करिअर कसं निवडायचं? हा प्रश्न प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी पडतोच पडतो. आजूबाजूला अनेक मंडळी भरपूर गोष्टी सांगत असतात. आई-वडिलांच्या अपेक्षा ‘वेगळे काही’ करण्याच्या आणि महत्त्वाचे म्हणजे तरीही सुरक्षित कोशातील आयुष्य जगता येईल असेच काही तरी करावे अशा असतात. मुलांवर सर्वाधिक प्रभाव असतो तो त्यांच्या मित्रांचा. अर्थात वयही तसंच असतं पौगंडावस्थेतलं; त्यामुळे मित्र कुठे जाणार त्या दिशेने जावे म्हणजे कुणी तरी सोबत असेल, असा विचार तेव्हा मनात असतो. मग अशा वेळेस आपली गुणवैशिष्टय़े नेमकी काय आहेत ते पाहून करिअरची निवड करावी, हा विचार मागे पडतो. मनात संभ्रम असतो आणि मग त्या अवस्थेत घेतलेल्या निर्णयाबद्दल नंतर पस्तावण्याची वेळ येते! हा निर्णय घेताना घरचे, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वाचा असलेला दबावही अनेकदा या पश्चात्तापाला कारण ठरतो..
पण करिअरचा निर्णय काही फक्त गुणावगुणांवरच घ्यायचा नसतो. अनेक यशस्वी व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचली तर लक्षात येईल की, भविष्य नेमके कोणत्या विषयांना आहे, याचा अंदाज त्यांना निर्णय घेताना नेमका आलेला असतो. हा अंदाज येण्यासाठी माणसाला चौकस असावे लागते आणि जगात नेमके काय चालले आहे, याचा मागही ठेवावा लागतो. सध्या करिअरचा प्रश्न भेडसावणाऱ्या अनेकांचे आई-वडील हे आज ४०-४५च्या घरात आहेत. त्यांच्या कॉलेजच्या वेळेस फक्त बीए, बीकॉम, बीएस्सी किंवा मेडिकल अथवा इंजिनीअरिंग एवढेच पर्याय होते. त्यामुळे ही पालक मंडळी आपल्या पाल्याला मार्गदर्शन करताना आपल्या आयुष्याच्या पाश्र्वभूमीवर मार्गदर्शन करतात. त्यात आपुलकी आणि प्रेम भरपूर असले आणि चांगुलपणाही असला तरी आता परिस्थिती भरपूर बदलली आहे. अनेक प्रकाशवाटा खुल्या झाल्या आहेत, याचे भान अनेकदा कमीच असते.. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे, अनुभवाचे बोल खूप उपयोगी पडतात, पण ती कसोटी आपल्या आयुष्याला लावताना अंमळ विचार करणे गरजेचे असते!
आगामी काळातील भविष्य हे आंतरशाखीय अभ्यासामध्ये दडलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यायलाच हवे! डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूच्या घटना पाहिल्यात तर हे सहज लक्षात येईल. काही वर्षांपूर्वी मानवीय जनुकाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणजे आगामी काळात होणारे विकार किंवा रोग याची खातरजमा गर्भधारणेनंतरच करणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे त्यावरच्या उपायांनाही गर्भधारणेतच सुरुवात होते. आता औषधेही जनुकीय असणार आहेत. हे सारे शक्य झाले ते केवळ जैवतंत्रज्ञान या नव्या शाखेमुळे असे सांगितले जाते. यात जीवशास्त्र व तंत्रज्ञान असे दोन विषय एकत्र आले आहेत, पण एवढेच नव्हे तर गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि सांख्यिकी या चार शाखांनीही यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गणितज्ञांमुळेच मानवाचा जनुकीय नकाशा उलगडणे संशोधकांना शक्य झाले. याचाच अर्थ या प्रकल्पामध्ये या सर्व विषयांची मंडळी काम करत होती.
दुसरे एक उदाहरणही तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्याकडील प्राचीन सिंधू संस्कृती असे म्हटले की, हडप्पा आणि मोहेंजोदारो या दोन ठिकाणांची आठवण होते. या प्राचीन संस्कृतीचा जगभरात भरपूर अभ्यास झाला, पण आजवर संशोधकांना या संस्कृतीमध्ये वापरली गेलेली लिपी समजून घेण्यात यश आलेले नाही. ही लिपी उलगडली तर तो जगातील सर्वात मोठा शोध असणार आहे. अनेक नवीन बाबी जगासमोर येतील.. कदाचित इतिहास नव्याने लिहिण्याची वेळ आपल्यावर येईल.. आजवर त्यासाठी केवळ पुरातत्त्वतज्ज्ञ काम करत होते, पण आता आंतरशाखीय पद्धती यावर उतारा ठरेल, असे लक्षात आल्याने त्याच्या उलगडय़ासाठी गणितज्ञ, सांख्यिकीतज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि खगोल वैज्ञानिक असे सर्व जण एकत्र काम करत आहेत. त्यातून काय हाती लागते आहे, याविषयी सध्या अळीमिळी गुपचिळी असली तरी सर्वाच्याच आशा आता शतकानुशतके राहिलेले कोडे सुटेल म्हणून पालावलेल्या दिसताहेत.
प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची एक विशिष्ट पद्धती असते. त्या ज्ञानशाखेत शिकलेला विद्यार्थी मग त्याच शिकवलेल्या पद्धतीने विचार करतो, पण जेव्हा त्या ज्ञानशाखेमध्ये इतर शाखेचा विद्यार्थी येतो, तेव्हा तो त्याच्या शिकवलेल्या पद्धतीने पाहू लागतो जी या शाखेसाठी अनेकदा सर्वस्वी नवीनच दृष्टिकोन देणारी पद्धती असते! या पाश्र्वभूमीवर जेव्हा आंतरशाखीय तज्ज्ञ एकत्र येतात तेव्हा गतानुशतकाची कोडी सहज सुटतात आणि नवा इतिहास रचला जातो.. त्यामुळेच उद्याच्या प्रकाशवाटा या आंतरशाखीय महामार्गावर एकत्र येणार आहेत!
तर मग सज्ज व्हा, आंतरशाखीय प्रकाशमान महामार्गासाठी !
 

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!