मेष : तुम्ही एका नवीन वळणावरती येऊन पोहोचलेले असाल. व्यापार-उद्योगामध्ये नवीन काम सुरू करण्याच्या दृष्टीने माणसांची आणि साधनसामुग्रीची जुळवाजुळव कराल. पशाची व्यवस्था करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल. पण तुम्ही निश्चयाच्या जोरावर बाजी मारू शकाल. नोकरीमध्ये संस्थेच्या आणि वरिष्ठांच्या गरजेनुसार तुम्हाला तुमचे धोरण लवचीक ठेवावे लागेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या अनुपस्थितीमुळे पोकळी जाणवेल. नवीन खरेदीचे बेत ठरतील. पण त्यावर सगळ्यांचे एकमत होणे कठीण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ : विशेषत: ज्या प्रश्नात बराच प्रयत्न करून यश मिळत नव्हते त्याला अचानक चांगली कलाटणी मिळाल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित होतील. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात एका नवीन वळणावर तुम्ही येऊन पोहोचाल. जुन्या कार्यपद्धतीला रामराम ठोकून नवीन कार्यपद्धती अमलात आणण्याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीमध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून  सहकाऱ्यांशी तात्पुरता दुरावा निर्माण होईल.  घरामध्ये ‘ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे’ असा अनुभव आला तर आश्चर्यात पडू नका.

मिथुन : तुमच्यामधले नवीन आणि जुने विचार यांचा गोंधळ उडाल्यामुळे नेमका कोणता पवित्रा घ्यायचा याविषयी तुम्ही संभ्रमात असाल. सभोवतालच्या व्यक्तींना जुन्या पद्धती चांगल्या वाटतील तर तुम्ही मात्र आधुनिक गोष्टींचा हट्ट धराल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण कराल. नोकरीमध्ये चालू कार्यपद्धतीत थोडासा फेरफार करून त्यामध्ये सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये पूर्वापार चालत असलेल्या  एखाद्या कामात लक्ष घालावे लागेल.

कर्क : गेल्या दोन-तीन आठवडय़ांमध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयांवर बोलणी लांबवावी लागली असतील तर त्यावर नव्या पद्धतीने फेरविचार करावे लागतील. नव्या आणि जुन्या पद्धतीचा योग्य समन्वय साधून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक तत्परता दाखवाल. व्यापार-उद्योगामध्ये पशाची आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी तुमचा जास्त गरफायदा घ्यायचे ठरविले तर असे काम तुम्ही युक्तीने टाळाल. घरगुती कामात कोणाचीही मदत न लाभल्याने एकटे पडल्यासारखे वाटेल.

सिंह : पशासंबंधी जी कामे हातातोंडाशी येऊन लांबलेली होती त्यांना आता वेग मिळाल्यामुळे तुमच्यामध्ये एक नवीन प्रकारचा उत्साह निर्माण होईल. या आठवडय़ात बाजारातील चढ-उतार आणि पशाची गरज या दोन कारणांमुळे व्यापारी वर्गाला चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी नावीन्यपूर्ण करावेसे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ काही काळापुरती वेगळ्या टेबलावर तुमची बदली करतील. ही जबाबदारी तुमच्या दृष्टीने थोडीशी तणाव देणारी ठरेल. घरामध्ये तीन पिढय़ांमधील विचारांची तफावत जाणवेल.

कन्या : तांत्रिक कारणावरून जी कामे गेले तीन-चार आठवडे लोंबकळत पडलेली होती त्यांना वेग मिळाल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. व्यवसाय-उद्योगात कामाचे प्रमाण हळूहळू वाढल्यामुळे तुमच्यामध्ये एकप्रकारचा जोश आणि उत्साह निर्माण होईल. मात्र विनाकारण रेंगाळलेल्या कामात गती आणण्यासाठी कामाच्या पद्धतीत फेरफार करावेसे वाटतील. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा वाढत राहतील. घरामध्ये कामाच्या वेळेला कोणाचीच मदत न मिळाल्याने तुम्हाला एकटे पडल्यासारखे होईल.

तूळ : विनाकारण वाढणाऱ्या खर्चावर आळा घालायचे तुम्ही ठरवाल. त्यात काही प्रमाणात यश मिळेल. मनाच्या कोपऱ्यात काहीतरी चांगले करावे ही इच्छा-आकांक्षा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी हातमिळवणी करताना तुमचा पवित्रा सावध ठेवा. नोकरीमध्ये जे काम तुम्ही एकटय़ाने कराल, त्या कामात तुम्हाला सफलता मिळेल, पण मदतीच्या बाबतीत सहकाऱ्यांकडून निराशाच होईल. घरामध्ये अत्यावश्यक कर्तव्यांना प्राधान्य द्यावे लागेल.

वृश्चिक : जेव्हा तुम्हाला तुमच्या कामात वेग मिळण्याची आवश्यकता असते त्यावेळी तुम्ही आधुनिक पद्धतीचा किंवा तंत्रज्ञानाचा पाहिजे तसा वापर करून घेता. पशाची/ भांडवलाची सोय करताना तुमची धावपळ होईल. पण हे काम जिद्दीने उरकाल. एखाद्या जुन्या पद्धतीला रामराम ठोकावासा वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मूडी स्वभावामुळे नेमके कसे काम करावे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. घरामध्ये सर्वाचा मूड मौजमजेचा असेल, पण तुम्ही मात्र तुमच्या कर्तव्याला जास्त प्राधान्य द्याल.

धनू : तुमच्या करिअरमधील कामे काही विशिष्ट कारणाकरिता लांबलेली असतील तर त्याला आता चांगली गती मिळेल. व्यापार-उद्योगात कामाचा वेग वाढविण्याकरिता तुम्हाला धाडस करावेसे वाटेल. इतरांकडून त्याला विरोध होईल. पण तुम्ही  त्याला जुमानणार नाही. जादा भांडवलासाठी महत्त्वाच्या व्यक्तीकडे शब्द टाकाल. नोकरीमध्ये एखादे चालू असलेले काम वरिष्ठ अचानक थांबवून त्या जागी दुसरे काम सांगतील. घरामध्ये प्रत्येक जण ठरवून एखादे बेत सांगेल. पण तडीस नेण्याकरिता जबाबदारी घेण्याची कोणाचीच तयारी नसेल.

मकर : पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण करून देणारे ग्रहमान आहे. व्यवसाय-उद्योगात एखाद्या कामाची पूर्वतयारी तुम्हाला ह्य़ा आठवडय़ातच करावी लागेल. काही निर्णय पटकन घ्यावे लागतील. पशाची व्यवस्था होईल. नोकरीमध्ये सतत बदलत्या दिनक्रमामुळे एक प्रकारचा दबाव तुम्हाला जाणवेल. तरीही तुम्हाला विश्रांती घेता येणार नाही. नवीन नोकरीच्या कामात काही कारणाने वेगळी कलाटणी मिळेल. त्यामुळे सध्याची नोकरी घाईने सोडू नका. घरामध्ये  एखाद्या व्यक्तीची अनुपस्थिती जाणवेल.

कुंभ : या आठवडय़ात तुम्हाला तुमचे विचार बाजूला ठेवून सभोवतालच्या व्यक्तीनुसार किंवा वातावरणानुसार बदलणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात नवीन तंत्रज्ञान आणि मिळालेली माहिती याचा वापर करून कामाला गती द्यावी लागेल, पण त्या नादात जुन्या कार्यपद्धतींना लगेचच रामराम ठोकू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या मूडमुळे, सूचनांमुळे नेहमीच्या कामांकडे दुर्लक्ष होईल. बेकार व्यक्तींनी त्यांचे धोरण लवचीक ठेवावे. घरामध्ये इतरांनी आपल्या भावना जाणून घ्याव्या याकरिता तुम्ही प्रयत्न करून बघाल.

मीन : परंपरा जपणे किंवा ठरविलेल्या पद्धतीने काम करणे, ही गोष्ट तुम्हाला नेहमीच आवडते. व्यापारी वर्गाला असा अनुभव येईल की चलतीच्या वेळी आपल्याला सर्वजण खूश ठेवण्याचे प्रयत्न करतात, पण काही कारणाने त्यात  उलट-सुलट घडले की मदतीला कोणीच पुढे येत नाही. नोकरीमध्ये सतत बदलत्या दिनक्रमामुळे  कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. एखादा तुमचा चांगला सल्ला सर्वजण ऐकून घेतील, पण त्याला काहीच प्रतिसाद देणार नाही.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology
First published on: 09-10-2015 at 01:04 IST