03 August 2020

News Flash

ब्लॉगर्स कट्टा : लाचारी

भाचा दिव्यराज आजारी आहे असं कळलं होत. दवाखान्यात गेलो. दिव्य शांत झोपला होता. कधीही न आजारी पडणारा, सतत हसत-खेळत असणारा, मम्माला नोकरीला जाताना टाटा करणारा,

| March 6, 2015 01:19 am

भाचा दिव्यराज आजारी आहे असं कळलं होत. दवाखान्यात गेलो. दिव्य शांत झोपला होता. कधीही न आजारी पडणारा, सतत हसत-खेळत असणारा, मम्माला नोकरीला जाताना टाटा करणारा, ती परत येईपर्यंत तब्बल दहा ते बारा तास घरच्यांना कोणताही त्रास न देणारा हा एक वर्षांचा दिव्य आज अचानक बेशुद्ध पडला होता. तोही तब्बल बारा तासांहूनही अधिक काळ; मन कासावीस होऊन गेलं त्याची ती अवस्था पाहून. 

सर्व टेस्ट करून झाल्या होत्या. रिपोर्ट येणे बाकी होते. त्याची वाट पाहत हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाकावर बसलो होतो. थोडं बाहेर फिरून यावं म्हणून दवाखान्याबाहेर पडलो आणि सायंकाळच्या वातावरणात फिरत शतपावली करून मन हलकं करावं म्हणून थोडं अंतर फिरत गेलो तोपर्यंत दिव्यच्या आईचा, मीनाचा फोन आला.
‘कुठं आहेस?’
‘आहे बाहेरच,’ मी म्हणालो.
‘लवकर ये. औषध आणायचं आहे.’
‘आलोच,’ मी म्हणालो.
घाईगडबडीत दवाखान्याच्या दरवाजाजवळ आलो. आत पाऊल टाकणार तोपर्यंत मागून आवाज आला.
ओ दवाखान्यात आलाय का?
‘हो,’ मी म्हणालो.
पेशंट आहे काय?
‘होय लहान मूल आहे’
‘कोणतं गाव?’
‘मिठारवाडी,’ मी म्हणालो.
‘माझं नेबापूर गाव,’ तो म्हणाला.
‘अहो काय सांगू, माझीही मुलगी या दवाखान्यात अ‍ॅडमिट होती. हसत-खेळत असणारी मुलगी अचानक आजारी पडली. इथं आणली. डॉक्टर बोलले होते ठीक होईल. पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण काही उपयोग झाला नाही. खूप खूप वाईट वाटलं. तिसऱ्या दिवशी ती वारली. नियतीपुढं कोणाचं काय चालणार म्हणा. पण झालं ते झालं. खूप महागडा दवाखाना आहे. हा पण काय पर्याय नसतो अशा वेळी’
असं तो म्हणताच माझ्या डोक्यात वेगळाच विचार आला, तो म्हणजे तुम्ही इथून पेशंट हलवा असं त्याला सागायचं असेल, पण थोडय़ाच वेळात माझा भ्रमनिरास झाला.
तो म्हणाला, ‘माझं एक महत्त्वाचं काम आहे तुम्ही ते करा. नाही म्हणू नका. प्लीज.’
‘कोणतं?’
‘मला पन्नास रुपये द्या. माझ्या गाडीतलं पेट्रोल पूर्ण संपलं आहे.’
‘माझ्याकडे नाहीत हो आत्ता,’ असं मी म्हणालो.
‘प्लीज नाही म्हणू नका. मी तुमचे पैसे उद्या परत करतो. वाटल्यास पन्नासला शंभर परत करतो. माझा फोन नंबर घ्या. पत्ता घ्या, उद्याच्या उद्या तुम्हाला इथे दवाखान्यात आणून देतो आणि काय सांगू सांगा. मला घरी जायचा खूप प्रॉब्लेम झालाय हो. असं तुमच्याकडे पैसे मागायची लाज वाटते हो, पण काय करणार सांगा.’
मी दोन मिनिटे शांत उभा राहिलो. विचार केला. इकडे दवाखान्यात पेशंटवर पैसा खर्च करून खिसा रिकामा झालाय आणि हा तर दवाखान्याच्या दारात पैसा मागतोय काय कारावं? द्यावेत की नको? दिले तर याचा योग्य वापर करेल का? की न द्यावे तर खरंच अडचण असेल तर मदत केली पाहिजे. नाहीतर याला घरी जाणं खूप अडचणीचं होऊन जाईल. रात्रीची वेळ आहे. मलाही दोन वेळा माझ्या गाडीतील पेट्रोल संपले होते तेव्हा आपल्या गाडीतील पेट्रोल काढून देणारे मित्र भेटले होते. मीही अनेक जणांना माझ्या गाडीतील पेट्रोल काढून देऊन मदत केली होती. अडणाऱ्याला सहकार्य करणे हा मानवी स्वभावधर्म आहे. आणि तो आपण पूर्ण केला पाहिजे असं म्हणत मी खिशातून वीस रुपये काढत त्याच्या हातावर ठेवले.
‘वीसच रुपये, आणखी तीस द्या,’ असं तो म्हणाला.
इकडे खिशात फोन सतत वाजत होता. मन तिकडे सैरभैर होत होते आणि हा इकडे विनवत होता. मनाची द्विधा अवस्था झाली होती.
‘आणखी तीस द्या,’ तो पुन्हा म्हणाला.
‘जातंय तेवढय़ात,’ मी म्हणालो.
‘बुलेट गाडी आहे नाही जाणार हो,’ असं तो म्हणाला.
तेवढय़ात माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हा नक्कीच खरं बोलत नसावा. जो बुलेटवरून फिरतो आहे तो नक्कीच असं लाचार होऊन पैसे मागणार नाही. दिलेले पैसे परत मागू शकत नव्हतो. फोन तर सतत वाजत होता. दुनियादारीच्या नादात आपण आपलं महत्त्वाचं काम विसरत चाललोय याची जाणीव होताच तसाच आत निघून गेलो. औषधं घेऊन परत बाहेर आलो, अंधार पडला होता, रस्त्यावरून येणाऱ्याा गाडय़ांच्या हेडलाइटच्या प्रकाशात रस्ता पार करू लागलो. गाडीवरून मागे वळून पाहिलं तर तोच माणूस दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे उकळत होता.
उमेश महादेव तोडकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:19 am

Web Title: bloggers katta 12
टॅग Blog,Bloggers Katta
Next Stories
1 इतिहासाचा अभ्यास? कशासाठी?
2 कॅमलची पावले
3 कथा : तिचे मन… त्याचे मन
Just Now!
X