जातपंचायतीने घातलेल्या सामाजिक बहिष्काराच्या बातम्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. खाप पंचायतींपेक्षाही जास्त भयावह असणाऱ्या या जातपंचायती पुढारलेल्या महाराष्ट्राला शंभर वर्षे मागे नेऊन ठेवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या ‘खापपंचायत’ यासारख्या अनिष्ट व्यवस्था किती अमानुष आहेत याबद्दल आपण महाराष्ट्रातले लोक तळमळीने बोलत असतो. हरयाणा, राजस्थान यासारख्या मागास राज्यांपेक्षा महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, याचेही आपण वारंवार कौतुक करीत असतो. ‘खापपंचायती’ ज्या शिक्षा सुनावतात त्याने देश हादरतो, आपल्या तथाकथित प्रगतीचा फुगाही फुटतो आणि आपण भानावर येतो. प्रत्यक्षात ‘खापपंचायत’सारख्याच आपल्याकडे ‘जातपंचायत’ अस्तित्वात आहेत आणि या जातपंचायतींनी भटक्या विमुक्त समाजात एक समांतर अशी न्याय व्यवस्था निर्माण केल्याचे हे दाहक वास्तव आपल्या पायाखालीच जळत असल्याचे आपल्या ध्यानी येत नाही. ही न्याय व्यवस्था नसून अन्याय्य व्यवस्थाच आहे आणि त्यातून अंधारात खितपत पडलेल्या समाजाचे शोषण होत आहे याकडे आपले म्हणावे तेवढे लक्ष जात नाही. कधी तरी जातपंचायतीला मूठमाती दिल्याची एखाद्या भटक्या समाजाची बातमी येते. तेव्हा आपल्याला हे शुभ वर्तमान असल्याचे वाटते. प्रत्यक्षात अशी एखादी बातमी आल्यानंतर काही दिवसांतच अन्य कुठल्या तरी जातपंचायतींनी शिक्षा ठोठावलेल्या एखाद्या अमानुष कृत्याची बातमी मन सुन्न करते. आपण कितीही महासत्तेच्या गप्पा मारत असलो आणि प्रगतीचा वेग अफाट असल्याचे बोलत असलो तरीही आपल्या परिघाबाहेर एक मोठे जग आहे आणि या जगात लोकशाही व्यवस्थेतले कायदे चालत नाहीत तर तिथे जातपंचायतीने दिलेला ‘फैसला’ महत्त्वाचा असतो. या विदारक वास्तवाकडे डोळेझाक करता येत नाही.

गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात एक घटना घडली होती. आंतरजातीय लग्नानंतर गरोदर असलेल्या प्रमिला कुंभारकर या महिलेला आजी आजारी असल्याचे खोटे कारण सांगून बापाने तिला रिक्षात घातले आणि गळा आवळून तिचा जीव संपवून टाकला. त्या वेळी या घटनेने सर्व महाराष्ट्र हादरला होता. सख्ख्या बापानेच आपल्या मुलीला संपवले ही बाब जेवढी भयानक होती, त्यापेक्षाही जास्त या बापाला जातपंचायतीचा सततचा दबाव होता आणि या दबावातूनच पोटच्या पोरीची हत्या स्वत:च्या हाताने करण्याच्या घृणास्पद निर्णयापर्यंत हा बाप आला होता हे त्याहून भीषण आहे. प्रमिला कुंभारकर ही महिला भटक्या जोशी समाजातली होती. महाराष्ट्रात जातपंचायत जिथे निवाडा करतात त्यात केवळ एकच समाज नाही. वैद, गोसावी, मसणजोगी, कुडमुडे जोशी, कैकाडी, पारधी, डवरी, डोंबारी, घिसाडी, बेलदार असे अनेक समाज घटक आहेत. या सर्व समाजाच्या आपआपल्या जातपंचायती आहेत. अजूनही हा समाज जातपंचायतीच्या निवाडय़ानेच आपले सर्व व्यवहार पार पाडतो. पोलीस ठाणे, न्यायालय, प्रशासन अशा यंत्रणांपेक्षा जातपंचायतीवर या सर्व समाजाची भिस्त आहे आणि जातपंचायतीतलेच निर्णय या समाजासाठी शिरसावंद्य असतात.

महाराष्ट्रात मोठय़ा संख्येने असलेल्या भटक्या विमुक्त समाजाला अजूनही स्वत:ची दिशा सापडली नाही आणि संपूर्ण समाजानेही कधी हे सर्व समूह समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील याबद्दलचा आस्थापूर्वक दृष्टिकोन ठेवला नाही. या समाजाकडे स्वत:चे कायमचे राहण्याचे ठिकाण नाही, स्वत:ची ओळख सांगावी असे गाव नाही, ज्यावर गुजराण होऊ शकेल असा व्यवसाय नाही किंवा स्वत:च्या मालकीचा जमिनीचा तुकडा नाही. थोडक्यात गावात घर नाही, शिवारात शेत नाही आणि सर्व समाज कधी विश्वासाने पाहतही नाही. अशा परिस्थितीत हा समाज जगतो. यातले बहुतांश लोक आज इथे तर उद्या तिथे असे करत जगतात. ‘दर कोस दर मुक्काम’ हा त्यांचा प्रवास नाही तर त्यांच्या जीवनाचीच शोकांतिका आहे. एका ठिकाणी राहायचे नाही त्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणाचे कसे होणार? कुठेही चोरी झाली, दरोडा पडला की पोलीस जाणार आणि पारध्यांच्या माणसांना जाऊन ढोरासारखे बडवणार, त्यांना डांबणार, अशा वेळी कायमचा लागलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसायचा कसा आणि मुख्य प्रवाहात यायचे कसे, हे प्रश्न अजूनही स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा कालावधी लोटला तरीही संपले नाहीत. विशेषत: पारधी समाजात गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणारी नवी पिढी आता येत असली तरीही या पिढीला दिशा सापडत नाही.

आपण लोकशाही व्यवस्थेत आहोत आणि ही व्यवस्था राज्यघटना, कायदे यांनी चालते याची पुसटशीही कल्पना या समाजाला नाही. समाजातल्या या भोळ्याभाबडय़ा जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणारे लोक जातपंचायतीच्या माध्यमातून आपली समांतर व्यवस्था बळकट करत राहतात. महाराष्ट्रात पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, मिरज, सोलापूर, माळेगाव, मढी आदी ठिकाणी या जातपंचायती भरतात. हा सर्व डोंगराळ भाग आहे. मुळात ग्रामीण महाराष्ट्राची ढोबळ विभागणी करायची झाली तर जिथे सुपीक आणि काळीभोर जमीन आहे त्या भागात भटका विमुक्त समाज आढळत नाही. याउलट जो भाग डोंगराळ आहे, दुष्काळी आहे त्याच भागात हा समाज मोठय़ा प्रमाणात राहतो. सगळ्या जातपंचायती या डोंगराळ भागातच भरतात. यातली मढी आणि माळेगावची जातपंचायत महत्त्वाची मानली जाते. ‘उचल्या’ या आत्मचरित्राचे लेखक आणि भटक्या विमुक्त समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण गायकवाड यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता जातपंचायत हे भटक्या विमुक्त समाजाचे भीषण वास्तव असल्याचे ते सांगतात. महाराष्ट्रातल्या जातपंचायती या खापपंचायतीपेक्षाही वाईट आहेत. समाजाच्या सर्वागीण प्रगतीपासून ही सगळी माणसे दूर फेकली गेलेली आहेत. अमानुष अशा प्रथा आणि रूढी-परंपरांचे काच अजूनही सैल झाले नाहीत. त्यातूनच जातपंचायतीसारखे दाहक वास्तव कायम असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. मढी येथील जातपंचायत हे भटक्या विमुक्तांचे ‘हायकोर्ट’, तर माळेगावच्या जत्रेत भरणारी जातपंचायत हे ‘सुप्रिम कोर्ट’ असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. जी माणसे आयुष्यभर पाल ठोकून राहतात, त्या माणसांच्या अनेक बारीकसारीक प्रश्नांवर या जातपंचायतींमध्ये निवाडा केला जातो. बाईला नांदवायचे की नाही इथपासून ते एखाद्याला जातीत घ्यायचे की वाळीत टाकायचे इथपर्यंतचे निर्णय अशा जातपंचायतींमध्ये होतात.

पूर्वी भटका-विमुक्त समाज एकत्र नव्हता आणि संपर्काची साधनेही फारशी नव्हती. अशा वेळी पंचक्रोशीत भरणाऱ्या जत्रांमध्येच हा सर्व समाज एकत्रित यायचा. एकमेकांना काही निरोप द्यायचे असले, सुखदु:खांच्या गोष्टी सांगायच्या असल्या तरी पूर्वी भेटी होत नसत. दळणवळणाची साधने नव्हती. कोणतेही हक्काचे ठिकाण नसायचे त्यामुळे कुठे जाऊन सांगणार? अशा वेळी आठवडीबाजार, जत्रा हेच या माणसांचे एकमेकांना भेटायचे ठिकाण. माणसे यानिमित्ताने एकमेकांना भेटून विचारपूस करायची. अशा जत्रेच्या ठिकाणीच मोठय़ा जातपंचायती भरायच्या. अजूनही काही ठिकाणी या जातपंचायती भरतात. कुठे तरी एखाद्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत वर्तुळाकार माणसे बसतात. ज्याच्यावर अन्याय झालेला आहे किंवा ज्याला न्याय हवा आहे तो माणूस ही पंचायत भरवतो. पंचायतीतले पंच फक्त पाचच असतात, असे नाही तर ही संख्या कितीही असू शकते. कधी कधी पंच लोक जे निर्णय घेतात त्यात जर निवाडा झाला नाही तर महापंचांपर्यंत हे प्रकरण जाते आणि त्या ठिकाणचा निर्णय बांधील असतो. पंच हे स्थान केवळ वारसाहक्काने मिळते. परंपरेने समाजातल्याच काही लोकांना मिळालेला तो अधिकार आहे. जेव्हा जेव्हा अशा जातपंचायती बसतात तेव्हा तेव्हा या जातपंचायतींचा सर्व खर्च हा जातपंचायत बसवणाऱ्याने करायचा असतो. आधीच फाटका असलेला हा समाज केवळ जातपंचायतीच्या मान्यतेसाठी आणखी कर्जबाजारी होतो. काही प्रकरणांत जातपंचायतीचा निवाडा तीन तीन दिवस होत नाही. वर्तुळाकार बसलेल्या लोकांमध्ये पंचही बसतात. पंचांनी काठी उगारली की आपली बाजू मांडणारांनी थांबायचे, असा प्रघात असतो. दिवस दिवस हे चर्चेचे गुऱ्हाळ चाललेले असते. अशा वेळी या जातपंचायतीचा सर्व खर्च आणि पंचायतीतल्या लोकांचे ‘साग्रसंगीत जेवण’ असा खर्च जातपंचायत बसवणाऱ्यालाच उचलावा लागतो. जातपंचायतीच्या शिक्षाही भयंकर असतात. संवेदनशील माणसाने क्षणभर गोठून जाव,े असे काही शिक्षांचे स्वरूप असते. पूर्वी कान कापण्यापासून ते उकळत्या तेलातल्या भांडय़ातले नाणे हाताने काढण्यापर्यंतच्या शिक्षा या पंचायतीमध्ये दिल्या जात.

लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणारे लोक जातपंचायतीच्या माध्यमातून आपली समांतर व्यवस्था बळकट करत राहतात.

आज आपण एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतो, देश महासत्तेकडे वेगाने जात असल्याचे दावे करतो. प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरणाऱ्या या जातपंचायती पाहिल्या म्हणजे एक भटक्या-विमुक्तांचा वेगळा देशच अस्तित्वात असल्याची कल्पना येते. या देशाला कोणत्याही सीमा नाहीत आणि आपले कोणतेही कायदे या ठिकाणी लागू होत नाहीत. या देशाचे कायदे वेगळे आहेत आणि न्यायनिवाडा करण्याची व्यवस्थाही वेगळी आहे. जातपंचायतीत सर्वाधिक शोषण होते ते स्त्रिया आणि लहान मुलांचे. बायकांना गहाण ठेवण्यापर्यंतच्या अमानुष प्रथा जिथे आजही अस्तित्वात आहेत तिथे आपण कोणत्या विकासाच्या गप्पा करायच्या? एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे ही गरीब माणसे न्यायासाठी जातपंचायतींकडे याचना करतात. आपल्याला जगायचे असेल तर जातपंचायतीला आव्हान देऊन चालणार नाही. जातपंचायत म्हणेल त्याच पद्धतीने जगावे लागते. आपण जर जातपंचायतीचा फैसला ऐकला नाही तर आपल्याला समाजातून बहिष्कृत केले जाईल ही भीती अजूनही भटक्या-विमुक्त समाजाच्या मनात आहे. शिकून प्रगती करायची, आर्थिक स्थैर्य मिळवायचे आणि जातपंचायतीच्या बंधनातून मुक्त व्हायचे, हा विचार अजूनही भटक्या समाजात बळावला नाही याचे कारण पुन्हा शिक्षणाचा अभाव हेच आहे. समाजात जिवंत राहायचे असेल तर जातपंचायतीचा निर्णय ऐकावाच लागेल. जातपंचायतीनेच वाळीत टाकले तर मग आपले काहीच खरे नाही, मग जगायचेच कशाला? अशी पक्की समजूत समाजात अजूनही आहे.

हा समाज कसा जगतो, या समाजाच्या प्रथा-परंपरा कोणत्या आहेत. आणि मुख्य समाजापासून कोसो दूर असलेला हा समाज अजूनही कोणत्या जोखडात आहे हे समजून घ्यायचे असेल तर लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’, ‘पालावरचं जग’, लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’, अशोक पवार यांचे ‘बिऱ्हाड’ ते ‘इळणमाळ’पर्यंतची पुस्तके वाचली म्हणजे लक्षात येईल आणि समाजातला तळाचा वर्ग अजूनही कसा अंधकारात खितपत पडलेला आहे याची कल्पना येईल. त्याचबरोबर आपण फार विकसित जगात वावरत असल्याच्या कथित स्वप्नाबद्दलची लाजही वाटेल. रामनाथ चव्हाण यांचे लेखनही भटक्या-विमुक्तांच्या जातपंचायतींचा नेमका वेध घेणारे आहे. बाळकृष्ण रेणके यांच्यासारखी काही नावे आहेत, ज्यांनी भटक्या-विमुक्त समाजासाठी गंभीरपणे विचार केला.

आज समाजात एक नवी चाहल दिसू लागली आहे पण हा बदल खूपच क्षीण आहे. हळूहळू शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. भटक्या-विमुक्त समाजातला तरुण शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागला आहे. तो जसजसा या प्रवाहात येईल तसतसा हा समाज पारंपरिक रूढींमधूनही बाहेर येईल. समाजात मोठय़ा प्रमाणावर अज्ञान आहे. समाजातल्या जातिव्यवस्था अजूनही टिकून आहेत. जातपंचायतींची दहशत त्या त्या समाजात अजूनही आहे. जातीतल्या लोकांनी कसे व्यवहार करायचे याबाबतचे अप्रत्यक्ष नियंत्रण या जातपंचायतीच करीत असतात. आता खेडय़ापाडय़ापर्यंत दळणवळणाची साधने आली. जगात काय घडते ते अगदी घरबसल्या एखाद्या गावात दिसू शकते. भटका-विमुक्त समाज मात्र अजूनही विखुरलेला आहे. या विखुरलेल्या समाजाला स्थैर्य नाही. त्यामुळे बदलत्या जगात आपण कुठे आहोत हे शोधण्याचे त्यांच्या गावीही नाही. जातपंचायतीच्या नावाखाली घटनाबा सत्ताकेंद्रे शोषणासाठी टपलेलीच आहेत. जातपंचायतीच्या वरवंटय़ाखाली म्हणूनच हा समाज अजूनही भरडतो आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यानंतर या जातपंचायतींच्या निर्मूलनाकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. जातपंचायतीला मूठमाती कशासाठी द्यायची आणि कशा प्रकारे द्यायची याबाबतचे त्यांचे चिंतनही चालू होते. जातपंचायतीचा क्रूर चेहरा समोर आल्यानंतर त्याविरोधात संघर्ष करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होती. जातपंचायत हे जातव्यवस्थेचे अग्रदल असल्याचे डॉ. दाभोलकरांचे मत होते. जोवर या जातपंचायतीचे पारंपरिक गड उद्ध्वस्त होत नाहीत तोवर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरूच होणार नाही. स्वातंत्र्याच्या एवढय़ा वर्षांनंतर आज तरी संपूर्ण भटका समाज हा ‘उजाडलं पण सूर्य कुठंय?’ या एकाच प्रश्नाच्या शोधात गांगरून गेलेला आहे. ‘जातपंचायत’ हे या समाजातले जळजळीत असे भीषण वास्तव आहे. या जातपंचायतींना जेव्हा सुरुंग लागेल तेव्हाच हा संपूर्ण समाज लोकशाही व्यवस्थेत मोकळा श्वास घेईल.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Casteism
First published on: 28-11-2014 at 01:34 IST