आजचा जमाना खूप ट्रेंडी आहे. एक ट्रेंड आला की उशिरा का होईना फॉलो केला जातोच. सोशल मीडियामुळे तर दिवसागणिक ट्रेंड्स बदलत जातात आणि वेगाने पसरतातसुद्धा. ऑर्कुटपासून सुरू झालेला हा सोशल अटॅचमेंट फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, रेट्रिका, व्हॉट्सअ‍ॅप, हाइक वगैरे वगैरेपर्यंत येऊन पोहोचली आहे. अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयफोन, विंडोज फोनमुळे ही अ‍ॅटॅचेमेंट आणखी वाढली. हट के अ‍ॅप्स येऊ लागले. सोशल दुनियेत अशी एकेक क्रांती होऊ लागली. पाणी पिण्याची आठवण करून देणारं अ‍ॅप, बॅटरी सेव्हिंग करणारं अ‍ॅप, कॉल रेकॉर्डिग अ‍ॅप, ट्र कॉलर, रिंगटोन कटर, पिक्सआर्ट अशी असंख्य अ‍ॅप्स आली. आता या सगळ्या अ‍ॅप्समध्ये आणखी एका भन्नाट अ‍ॅपची भर पडली आहे. ‘डबस्मॅश’ या नव्या अ‍ॅपने सध्या धुमाकूळ घातलाय. बॉलीवूडचे तारे, गायक, खेळाडू अशा सगळ्यांनाच या डबस्मॅशचं वेड लागलंय. कुणी हौस म्हणून, कुणी नवीन काही तरी करून पाहू म्हणून तर कुणी सगळे करताहेत म्हणून अशा अ‍ॅप्सच्या मागे धावतात. डबस्मॅशचंही तसंच झालंय.
सुरुवातीला हे अ‍ॅप काय आहे, कसं आहे वगैरेच्या शोधात अनेक जण होते. हळूहळू त्याचं कोडं उलगडतं गेलं. मग सुरू झाला डबिंगचा सिलसिला. ‘मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता’, ‘हा.. मैं अपनी फेवरेट हूँ’, ‘तुम मेरा वहा इंतजार कर रहे हो और मैं यहा हूँ’, ‘डेविल आपके पिछे, आप डेविलके पिछे. टू मच फन’, ‘धीरे धीरे मेरा सेन्स ऑफ ह्य़ुमर पता चल जाएगा’ अशा असंख्य बॉलीवूड डायलॉग्जचे व्हिडीओ फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपवर फिरताना दिसताहेत. केवळ सिनेमांचेच नाही तर लोकप्रिय जाहिराती, रिअ‍ॅलिटी शो, इंग्लिश मालिकांच्या सीरिज, वेगवेगळ्या प्रसंगांवरचे डायलॉग्ज, कार्टून्स, रॅप, राजकारणी, कॉमेंट्री अशा अनेक गोष्टी यात आहेत. एका डायलॉगची निवड करायची, तो नीट ऐकायचा मग मूकअभिनय करत कॅमेराने ते शूट करायचं, असं या अ‍ॅपमध्ये आहे. थोडक्यात काय तर, डबिंगची मजा घ्यायची. ‘डबिंग’ हा शब्द केवळ तारे-तारकांकडून ऐकायला किंवा बघायला मिळायचा. पण, आता तो सर्वसामान्य लोकांच्या ‘बाए हात का खेल’ झाला आहे.
एकापेक्षा अधिक जणही या डबिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. तशी सोय या अ‍ॅपने करून दिली आहे. त्यामुळे आता कट्टा, नाका, कॅम्पस, ऑफीसचं कॅन्टीन अशा ठिकाणी गप्पाटप्पांमधून कंटाळा आला की या हक्काच्या ‘डबिंग टाइमपास’चा आधार घेतला जातोय. यात बॉलीवूड तारे मागे नाहीत. सोनाक्षी सिन्हा, रणवीर सिंग, आलिया भट, प्रियंका चोप्रा, सलमान खान, श्रुती हसन, रिचा चड्डा असे अनेक कलाकार सिनेमांतल्या खऱ्याखुऱ्या डबिंगसोबत या डबस्मॅशचाही आनंद लुटताहेत. यात सायना नेहवालही आहे. तिचाही व्हिडीओ वेगाने पसरला होता. एखादं अ‍ॅप आवडलं की त्याचा प्रसार व्हायला फारसा वेळ लागत नाही. सोशल मीडियाने ते खूप सोपं केलंय. काही दिवसांपूर्वी हॅश टॅगचा ट्रेंड आला होता. काही गोष्टी ठळकपणे सांगायच्या असतील तर हॅश लिहून मग तो शब्द लिहायचा असा तो ट्रेंड. तसंच इन्स्टाग्राम, रेट्रिका हेही ट्रेंड जोरात आहेत. दोन्ही अ‍ॅप फोटोंच्या इफेक्ट्साठी प्रसिद्ध आहेत. हे सगळे ट्रेंड्स शिकवावे लागले नाहीत. एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे ते पसरत गेले. डबस्मॅश हे अ‍ॅपही तशीच धमाल आणतंय.
‘आज मेरे पास बंगला है, गाडी है, दौलत है. तुम्हारे पास क्या है.’ आवाज अमिताभचा पण, मोबाइलच्या स्क्रीन दिसताय मात्र तुम्ही. हे चित्र काहींच्या फक्त स्वप्नातलं असू शकतं. पण, ते सत्यात उतरवलंय ‘डबस्मॅश’ने. ज्याला गाता येत नसेल, आवाजही बरा नसेल पण, गाण्याची फारच हौस असेल त्यांच्यासाठी तर हे अ‍ॅप म्हणजे पर्वणीच. सोनू निगम, श्रेया घोषाल, अरिजित सिंग असे अनेक गायक-गायिका या अ‍ॅपच्या माध्यमातून तुमच्यासाठी पाश्र्वगायन करताना दिसतील. फक्त सहा ते आठ सेकंदांचा हा व्हिडीओ असल्यामुळे कमी वेळात तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायचं असतं. कलाकार तर ते सहज करू शकतात. पण, अभिनयाची पाश्र्वभूमी नसलेल्यांसाठी ते आव्हान आहे. ज्यांनी कधीच अभिनय केला नाही त्यांनाही या अ‍ॅपमुळे त्यांच्यातलं अभिनयाचं सुप्त कौशल्य दिसून आलंय. मागे असणाऱ्या आवाजाला ओठांचे हावभाव जुळून येणं हेही मोठं काम. एखाद्या व्यक्तीचं समाधान होईपर्यंत डबिंग व्हिडीओ शूट करता येतो. तसंच तो आवडला आणि शेअर करावासा वाटला तरच व्हॉट्स अ‍ॅप, मेसेंजर आणि फेसबुकवर शेअर करता येतो. अन्यथा तो तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह राहतो. त्यामुळे अ‍ॅप हाताळणाऱ्यांच्या सोयींचा विचार केल्यामुळे ‘डबस्मॅश’ लोकप्रिय ठरलंय. डबिंगची ही लाट जबरदस्त पसरली आहे. आणि ती आणखी बरेच दिवस तशीच वेगाने पसरेल यात शंका नाही.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com