तंत्रज्ञान : बोलणाऱ्या-ऐकणाऱ्यांसाठी ‘क्लबहाऊस’

सध्या इंटरनेटवर चर्चा आहे ती क्लबहाऊस अ‍ॅपची.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या इलॉन मस्क यांच्यापासून ते चीनसारख्या देशापर्यंत सगळीकडेच क्लबहाऊसची जोरदार चर्चा आहे.

स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com

सध्या इंटरनेटवर चर्चा आहे ती क्लबहाऊस अ‍ॅपची. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या इलॉन मस्क यांच्यापासून ते चीनसारख्या देशापर्यंत सगळीकडेच क्लबहाऊसची जोरदार चर्चा आहे. हे अ‍ॅप भविष्यात एअरबीएनबी, उबरप्रमाणे लोकप्रिय होईल असं म्हटलं जात आहे. चीनमध्ये तर याची लोकप्रियता एवढी वाढली की तेथील सरकारने यावर बंदी घातली आहे. त्यामुळेच हे अ‍ॅप नक्की काय आहे? ते कसं काम करतं? इलॉन मस्क आणि या अ‍ॅपचा काय संबंध आहे, चीनने त्यावर बंदी का घातली? भारतात काय परिस्थिती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा केलेला हा प्रयत्न..

क्लबहाऊस हे एक नवीन सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन आहे. याचं वैशिष्टय़ म्हणजे हे ऑडिओ अ‍ॅप्लिकेशन आहे. म्हणजेच कॉन्फरन्स कॉलप्रमाणेच हे काम करत असलं तरी या माध्यमाची अनन्यता म्हणजेच एक्सक्लुझिव्हिटी हा मुख्य मुद्दा आहे. दोन वापरकर्त्यांमधील संवाद इतरांना श्रोते म्हणून ऐकण्याचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे. हे म्हणजे एखादं पॉडकास्ट ऐकण्यासारखंच आहे. फक्त यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरील लोक संवाद साधत असताना इतर व्यक्ती श्रोते म्हणून सहभागी होऊ शकतात. भारतीयांना समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास हे एखाद्या चर्चासत्राप्रमाणेच आहे, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी असलेले लोक त्यात सहभागी होऊ शकतात.

क्लबहाऊसचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे हे अ‍ॅप इन्व्हाइट बेस्ड आहे. म्हणजेच तुम्ही थेट आयओएसवरून हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकत नाही. एखाद्या खऱ्या क्लबमध्ये ज्याप्रमाणे क्लबच्या सदस्यांनी आमंत्रण दिल्यानंतरच त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येतं तसंच इथेही आहे. इन्व्हाइट म्हणजेच आमंत्रण असल्याशिवाय हे अ‍ॅप डाऊनलोड करता येत नाही. अशीच इन्व्हाइट बेस्ड यंत्रणा यापूर्वी वन प्लस या कंपनीने त्यांच्या फोनविक्रीसाठी वापरली होती. एक फोन विकत घेतल्यानंतर त्या ग्राहकाला इन्व्हाइट पाठवण्याची परवानगी दिली जात असे. त्या ग्राहकाने आपल्या परिचयातील कोणाला इन्व्हाइट पाठवल्यास त्याच्या आधारेच त्या व्यक्तीला वन प्लस विकत घेता येत असे. भारतामध्येही या वन प्लस इन्व्हाइटची काही वर्षांपूर्वी तुफान चर्चा होती.

क्लबहाऊसची कार्यप्रणाली

इन्व्हाइट मिळल्यानंतर क्लबहाऊसमध्ये दाखल होताना वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडावे लागतात. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, पुस्तकं, उद्योग व्यवसाय, आरोग्य याबरोबरच इतरही अनेक विषय आहेत. आवडीच्या विषयांबद्दल जेवढी अधिक माहिती वापरकत्रे अ‍ॅपमध्ये देतील तेवढय़ा कॉन्व्हस्रेशन रूम्स आणि त्या विषयावर बोलणाऱ्या वक्त्यांशी वापरकत्रे कनेक्ट होतील.

कॉनव्हस्रेशन रूम्स या सध्या सर्वच जण वापरत असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्ससारख्या असतात. मात्र यातील महत्त्वाचा फरक असा असतो की, या कॉलवरील काही मोजके लोक बोलत असतात, तर अनेक जण केवळ ऐकण्यासाठी आलेले असतात. ठरलेल्या विषयावरील चर्चा झाल्यानंतर कॉनव्हस्रेशन रूम्स बंद होतात. पॉडकास्ट किंवा लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून साधलेल्या संवादाचे व्हिडीओ अनेकदा सोशल नेटवìकगवरच पोस्ट केले जातात. त्यामुळे ठरावीक वेळेला हे कार्यक्रम पाहू, ऐकू न शकलेल्यांना नंतर ते पाहता येतात. मात्र क्लबहाऊसमध्ये असे होत नाही. एखाद्या विशिष्ट विषयावरील चर्चा संपल्यानंतर तो संवादाचा ऑडिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नसतो. मात्र वापरकर्त्यांना संवाद सुरू असताना तो रेकॉर्ड करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इन्व्हाइट कसे मिळते?

क्लबहाऊसचे सध्याचे वापरकत्रेच नवीन व्यक्तीला हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी इन्व्हाइट पाठवू शकतात. इन्व्हाइट पाठवल्यानंतर ज्या व्यक्तीला ते मिळतं त्याला त्याच्या फोनवर मेसेजच्या माध्यमातून एक िलक पाठवली जाते. ही िलक अ‍ॅपच्या साइन-अप पेजची असते. मात्र सरसकट सर्वच वापरकत्रे कितीही लोकांना कितीही वेळा इन्व्हाइट पाठवू शकत नाहीत. एका नवीन वापरकर्त्यांने अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याला दोन इन्व्हाइट दिले जातात. ते तो त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवू शकतो. नुकत्याच एका ब्लॉगपोस्टमध्ये क्लबहाऊसची निर्मिती करणाऱ्या कंपनीने २०२१ मध्ये या अ‍ॅपचे बिटा व्हर्जन पूर्णपणे कार्यरत करायचे आणि नंतर क्लबहाऊस संपूर्ण जगासाठी सुरू करायचे असा विचार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट

क्लबहाऊस हे अ‍ॅप खरे तर मार्च २०२० पासून अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपच्या निर्मात्यांपकी एक जण भारतीय वंशाचा आहे. हे अ‍ॅप सिलिकॉन व्हॅलीमधील नवउद्योजक असणाऱ्या पॉल डेव्हिडसन आणि भारतीय वंशाच्या रोहन सेठ या दोघांनी तयार केले आहे. ऑडिओ माध्यमातून संवाद साधणारं हे अ‍ॅप तयार करण्यात भारतीय व्यक्तीचा सहभाग असणे ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मे २०२० पर्यंत हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या दीड हजारांपर्यंत होती आणि या अ‍ॅपची किंमतही १०० मिलियन डॉलर इतकी होती. मात्र काही दिवसांपूर्वी स्पेस एक्स तसेच टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या इलॉन मस्क यांनी रॉबिनहूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या व्हॅड टेनिव्ह यांच्याशी संवाद साधण्यासाठी क्लबहाऊस हे माध्यम वापरले. ही चर्चा अ‍ॅपवरील कॉनव्हस्रेशन रूम्सबरोबरच यूटय़ूबवरूनही लाइव्ह करण्यात आली होती. यामुळे क्लबहाऊसची लोकप्रियता अचानक वाढली आणि वापरकर्त्यांनी एकमेकांना इन्व्हाइट पाठवण्याचे प्रमाणही वाढले. १ फेब्रुवारी रोजी क्लब हाऊसच्या वापरकर्त्यांची संख्या २० लाखांहून अधिक आहे.

इन्व्हाइटला प्रचंड मागणी

क्लबहाऊसने आता नवीन फीचरची घोषणा केली असून यामध्ये टििपग (हॉटेलमध्ये आपण टीप देतो त्याप्रमाणे दिलेली सदिच्छा देणगी), तिकीट किंवा सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून थेट कन्टेन्ट निर्माण करणाऱ्यांना पसे देण्याचा पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध करून देणार आहे. लोकप्रियता वाढल्यानंतर क्लबहाऊसला मोठय़ा प्रमाणात देणगी दिली जाऊ लागली आहे. क्लबहाऊसची आताची किंमत १० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. या क्लबहाऊस अ‍ॅपकडे आता एअरबीएनबी, उबर आणि स्पेसएक्ससारख्या नावाजलेल्या कंपन्यांप्रमाणेच युनिकॉर्न स्टार्टअप म्हणून पाहिले जात आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार क्लबहाऊसच्या इन्व्हाइटची मागणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाढली आहे की रेडईट, ईबेसारख्या माध्यमांतून या इन्व्हाइटची विक्रीही केली जात आहे. चीनमध्येही क्लबहाऊसचे इन्व्हाइट अलिबाबा कंपनीच्या मालकीच्या सेकण्ड हॅण्ड वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या वेबसाइटवर विकले जात आहेत. मस्क यांनी टेनिव्ह यांच्याशी बोलताना या अ‍ॅपचे कौतुक केले. या अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या विषयांवर उपलब्ध असणारे पर्याय आणि तो निवडण्याच्या सोप्या पद्धती कौतुकास्पद असल्याचे मस्क या संवादादरम्यान म्हणाले. क्लबहाऊसवर लॉगइन केल्यानंतर नोटिफिकेशन डिसएबल ठेवून वापरकत्रे एका वेळेस एकाच विषयासंदर्भातील संवाद ऐकू शकतात. या अ‍ॅपची किंमत आणि वापरकर्त्यांकडून होणारी मागणी काही आठवडय़ांमध्ये अनेक पटींनी वाढली आहे.

चीनमध्ये मुक्त अभिव्यक्तीचे माध्यम

चीनसारख्या बाजारपेठेतही या अ‍ॅपला तुफान मागणी आहे. चीनमध्ये सर्वच संवाद माध्यमांवर असणारे सरकारचे नियंत्रण, दबाव तंत्र आणि सेन्सॉरशिपमध्येही या अ‍ॅपसाठीची मागणी वाढत आहे. मागील अनेक महिन्यांपासून चीनमधील फायरवॉलला (ठरावीक साइट न वापरता येणारी यंत्रणा) चकवा देत क्लबहाऊस चीनमध्ये वापरता येत होते. ज्या देशामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांना बंदी आहे तेथे हे नवे संवाद माध्यम लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या अ‍ॅपवरून दडपशाहीच्या वातावरणात मोकळेपणाने बोलण्याची संधी चिनी नागरिकांना आणि नेटकऱ्यांना मिळाली. मेन लॅण्ड चायना म्हणजेच चीनच्या मुख्य प्रांतामध्ये ज्या विषयांवर मोकळेपणे बोलल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जातो अशा विषयांवर बोलण्यासाठी क्लबहाऊसचा वापर चिनी नागरिकांनी केला. यामध्ये शिनजियांग प्रांतामध्ये उइगर मुस्लिमांवर होणारे अत्याचार, हाँगकाँगसंदर्भात चीनचे धोरण, चीन विरुद्ध तवान वाद यासारख्या विषयांचा समावेश होता. चीनमधील वापरकत्रे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे गुंतवणूकदार आणि व्यावसायिक क्लबहाऊसचा वापर देशात मुक्तपणे ज्या विषयांवर बोलण्यास बंदी आहे त्या विषयांवर बोलण्यासाठी करत आहेत. यामध्ये लोकशाही हा विषय विशेष चच्रेत असल्याचे दिसते, असे क्वात्र्झ या वेबसाइटने म्हटले आहे.

बंदीचा बडगा..

चीनमध्ये अनेक ई-कॉमर्स संकेतस्थळांवर क्लबहाऊसचे इन्व्हाइट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथील अनेक ऑनलाइन माध्यमांवर क्लबहाऊस इन्व्हाइट १५० ते ४०० युआनला (भारतीय चलनामध्ये सोळाशे ते साडेचार हजार रुपये) उपलब्ध आहेत. मात्र या अ‍ॅपची लोकप्रियता आणि त्यावर चर्चा होणारे विषय पाहता चीनने या अ‍ॅपवर ८ फेब्रुवारीपासून बंदी घातली आहे.

भारतातील प्रतिसाद

भारतात क्लबहाऊसची सुविधा सध्या केवळ आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी वापरकर्त्यांना एका इन्व्हाइटची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप चिनी कंपनीचे नसल्याने भविष्यात भारत सरकारकडून किंवा सरकारी यंत्रणांकडून यावर बंदी आणली जाण्याची शक्यता कमी आहे. मागील महिन्याभरात भारतात आठ हजारांहून अधिक जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. भारतात हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या १२ हजारांहून अधिक असल्याचे, सेन्सर टॉवरने म्हटले आहे. हे अ‍ॅप भारतात ऑनलाइन वक्ते आणि श्रोत्यांसाठी एक सोपा, सोयीस्कर आणि उत्तम पर्याय ठरू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Clubhouse app tantradnyan dd70