lp00नृत्य-गायनासारख्या कला पोटापाण्यासाठी उपयोगाच्या नाहीत असं समजण्याचे दिवस आता गेले. नृत्यात करिअर करण्यासाठी अनेकविध शाखा आता उपलब्ध आहेत. त्याचा गांभीर्याने विचार केल्यास नृत्यात उत्तम करिअर होऊ शकते.

पूर्वी ‘‘तू काय करतेस/ करतोस?’’ या प्रश्नावर ‘नृत्य करते/ करतो’ असं उत्तर आलं तर हमखास पुढचा प्रश्न असायचा.. ‘ते ठीक आहे, पण बाकी काय करतेस? पोटापाण्यासाठी नोकरी वगैरे?’ ‘नृत्य’ हा ‘पूर्णवेळ व्यवसाय’ असू शकतो, हेच मुळात कित्येकांना माहीत नसायचं किंवा मान्य नसायचं. हळूहळू परिस्थिती बदलते आहे. आता अभिनय, गायन, वादन, चित्रकला, नृत्यकलेकडेसुद्धा एक चांगला ‘करिअरचा पर्याय’ म्हणून पाहिले जाऊ लागले आहे व या सामाजिक बदलामुळेच नृत्यकलेत ‘पूर्णवेळ करिअर’ करणाऱ्या कलाकारांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याला मुख्यत्वे कारणीभूत ठरले आहेत वाढत चाललेले ‘रिअ‍ॅलिटी शोज’ विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आणि प्रसारमाध्यमांनी या क्षेत्राला दिलेले महत्त्व! पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम ‘नृत्य’ क्षेत्रातील करिअरच्या संधी वाढण्यासाठी होतो आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाने/ मुलीने सर्वगुणसंपन्न असावे. अभ्यासाबरोबर कलागुण, क्रीडाकौशल्यही शिकावे. बरेच पालक आपल्या मुलांना लहानपणी नृत्यवर्गात नेतात, त्यांना नृत्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करताना दिसतात आणि मग त्यांना ‘स्टेजवर’ नृत्य करताना बघण्यासाठी पालक आतुर होतात. अगदी शिशुवर्गापासून मुलं विविध कार्यक्रमांत ‘नृत्य’ करत असतात. ‘नृत्य’ ही कला ‘रंगमंच सादरीकरणाच्या’ कलेमध्येच येत असल्याने रंगमंचावरील नृत्यप्रस्तुती हा तर नृत्यकलेचा अविभाज्य घटक आहे. परंतु, व्यावसायिक दृष्टीने नर्तक/नर्तिका होण्यासाठी मात्र कठोर परिश्रम, मेहनत आणि साधना आवश्यक असते. ‘परफॉर्मिग आर्टिस्ट’ हा नृत्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा करिअर पर्याय आहे. देशात, जगभरात विविध ठिकाणी, अनेकविध नृत्य महोत्सव सतत चालू असतात. या नृत्य महोत्सवात सहभागी होऊन आपली कला लोकांसमोर पेश करायची संधी नर्तकाला मिळते व नवीन-नवीन कार्यक्रम सादर करण्याने कलाकाराला आत्मिक आनंदही मिळतो. या महोत्सवांमधून अर्थार्जन होत असले तरी कार्यक्रम मिळविणे, टिकवणे हा सोपा प्रवास नाही. तुमची कला, साधना, अनुभव, लोकप्रियता इ. अनेक गोष्टी कलाकाराला ‘परफॉर्मिग आर्टिस्ट’चे करिअर टिकवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.
जेव्हा आपण आपली कला इतरांपर्यंत पोहोचवतो, पुढच्या पिढीला शिकवतो, तेव्हाच त्या कलेचा विकास होतो व ती कला जिवंत राहते. नृत्यकला जिवंत ठेवण्यात व ती समृद्ध करण्यात खूप मोठा वाटा आहे तो ‘नृत्यगुरूंचा!’ नृत्य हा विषय पुस्तकात केवळ वाचून अवगत करता येऊ शकत नाही, त्यामुळे ‘गुरू’ हा सर्वोच्च स्थानावर पाहिला जातो. ‘नृत्य शिक्षक’ हा एक उत्तम करिअर पर्याय आहे. स्वत:चे नृत्यवर्ग चालू करून अनेक कलाकार पुढील पिढीला नृत्याचे धडे शिकवत आहेत व त्यातूनच नवीन कलाकार घडवत आहेत. बरेचदा कलाकारांना ९-५ नोकरी करायला आवडत नाही, पण ‘डान्स क्लास’ हा चांगला पर्याय ठरतो. नृत्यवर्गामुळे नियमित दरमहा विद्यार्थ्यांकडून ‘फी’ मिळते, शिवाय ‘डान्स क्लास’बरोबर ‘नृत्यसादरीकरण’ करणेही शक्य होते. स्वत:चे क्लास काढायला नको असेल तर आजकाल बहुतांश शाळांमध्ये ‘नृत्य’ हा शैक्षणिक विषयांबरोबरच एक विषय म्हणून सामावून घेतला आहे. त्यामुळे विविध शाळांमध्येही ‘नृत्य शिक्षकाची’ नोकरी करता येऊ शकते. नृत्यवर्ग, शाळेबरोबरच विविध ‘हॉबी क्लास’, ‘समर कॅम्प’, कार्यशाळांमध्येही नृत्य शिक्षकाला कायम ‘डिमांड’ असते. नृत्य शिक्षक होणं हे अजिबात सोपं नसतं. ‘शिकवणं’ ही एक कला आहे व प्रत्येकालाच ती जमत नाही. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या कलाने घेऊन, त्यांच्यात नृत्याची गोडी निर्माण करणं, त्यांच्याकडून कार्यक्रमांची तयारी करून घेणं, इ. अनेक गोष्टींची कसरत ‘नृत्यगुरू’ला करावी लागते. ‘अनुभव’ मात्र नृत्यगुरूसाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. विद्यार्थ्यांना शिकवल्याने नृत्यगुरू कलाकार म्हणूनही अधिक समृद्ध होतो, विद्यार्थ्यांकडूनही खूप शिकायला मिळते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे! इतर विषयांप्रमाणे नेट-सेटची परीक्षा नृत्य विषयात उत्तीर्ण झाल्यावर विविध नृत्य महाविद्यालयांत व विद्यापीठांतही नृत्यशिक्षक म्हणून नेमणूक होऊ शकते.
नृत्यकलेत अजून एक महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे- ‘नृत्य दिग्दर्शकाचा!’ कुठल्याही नृत्यप्रस्तुतीचा ग्रँड मास्टर असतो त्या नृत्याचा ‘नृत्य दिग्दर्शक!’ आजकाल चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शकाला अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त विविध पुरस्कार सोहळे, म्युझिक व्हिडीओ, जाहिरात, मालिका, मालिकांचे शीर्षकगीत, लग्नाचे ‘संगीत’- अशा अनेक ठिकाणी नृत्य दिग्दर्शकाला कामाची संधी मिळते आणि कामाचा मोबदलाही चांगला मिळतो. ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्येपण नृत्य दिग्दर्शकावर महत्त्वाची जबाबदारी असते. नृत्य दिग्दर्शकांना ‘सेलिब्रिटी’ दर्जादेखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे बरेच जण या पर्यायाकडे वळताना दिसत आहेत. इतर करिअर पर्यायांप्रमाणे ‘नृत्य दिग्दर्शक’ बनण्यासाठीदेखील स्वत:ला कलाकार, गुरू, सर्जनशील नर्तक असणं फार महत्त्वाचं आहे.
‘नृत्य समीक्षक’ हादेखील नृत्य क्षेत्रातील एक व्यवसायाचा पर्याय आहे. चांगला कलाकार आणि चांगला जाणकार श्रोता एक ‘चांगला नृत्य समीक्षक’ होऊ शकतो. नृत्याच्या विविध कार्यक्रमांची समीक्षा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम समीक्षक करतात. ‘नृत्यकलेतील जाणकार व अभ्यासक’ या समीक्षकासाठी आवश्यक गोष्टी आहेत. विविध वर्तमानपत्रे, मासिके इ. ठिकाणी नृत्य समीक्षक काम करू शकतात, तसेच आजकाल इंटरनेटवर विविध नृत्यांशी निगडित वेबसाइटवरदेखील समीक्षक कार्यरत असतात. नृत्य समीक्षकाप्रमाणे नृत्यावर/नृत्याविषयी लिहिणारे लेखक नृत्य क्षेत्रासाठी अत्यावश्यक आहेत. ही नृत्यकलेवरची पुस्तके, ग्रंथ, संदर्भग्रंथ म्हणून वापरता येतात व त्यातून नृत्यकलेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भांडार उपलब्ध होते. त्या पुस्तकांमुळे नृत्यसाहित्यात मोलाची भर पडली आहे, ज्यामुळे नृत्यकलेतील सैद्धांतिक बाजूलादेखील तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. क्रियात्मक बाजूबरोबर ज्या कलाकाराची सैद्धांतिक बाजू भक्कम असते तो परिपूर्ण कलाकार बनू शकतो, असं मला वाटतं. ‘नृत्य संशोधक’ हादेखील पर्याय नृत्य क्षेत्रात निवडता येऊ शकतो. नृत्य संशोधकांमुळे नृत्यातील विविध विषय तपासले जातात. कलाकारांपर्यंत मूळ रूपातील माहिती पोहोचण्यास मदत होते व त्यामुळे नृत्यकला मूळ, सच्च्या रूपात टिकवण्यास साहाय्य होते.
नृत्यक्षेत्रात ‘मेकअप’ला खूप महत्त्व दिले जाते. शास्त्रीय नृत्यात विशिष्ट पद्धतीचाच ‘मेकअप’ केला जातो. त्यामुळे ‘रंगभूषाकार’ (मेकअप आर्टिस्ट)नासुद्धा नृत्य कलाकारांकडून कामाची संधी उपलब्ध होते. त्याशिवाय वेशभूषाकार, विविध कार्यक्रमांसाठी भाडय़ावर घेतले जाणारे ‘कॉश्चुम’ त्यासाठी प्रसिद्ध असलेली दुकाने, या सगळ्याचे महत्त्व पाहता, वेशभूषाकारांनासुद्धा नृत्यक्षेत्रात करिअर संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे, याचा प्रत्यय येतो. नृत्यप्रस्तुती खुलते ती ‘प्रकाशयोजनेमुळे!’ विविध नृत्यांच्या प्रसंगात, अचूक प्रकाशयोजना असेल तर नृत्याचा आस्वाद प्रेक्षक अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. ‘रंगमंच नेपथ्य’ हादेखील नृत्यप्रस्तुतीचा महत्त्वाचा पैलू! प्रकाशयोजनाकार व नेपथ्य/ कलादिग्दर्शकांनाही नृत्य क्षेत्रात खूप मागणी आहे. संगीत व नृत्य या संलग्न कला मानल्या जातात. वाद्यवृंदाबरोबर नृत्य सादर करण्याची पारंपरिक पद्धत आजही अस्तित्वात आहे. वादक, गायक यांना नर्तकांबरोबर साथसंगत करण्याचे अनेक कार्यक्रम मिळतात, कारण त्यांच्याशिवाय नर्तनाचा कार्यक्रम सफल होऊ शकत नाही, त्यामुळे वाद्यवादक व गायकांना नृत्य क्षेत्रात खूप व्यावसायिक कामे मिळतात.
याबरोबरच नृत्योपचारतज्ज्ञ हा पर्यायदेखील वाढायला लागला आहे. ‘शिल्पकला’ व ‘नृत्यकला’ यांचा घनिष्ठ संबंध असल्याने विविध इतिहास संशोधकही नृत्यक्षेत्रात मदत करत आहेत. चित्रपटांमध्ये, पुरस्कार सोहळ्यांमध्ये ‘पाश्र्वनर्तक’ म्हणून नृत्य करणे हादेखील एक मोठा करिअर पर्याय आहे. असे अनेकविध पर्याय ‘नृत्यक्षेत्रात’ उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कलाकार अजून वेगवेगळ्या करिअरच्या संधी नृत्यात निर्माण करत आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणेच हेदेखील झपाटय़ाने वाढणारे आणि आर्थिकदृष्टय़ाही स्थिरता देणारे क्षेत्र आहे.
जर नृत्याची आवड असेल व नृत्यात करिअर करायची जिद्द, इच्छा असेल, तर नृत्यक्षेत्रात समाधानी, आनंदी करिअर करता येऊ शकते. नृत्य शिकवणाऱ्या व विविध विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या अनेक संस्था आहेत.
१) नालंदा डान्स रिसर्च सेंटर, मुंबई- ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न संस्था आहे. भरतनाटय़म, मोहिनी अट्टम व कथक या नृत्यशैलीमध्ये पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेता येते.
http://www.nalandadanceeducation.com
२) ललित कला केंद्र, पुणे- पुणे विद्यापीठातील ‘परफॉर्मिग आर्ट’ विभागात नृत्यकलेत (भरतनाटय़म व कथक) पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेता येते. www.unipune.ac.in
३) भारती विद्यापीठ, पुणे- (पूर्ण वेळ अभ्यासक्रम)
http://www.bhartividyapith.edu
४) खरागढम् विद्यापीठ, छत्तीसगढम्
इंदिरा कला संगीत विश्वविद्यालयामध्ये शास्त्रीय नृत्यात पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेता येते
५) अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई-  www.abgmvm.org
या संस्थेच्या अभ्यासक्रमाप्रमाणे नृत्यात विशारद, अंलंकार, इ. पदवीपर्यंत परीक्षाप्रणाली पद्धतीने शिक्षण घेता येते.
६) प्रयाग संगीत समिती, अलाहाबाद :- पदवी पदव्युतर अभ्यासक्रम. ( ही खूप जुनी संस्था आहे.)
७) प्राचीन कला केंद्र – चंदिगढ.
८) भातखंडे महाविद्यालय – मध्य प्रदेश.
९) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (बहि:शाल विभागातून नृत्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेता येते.)
http://www.tmv.edu.in/
१०) एसएनडीटी, मुंबई (डिप्लोमा)
११) कथक केंद्र, दिल्ली, http://www.kathakkendra.org/
१२) कलाक्षेत्र, चेन्नई (भरतनाटय़मसाठी)
http://www.kalakshetra.in/
अशा प्रकारे अनेक विद्यापीठांत, महाविद्यालयांत नृत्यात शिक्षण घेता येते व ‘नृत्यक्षेत्र’ हा चांगला करिअर पर्याय म्हणून बघता येतो. तेव्हा नृत्यक्षेत्रात करिअर करायला मुळीच घाबरू नका. स्वत:च्या कलेवर प्रेम करा, विश्वास ठेवा अणि तुमच्या आवडीला तुमचे करिअर बनवा!

नृत्य छायाचित्रण
सध्या नृत्य क्षेत्रात करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे ती छायाचित्रकारांना! नृत्याच्या कार्यक्रमातले अचूक क्षण कॅमेरात टिपणं, ही एक वेगळी कला आहे. सर्वच छायाचित्रकारांना नृत्याच्या कार्यक्रमासाठी छायाचित्रण करणे शक्य होत नाही. अतिशय वेगवान गतीत हालचाली चालू असताना नेमकी मुद्रा, हावभाव, विशिष्ट ‘सम’ कॅमेरात टिपताना छायाचित्रकाराला कौशल्य दाखवावे लागते. आपल्या कार्यक्रमाचे अनमोल क्षण फोटोच्या माध्यमातून आपल्याबरोबर कायम असावे असं प्रत्येक नर्तकाला वाटतं. त्यामुळे कार्यक्रमांसाठी ‘छायाचित्रकारांना’ मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे हा पर्यायही नक्कीच नृत्यक्षेत्रात करिअर संधी उपलब्ध करून देऊ शकतो. कार्यक्रमांव्यतिरिक्त ‘पोर्टफोलिओ, वेबसाइट, ब्रोशर,’ इ. साठीदेखील छायाचित्रकारांना नर्तकांकडून मागणी असते.
तेजाली कुंटे