चिनूला पहिल्यांदा मी पाहिलं ते तिच्या शाळेत गेले तेव्हा. मोठी गोड मुलगी, इटुकली. कुरळ्या केसांच्या दोन लांब वेण्या तिनं घातलेल्या होत्या. फार न बोलणारी, समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकत राहणारी पाच वर्षांची चिनू मला वेगळी वाटली, आवडून गेली. मधूनमधून तिची आठवण होत राहायची, पण भेट व्हायची नाही.

आमच्या गावात एकदा लहान मुलांसाठी फिल्म फेस्टिवल सुरू झाला. त्यात खूप सारे सिनेमे होते. मला मनातून वाटत होतं, की चिनू येईल सिनेमे बघायला. फेस्टिवल सुरू व्हायची वेळ झाली तरी ती आलेली काही दिसली नाही. मी मनातून नाराज झाले. इतक्यात माझ्या मागून किनऱ्या आवाजातली हाक आली, ‘‘सोनालीताई ऽऽऽ, मी आणि माझा भाऊ आलोय सिनेमा पाहायला..’’

चिनूच्या येण्यानं मला खूप खूप आनंद झाला. आज ती आली होती तेव्हा तिच्या कुरळ्या केसांच्या वेण्या गायब होत्या. तिनं छानपकी मागं एकच रबर लावून केस बांधले होते, त्यामुळं कुरळ्या केसांची फुगून आयाळ तयार झाली होती. ती तिला मस्त दिसत होती. सिनेमा सुरू होण्यापूर्वी ‘खाण्याच्या पिशव्यांचा आवाज करू नका’, ‘एकमेकांच्या कानात सिनेमाची गोष्ट सांगू नका’, ‘फोटो काढू नका’, ‘मोबाइल फोन सायलेंटवर ठेवा’, ‘मोबाइलवर कोणाचा फोन आला तर बोलू नका’ अशा सूचना माइकवरून सांगायच्या होत्या. त्या सांगताना मला कुठल्या तरी छोटुकल्याची मदत हवी होती. मी विचारलं समोरच्या लहान मुलांना, तर कुणीच उठलं नाही. चिनू तेवढी मधल्या रांगेतून हळूहळू चालत आली आणि म्हणाली, ‘‘मी करेन तुम्हाला मदत!’’ – माइकवरून सूचना देण्याकरिता तिनं मला खरंच मदत केली.

फिल्म फेस्टिवलच्या चार दिवसांत मला चिनूचं वेड लागलं. दिवसातून एक-दोनदा तरी ती दिसायला हवी असं वाटायचं. ती भेटली की छान वाटायचं.

असेच काही महिने निघून गेले. चिनू पहिलीत गेली होती. तिच्या शाळेत मुलांनी भरवलेल्या बाजारात मी जाणार होते. बाजार जोरात भरला होता. मुलांनी काय काय विकायला ठेवलं होतं! स्वत: बनवलेलं! पुस्तकांमध्ये ठेवायच्या पुठ्ठय़ाच्या रंगीबेरंगी खुणा होत्या, चमचम टिकल्या लावून बनवलेले तोरण होते, भडंगाच्या पुडय़ा होत्या, शेंगदाण्याची चटणी होती, मातीची खेळणी होती, वेगवेगळ्या डाळी लावून केलेली चित्रं आणि फळांच्या, फुलांच्या बिया व पानं वापरून केलेली शुभेच्छापत्रंसुद्धा होती. इतक्या गर्दीत मी आपली चिनूला शोधत होते. तिच्या पहिलीच्या वर्गातपण गेले. ती नव्हती. बाजार दुसरी ते चौथीच्या मुलांचा असल्यामुळं कदाचित बालगट व पहिलीची मुलं नसावीत असं वाटलं. दारातून बाहेर पडताना पाहिलं तर चिनू उभी होती वॉटरबॅग गळ्यात अडकवून. मोठय़ा मोठय़ा डोळ्यांनी ती सगळीकडं पाहत होती. मी हसून एकदम तिच्याजवळ गेले. मला आनंद झालाय म्हणजे तिलाही झालाच असणार असं मी समजून बसले. ‘‘काय म्हणतेस चिनू? कशी आहेस?’’ असं उत्साहानं तिला विचारलं. तिचा गोरा गोरा मऊसूत हात हातात घेतला. बाजूला माझा बाबा होता, आणखी काही माणसं होती. त्यांच्याकडं पाहून म्हटलं, ‘‘मी म्हणायचे नं, ती हीच चिनू बरं का! माझी मत्रीण.’’ या माझ्या वाक्यावर चिनू किनऱ्याच पण स्पष्ट शब्दांत म्हणाली, ‘‘मी छान आहे, पण मी तुमची मत्रीण आहे.. तुम्ही माझी मत्रीण नाहीये!’’

चिनूच्या या वाक्यानंतर मी एकदम गप्प झाले. हसले, पण मनातून रडूच आलं. लहान मुलांवर आपण काही लादू शकत नाही हे पहिल्यांदाच मला कळलं. कळल्यानंतर लगेच काही सहन झालं नाही; पण मोठी माणसं वाईट वाटल्याचं लगेच दाखवत नाहीत. त्यामुळं मीसुद्धा, ‘‘हो का गं चिनू? असू दे असू दे!’’ म्हणत विषय सोडून दिला. मनातून मात्र विषय गेला नव्हता. चिनूबद्दलचं आकर्षण आणखीच वाढलं होतं. जी मुलगी इतक्या बाणेदारपणे तरीही गोड आवाजात सांगते- ‘तुम्ही माझी मत्रीण नाही!’ ती कशीही करून व्हायला पाहिजे माझी मत्रीण असं आणखीनच जास्त तीव्रपणे वाटत गेलं. एक कळलं होतं, की हे आपोआप झालं पाहिजे. लहान मुलं उगीच नाही काही लादून घेणार! तेव्हा चिनूच्या मत्रीसाठी प्रयत्न करायचे याचा अर्थ होता, की प्रयत्न नाहीच करायचे.

गावात अध्येमध्ये पुस्तक प्रदर्शन भरायचं. मी बाबाबरोबर पुस्तकं पाहायला नक्की जायचे. अशाच एक प्रदर्शनात लहान मुलांच्या पुस्तकाच्या टेबलजवळ पाठमोरी एक धिटुकली दिसत होती. तिनं बरीच पुस्तकं निवडली होती. इंग्रजीपण होती नि मराठीपण. मला गंमत वाटली. चिनूप्रमाणं तिचेही केस लांब व कुरळे होते. मला उत्सुकता वाटली, की कोण ही लहान मुलगी चक्क पुस्तकं घेतेय, स्वत: निवडतेय. मी गेले समोर तर काय? चिनूच!

‘‘काय म्हणतेस चिनू? कशी आहेस? कुणाबरोबर आलीस? इथं कशी काय?’’ मी तिला धडाधड प्रश्न विचारले. तिनं मात्र घाई न करता उत्तर दिलं, ‘‘आजोबांबरोबर आलेय. पुस्तकं घ्यायचीत ना मला, म्हणून!’’

‘‘तू वाचतेस?’’

‘‘हं! म्हणजे थोडं थोडं; पण आई-बाबा, आजी-आजोबा दाखवतात नं वाचून. मला गोष्टी आवडतात खूप.’’

चिनूचा आवाज आता घशातून थोडा जास्त व्यवस्थित बाहेर पडत होता. नाजूकच होता, पण किनरा नव्हता. स्वत:च्या गोष्टी ती स्वत:च निवडतेय याची मला गंमत वाटली. माझी पुस्तकं घेऊन मी निघाले तशी तिनं मला हाक मारून ‘बाय’ केलं. मी आनंदून गेले.

एक दिवस मी गावाहून येत होते. मोबाइल वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. फोनवर चिनूची आई होती. म्हणाली, ‘‘चिनूला तुमच्याशी बोलायचंय. तिचं झालं की मग मी बोलते. आधी बोलले तर रुसून बसेल.’’

आता फोनवर चिनू होती, ‘‘सोनालीताई, आमच्या दुसरीच्या वर्गाला सुट्टीचे खूप उपक्रम दिलेत. मी वाचनाचा उपक्रम निवडलाय. मी तुम्हाला वाचून दाखवायला कधी येऊ, असं विचारायला फोन केलाय..’’

मी आनंदानं बसल्या जागी उडीच मारली. म्हटलं, ‘‘अगं चिनू, केव्हाही ये. मी आज येतेय गावाहून. तू असं कर, उद्या संध्याकाळी ये. चार वाजता येतेस?’’

‘‘पण माझी शाळा आहे नं. मग सहानंतर चालेल? आणि मी वाचून दाखवल्यावर अभिप्रायसुद्धा द्याल नं लिहून? थांबा हं! आता आई बोलतेय..’’

चिनूनं चक्क तिचा उपक्रम पूर्ण करण्यासाठी माझी निवड केली होती! मी जाम खूश झाले. अरेच्चा ‘उपक्रम’, ‘अभिप्राय’ वगरे शब्द वापरण्याइतकी मोठी झाली चिनू? किती मोठी झाली हे तर मला बघताच येणार होतं दुसऱ्या दिवशी.

चिनू पुस्तकं भरलेली एक मोठाली पिशवी घेऊन दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली. सगळी पुस्तकं तिनं रांगोळी काढत असल्यासारखी जमिनीवर पसरली. थोडीशी लाजत म्हणाली, ‘‘तुम्ही सांगा, यातलं काय वाचू ते..’’

मी निवडलेल्या पुस्तकातली गोष्ट चिनू वाचायला लागली. मला गंमत वाटली.. कारण ती सावकाश पण सराईतपणे वाचत होती. मध्येच पुस्तक बाजूला ठेवून त्यातलं मला कळलंय का पाहत होती. मी नीट कळलं नाहीये असा चेहरा केला, की गोष्टीत घडलेल्या गोष्टी अगदी त्याच क्रमानं सांगत होती, तेही पुस्तक हातात न घेता! मी म्हटलं तिला, ‘‘अगं, वाचताना वाक्यात कुठं थांबायचं ते तुला कसं कळतं?’’ तर ढमाली म्हणाली, ‘‘असतात नं पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्हं. ती बघायची नि तसं तसं वाचायचं.’’

कधी कधी वाचतेस, असं विचारलं तर म्हणाली, ‘‘सरावपाठ संपल्यावर आणि सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपतानापण!’’

सात वर्षांची छबकडी इतक्या आवडीनं वाचतेय हे मला मोठय़ाच कौतुकाचं वाटत होतं. पुस्तकं स्वत: निवडताना ती चित्रं आणि वाक्यं पाहून निवडत होती. पहिली दोन वाक्यं अवघड असतील तर पुस्तकं रद्द करत होती. तिला पुस्तकांच्या चित्रांमधले फरक कळत होते, वाक्यांची गंमत कळत होती, अनुस्वार कसे वाचायचे ते कळत होतं. मुळाक्षरं ओळखीची झाल्यावर गोष्ट वाचण्यासाठी आता कुणावर अवलंबून राहायची गरज नाही म्हणून तिला केवढा तरी आनंद झाला होता. नाही तर ‘चिनू, हातातलं काम आटपू देत मग सांगते गोष्ट!’, ‘चिनू, सारखं सारखं नाही हं गोष्ट-गोष्ट करायचं. मी गडबडीत आहे ना?’, ‘चिनू, कंटाळा आलाय थोडा, पडू देत ना मला निवांत’ अशी कारणं सांगणाऱ्या आजी-आजोबा आणि आईबाबांना आता चिनूच गोष्टी वाचून दाखवत होती. आजीला भेटायला तिच्या मत्रिणी आल्या, की आजी खोलीतून हॉलमध्ये येईपर्यंत किंवा चहा आणेपर्यंत चिनू त्यांना म्हणते, ‘‘तुमचा वेळ जावा म्हणून मी तुम्हाला कविता वाचून दाखवते हं!’’

चिनूचं वाचन झाल्यावर मी तिला म्हटलं, ‘‘तुला जो अभिप्राय हवाय ना, तो घेऊन मी तुझ्या घरी उद्या साडेचार वाजता येते.’’ ती म्हणाली, ‘‘ठीकाय.’’

तिच्या घरी पोहोचेपर्यंत पाच-दहा मिनिटे इकडेतिकडे झाली. तिची आजी म्हणाली, ‘‘आज दुपारी ती झोपलेलीच नाही. म्हणाली, माझी मत्रीण येणारे!’’

तिची आई म्हणाली, ‘‘वेणी घालून, आवडता फ्रॉक घालून ती सारखी घडय़ाळाकडे पाहात बसलेली. सारखं दारात जाऊन पाहत होती. चिनू, किती घाई करतेस म्हटल्यावर पटकन म्हणाली, अगं, माझी मत्रीण सोनाली येणारे ना. तिचा रस्ता चुकायला नको म्हणून दारात जायचंय. एकेरीत ‘सोनाली’ म्हटल्यावर लगेच तिला वाटलं चुकलंच.. ‘सॉरी .. सॉरी’ असंही पुटपुटली.. नंतर म्हणाली, ‘पण आई, मत्रिणीला का कुणी ताई म्हणतं, कुणी अहो म्हणतं? मग ..?’’

आता चिनूनं मला सोनू म्हणायचं ठरवलंय, तिचं तिनंच ठरवलंय!!