काही दिवसांपूर्वी ‘नच बलिये’ हा शो सुरू झाला. या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या पर्वाची लोकप्रियता बघता याही पर्वाला तुफान प्रतिसाद मिळणार यात शंका नव्हती. पण, शो सुरू झाला तशी चर्चेला सुरुवात झाली. जोडय़ांसह परीक्षकांबद्दलही प्रेक्षक व्यक्त झाले. परीक्षकांच्या तीन खुच्र्यामध्ये ‘ग्लॅमरस’ चेहरा हवा म्हणून प्रीती आणि नाचाबद्दल बोलणं आवश्यक म्हणून मर्झी या दोघांची तिथे वर्णी लागली. आता प्रश्न उरला तो तिसऱ्या परीक्षकाचा. रिअ‍ॅलिटी शोमध्ये काहीतरी धमाकेदार हवं म्हणून रिसर्च केल्यावर चेतन भगत हे नाव समोर आलं. नाचाशी थेट काहीही संबंध नसताना त्याला त्या खुर्चीत बसवणं म्हणजे धन्यच! नशीब एकेकाचं आणि काय.. तर प्रेक्षकांच्या चर्चेत जास्त भाव खाऊन गेला तो चेतन. ‘डान्सबद्दल याला काय कळतं’, ‘किती उद्धट आहे हा’ अशा नानाविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. चेतनने ही ऑफर का घेतली असेल हा प्रश्न प्रेक्षकांना स्वस्थ बसू देईना. पण, खरं तर याचं उत्तर सरळ, स्पष्ट आणि सोपं आहे. इंडस्ट्रीत उतरल्यावर ज्याचा-त्याचा आर्थिक दृष्टिकोन अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतो. तसंच झालंय त्याचं. आपल्या पुस्तकांवर सिनेमे येताहेत आणि ते हिट होताहेत म्हटल्यावर तो स्वार्थीपणे याकडे बघणारच. तर मुद्दा हा की एक लेखक नाचाच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून काय करतोय? कार्यक्रमाची निर्माती एकता कपूर आहे. आता एकता आहे म्हणजे शोमध्ये ड्रामा हवाच. तो त्यांना चेतनमध्ये दिसला असावा. त्यात चेतन शोच्या टॅगलाइनप्रमाणे ‘टू मच’ करतोय. कोणाला ‘रन वे’ कपल म्हणतोय तर कोणाला ‘पळून लग्न करू नका’ असे प्रेमाचे सल्ले देतोय. नाचाशी काहीही संबंध नसताना स्पर्धकांना सहा आणि सात असे मरकही देतोय तो. आता हा सगळा ड्रामा करीत असल्यामुळे आणि त्याची लोकप्रियता तुफान असल्यामुळे कार्यक्रमाला प्रेक्षकवर्ग लाभतोय. यामुळे साहजिकच शोची भरभराट होतेय आणि पर्यायाने त्याचीही भरभराट होते. ही देवाणघेवाण त्याच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. ‘ज्या परीक्षकाला टीआरपी जास्त तो नंबर एकचा परीक्षक’ हा अलिखित नियम तसा पूर्वीपासून रिअ‍ॅलिटी शोसाठी आहेच. त्यातच शोमध्ये असलेल्या अकराही जोडय़ांच्या प्रेमकहाण्या ऐकून कुणास ठाऊक एखादी ‘लव्ह स्टोरी’च तो लिहून काढेल आणि मग त्यावरही एखादा सिनेमा येईल. याला म्हणतात प्रोफेशनल वागणं. त्यामुळे चेतनने त्या शोमध्ये ‘असण्या’ची व्यावसायिक कारणं पक्की अभ्यासली आहेत.