डॉ. किशोर कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

दरवर्षी २२ सप्टेंबरला वर्ल्ड रोज (पिंक) डे  म्हणजेच कर्करोग जनजागृती दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी प्रत्येक कर्करोग रुग्णाला असे सांगण्यात येते की, तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर  आणि लढाऊ वृत्तीने या रोगाचा  सामना केलात तर या लढाईत शेवटी विजय तुमचाच असेल ही खात्री. रोगाविरुद्ध जनजागृती अत्यावश्यक आहे. केवळ रुग्णाला धीर देण्यासाठी नव्हे तर त्याचा प्रतिबंध करण्यासाठीसुद्धा आवश्यक आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने भारताविरुद्ध एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात गुलाबी रंगाचा पेहराव केला होता. तसेच एकदा इंग्लंडविरुद्ध खेळताना त्यांनी गुलाबी रंगाचा पोशाख केला होता. कित्येकांना अगोदर कळलेच नाही की त्यांनी असा पेहराव का केला? समालोचकांनी सांगितले की, कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी त्या संघाने तसा पोशाख केला त्या वेळेस अनेकांना माहिती झाली. आज गुलाबी रंग म्हणजे कर्करोग असे समीकरण झाले; परंतु सुमारे ३० प्रकारचे कर्करोग आहेत आणि २० प्रकारच्या रंगछटा कर्करोग दर्शवतात आणि तेही पाच वेगवेगळ्या आकारांत. कर्करोगाची प्रतीके म्हणून रिबिन, मनगटी पट्टे किंवा रिस्ट बँड, की चेन आणि कॉफी मग/ प्याले यांना त्या प्रकारचे रंग देऊन विकले जायचे.

वेगवेगळ्या रंगछटा आणि कर्करोग

यादी इथेच संपत नाही. काही कर्करोग दर्शवण्यासाठी अनेक रंग वाटून घेतले गेले किंवा समान दाखवले गेले आहेत. केशरी  हा रंग रक्ताच्या कर्करोगाबरोबरच मूत्रपिंड कर्करोगाने वाटून घेतला आहे. यकृताबरोबरच पित्ताशयाच्या कर्करोगाने व लसिका ग्रंथीच्या कर्करोगाने हिरवा रंग विभागून घेतला आहे. जांभळ्या रंगाच्या निरनिराळ्या छटा स्वादुपिंडाच्या कर्करोगाने, वृषण कर्करोग, लिओमायोसारकोमा म्हणजेच एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग, हॉजकिन प्रकारातला लसिका ग्रंथीचा कर्करोग, लहान आतडय़ाचा कर्करोग आणि इसॉफेजीएल किंवा ग्रसिका/ अन्ननलिकेचा कर्करोग यांनी विभागून घेतल्या आहेत. अर्थात आज जरी हे रंग निश्चित करण्यात आले असले तरी रंग बदलण्याचा प्रवास मनोरंजक आहे. उदाहरणार्थ- मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग. मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगासाठी तपकिरी/ चॉकलेटी रंगाच्या रिबनचा वापर प्रथम केला गेला; परंतु नंतर ते गडद निळ्या रंगाकडे वळले. मध्यंतरी प्रोस्टेट कर्करोग संघटनेने मोर्चा फिकट निळ्या रंगाकडे वळवला. कारण काय? तर गडद निळा रंग काही लोकांना गोंधळात टाकणारा भासला म्हणून ते फिकट निळ्या रंगाकडे वळले. ओव्हरी किंवा अंडाशयाच्या कर्करोगाचा रंग हिरवट-निळा असून तो पूरस्थ ग्रंथी कर्करोगासारखाच जवळपास दिसतो. जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्यात जेव्हा इमारती निळ्या रंगाने प्रकाशित केल्या जातात तेव्हा नेमके कोणत्या कर्करोगाचे हे चित्रण आहे, असा प्रश्न पडतो. पुरुषांतील पूरस्थ ग्रंथीच्या कर्करोगाचे की स्त्रियांतील अंडाशयाच्या कर्करोगाचे? आणि योगायोगाने सप्टेंबर महिन्यातच दोन्ही कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येते.

१९९९ मध्ये हिरवा रंग हा सर्व प्रकारच्या लसिका ग्रंथीच्या कर्करोगाच्या प्रचारासाठी वापरण्यात येत होता; परंतु २००१ साली मॅट्ट र्टेी नावाच्या कर्करोग रुग्णाने लिंफोमा क्लबच्या आग्रहामुळे आपल्या रोगाचे प्रतीक म्हणून जांभळा रंग निवडला. त्यानंतर २००७ साली वेगवेगळ्या प्रकारच्या लसिकाग्रंथींच्या कर्करोगातून मुक्त झालेल्या मंडळींनी एकी करून दोन रंग एकत्रित करून तशा प्रकारची रिबन तयार केली; परंतु २००९ या वर्षी रक्त कर्करोग आणि लिंफोमा संघटनांनी सर्व प्रकारच्या रक्त कर्करोग प्रकारांना एकच रंग दिला तो म्हणजे लाल रंग. एक मात्र निश्चित, की रक्त आणि लसिका ग्रंथी कर्करोग यांच्या अनेक संघटना होत्या आणि त्यांच्यात कधीच एकमत नव्हते आणि एकाच रंगावर सहमती नव्हती, असे या संघटनेच्या एक ज्येष्ठ संचालक अ‍ॅांड्रिया ग्रिफ यांचे म्हणणे होते. त्यामुळे अनेक संघटनांनी अनेक रंग सुचवले म्हणून आम्ही असा निर्णय घेतला, की रक्ताचा रंग तांबडा/लाल असतो म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगासाठी लाल रंगच निवडला. लहान मुलांतील सर्व प्रकारच्या कर्करोगांना एकच रंग निवडण्यात आला आणि तो म्हणजे सोनेरी. का? तर लहान मुले सर्वच मातापित्यांना सोन्यासारखी असतात, असे अमेरिकेच्या लहान मुलांच्या कर्करोग संघटनेने म्हटले आहे.

आता प्रश्न असा आहे की, मुळातच रंगाची कल्पना कधी कशी अणि कुठून आली आणि कोणाला सुचली?

१९९६ साली रोज श्नायडर या महिलेला स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. त्या महिलेची शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आली होती. महिला दिसायला खूप सुंदर व देखणी होती. ते सौंदर्य पुन्हा पाहायला मिळेल किंवा नाही या आशंकेने तिच्या मुलीने शस्त्रक्रियेपूर्वीच सौंदर्य जतन करून ठेवण्यासाठी तिला फोटो स्टुडिओमध्ये नेऊन सुंदर फोटो काढून घेतले. त्या वेळी तिने  जांभळ्या रंगाचे वस्त्र घातले होते, कारण तो तिचा आवडता रंग होता. त्यानंतर एकाच महिन्यात महिला स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन पावली. त्या वेळी रोज बाईंच्या मुलीच्या लक्षात आले की, स्वादुपिंड कर्करोगाने पीडित रुग्णासाठी कोणतीही मदत करणारी संस्था नाही; परंतु जॉहन्स हॉपकिन्सच्या वेबसाइटवर या रोगावर चर्चा करणारे मंडळ आढळले. त्यांना तिने विनंती केली की, स्वादुपिंड कर्करोग निदर्शक म्हणून जांभळ्या  रंगाचे नियोजन करावे. त्या मंडळाने तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला म्हणून आणि हाच जांभळा रंग स्वादुपिंड प्रकारच्या कर्करोगाचे निदर्शक आणि गुलाबी रंग सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदर्शक ठरले. १९९१ मध्ये कॅलिफोर्नियाच्या चार्लोटी हॅले स्तनाच्या कर्करोगाचे प्रतीक म्हणून फिकट पिवळा किंवा पिवळी छटा असलेल्या लाल रंगाची रिबिन बनवत असे. पाच रिबिनीच्या एका पॅकवर ती नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा लोगो असलेले पोस्टकार्ड लावत असे. असे हजारो पॅक ती वितरित करीत असे. हेतू हा की, कर्करोग प्रतिबंधासाठी लागणारी जागरूकता त्यामधून निर्माण होईल. १९९२ मध्ये ‘सेल्फ’ नियतकालिकाच्या संपादकाने कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी व उपचारासाठी जो प्रकल्प त्यांनी हाती घेतला त्यात हॅलेबाईंनी भागीदार व्हावे, अशी विनंती केली; परंतु त्यांचा प्रकल्प खूपच अर्थार्जनाचा असल्याने भागीदार होण्यास हॅलेबाईंनी नकार दिला. म्हणून नियतकालिकाच्या संपादकाने तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी हॅलेबाईंच्या फिकट पिवळा (पीच रंग) ऐवजी गुलाबी रंग आपल्या कॅन्सर किंवा कर्करोगविरोधी जनजागृतीसाठी ब्रेस्ट कॅन्सर कॉन्सॉरशियमच्या सल्ल्याने वापरला आणि त्या वेळेपासून सर्वच कर्करोगविरोधी प्रचारात गुलाबी रंग वापरण्यात येऊ लागला.

इ.स. २००५ मध्ये किडनी किंवा मूत्रपिंड कर्करोग संघटनेने रंगाचा शोध घेतला. त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, शरीरांतर्गत अवयवांना झालेला कर्करोग हिरव्या रंगांनी ओळखला जात असे; परंतु  विश्लेषणाअंती त्यांना असे लक्षात आले की, केशरी रंग हा त्यातल्या त्यात बरा आहे. पुन्हा त्यावर चर्चा-प्रतिचर्चा झाल्या आणि पुन्हा याच निष्कर्षांला आले की, हिरवाच योग्य आहे आणि म्हणून हिरव्यावरच आम्ही ठाम राहिलो, असे संघटनेचे कार्यकारी अधिकारी म्हणाले. रंग सांगतात कर्करोगाची ओळख याचे खरे श्रेय जाते ते पामेला अ‍ॅेकोस्टा माक्र्वार्ट या महिलेला. ही महिला म्हणजे रोज श्नायडर यांची कन्या. आपल्या आईला स्वादुपिंडाचा कर्करोग झाला, त्यात तिचे निधन झाले; परंतु तिची कायमस्वरूपी आठवण  राहावी या हेतूने तिने जी कल्पना अमलात आणली त्यातूनच कर्करोग आणि रंगसंगती आणि त्यातूनच कर्करोगाची त्यांची ओळख रंगाद्वारे पामेला महिलेने जगाला दिली असे म्हणावयास हरकत नाही.