‘स्वरा’नावाची लाट आमच्या कुटुंबीयांच्यामध्ये २०१३ मध्ये आली. पंधरा महिन्यांमध्ये या स्वराने अक्षरश: वेड लावले. लहान मुलांना सर्वच ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगतात, ‘‘एक चिमणी आली, एक दाणा घेतला अन् भुर्रकन उडून गेली. स्वराचे हात आपोआपच भुर्रकन उडून गेल्याची अ‍ॅक्शन बघण्यासारखी असायची. दोन्ही हात उंचावत वर बघत ‘भुर्रभुर्र’ करत आवडीने गोष्टीचा आनंद घेत सर्वानाच मोहून सोडायची.

स्वराला फोटोची आत्यंतिक आवड. फोटोसाठी पोज देत फोटो काढेपर्यंत पुन्हा तो फोटो कॅमेऱ्यामध्ये अथवा मोबाइल तिला दाखवेपर्यंत दमधीर नसायचा. कधी एकदा स्वत:चा फोटो पाहीन, असेच हास्य तिच्या चेहऱ्यावर असायचे. पाण्याच्या टबमध्ये आंघोळ दोन मिनिटांची पण नंतर २५ ते ३० मिनिटे टबमध्ये पाण्यात खेळणे, अंगावर पाणी उडवणे हा आवडीचा छंद. जवळ कोण गेले तर टबमध्ये उभं राहून राग व्यक्त होई. मनसोक्त आंबा खाणे म्हणजे बघत बसावे. कारण आंबा सोलून देईपर्यंत दंगा तर सोलून दिल्यावर सालीवर जरासुद्धा गर दिसणार नाही. आंब्याची कोय खाताना तर सारखी हातातून निसटायची तर पडलेली कोय अंगावर घेत अंग घाण करून कोय खाण्याची धडपड पाहण्यासारखी.
लहान मुलांना झोप कमी तशी स्वराची झोप कमी होती. सकाळी ५-५।। वाजता उठायची. सर्वजण झोपलेत म्हटल्यावर शांतपणे पडून राहायची, पण खाली बाबांचे खोकणे शिंकण्याचा आवाज ऐकला की रांगत रांगत दाराजवळ येत ‘‘बाबा’’ म्हणून जोरदार हाक मारायची. तिच्या आवाजाने घरदार जागे व्हायचे. प्रत्येकजण झोपमोड झाली म्हणून स्वरावर वैतागायचे, पण बाबांनी वर येऊन घेईपर्यंत बाबा बाबाचा गजर चालूच असायचा. बाबांच्याबरोबर दूध आणायला बरोबर जाणे, हा तिचा दिनक्रम असायचा. तिचा दिवस तेथून चालू होई. दूध घेऊन आल्यावर ते तिच्या पोटात जाईपर्यंत दंगा चालू होई. आईने घेतले तरी पोटोबा शांत होईपर्यंत स्वराचा स्वर, उच्च पातळीवर आपली कमाल दाखवून सर्वाना हैराण करायचा. एकदा पोटोबा भरला की, परत तासदोन तास अगदी निवांतपणे दंगामस्ती चालायची. वृत्तपत्रे वाचण्यासाठी घेतले की जवळ येत, ते काढून घेत अध्र्या मिनिटात त्याचा चोळामोळा होई. हा तिचा वाचनाचा छंद बघण्यासारखा.
वॉकरमधून घरभर पळणे, कोचला धरत एक एक पाय टाकत, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणे, मोबाइलचा आवाज आला की तो घेत सर्व बटणे दाबत कानाला लावत काहीही बडबडणे, मोबाइलमधील गाणी, हास्यचित्रे पाहणे हा तर स्वराचा आवडीचा छंद. छोटय़ा सायकलवरून फिरणे म्हणजे , ‘‘दादाला, दाद्रा, दादा’’, करत माया लावणे म्हणजे दादा मला फिरवून आण, अशा करामती बघण्यासारख्या होत्या. घरातून बाहेर पडताना तर मोटरसायकलवरून फिरवून आणल्याशिवाय मोठय़ा व्यक्तीला बाहेर जाऊन द्यायची नाही तर रस्त्याने जाताना एक हात उंचावत ‘‘बाय, बाय’’ असा हात हलवत सर्वाना मानवंदना दिल्यासारखी जायची, तिचे बाय बाय करणे व बोलणे उच्चारणे हे सर्व गल्लीतील लहानथोरांना चांगलेच अंगवळणी पडले होते.
आंघोळ झाल्यावर देवदर्शनासाठी स्वरा तयार असे. गणपतीच्या मंदिरात नमस्कार करण्यापासून ते स्वत:ला उंच घेत घंटा वाजवणे हे तिला आवडायचे. त्यानंतर कपाळावर देवाचा अंगारा लावायसाठी कोपऱ्यात बोट करायची, या सर्व अ‍ॅक्शन जोरजोरात चाललेल्या असायच्या. गल्लीच्या कोपऱ्यावरून मोटरसायकलचा हॉर्न वाजवला की, दारात रांगतरांगत येत ‘‘बाबा, बाबा’’ म्हणत भंडावून सोडायची, तिला घेईपर्यंत दमधीर नसायचा. घेतल्यानंतर डोक्यावरची टोपी काढून घेत स्वत:च्या डोक्यावर घालणे, खाऊसाठी हात पुढे, मासा बघण्यासाठी उतावीळ होत, माशाच्या पेटीकडे झेप टाकणे व मनसोक्त १० ते १५ मिनिटे मासे बघणे हा स्वराचा आवडीचा उद्योग. स्वरा म्हणजे मन भुलावून टाकणारे व्यक्तिमत्त्व. वेळ कसा जायचा हे कधीच समजायचे नाही. वेळेचे भान मोडीत जायचे.
स्वराच्या वाढदिवसा दिवशी तिच्या वडिलांनी पै-पाहुणे, मित्रमंडळ सर्वाना भोजनासाठी आमंत्रित केले. उत्कृष्ट जेवणाचा बेत सर्वाना आवडला, परंतु स्वराच्या वाढदिवसाला कोणाची तरी दृष्ट लागली. स्वराच्या आईची १० तोळे दागिने असलेली पर्स बघताबघता लांबवली. सर्वजण हबकून गेले. स्वराचा वाढदिवस कुटुंबीयांना तापदायक ठरला.
स्वराचे चालणे, बोलणे, बागडणे, नकला करणे हे सर्वानाच आनंददायी होते. अशातच थोडासा ताप आला. डॉक्टरनी ताप व दातावरील उपचार चालू केले. ताप अचानक वाढला, डॉक्टरनी प्रयत्नांची पराकष्ठा केली. बघता बघता स्वरा निस्तेज झाली. चिमणीची गोष्ट सांगता सांगता चिमणी भुर्रकन उडून गेली. स्वरा नावाची सव्वा वर्षे-१५ महिने टिकली, पण त्या लाटेने सर्वाना अक्षरश: वेड लावले. स्वरा गेली ती पण कायमची, हे आजसुद्धा कोणाला सांगून पटत नाही. स्वराला शेवटच्या क्षणी घातलेला परीचा फ्रॉक सर्वाचे डोळे पाण्याने भरवून गेला. दाराआडून ‘‘भौ’’ करत भीती दाखवणारी स्वरा आता दिसणार नाही.
पाच वर्षांच्या छोटय़ा संचितला सांगितले, ‘स्वरा देवाघरी गेली.’ तेव्हापासून देवाघरून स्वरा कधी येणार, हे भरलेल्या डोळ्यांनी विचारलेल्या संचितला कोण उत्तर देऊ शकत नाही.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक