शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.com
पावसाचे बदलते स्वरूप, सातत्याने बदलणारे वातावरण, वाढते शहरीकरण आणि करोनाकेंद्री आरोग्य व्यवस्था याचे दुष्परिणाम याहीवर्षी प्रकर्षांने जाणवत आहेत. डेंग्यू आणि हिवतापाने राज्यात पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याचेही संकेत दिले जात आहेत. धोक्याची ही घंटा ओळखून वेळीच सावध न झाल्यास करोनासह या साथीच्या आजारांशीही झगडावे लागेल, जे सरकारी यंत्रणाच काय, सर्वसामान्यांनाही सद्य स्थितीत परवडणारे नाही.

गेल्यावर्षी करोनाच्या पहिल्या लाटेला तोंड देत असताना हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे हिवतापाचा प्रादुर्भाव राज्यात जवळपास तिपटीने वाढला. हिवताप नियंत्रणासाठी गेल्या काही वर्षांत राज्याने केलेल्या प्रयत्नांवर यामुळे पाणी फेरले आणि आपण पुन्हा तीन ते चार वर्षे मागे गेलो. यंदाही हिवतापाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत आहे. गेल्या वर्षभरात हिवतापाचे १२ हजार ९०९ रुग्ण आढळले होते आणि १२ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी सप्टेंबरमध्येच रुग्णसंख्येने नऊ हजारांचा टप्पा गाठला आहे. त्यातुलनेत मृतांचे प्रमाण अद्याप तरी कमी असून केवळ दोन मृत्यूच नोंदलेले आहेत. अद्याप पावसाळा सुरूच असल्यामुळे रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहेच आहे.

गेल्या वर्षी अन्य पावसाळी आजारांच्या चाचण्या, सर्वेक्षण कमी प्रमाणात झाल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव तुलनेने फार कमी होता. परंतु यंदा जुलैपासूनच डेंग्यूने डोके वर काढायला सुरूवात केली. गेल्यावर्षी डेंग्यूचे ३३५६ रुग्ण तर १० मृत्यू होते. परंतु यावर्षी रुग्णसंख्येत जवळपास ७७  टक्कय़ांनी वाढ होऊन ती रुग्णसंख्या ५९४४ झाली आहे, तर ११ मृत्यू झाले आहेत.

डेंग्यूचा प्रादुर्भाव विदर्भात अधिक

डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव नागपूर, वर्धा, पुणे, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, अमरावती, सोलापूर येथे झाला आहे. त्या खालोखाल मुंबई, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथेही रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत झालेल्या ११ पैकी नऊ मृत्यू विदर्भात झाले आहेत. नागपूरमध्ये मनपा आणि ग्रामीणमध्ये एकत्रित सहा, तर वर्धा, चंद्रपूर, भंडारा, ठाणे, नगर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

डेंग्यू राज्यभरात, हिवताप जिल्ह्यंपुरता

साथरोगांच्या प्रसाराबाबत राज्याचे साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे सांगतात, ‘राज्यात हिवतापाचा प्रादुर्भाव काहीच जिल्ह्यंपुरता मर्यादित आहे. यात प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हे आदिवासी भाग आणि पश्चिम भागात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे हिवतापाचे रुग्ण आढळतात. त्यामुळे हा संपूर्ण राज्यातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न नाही. परंतु डेंग्यूच्याबाबत मात्र असे म्हणता येणार नाही, कारण राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यमध्ये याचा प्रादुर्भाव आहे.’

हिवताप हा काही जिल्ह्यंपुरता मर्यादित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात असले तरी नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांसह चाचण्यांबाबत अधिक सुधारणा होणे गरजेचे आहे असे गडचिरोली जिल्ह्यतील आदिवासी भागात दहा वर्षे काम केलेले सामाजिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. योगेश काळकोडे यांनी अधोरेखित केले. ‘हिवतापाचा फैलाव वाढू नये म्हणून प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागांमध्ये मे आणि ऑगस्ट अशी दोन वेळा फवारणी होणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाकडून फवारणी केली जाते. परंतु यामध्ये अनेक त्रुटी आहेत. फवारणी करण्यासाठी अचानक गावात आल्यामुळे गावकरी त्यांच्या देवाच्या ठिकाणी किंवा स्वयंपाक खोलीत फवारणी करू देत नाहीत. या ऐवजी आधी सूचना देऊन गावकऱ्यांना सोबत घेतल्यास परिणामकपणे फवारणी करता येऊ शकते. गेल्यावर्षी तर फवारणी केलीच नाही. तसेच हिवताप रोखण्यासाठी मच्छरदाणी हे प्रभावी माध्यम आहे. आरोग्य विभागाकडून दोन व्यक्तींमागे एक मच्छरदाणी दिली जाते. परंतु प्रत्यक्षात एका मच्छरदाणीमध्ये दोन व्यक्ती झोपण्यास सर्वच कुटुंबांमधील व्यक्ती तयार होतातच असे नाही. त्यामुळे यांची संख्याही वाढविणे आवश्यक आहे. चाचण्या करण्यासाठीचे संच आता ‘आशां’कडे दिलेले आहेत. परंतु अनकेदा हे संच अपुरे असल्यामुळे चाचण्या आवश्यकतेच्या प्रमाणात केल्या जात नाहीत. पावसाळ्यात अनेक दुर्गम भागात दळणवळण पूर्णपणे बंद असते. अशा भागांमधील संभाव्य प्रादुर्भाव, रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात चाचणी संच आणि औषधे यांचा आगाऊ साठा पावसाळ्यापूर्वीच देणे गरजेचे आहे. फवारणी, मच्छरदाणीचे वाटप आणि त्वरित निदान आणि उपचार या तीन बाबी लोकसहभागातून करणे महत्त्वाचे आहे, असे मत डॉ. योगेश यांनी व्यक्त केले.

चिकनगुनियाचेही वाढते प्रमाण

डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजारांचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या माध्यमातून होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला की चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्याही वाढते. यावर्षी देखील हीच स्थिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे, तर रुग्णसंख्येत २०१८ पेक्षाही ४० टक्कय़ांनी वाढ झाली आहे. पुणे, नाशिक मनपा आणि ग्रामीण, सातारा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कोल्हापूर येथे चिकनगुनियांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

स्वयंसेवकांच्या नियुक्तीत दिरंगाई

डेंग्यूच्या किंवा हिवतापाच्या डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी घराघरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी मनपा आणि ग्रामीणमध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाते. मोठय़ा महानगरपालिकेला ५० तर ग्रामीण आणि छोटय़ा नगरपालिकांमध्ये २५ स्वयंसेवकांची नियुक्ती केली.  गेल्यावर्षी निधीच प्राप्त न झाल्यामुळे नोव्हेंबरनंतर हे सर्वेक्षण सुरु केले गेले. याही वर्षी डेंग्यूचा फैलाव वाढल्यावर सप्टेंबरपासून स्वयंसेवकांची नियुक्ती करून सर्वेक्षण सुरू केले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे डेंग्यू वाढीस

गेल्या काही वर्षांंपासून डेंग्यूचे प्रमाण वाढत असून ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात प्रसाराचे प्रमाण अधिक आहे. अनियमित पाऊस आणि सातत्याने होणारे वातावरणातील चढ-उतार डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण करते. हे देखील डेग्यूंच्या फैलावासाठी कारणीभूत घटक आहेत. शहरे विस्तारत असली तरी त्या तुलनेत राहण्याच्या आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा मात्र विस्तार झालेला नाही.  सांडपाणी, शौचालये इत्यादी ठिकाणच्या पाण्याचे व्यवस्थापन योग्य रितीने केले जात नाही.  साचून राहिलेल्या या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढत असल्याने मग फैलावही वाढतो. तसेच अनेक बांधकाम प्रकल्प शहरांमध्ये सुरू असून या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा योग्यरितीने होत नाही. त्यामुळेही येथेही मोठय़ा प्रमाणात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढते.  झोपडपट्टय़ांमध्ये पावसाळ्यात घरांवर ताडपत्री पसरली जाते. त्यातही पाणी साचून डेंग्यूच्या अळ्यांची वाढ होते.  तेव्हा शहरांचे नियोजन योग्यरितीने झाल्यास डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येईल, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.

डेंग्यू सर्वांचा आजार

डेंग्यूच्या अळ्या या स्वच्छ पाण्यातही वाढतात. त्यामुळे केवळ झोपडपट्टय़ांमध्ये याचा प्रादुर्भाव आहे, असे नाही. काही वर्षांंपूर्वी मुंबईत विख्यात निर्मात्यांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला. मृत्यूनंतर केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांच्या घराच्या अंगणातील कारंज्याच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. डेंग्यूच्या अळ्यांची वाढ कुंडयातील साठलेले पाणी, कांरज्याचे पाणी, इमारतींच्या गच्चीवर साठलेले पाणी यामध्येही होत असते. काही ठिकाणी वापरासाठी पाणी भरून ठेवले जाते. असे पाणी झाकून न ठेवल्यास त्यातही अळ्या वाढण्याची शक्यता असते.  झोपडपट्टीसह मध्य आणि  उच्च वर्गातील घरांमध्येही डेंग्यूचा अधिवास असल्याचे आढळले आहे.

बांधकाम क्षेत्रांकडे दुर्लक्ष

बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याचा संभव अधिक असतो. परंतु संबंधित व्यक्तीला किंवा यंत्रणेला पाणी साठू नये याची दक्षता घेण्याबाबत कोणतीही नियमावली उपलब्ध नाही. पालिकेकडून तपासणी केल्यावर काही वेळा नोटीस बजावली जाते. परंतु त्यानंतर मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नाही. त्यामुळे याबाबत कडक नियम तयार होणेही आवश्यक आहे.

बालकांची काळजी आवश्यक

डेंग्यूच्या अळ्या या वर्षभर पाण्याशिवाय राहतात. पाणी उपलब्ध होताच त्यांची वाढ व्हायला लागते. तसेच डेंग्यूचा डास दिवसा चावत असल्यामुळे केवळ घरापुरती स्वच्छता करून उपयोगाचे नाही. कामाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणीही पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना दिवसादेखील मच्छरदाणीमध्ये झोपवावे. लहान मुलांमध्ये आजाराची तीव्रता अधिक असल्यामुळे यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती  कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी दिली.

डेंग्यू, हिवताप संसर्गजन्य आजार नाहीत

डेंग्यू, हिवतापाचा प्रसार हा डासांच्याच माध्यमातून होतो. डेंग्यूचा फैलाव एडिस इजिप्ती या डासापासून तर अ‍ॅनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे हिवतापाचा फैलाव होतो. त्यामुळे हे दोन्ही आजार संसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होत नाहीत.

नागरिकांची सामाजिक जबाबदारी

मुंबईत गेले अनेक वर्षे या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी कार्यरत असलेल्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर सांगतात, ‘डेंग्यू नियंत्रणाची १० टक्के जबाबदारी ही महानगरपालिकेची परंतु ९० टक्के जबाबदारी ही नागरिकांची आहे. पाऊस गेल्यावरही या डासांच्या अळ्यांची उत्पत्ती पाणी साठवणू ठेवलेले पिंप, इमारतीमध्ये काचेच्या बाटल्यांमध्ये लावलेली रोपे, कुंडय़ांच्या खालील थाळ्या इत्यादी ठिकाणी होते. तेव्हा यांची स्वच्छता वेळच्या वेळेस केल्यास डासांच्या अळ्यांची पैदास वाढणार नाही. रुग्ण सापड्ल्यावर त्याच्या घराजवळील पिंप, पावसामध्ये उभारलेले शेड, कुंडय़ा इत्यादी ठिकाणी हमखास आम्हाला डेंग्यूच्या अळ्या सापडतात. डेंग्यूच्या डासाच्या अंडय़ांमधून अळ्या आणि अळ्यांमधून डास हे चक्र पूर्ण होण्यास चार दिवसांचा कालवधी लागतो. हे चक्र वर्षांनुवर्षे असेच सुरू आहे. त्यामुळे डेंग्यूच्या नियंत्रणासाठी नागरिकांच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे, असे मत नारिंग्रेकर यांनी व्यक्त केले.

डेंग्यू, हिवताप या आजारांचे नियंत्रण आरोग्य यंत्रणा आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच होऊ शकते.