काही माणसे आपल्याला अगदी जवळून पाहायला मिळतात. ती असतात आपली स्वकीय, मित्र, वगरे. पण काही माणसांना जवळून कधीच पाहता येत नाही. ती काही काळ आपल्या अवतीभवती असतात, मग नाहीशी होतात, आणि पुन्हा कधीच भेटत नाहीत. पण आपल्या मनात त्यांची प्रतिमा कोरली जाते ती मात्र कायमची. फक्त दुरून दिसतात ही माणसं. मग कोपऱ्यावर रोज दिसणारी म्हातारी असो, समोरच्या वाडय़ात दिसणारा कोणी असो, लोक त्याला वेडं म्हणत असूनही आपल्याला वेडा वाटत नसलेला कोणी म्हातारा असो, किंवा घरावरून रोज जाताना दिसणारा कोणी. मला अजून आठवतात अशी काही माणसं.
त्यातीलच एक – गजा. समोरच्या वाडय़ात दिसणारा. पांढरे केस, थोडी वाढलेली पांढरी दाढी, चेहऱ्यावर दिसणारं वय आणि थकलेपण आणि एक प्रकारचं हरवलेपण. अंगात बंडी आणि पायजमा. कोणी म्हणायचं तो वाडा-मालकांचा कोणी दूरचा भाऊ आहे, तरी आश्रितासारखा राहतो त्या वाडय़ात, तर कोणी म्हणे, तो खूप र्वष या वाडय़ामध्ये कामाला होता म्हणून ह्याच वाडय़ात आसऱ्याला असतो. तो बरेचदा सारसबागेतही दिसायचा. त्याच्याशी मोठे कोणी बोलत नसत आणि आम्हा लहान मुलांनाही त्याच्यापासून लांबच राहायला सांगितलं जाई. मला त्याची भीती अशी नाही वाटली खरंतर, पण तो खूप बिचारा वाटायचा. त्याचे ते भकास दिसणारे डोळे, शून्यात लागलेली नजर, मला आत कुठेतरी बोचून जायची. तो शेवटचा दिसला तो त्याच वाडय़ाबाहेर िभतीला टेकून बसलेला. त्याचे डोळे मावळल्यासारखे दिसत होते, तो मनाशी काहीतरी बोलत होता. त्या दिवशी प्रथमच मी त्याला बोलताना पाहिलं, आणि शेवटचंच. त्याच संध्याकाळी तो गेल्याचं कळलं. आणि अर्थातच पुन्हा कधीच तो दिसला नाही. भकास वगरे शब्दांचा अर्थही कळत नसेल मला तेव्हा, पण ते डोळे आणि तो चेहरा आज आठवला तरी मन उदास होतं.
असाच दूरून पाहिलेला दुसरा माणूस म्हणजे रामू. फुगे विकायचा तो आणि रोज आमच्या घरावरून जायचा. त्याच्या हातात काकडीच्या आकाराचा एक फुगा असायचा, त्याच्या वर हात घासून तो एक विशिष्ट आवाज काढायचा. तो ऐकताच कळायचं, रामू आला. मी धावत जायची खिडकीकडे. फुगा घेण्यापेक्षा मला त्याचं ते फुग्याची काकडी वाजवणं पाहण्याचंच अप्रूप असायचं. उंची अगदी कमी, अंगात मळकट सदरा आणि विजार असा त्याचा पोशाख असायचा. खांद्यावर फुगे अडकवलेली काठी, त्यावर रंगीबेरंगी फुगे, आणि दोन्ही हातांनी धरलेली, ‘‘मी आलोय’’ म्हणणारी काकडी. काही वष्रे तो नेमाने आला, आमच्या घरासमोरून जाताना दिसत असे. पुढे कधीतरी त्याचं येणं बंद झालं. त्याचं ते अचानक नाहीसं होणं जाणवलं असेल कोणाला?
न कळलेली कविता, ही अशीच एक व्यक्ती. आजही दिसते ती कधीतरी, पण कळली तेव्हाही नव्हती आणि कळत नाही अजूनही. ती आमच्या शेजारी कामाला यायची. धुणंभांडी, केर फरशी वगरे करायची, काम झालं की निघून जायची. कोणाशी बोलणं असं नाही. कामात अगदी चोख, कधी रजाही घेतली नसेल. तिच्यावर तिच्या पूर्ण घराची जाबाबदारी होती असं ऐकलं होतं. आपल्या पाठच्या भावंडांची शिक्षणं, लग्न करण्यात, तिच्या लग्नाला खूप उशीर झाला होता, आणि तिच्यापेक्षा वयाने खूप मोठय़ा असलेल्या कोणाशी तिचं लग्न झाल्याचं कळलं होतं नंतर कधीतरी. ती दिसायला सुरेख होती, तरतरीत होती. एकदा आम्ही मुलं जिन्यात खेळत असताना मी पडले, आणि नेमकी तेव्हाच कविता तिथून जात होती. थांबून तिने मला विचारलं होतं, ‘बाळा, लागलं तर नाही नं फार?’ बस. इतकंच काय ते आमचं बोलणं. त्यानंतर अधेमधे दिसायची तेव्हा ओळख दाखवायची. का माहीत नाही, पण मला आवडायची ती. आजही दिसते क्वचित. वयापेक्षा जास्त थकलेली वाटते. ओळखीचं बघते माझ्याकडे, पण खरंच हसते का ते कळत नाही.
कधी गतकाळाची पानं उलटताना जवळून भेटलेली माणसं तर आठवतातच, पण अशी दुरून दिसलेली माणसंही स्मरतात. त्यांच्या ‘आठवणी’ अशा नसूनही ती माणसं आठवतात आणि हुरहुर लागते त्यांना ‘भेटायचं’ राहून गेल्याची. अनोळखी चेहऱ्यांच्या गर्दीत एखादा चेहरा पूर्वी पाहिल्यासारखा वाटतो. या दुरून दिसलेल्या, पाहायचं राहून गेलेल्या माणसांसारखा असतो का तो चेहरा?