुसार फळे प्रत्येकाला वेगवेगळी मिळणार हे निश्चितच आहे.
येणाऱ्या काळात प्रत्येक राशीच्या जातकांना करोनाने केलेल्या नुकसानीतून सावरून पुन्हा ठामपणे उभे राहण्याची शक्ती लाभो, ही सदिच्छा!