03 August 2020

News Flash

भटकंती कळसूबाईची

आमचा कळसूबाई ट्रेक करायचा ठरला तो अपघातानेच. म्हणजे ठाकूरवाडी ट्रिपचा बेत फिक्स व्हायच्या मार्गावर होता, फेसबुकवर एका ट्रेकिंग ग्रुपने तयार केलेल्या इव्हेंटवरून आमच्यात प्रस्तावना सुरूही

| May 1, 2015 01:05 am

आमचा कळसूबाई ट्रेक करायचा ठरला तो अपघातानेच. म्हणजे ठाकूरवाडी ट्रिपचा बेत फिक्स व्हायच्या मार्गावर होता, फेसबुकवर एका ट्रेकिंग ग्रुपने तयार केलेल्या इव्हेंटवरून आमच्यात प्रस्तावना सुरूही झाली होती. पण फेसबुक देतं नि व्हॉट्सअप नेतं त्यातला प्रकार झाला. म्हणजे तो ट्रेक त्या ग्रुपकडूनच काही कारणाने रद्द झाला. आणि मग व्हॉट्सअपवर आमच्या ग्रुपमधली त्यावरची चर्चाही थांबली. पण मग अचानक आली लहर केला कहर. म्हणजे व्हॉट्सअपवरच ‘ट्रेक प्लॅिनग’ नामक एक नवीन ग्रुप सुरू केला आणि आमच्या ग्रुपमधले उत्साही कार्यकत्रे त्यात येताच आमचा अचानक कळसूबाई शिखर करण्याचाच निश्चय झाला. पटापट उपलब्ध इंटरेस्टेड डोकी मोजण्यात आली.. ती पाचच भरली.. पण उत्साह काय विचारता? मग लगेच तारीखही ठरली. जॉबमुळे कुणी मुंबई, कुणी पुणे असे विस्कटल्या गेलेल्या आमच्या इंजिनीअिरगच्या फ्रेंड सर्कलपकी आम्ही पाचजण म्हणजे धनश्री आणि सागर सहस्रबुद्धे हे नवविवाहित दाम्पत्य, गुणी बाळ सर्वेश जोशी, दोन्ही ट्रेक्सच्या कल्पना सुचवणारी मास्तरमाइंड प्रियांका पाटील (ती आधीही कळसूबाई वारी करून आलेली असल्याने आता तीच गाईड कम मास्तर.. म्हणून मास्तरमाइंड.) आणि (नंतर प्रवासवर्णन लिहायला कुणीतरी हवा म्हणून) मी असे हम पाँच या ट्रेकसाठी सज्ज झालो.
मुंबई-कानपूर ही ट्रेन दादरला फक्त सव्वा तासच लेट होऊन मध्यरात्री दोन वाजता आल्याने दादर स्टेशनवरच्या अनेक डासांचे आशीर्वाद आम्ही अनच्छिक रक्तदान करत मिळवले. मग आम्ही पाच वाजता इगतपुरी स्टेशनला पोचलो. तिथून बारी या गावी जाण्यासाठीची बस बरी लवकर मिळाली. बारीला उतरून थोडेसे चालत जाताच ईप्सित स्थळी पोचलो. चहा-बिस्किटे झाल्यावर मोहीम सुरू करायला सर्वानाच तरतरी आली. आणि मग काय, ‘होऊ दे ट्रेक’ म्हणत आम्ही सकाळी साधारण साडेसातच्या सुमारास चढाई सरू केली.
lp77सह्यद्री पर्वतराजीतल्या या सर्वोच्च कळसूबाई शिखरावर पायथ्यापासून जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत हे माहीत होतेच. (अर्थातच आपला मित्र विकीपीडियाच्या सौजन्याने) वाट चुकलोच तर प्रियांका जबाबदार असे आधीच ठरलेले असल्याने आम्ही बिनधास्त होतो. तरी सुरुवातीला जे एक दोघे स्थानिक लोक दिसले, त्यांना विचारून आम्ही योग्य मार्गाची माहिती घेतली आणि त्यानुसार  निघालो. नाहीतरी इंटरनेटला पुरेशी रेंज नसल्याने मोबाइल जीपीएसवर सर्वेश वैतागला होताच.
‘कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची टिंब टिंब मीटर आहे’, या वाक्यात अचूकपणे १६४६ लिहून शाळेत असताना परीक्षेत मार्क मिळवले होते, तेव्हा वाटलेही नव्हते की एक दिवस ह्य़ा शिखरावर जाऊ. ते भूगोलचे सरही सोबत आले असते तर.. असं उगाचच वाटून गेलं. वर वर जाताना ठिकठिकाणी २००, ५०० इत्यादी आकडे मार्क केलेले मोठे दगड दिसत होते. पण तो तिथे भरायचा टोल नसून तिथली उंची दर्शवणारे आकडे आहेत हे आम्ही तात्काळ ओळखले. ‘‘मागच्या वेळी इथे ना..’’, ‘‘तेव्हा आम्ही ना असे इकडून..’’ इत्यादी वाक्ये प्रियांकाकडून येत होती. इंजिनीअिरगचे असल्याने समोरच्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसताना आणि काहीही कळत नसतानाही आत्मविश्वासाने मान डोलावण्याची सिद्धी आम्हाला प्राप्त होतीच. अध्येमध्ये थकवा यायचा तेव्हा आम्ही थोडा ब्रेक घ्यायचो. आणि ते आमच्या बॅग्जमधल्या खाद्यपदार्थाना, फळांनाही आपसूक कळत होतंच. पोटोबा इनफ डाऊनलोड झाला की पुन्हा मजेत आम्ही शिखराकडे अपलोड व्हायला लागायचो. शिखरापर्यंत जाताना चढाईचा बराचसा भाग हा दगडा-दगडांतूनच वाट काढत जायचा होता, पण ज्या ठिकाणी चढ अतिशय तीव्र आहे, त्या ठिकाणी सोयीसाठी लोखंडी शिडय़ांची व्यवस्था पूर्वीच करण्यात आली आहे. कॉलेजनंतरही आयुष्यात ‘व्हिजन’चं महत्त्व कळत होतं ते असं! अशा तीन शिडय़ांपकी पहिली शिडी काही वेळाने लागली. आम्ही टाइम मॅनेजमेंट (आणि एकमेकांना) सांभाळत वरच्या दिशेने जात होतो. फार वेगाने चाललोय, जरा निवांत जाऊ असं वाटताच ब्रेक घेत मध्येच ‘रनरेट’ कमीही करायचो. मोबाइल आणि डिजीकॅम सोबत असल्याने ठिकठिकाणी फोटो काढत निसर्गाला (आणि आम्हालाही) त्यात कैद करत होतोच. अर्थात जादूगार निसर्गाचे ते अप्रतिम सौंदर्य पाहून बहुतेकदा ते मनातच साठवून घ्यावेसे वाटत होते हेही खरेच! टेक्नॉलॉजीने झपाटलेल्या या युगातदेखील माणूस म्हणून आपण ‘त्याच्या’समोर किती क्षुल्लक आहोत हे पदोपदी जाणवत होते आणि गंमत म्हणजे तो पराभवही गोड वाटत होता, हवाहवासा वाटत होता. काही वेळाने दुसरीही शिडी पार करून वर निघालो. दरम्यान चक्क अशा उंच ठिकाणीही एका झोपडीवजा जागी एक काका गरमागरम भजी तळत असलेले दिसले. मग पुन्हा पोटपूजा ओघाने आलीच. त्या वेळी त्या काकांशी छान गप्पाही झाल्या. तेव्हा कळलं की वर्षभर तिथे अनेक ट्रेकर्स येत असतातच, पण नवरात्रीत मात्र तेथील कळसूबाई देवीची रोज नऊ दिवस पूजा असते नि त्या काळात तिथे येणाऱ्या भाविकांची गर्दीही बरीच असते. संध्याकाळी अंधार पडल्यावरही आरतीसाठी वर मंदिरापर्यंत जाणारे बरेचजण असतात. शिवाय तेव्हा स्थानिक वस्तू, पूजासाहित्य वगरे विकणारेही मोठय़ा संख्येने असतात. खरं तर अशी बिकट वाट ही, तिथे दिव्यांची सोय नसल्याने, सूर्यास्तानंतर पुरेसा उजेड नसताना चढणे धोकादायक आहे हे स्पष्ट दिसत होते. आम्ही सगळे इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स आणि त्यात ‘स्वदेस’  पाहिलेला असल्याने त्या अनुषंगाने मनात काही विचारही आला. पण त्यासाठीच नवरात्रीत तिथे अनेक स्थानिक गाइड्स, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव पोलीसही असतात अशी माहिती मिळाली. वर जाताना वाटेत कुठे पिण्याच्या पाण्याची सोय नसली तरी या ठिकाणी मात्र जवळच एक छोटीशी विहीरही दिसत होती. तिथून पुढे निघताच काही मिनिटांतच ती तिसरी आणि त्यातल्या त्यात तीव्र चढण असलेली लोखंडी शिडी लागली. ती पार केल्यावर काही वेळातच आम्ही कळसूबाई शिखरावर पोचलो, तेव्हा घडय़ाळातले काटे साधारण ‘वाजले की बारा’ असे होते.
इथे येताच सर्वप्रथम दिसते ते कळसूबाई देवीचे छानसे मंदिर आणि एक भगवा झेंडा. इतरांनी मनोभावे त्या देवीला हात जोडून नमस्कार केला, तसे मीही माझ्या आडनावाला जागत ते सार्थ केलं.
महाराष्ट्रातल्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्यावर सागऱ्या आणि धनूच्या चेहऱ्यावरचे लग्नापाठोपाठ आणखी एक धाडस यशस्वीपणे पार पाडल्याचे अचीव्हमेंटपूर्तीचे भाव काही लपता लपत नव्हते. मंदिर दृष्टिपथात येताच आम्ही जवळपास धावतच वर आलो होतो. हातात मोबाइल वा टॅबलेट नसतानाही मिळालेला हा ‘टेम्पल रन’चा अनुभव जाम थ्रिलयुक्त भन्नाट होता. तिथे आकाशात फारसे ‘अँग्री बर्ड्स’ दिसले नाहीत, मात्र वर येईपर्यंत काही स्थानिक श्वानांनी सोबत केली. इथे शिखरावर येताच आसपास काही माकडे दिसली. ‘तुम्ही इथे येणारे पहिलेच नाही, गर्व नको लेको’  हे अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठीच तर निसर्गाने ही पूर्वजांची योजना तिथे केलेली नसेल ना! आम्हाला मग लिमिटेड खजील झाल्यासारखे वाटले. माकडेही माग काढत येऊ शकतात हे जेवणासाठी आम्ही डबे उघडताच कळून चुकले. आम्ही एकमेकांतच कुणालातरी ‘ए माकडतोंडय़ा’ म्हणालो होतो, हे सांगूनही त्यांना पटले नसावे. एखाद्यासाठीचा अपशब्द हा दुसऱ्या कुणाला प्रेमळ आमंत्रणही असू शकतो तो असा. माकडेच ती, त्यातले एक पिल्लू तर सारखे त्याच्या माँकडेच पळत सुटायचे. पण हो, ऑफिसमधल्या रोजच्या इन-आउटच्या पंचपेक्षा आज निसर्गाच्या सान्निध्यातला हा ‘पीक लंच’ नक्कीच सुखद वाटत होता. अन् का वाटू नये, कारण त्या क्षणी का होईना, पण निसर्गाबरोबरच आम्हीही ’हाइट’ केली होतीच की!
जेवून थोडा वेळ आराम केला, मग खाली यायला निघालो. उतरताना मात्र पटपट अडीच तासांतच आम्ही पायथ्याशी आलोही. शिखर गाठण्यासाठी कितीही वेळ लागला, तरी एकदा उतरण सुरू झाली की माणूस ‘डाउन टू अर्थ’ यायला वेळ लागत नाही हा अर्थपूर्ण शोधही लागला. खरंच निसर्गासारखा गुरू नाही!
संपूर्ण ट्रेकदरम्यान नजरेला पडणारी एक गोष्ट मात्र सातत्याने खटकत होती. ठिकठिकाणी त्या मोठमोठय़ा दगडांवर खडूने काढलेले मोठमोठे बदाम आणि त्यात बाण, नावे, अक्षरे वगरे केलेलं नक्षीकाम. मुळात किल्ले, लेणी आणि अशा सुंदर शिखरांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दगडांवर असे काहीबाही लिहून आपण साक्षर आहोत हे सिद्ध करणाऱ्यांची सांस्कृतिक चीड, सात्त्विक संताप, मनस्वी कीव वगरे जितकी यावी तितकी कमीच. दगडावर असं नाव कोरून अमर होता येतं असा या अश्मयुगीन धोंडय़ांचा समज असावा कदाचित. अशी दगडावर नावे लिहून प्रेम दाखवून देणाऱ्या लोकांना खरं तर एका अर्थी पाषाणहृदयीच म्हटलं पाहिजे.
पायथ्याशी येऊन पुन्हा चहापाणी झालं. तिथे एका हातपंपावर पाणी भरणारी लहानशी कोवळी मुलं-मुली पाहून मनात कसंसंच झालं, आत काहीतरी तुटलं. मग आम्हीही जरा पंप हापसून त्यांना पाणी भरून दिलं. त्यांच्याशीही झालेल्या गप्पांतून ते राहतात कुठे, त्यांची शाळा कोणती, पाणी कुठवर न्यावं लागतं वगरे कळलं.
इगतपुरीहून संध्याकाळी परतीची गीतांजली एक्स्प्रेस ही ट्रेन मिळवून नि अथक कष्टाने बसायला जागा पकडून आम्ही पुन्हा मुंबईला यायला निघालो आणि पुन्हा पुढचा ट्रेक कुठे याची चर्चा सुरू झाली. 

– पराग पुजारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2015 1:05 am

Web Title: blog on kalsubai trek
टॅग Lokprabha
Next Stories
1 आडवाटांच्या सान्निध्यात
2 आडवाटांच्या सान्निध्यात
Just Now!
X