मी मुलांना विश्वासात घेतले. ‘आपण सगळे मिळून’या वाक्याचा फार चांगला परिणाम झाला. ‘तुम्हीपण अभ्यास कराल का जी आमच्यासोबत?’ स्वप्निल उत्साहाने म्हणाला.

तो ‘८वी/ अ’चा वर्ग. खेडय़ापाडय़ातून आलेली गरीब कुटुंबांतली सारी मुलं. १० मुली व ४६ मुलं मिळून एकूण विद्यार्थी ५६. मी या वर्षी त्या वर्गाला मराठी शिकवणार होते. फार मस्तीखोर मुलं. शिक्षणाचा गंध नसलेली. अक्षरं तर ‘आप लिखे ईश्वर पहेचाने.’ त्यांचं त्यांनाही काही कळत होतं की नाही देव जाणे! स्वप्निल, गौरव, सुनील, विशाल, यामिनी, योगराज, संजय ही पाच-सात मुलं तर अक्षरओळख नसलेली. फळ्यावर क लिहिला तर याला क म्हणतात का याबद्दलही शंका असणारी. अक्षरांपासून कित्येक योजने दूर असणारी. आठवीतली ती बापडी मुलं पाहून मी चक्रावून गेले. त्यांच्यावर राग काढण्यात काहीच अर्थ नव्हता. काहीही दोष नसताना पुढं-पुढं सरकत आलेली ती पिढी होती. पहिली ते आठवीपर्यंत मुलांना नापास करायचे नाही, याचा किती सोईचा अर्थ आम्ही शिक्षक लावत आलेलो आहोत! ही मुलं सातवीपर्यंत कशी काय आली, असे दोषाचे खापरही मला कोणावर फोडायचे नव्हते. माध्यमिकच्या शिक्षकांनी ५ ते ७ला शिकवणाऱ्या शिक्षकांना दोष द्यायचा, ५ ते ७ला शिकवणाऱ्या शिक्षकांनी १ ली ते ४ थीला शिकवणाऱ्या शिक्षकांवर दोषारोपण करायचे. पिढय़ान् पिढय़ा आम्ही हेच करत आलोय. वर्षभर शिकवूनही मुलांनी परीक्षेत काही लिहिले नाही तर उपचारात्मक कार्यक्रम मागे लागू नये म्हणून डाव्या हाताच्या करामती करणारे शिक्षक मी पाहत आलेय आणि अशाचमुळे ही मुलं इथवर आली आणि म्हणून त्यांचा काही अपराध मला वाटला नाही.
स्वप्निलला फळ्यावरचा ‘क’ वाचायला सांगितला. तो फळ्याकडे पाहत ढिम्म उभा होता. त्याचा तो भेदरलेला चेहरा आजही मला आठवतो. ‘मुर्दाड’ म्हणून त्याने इतर शिक्षकांचा मार खाल्ला, रोजच खातो. इतर विद्यार्थी सांगत होते. पण खरंच स्वप्निलला अक्षरओळखच नव्हती. काय करणार होता तो? घरी प्रेमाने अभ्यासाला बसवणारे कोणी नाही. घरात अभ्यास कशाशी खातात हेच माहीत नाही. अंत्ययात्रेत डफडे वाजवणारा बुद्धभूषण कोणी मेले की आनंदित होतो. कारण त्या दिवशी त्याला २०० रुपये मिळतात. घराच्या बांधकामात कॉन्ट्रॅक्टर सांगेल ते काम करणारा संजय, कॅन्टीनमध्ये कपबशा विसळणारा आई नसलेला विशाल, मोलमजुरी करणारी ही मुलं घरी गेली की व्यसनाधीन बापाच्या रागाला बळी पडतात. कशी अभ्यास करतील ती?
मी प्रेमाने, मायेने त्या वर्गातल्या मुलांना अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले. ‘तुम्ही चांगली मुलं आहात. तुम्हाला आताही अभ्यासास सुरुवात करता येईल. आपण सगळे मिळून अभ्यास करू या का?’ ‘आपण सगळे मिळून’या वाक्याचा फार चांगला परिणाम झाला. ‘तुम्हीपण अभ्यास कराल का जी आमच्यासोबत?’ स्वप्निल उत्साहाने म्हणाला. आणि मी खरेच माझे रजिस्टर केले. झाला आमचा अभ्यासाचा ‘श्रीगणेशा’ वर्णमालेची ओळख.. शब्द, वाक्य, विरामचिन्हे, ओळी, उतारे.. व्याकरण, कविता पाठांतर. माझा उपचार कार्यक्रम सुरू झाला. किती कठीण होते ते सारे. मी अजून काही तरी वेगळे करण्याचे ठरवले. आता या मुलांना एकमेकांचे पाहून लिहिता यायला लागलेले होते. मी वर्गात दत्तक मित्र योजना सुरू केली. बऱ्यापैकी लिहिता येणाऱ्या मुलांना मी अप्रगत मुले दत्तक देऊन टाकली. एकाच बेंचवर या दत्तक मित्र व पालक मित्र जोडीच्या बैठकीची व्यवस्था केली. फार छान सोडवायला लागली मुले. वर्गातल्या मुलांच्या मारामाऱ्या, हेवेदावे, बंद झाले. एकमेकांची कागाळी नाही चुगली नाही असे वातावरण तयार झाले. त्या वर्गाचे वर्गशिक्षक त्या वर्गाला ‘शापित’ म्हणायचे. कुठल्या तरी कोपऱ्यातल्या खोलीत ‘अंधारकोठडीत’ प्रकाशाच्या झोताच्याविरुद्ध दिशेने तोंड करून बसलेली ही मुले पाहिली की काळीज पिळवटून निघायचे. मी माझ्या तासिकेला कडुनिंबाच्या खाली मुलांना मोकळ्या हवेत घेऊन बसायला सुरुवात केली. जमिनीवर बांधकामाची रेती आणि कडुनिंबाची गार गार सावली. आमच्या वाचन-लेखन उपचाराला पूरक वातावरण. मी आधीच्या तासिकेवरून येण्यापूर्वीच मुले झाडाखाली आलेली असायची. त्या मुलांना फक्त सकारात्मकतेची गरज होती.
बऱ्याच प्रयत्नांनी स्वप्निल, गौरव, विशाल पुस्तकातील काही ओळी वाचायला लागले. आजही तो दिवस आठवतो मला. ज्या दिवशी महत्प्रयत्नांनी स्वप्निलने अडखळत का होईना काही ओळी वाचल्या. माझ्या डोळ्यात पाणी आले. स्वप्निलला तर मी वर्गासमोर कडकडून मिठी मारली. कधी नव्हे ते कौतुक त्याच्या वाटय़ाला आले होते. तेही पोर मला बिलगले. अविस्मरणीय व विलक्षण क्षण होता तो. कुणाला पैसा मिळाल्याचा आनंद होतो, कुणाला पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतो, कुणाला आपल्याला क्लासटीचरशिप नाही याचा आनंद होतो. पण मला त्या दिवशी स्वप्निलला वाचता आले याचा प्रचंड आनंद झाला. त्या सर्व मुलांमध्ये आत्मविश्वास आला.
मी नववी-दहावीलाही ती ५६ मुले सोडणार नाही. त्या वर्गाचे अध्यापन मला नवे आव्हान वाटतेय आता. शाळेत येताना वही, पेन, पुस्तक न आणणारी मुले ही, त्याच वर्गात पण अतिशय संयम ठेवून मी एखादा कागद, माझ्याजवळचे पेन पुरवून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतलाय. पालकांना जागृत करण्याइतपत पालक सक्षम नाही. मुलगा कोणत्या वर्गात शिकतो याच्याशीही त्याला काही देणे घेणे नाही. अशा परिस्थितीत शिक्षकाच्या फार जबाबदाऱ्या वाढतात. ‘ती मुलंच तशी आहेत. आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करायचा का अ आ ई शिकवत बसायचे? कसे तरी दहावीपर्यंत न्या. आपोआपच तिथे निकाल लागेल त्याचा.’ या असल्या मुलांमुळे शाळेचा रिझल्ट घसरतो. अशी मुले शाळेतच नकोत, अशी अनेक वक्तव्ये र३ंऋऋ १ेमध्ये ऐकल्यानंतर या मुलांचा वाली कोण? अशा मुलांची कोणी जबाबदारी घ्यायची? मुले शाळेत येत असली तरी शाळेतल्या शिक्षणापासून ती वंचित राहत आहेत याची जाणीव का नसेल होत कोणाला? आपण त्यांना जाणीवपूर्वक वंचित करतोय याची जाणीव का होत नसेल यंत्रणेला.
आठवीतून नववीत जाणाऱ्या या मुलांना सकारात्मक गोष्टींची आणि अतिरिक्त वेळेत अभ्यास आणि उपचार करून घेणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. मुलांच्या मनातला अभ्यासाचा भयगंड काढून त्यांना सन्मानाने आणि सकारात्मकतेने वाढवण्याची गरज आहे. पुढच्या दोन वर्षांत मी अधिकचा वेळ देऊन त्यांच्याकडून तयारी करूनच घेणारेय. मी मुलांना वर्गात विचारते, ‘आम्ही छप्पन्न!’ मुले एकमुखाने ओरडतात ‘दहावी पास होणारच.’ मी म्हणते ‘आम्ही छप्पन्न!’ ते ओरडतात ‘अभ्यास करणारच.’ वर्गात लगेच चैतन्य पसरते. ‘ते छप्पन्न आणि मी’ आमची आता सॉलिड टीम जमलीय.