डेव्हिड फॉस्टर वॉलेस या दिवंगत अमेरिकी लेखकाविषयी कुतूहल शमन करण्याचे कार्य हा चित्रपट करीत नाही. उलट या व्यक्तिमत्त्वाला त्याच्या साहित्याच्या मार्गाने आणखी शोधण्याचे कुतूहल त्याच्या प्रेक्षकांमध्ये निर्माण करतो. चरित्रपटाच्या पारंपरिक वाटा टाळून नवे काही दाखविणाऱ्या ‘द एण्ड ऑफ द टूर’ या चित्रपटाविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या जागतिक जगण्यातील लादलेल्या एकारलेपणाचे भाष्य आपल्या लेखनातून दीड दशकापूर्वी डेव्हिड फॉस्टर वॉलेस या अमेरिकी लेखकाने वर्तवून ठेवले होते. इंटरनेटमुळे, सामाजिक माध्यमांमुळे आणि टीव्हीवरील मनोरंजन हव्यासाने बौद्धिक दिवाळखोरीची उच्चतम अवस्था, पोर्नोग्राफीचा व्यापक प्रसार, माहितीमाऱ्याच्या अतिरेकाने येणारा सुन्नपणा आणि नेटफ्लिक्ससारख्या यंत्रणेचे आगमन याचे भाकीत त्याने दीडेक दशक आधी आपल्या साहित्यातून मांडून ठेवले होते. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेशी फटकून वागणाऱ्या या लेखकाने आपल्या साहित्याची लोकप्रियता टोकदार वळणावर असतानाच एकारलेपणाच्या मानसिक दुभंगातून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर आजतागायत त्याच्या साहित्याची उकल करण्याचे प्रयत्न संपलेले नाहीत. गंमत म्हणजे त्याने भाष्य केलेल्या समाज माध्यमांपासून, टीव्ही, यू टय़ुब या साधनांवरूनच त्याची विचारसरणी अन् लेखन जोमाने प्रसारित होत आहे. या डेव्हिड फॉस्टर वॉलेसने १९९६ साली आपल्या ‘इन्फिनेट जेस्ट’ या कादंबरीच्या विक्रीप्रसार मोहिमेत भाग घेतला होता. या पुस्तकाने प्रभावित झालेल्या रोलिंग स्टोन मासिकाच्या डेव्हिड लिप्स्की या पत्रकार-लेखकाने त्याच्या बुक टूरचा शेवटचा आठवडा वॉलेससोबत राहून शब्दबद्ध करण्यासाठी आपल्या संपादकाकडून परवानगी मिळवली. एक आठवडा लिप्स्कीने विविध विषयांवर वॉलेसशी चर्चा केली. लेखाच्या ऐवजासाठी फिरतीवर बराच वेळ नि पैसा खर्च केल्यानंतरही काही खासगी कारणांमुळे प्रत्यक्षात मासिकासाठी लेख लिहिलाच नाही. मात्र त्याच्या मृत्यूच्या धडकलेल्या वार्तेनंतर एका भल्यामोठय़ा पुस्तकाचा लिखित ऐवज त्याने प्रकाशकाकडे सोपवला. पुस्तकाला पारितोषिक मिळालेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ‘द एण्ड ऑफ द टूर’सारखा या लेखकाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारा चित्रपट तयार झाला.

चांगला चित्रपट आणि चांगला माहितीपट या दोहोंच्या सीमारेषेवर फिरणाऱ्या ‘एण्ड ऑफ द टूर’मध्ये खऱ्या अर्थाने दुपात्रीच व्यक्तिरेखा आहेत. एक खुद्द लेखक आणि दुसरा त्याच्या जगण्याचे पैलू टिपणारा पत्रकार (आणि फारशी प्रसिद्धी नसलेला साहित्य लेखकही). आता निव्वळ अवजड, रूक्ष वाटू शकणाऱ्या संवादालाच जेम्स पॉन्सोल्ड्ट या दिग्दर्शकाने जगण्याचा साहित्याशी संबंध लावत फुलवत नेले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी वॉलेसचे काही वाचण्याची गरज नाही किंवा साहित्य आवडीचा किंवा नावडीचा प्रांत असण्याचीही आवश्यकता नाही. हा मुळातच लेखकाची वा त्याच्या साहित्याच्या मोठेपणाची माहिती सांगण्याचा प्रयत्न नाही. नायक म्हणून वॉलेसला देव म्हणून उभे करण्याचाही येथे अट्टहास नाही. लेखकासोबत आठ दिवसांच्या कालावधीत उलगडलेला जगण्याचा प्रवास आहे. प्रसिद्धीच्या प्रचंड मोठय़ा वलयापासून दूर राहून एकांतात सक्तीने लेखनआहारी गेलेला लेखक, त्याची मनोरंजनापासून ते भवतालात होणाऱ्या बदलांकडे पाहिली जाणारी दृष्टी आणि खासगी आयुष्यातील त्याच्या मनुष्यपणाच्या नोंदी आदी घटकांनी चित्रपटाची पटकथा सजवण्यात आली आहे. लिप्स्कीच्या पुस्तकातील नोंदींच्या आधारे हा चित्रपट सुरुवातीपासून रंगायला लागतो.

चित्रपटाला सुरुवात होते ती वॉलेसच्या (जेसन सिगल) आत्महत्येच्या वृत्तानंतर लिप्स्कीकडून (जेसी आयझेनबर्ग) त्याच्या मुलाखतींच्या ध्वनिफिती अडगळीतून पुन्हा बाहेर काढण्यातून. एक कादंबरी आणि काही कथा प्रसिद्ध झालेल्या लिप्स्कीला आपल्या अवतीभवती डेव्हिड फॉस्टर वॉलेस या नावाचा आणि त्याच्या हजारांहून अधिक पानांच्या ‘इन्फिनेट जेस्ट’ या कादंबरीचा उदोउदो चाललेला दिसतो. सेलिब्रेटी लेखकांसारख्या कणभरही नसलेल्या वॉलेसविषयी एका मासिकातील लेख वाचून आणि त्यानंतर कादंबरी वाचून लिप्स्की रोलिंग स्टोनमधील आपल्या संपादकाला गाठतो. तेथे या लेखकाच्या प्रसिद्धी मोहिमेत सहभागी होऊन त्याच्याविषयी, त्याच्या अज्ञात पैलूंविषयी लिहिण्याची तीव्र इच्छा व्यक्त करतो. प्रवाहपतीत लेखनाच्या प्रसिद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोलिंग स्टोन मासिकाचा संपादक नाखुशीने का होईना, पण लिप्स्कीला सर्वतोपरी मदत करून वॉलेसला गाठण्याची तजवीज करतो.

आडशहरातील आडभागात आपल्या दोन कुत्र्यांसह राहणाऱ्या वॉलेसला आडवेळेत गाठून लिप्स्की बोलते करतो.

ही चर्चा नुसतीच साहित्यिक राहत नाही. टीव्हीचे व्यसन, पोर्नोग्राफीचे परिणाम आणि लेखन-वाचनाचे त्रोटक तपशील यांच्या दिमतीने फुलत राहते. वॉलेस लिप्स्कीला आपल्या कॉलेजात नेतो. तेथे वॉलेसच्या विषयाच्या तासाला लिप्स्की विद्यार्थ्यांसोबत बसतो. त्यांच्याशी गप्पा मारतो. पुन्हा घरी येताना, घरात आणि अंतिमत: प्रसिद्धी टूरवर जाताना संवाद एके संवाद स्वरूपात चालणाऱ्या भागाला संयततेचा स्पर्श होत नाही. हा संवाद पत्रकार आणि सेलिब्रेटी असूनही सामान्यपणा कवटाळणारा लेखक यांच्यातला प्रश्नोत्तर स्वरूपात राहत नाही, तर प्रेक्षकाच्या लेखी एका रंजक चित्रपटीय कथेतील कुतूहलासारखा पुढे सरकत जातो.

रेस्तराँ, पुस्तक प्रसिद्धीसाठी निवडलेले शहर, तिथल्या चाहत्यांमध्ये डेव्हिड फॉस्टर वॉलेसचे आपला मूळत: स्वभाव राखून मिसळणे. त्याची माजी प्रेयसी आणि मैत्रीण यांच्यासोबतच्या गप्पा, हॉटेलमधील टीव्हीसमोर तासन्तास बसून राहिलेला वॉलेस, मध्येच आपल्या लेखकीय विक्षिप्तपणाचे दाखले सांडून ते आवरण्याचा अट्टहास करणारा वॉलेस इथे दिसतो. लिप्स्की त्याला शोधताना आपल्या पत्रकारितेची सारी मूलभूत कौशल्ये वापरताना इथे दिसतो. मुळात एका पत्रकार आणि लेखकाची भूमिका करणारा इथला जेसी आयझेनबर्ग खुद्द कथालेखक आहे. चित्रपटात त्याच्यातील प्रत्यक्ष लेखक आणि व्यक्तिरेखेतील लेखकाचा संयोग झालेला आढळतो. खुद्द डेव्हिड फॉस्टर वॉलेसची भूमिका साकारणाऱ्या जेसन सिगलने त्याच्याइतके अवाढव्य शरीर कमावण्याचा, वॉलेसच्या हावभावांपासून ते त्याच्या शांत, समंजस बोलण्याचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे खुद्द वॉलेसच्या उपलब्ध यू टय़ुबवरील अनंत मुलाखतींशी पडताळून पाहताना लक्षात येऊ शकेल.

सेलिब्रेटी पदामागची फोलता, सेलिब्रेटी म्हणून जगणाऱ्या लेखकाची समाजामध्ये असलेली विशिष्ट पत, वाचक चाहते म्हणून समोर येणाऱ्या समुदायाची मानसिकता, लेखक म्हणून वॉलेसला असलेल्या वलयकाळात त्याचे वाचकांपासून विशिष्ट अंतर राखणे, त्याला स्वत:ला येणारे नैराश्याचे झटके या सगळ्याचा परामर्श लिप्स्कीच्या माध्यमातून येथे घेण्यात आला आहे.

संगणक कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करण्यापासून तुलनेने अगदीच हलक्या कामांमध्ये आलेल्या अनुभवांची बेगमी लिप्स्कीसमोर उलगडणारा खटय़ाळ वॉलेस येथे सापडतो. तसेच मैत्रिणीशी एकांतात बोलल्याबद्दल लिप्स्कीला धमकी देणारा गंभीर, असुरक्षित सामान्य माणूस म्हणून वॉलेस दिसू लागतो. लोकांपासून दूर राहणारा वॉलेस सार्वजनिक कार्यक्रमांत आपल्या वक्तृत्वाद्वारे एखाद्या निष्णात कलाकारासारखा कसा वागतो, हे फॉस्टरच्या व्यक्तिमत्त्वातील वास्तव विरोधाभास दाखवताना लिप्स्की सांगतो.

चित्रपटाची गंमत म्हणजे हा चित्रपट त्याच्या समग्र साहित्यावर वा समग्र आयुष्यावर काहीच बोलत नाही. तो त्याच्या साहित्यातील मोठेपणाचाही शोध घेण्याच्या फंदात पडत नाही. भेटलेल्या पाच दिवसांत घरात आणि बाहेर वॉलेस कसा वावरतो, कसे जगतो याचे सूक्ष्मलक्षी अवलोकन करतो. चित्रपटातील कथानकाला चढ-उतार आहेत, ते सर्व बाजूंनी या लेखकाला मांडल्यामुळे. तंबाखू खाण्याच्या त्याच्या सवयीपासून ते आपल्या कुत्र्यांवरच्या नितांत प्रेमापर्यंत अगदीच छोटय़ा गोष्टींमध्ये ते समोर आले आहे.

सुरुवातीला पत्रकारासमोर चाचपडत वावरणाऱ्या वॉलेसची नंतर रंगत जाणारी रसवंती येथे भावण्यास सुरुवात होते. इंटरनेटच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्याने म्हटले होते ‘‘पुढील १० ते १५ वर्षांत इंटरनेट इतक्या वेगाने वाढेल की, आपले शरीरही त्याच्याशी निगडीत होईल. तंत्रज्ञान जसे विस्तारित जाईल, तसे आपल्या शरीराचाच एक भाग बनून जाईल. या कोलाहलात तुम्ही खूप जवळ असूनही अधिकाधिक एकटेच बनत जाल.’ या आणि त्याने वर्तविलेल्या समाज माध्यमांबाबतच्या कित्येक गोष्टी आज खऱ्या होत आहेत. अन् आणखी काही वर्षांत त्याने मांडलेल्या अनेक कल्पना पूर्णत: वास्तवतेचा भाग बनू पाहत आहेत.

द एंड ऑफ द टूर म्हणूनच नुसता एका लेखकाचा शोध नाही. त्या लेखकाच्या साहित्याची चिरफाड नाही किंवा त्याच्यावर असामान्य, द्रष्टा असल्याचा शिक्का मारण्याचा प्रयत्न नाही. अमेरिकी साहित्यामध्ये थॉमस पिंचन, जे. डी सालिंजर, मार्क लेनर या लेखकांनी जगाशी फारकत घेत आपले गूढपणाचे लेखकत्व मिरविले. त्या पंथात राहूनही आपले लेखकपण सर्वार्थाने जगासमोर उलगडण्याचे असंख्य पर्याय या लेखकाने आपल्या साहित्यातून आणि मुलाखतींमधून उपलब्ध करून दिले आहेत.

डेव्हिड फॉस्टर वॉलेसविषयी कुतूहल शमन करण्याचे कार्य हा चित्रपट करीत नाही. उलट या व्यक्तिमत्त्वाला त्याच्या साहित्याच्या मार्गाने शोधण्याचे नवे कुतूहल त्याच्या प्रेक्षकांमध्ये निर्माण करतो. म्हणूनच चरित्रपटापलीकडे त्याचे रूप हे त्यातून होणाऱ्या अल्प मनोरंजनासोबत अभ्यासण्यासारखेच आहे.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व चित्रदृष्टी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The end of the tour
First published on: 27-05-2016 at 01:18 IST