राजकारणापासून चार हात लांबच राहायला पाहिजे अशी सर्वसामान्य माणसाची वृत्ती असली तरी चांगल्या माणसांनी ठरवून राजकारणात गेलं पाहिजे असं ठामपणे सांगणार आणि त्यासाठी काय काय करायला पाहिजे याचा कानमंत्र देणारं पुस्तक-

राजकारणापासून आणि राजकारण्यांपासून चार हात लांब राहणंच चांगलं ही मध्यमवर्गीय मनोवृत्ती असते. राजकारण म्हणजे भ्रष्ट, राजकारण म्हणजे काहीतरी घाणेरडं असं म्हणत त्या क्षेत्रापासून चार हात लांब राहण्यातच धन्यता मानली जाते. राजकारणी माणसाबद्दलही तीच भावना असते. वास्तविक लोकशाही व्यवस्थेत लोकांचे प्रश्न अजेंडय़ावर आणण्यासाठी, सोडवण्यासाठी राजकीय व्यवस्थाच सगळ्यात महत्त्वाची ठरते. स्वातंत्र्यचळवळीत पर्यायाने तत्कालीन राजकारणात सामान्य, मध्यमवर्गीय लोकांनी मोठय़ा प्रमाणात भाग घेतला होता. पण नंतरच्या काळात राजकारण बदलत गेलं. सामान्य माणूस त्यापासून लांब गेला. वाढते घोटाळे, लाचलुचपती, गुंडगिरी या सगळ्याचं राजकीय क्षेत्रातलं प्राबल्य वाढत गेलं आणि हळूहळू राजकारण हे चांगल्या माणसांचं क्षेत्र नाही, असंच समजलं जायला लागलं. खरं तर हे अंडं आधी की कोंबडी आधी या तिढय़ासारखंच आहे. राजकारण भ्रष्ट आहे असं म्हणत चांगली माणसं तिकडं फिरकत नाहीत आणि चांगली माणसं राजकारणात येत नसल्यामुळे राजकारणाचा दर्जा काही सुधारत नाही. अशा सगळ्या वातावरणात ‘चला राजकारणात!’ हे पुस्तक दीपक पटवे यांनी लिहिलं आहे.

Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारे लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत उपोषणाला बसले आणि त्यांना सध्याच्या तरुण वर्गाने आणि सामान्य लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अण्णांचं आंदोलन राजकीय नव्हतं. पण त्या आंदोलनाभोवती जमणाऱ्यांच्या आकांक्षा राजकीय होत्या. सामान्य माणसाला राजकारणात रस आहे, त्याला राजकीय सहभागाचीही इच्छा आहे, पण त्याला पुढे घेऊन जाणारं, स्वच्छ चारित्र्याचं कुणीतरी हवं आहे, असाच अण्णांना मिळालेल्या प्रतिसादाचा अर्थ होता. हाच मुद्दा घेऊन दीपक पटवे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. बक्कळ पैसा, मनुष्यबळ, कुठल्याही थराला जायची तयारी हे सगळं नसल्यामुळे सामान्य माणूस राजकारणापासून बिचकून राहतो. पण हे म्हणजेच राजकारण नाही. राजकारण चांगलं हवं असेल तर आपण त्यात शिरायला हवं आणि ती व्यवस्था सुधारण्याची सुरुवात आपल्यापासून करायला हवी असंच त्यांना या पुस्तकातून सांगायचं आहे.

राजकारणात जायचं असेल तर ते मुळात माहिती असायला हवं. त्यामुळे मग राजकारण म्हणजे काय, मुळात ते का करायचं, कसं करायचं या सगळ्याबाबत पुस्तकात चर्चा आहे. राजकारणात जायचं असेल तर त्याचा अभ्यास कसा करायचा, राजकारणात जायच्या पायऱ्या कोणत्या, त्या टप्प्याटप्प्याने कशा चढायच्या हे ओघवत्या भाषेत सांगितलं आहे. राजकारणात शिरायची इच्छा बाळगणाऱ्यांना कोणत्या अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं, कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावं लागू शकतं, याबद्दल चर्चा करताना लेखकाने आपल्याला माहीत असलेली अनेक उदाहरणं दिली आहेत. राजकीय क्षेत्राच्या पायऱ्या चढताना तुम्हाला काय काय माहीत असलं पाहिजे, काय काय आलं पाहिजे याच्या टिप्सच पुस्तकात दिलेल्या आहेत. त्यात मुळात तुमच्या घराचा उंबरठा ओलांडा, तुमच्या आजूबाजूचं वातावरण डोळे उघडून बघा, तुमच्या परिसरातले मित्र बनवा, ओळखी वाढवा, लोकांना मदत करण्यासाठी संधी शोधा, रक्तदानासाठी मदत, रुग्णालयात मदतीला जाणं अशा गोष्टींमधून ती कशी मिळते याचं विवेचन लेखकाने केलं आहे. त्याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणं, आयोजकांना मदत करणं, माहिती- आकलन वाढवणं, वृत्तपत्र वाचन, पेहराव कसा करा, सामूहिक समस्या सोडवा, इतरांकडून कामं करून घ्यायला शिका असे अनेक मुद्दे मांडले आहेत. माध्यमांशी संबंध कसे ठेवायचे, त्यासाठी काय काय करायचं याचीही माहिती लेखकाने दिली आहे. रायकीय पक्षांच्या यंत्रणा समजावून सांगताना आपल्या देशातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पक्ष, भाकप आणि माकप या राजकीय पक्षांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात शेवटी निवडणूक पद्धतीबद्दल लिहिले आहे.

मुळात आपण जे स्वप्न बघतो, त्याचा पाठपुरावा करतो आणि ते स्वप्न सत्यात आणायचा ध्यास घेतो. राजकारणात जायचं स्वप्न बघा, राजकारण करायचा ध्यास घ्या तरच तुम्ही राजकारणात यशस्वी व्हाल असं लेखकाचं म्हणणं आहे. हा मुद्दा म्हणून अतिशय आकर्षक आहे, यात शंकाच नाही. राजकारणाकडे एखाद्या करिअरसारखं बघा, त्याचा पद्धतशीर अभ्यास करा आणि यशस्वी व्हा असा कानमंत्र हे पुस्तक देतं. पण आपल्या देशातलं राजकारणही तेवढं सोपं नाही, ते प्रचंड गुंतागुंतीचं आहे. तुम्हाला कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसेल तर स्वबळावर काम करत करत तुम्ही राजकीय ओळख बनवायची. अनेक इच्छुकांमधून तिकीट मिळवायला झगडायचं. ते मिळालं तर निवडून यायचा संघर्ष, निवडून आलात, तुमचा पक्ष सत्तेवर आला तर मंत्रिपदासाठीचा संघर्ष. आणि हेच सगळं पाच वर्षांनी पुन्हा करायचं हे अजिबात सोपं नाही. तरीही हे मान्य केलंच पाहिजे की चांगल्या माणसांनी राजकारणात यायला हवं असा सकारात्मक विचार लेखकाने चांगल्या पद्धतीने मांडला आहे. पण पुस्तकाचं स्वरूप थोडंसं गाइडसारखं झालं आहे. हुशार मुलं गाइड वाचून परीक्षा देत नाहीत आणि गाइड वाचून परीक्षा देणारे कशाचाच सखोल अभ्यास करायला तयार नसतात हे सर्वश्रुत आहे. म्हणून वेगळा मुद्दा जाताजाता मांडणारं पुस्तक असंच या पुस्तकाबद्दल म्हणता येईल.
चला राजकारणात
दीपक पटवे; राजहंस प्रकाशन;
किंमत – २०० रुपये; पृष्ठे- २०७