अमेरिका
प्राजक्ता पाडगांवकर, अटलांटा जॉर्जिया

जिगसॉ पझल! अनेक तुकडे एकत्र जोडून तयार होणारे चित्रकोडे! वेळ घालवायला अतिशय उत्तम साधन!  सोसासोसाने टॉयलेट पेपर आणि सॅनिटायझर जमा करणाऱ्या ह्य अमेरिकनांना सध्या सगळ्यात जास्त तुटवडा कशाचा भासत असेल तर या जुन्या खेळाचा अर्थात जिगसॉ पझलचा! अनेक लोक सध्या घरी अडकून पडल्याने लोकांना जुने खेळ आठवू लागले आहेत, जुने पदार्थ करून पाहात आहेत आणि अर्थात इथल्या सर्व अत्यावश्यक सेवादळांतल्या लोकांना हुरूप यावा म्हणून आपापल्या घरातून गाणी, संगीत आणि टाळ्या असेही सरू आहेच! वरवर पाहता, जगातील इतर सर्व करोनाग्रस्त देशांसारखे अमेरिकेतदेखील सुरू आहे, मात्र या वेळी सगळेच आतून बदलल्यासारखे झाले आहे.

करोनामुळे, अमेरिका नामक बडय़ा घराचे, आतून पोखरून पोकळ झालेले वासे दिसू लागले आहेत! एवढय़ा मोठय़ा अस्मानी संकटासमोरदेखील इथली कडवी राजकीय मतभिन्नता टिकून आहे, तसेच इतर देशांपेक्षा, इथली सरकारी यंत्रणा, या संकटाला ओळखण्यात आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात मागे पडली आहे.

मार्च महिन्यापर्यंत या विकाराबद्दल, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या बंदोबस्ताबद्दल इथे पूर्ण गोंधळ होता, मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासून इथल्या स्थानिक महानगरपालिकांनी हळूहळू शाळा, पाळणाघरे बंद करण्यास सुरुवात केली! मग थोडी दुकाने, ऑफिस ऐच्छिक बंद घोषित करू लागले आणि अगदी शेवटी इथल्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संचारबंदी काही प्रमाणात जाहीर केली! त्यातदेखील अत्यावश्यक सेवांत कोणाला परवानगी द्यायची यावर प्रत्येक राज्यात भेद दिसून येत आहेत. काही ठिकाणी पिस्तुले, बंदुका विकणारी दुकाने, त्याच्या सरावाच्या रेंजेस हे अत्यावश्यक म्हणून उघडे आहेत. तर काही ठिकाणी गॉल्फ कोर्स सुरू आहेत! काही ठिकाणी दारूची दुकाने तर काही राज्यांत गांजाची दुकाने! तसेच संचारबंदी संपूर्ण देशात सरसकट लागू न करता काही राज्यांत ती अगदी दोन आठवडय़ांपूर्वी लागू करण्यात आली! त्यातदेखील लोक अगदी सहज समुद्रकिनारी सहलीला गेलेले आढळत होते! कोणत्याही प्रकारचे सक्तीचे नियम न घालून दिल्याने अनेक लोकांचे याबाबत पुष्कळ गरसमज आणि गरवर्तन सुरूच आहे. अमेरिकेत अचानक वाढलेला करोना रुग्णांचा आकडा, या सगळ्या पाश्र्वभूमीमुळे समजायला उपयुक्त ठरेल.

जॉन्स  हॉपकिन्स विद्यापीठ आणि इतर तज्ज्ञांच्या मते,  अमेरिकेत अद्याप म्हणाव्या तितक्या रोगनिदान चाचण्या झालेल्या नाहीत. आणि केवळ लॉकडाऊन करून पुढे रोगनिदान, बाधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना आणि रुग्णांना क्वारंटाइन करणे असे पुढचे अनेक टप्पे इथे पुरेशा प्रमाणात राबवले जाताना दिसत नाहीत. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनच्या जाहीर आकडेवारीनुसार एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून तिसऱ्या आठवडय़ापर्यंत लॅब टेस्टिंग १७.३ % पासून १७.८ % इतके वाढले. इस्पितळात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या एक मार्चपासून एकत्रितरीत्या मोजली तर दर एक लाख लोकांमागे २० रुग्ण इतकी आहे. रुग्णांत सर्वात अधिक संख्या ही ६५ आणि पुढील वयोगटातील असून त्या खालोखाल ५०-६४ वयोगटातील व्यक्तींना या रोगापासून धोका संभवतो. अमेरिकेत आत्तापर्यंतचे करोनाचे रुग्ण जवळपास साडेआठ  ते नऊ लाख इतके असून, त्यातील जवळपास पन्नास हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. या आकडेवारीतदेखील एक आकृतिबंध दिसून येत आहे, कृष्णवर्णीयांमध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आढळत आहे. अनेक पिढय़ांचे सामाजिक, आíथक शोषण, कमी शिक्षण, कमजोर प्रतिकारशक्ती यामुळे हे घडत आहे. आणखी एक अतिशय भयानक आकृतिबंध समोर येत आहे, तो म्हणजे अमेरिकेतील अनेक राज्यांत खासगी आणि सरकारी वृद्ध संगोपन केंद्रांतून आणि नìसग होम्समध्ये करोना अक्षरश थमान घालत आहे. न्यू जर्सी, सिअ‍ॅटल, न्यू यॉर्क, सगळीकडे फेब्रुवारी अखेरपासून करोनाचे बळी दिसून येत आहेत. इथल्या नर्सिग होम्समध्ये अशा प्रकारच्या रोगाशी सामना करण्याची अजिबात तयारी नसल्याने, अनेक वृद्धांचे नाहक बळी जात आहेत, अनेक संगोपक, व्यवस्थापक आणि रुग्णसेवकदेखील याला बळी पडत आहेत. अनेक अतिवृद्ध, डिमेंशियाचे रुग्ण, त्यांचे जोडीदार, काळजीवाहक या सगळ्यांचे अतोनात हाल होत आहेत,  इस्पितळांना प्राधान्य दिल्यामुळे साधे मास्क, संरक्षक कपडे, हातमोजे यांचादेखील तुटवडा या सर्व ठिकाणी जाणवत आहे.

या सगळ्या गोंधळात या आठवडय़ात अमेरिकेत ठिकठिकाणी लोकांनी करोनाच्या संचारबंदीविरुद्ध निदर्शने करायला सुरुवात केली आहे. गेल्या पाच आठवडय़ांत अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी नोंदणी केली आहे. हा आकडादेखील काहीसा कमी आहे, कारण अनेक लोकांना अद्याप सरकारी संकेतस्थळावर नोंदणी करायला जमलेले नाही आहे, तसेच अनेक लोक या मापकात बसत नसल्यानेदेखील बेरोजगार झाले असून त्यांना भत्तादेखील मिळणार नाही. एकीकडे निदर्शने करणाऱ्या लोकांना इथल्या राष्ट्राध्यक्षांनी पािंठंबा दर्शवला आहे, तर दुसरीकडे अनेक राज्यांना संचारबंदी सुरू ठेवण्याबाबत कडक धोरणांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्वत ट्रम्पनी दिले आहेत. हा क्रूर विरोधाभास, अमेरिकन जनतेला सर्वार्थाने  महाग पडत आहे.

या अतिशय निर्णायक आणि कठीण काळात, इथले सर्व राज्यकत्रे एकजुटीने जनतेला आश्वस्त न करता, त्यांच्यातील राजकीय भेदांना अधिक उफाळू देत आहेत, याहून शोचनीय काहीच नाही! अनेक विरोधी इशारे, अनेक गोंधळात टाकणारे, वेळोवेळी बदलत राहणारे नियम, भष्टाचार, अविवेकी धोरणे आणि एकमेकांना दूषणे देणारे हीन दर्जाचे राजकारण ह्य संपूर्ण काळाला अधिक भेसूर आणि भीषण असे रूप देत आहे.

लोक वैयक्तिक पातळीवर आणि खासगी कंपन्या मोठय़ा प्रमाणात मदतीस पुढे आलेल्या असल्या तरी केंद्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवर एकमत, एकवाक्यता नसल्याने अमेरिकेस प्रचंड मनुष्यहानी आणि आíथक हानीस सामोरे जावे लागत आहे!

हे सगळे कमी पडल्यासारखे, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनचे मुख्यालय असलेल्या जॉर्जयिा राज्यातील गव्हर्नरने शुक्रवार दिनांक २४ एप्रिलपासून संचारबंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. यात प्रामुख्याने ब्युटी पार्लर, केशकर्तनालये, सिनेमा हॉल, बॉलिंग अ‍ॅली, मसाज पार्लर, टॅटू पार्लर सर्वप्रथम उघडणार आहेत.

हे सगळे एकंदर माहितीचे, गोष्टींचे आणि विचारसरणीचे एकमेकांत सहज नीट न बसणारे असे जिगसॉचे तुकडे आहेत, त्या सर्व तुकडय़ांचे एकत्रित मिळून एक समजेल असे, रुचेल आणि सोसेल असे चित्र लवकरच तयार होवो, एवढीच सदिच्छा!

ऑस्ट्रिया सरकारकडून आर्थिक मदत 

ऑस्ट्रिया
विनीत देशपांडे, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

८ एप्रिलला संपूर्ण ऑस्ट्रियामध्ये करोना रुग्णांची संख्या १२ हजार ८५२ होती. मात्र, प्रशासनाकडून सुमारे १ लाख २० हजार तपासण्या करण्यात आलेल्या होत्या. चार दिवसांपूर्वी नागरिकांना सूचना देऊन १६ मार्च रोजीच

टाळेबंदी जाहीर केली. त्यामध्ये घरातून काम करणं शक्य नाही अशांना, सुपर मार्केट-औषधे घेणाऱ्यांना आणि इतरांना मदत करणाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. तसेच गर्दी न करण्याच्या अटीवर बाहेर सायकलिंग, व्यायाम, करण्याचीही परवानगी दिली होती. वसंताचे आगमन असल्याने गर्दी होणार, याचा अंदाज घेत बगिचे बंद करण्यात आले. मॉल्स, सिनेमागृहे बंद करण्यात आली. मात्र, आवश्यक वस्तूंचा पुरवठाही सुरळीत होता. तसेच सार्वजनिक वाहतूक सुरू होती. मात्र, नागरिकांनी दक्षता घेऊन त्याचा वापर केला नाही. दोन आठवडय़ांपूर्वी २४३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला.  सध्या १४ हजार ८०० नागरिक करोनाबाधित आहेत. त्याचबरोबर प्रशासनाने २ लाख तपासण्यादेखील केल्या. देशात सध्या रुग्णांची संख्या कमी होत आहे ही चांगली बाब म्हणायला हवी. १४ हजार रुग्णांपैकी १० हजार ५०० नागरिक करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे  प्रशासनाकडून टाळेबंदी हळूहळू उठवायला सुरुवात झाली आहे. छोटी छोटी दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही दुकानात जाताना मास्क घालणं अनिवार्य आहे. योग्य काळजी घेऊन बगिचात प्रवेश किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांच्या वापराची  परवानगी देण्यात आली आहे. तसेच १ मेपासून मोठी दुकाने, मॉल्स उघडण्याचा विचार प्रशासन करतं आहे. मात्र, मास्क अनिवार्य असेल. १५ मेपासून रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू होणार आहेत. टाळेबंदी पंधरवडय़ाच्या अंतराने टप्प्याटप्प्यात उठविली जाणार आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढली तर टाळेबंदी पुन्हा लागू करता येईल, असे गृहीतक यामागे आहे. केंद्र आणि राज्य सरकारने व्यवस्थित नियोजन केलं होतं. शेजारच्या इटलीतील परिस्थिती पाहता ऑस्ट्रियाने योग्य वेळेत निर्णय घेतले, असे म्हणावे लागेल. नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला. लोकांकडूनही मोठय़ा प्रमाणावर नियमही पाळले जात होते. बेरोजगार असणाऱ्यांना सरकारने आर्थिक मदत केली. संबंधित कंपन्यांनीही आपल्या कामगारांना वेळेवर वेतन द्यावे यासाठीही सरकारने मदत केली. त्याचबरोबर कंत्राटी आणि मुक्त कामगार पद्धतीने कार्यरत असणाऱ्यांनाही प्रशासनाने आर्थिक मदत केली आहे.

करोना आणि ऑस्ट्रेलियन

ऑस्ट्रेलिया
इरा पाटकर, कॅनबेरा

मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ापासूनच स्कॉट मॉरिसनच्या ऑस्ट्रेलियन सरकारने दक्षता घ्यायला सुरुवात केली. तेव्हा शाळा प्युपील फ्री करण्यात आल्या. म्हणजेच शाळेत मुलांना पाठवायचं की नाही हा निर्णय पालकांचा होता. मात्र जीवनावश्यक या सदरासाठी शाळा सुरू होत्या. कोविड-१९ चे चटके जगाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याआधीच १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था होरपळून निघत होती. ऑक्टोबरपासूनच ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन उद्योगाला भयानक जंगल वणव्याचा फटका बसला. त्या दुर्घटनेत अनेक प्राणी, माणसे मारली गेली आणि जंगले जळून खाक झाली. तो फटका फेब्रुवारी २०पर्यंत आटोक्यात येतो ना येतो तोच करोनाचं थैमान सुरू झालं. अशा वेळी देशाची अर्थव्यवस्था थांबता कामा नये असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना वाटणं साहजिकच होतं. आधी टाळेबंदीच्या भीतीने लोकांनी सुपर मार्केटमधून गोणीच्या गोणी भरतील असे सामान नेले. टॉयलेट पेपरच्या मारामाऱ्यांनी तर समाजमाध्यमांवर युद्ध सुरू झालं होतं. दुकानांत साहित्य मिळेना म्हणून काही नियम केले गेले. प्रत्येकाला २ पास्ता सॉस, १ टॉयलेट रोल, २ बाटली दूध असे र्निबध घातले गेले.

नोकरदार वर्गापैकी ७०-८० टक्के लोकांना घरातून काम करण्यासाठी सोयी पुरवण्यात आल्या. मुलांनासुद्धा शाळेकडून लॅपटॉप देण्यात आले. त्यांच्या तासिका गुगल क्लासरूमवर होतात. शिक्षक व्हिडीओ माध्यमातून अभ्यास पाठवतात. मुलांनी तो करून गुगल क्लासरूममध्ये सबमिट करायचा. अभ्यासापर्यंत ठीक आहे. पण मुलांच्या घराबाहेरच्या सर्व हालचाली बंद आहेत. ऑस्ट्रेलियाचा फुटी सॉकरचा सीझन थांबला आहे. कुटुंबाना बाहेर चालायला, सायकल चालवायला मुभा आहे. परसदारात फक्त कुटुंबातील सदस्यच खेळू शकतात. व्यक्तींमध्ये अंतराचे नियम पाळावेच लागतात. बाहेर मित्रमैत्रिणींसोबत फिरणाऱ्यांना त्वरित दंड ठोठावला जातो. दुकानं, झाडूवाला, प्लंबर आदी सेवा सुरू आहेत. नागरिकही नियम पाळताहेत. सेवाभावी संस्था आणि भारतीय उपाहारगृहे परदेशी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना अन्नधान्य, जेवण विनामूल्य घरपोच दिलं जातंय. तणावाखाली आलेल्यांच्या समुपदेशनाची सोय आहे. झुंबा, योग, डान्स क्लास झूमवर घेतले जात आहेत. कुटुंबाबरोबर प्रत्येक जण वेळ घालवतो आहे.

प्रशासनाची सतर्कता

ओमान
शशांक गिरडकर, मस्कत

ओमानमध्ये मार्चअखेरीस करोनाग्रस्तांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. पण प्रशासनाने तत्परता दाखवत वेळीच योग्य निर्णय घेतले. आखाती देशात स्थानिक नागरिकांपेक्षा प्रवासी नागरिकांची संख्या जास्त असते. इथे नोकरीनिमित्ताने आलेलेच त्यात अधिक असतात. सर्वच आखाती देशांमध्ये हेच चित्र आहे. त्यातही भारतीयच अधिक. करोनाबाधितांची संख्या वाढू लागली तसा एक प्रकारचा तणाव आणि काळजी सर्वाच्या मनात जाणवू लागली होती. स्थानिक प्रशासनाने अगदी तातडीची पावले उचलून अत्यावश्यक धोरणे राबवली. करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच खंबीर भूमिका घेत सर्वाना आवश्यक त्या सूचना आणि माहिती पुरविली. सुरुवातीच्या काळातच पूर्ण दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. आवश्यक वस्तूंखेरीज सर्व दुकाने आणि मॉल्स बंद करण्याचा निर्णय अगदी योग्य वेळेत घेण्यात आला. कंपन्यांना ३० टक्के कर्मचाऱ्यांवर काम करण्याची परवानगी मिळाली. शुक्रवारची प्रार्थनासुद्धा बंद करण्याचा आदेश देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे त्याचे पुरेपूर पालननागरिकांनी केले.

प्रशासनाने कंपन्यांना नियमावली पाठवून दिली आणि र्निबध कडक केले. नागरिकांकडूनही त्या नियमांचे पालन होताना दिसते आहे. ऑफिसमध्ये येण्यापूर्वी थर्मल डिटेक्टरने चाचणी केली जाते. प्रशासनाने अगदी योग्य वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे ओमानमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतीय दूतावासांतर्फेही योग्य त्या सूचना दिल्या जाताहेत. विद्यार्थाचे नुकसान नको म्हणून त्यांनी भारतीय शाळांना सूचना देऊन ऑनलाइन तासिकांची व्यवस्था केली आहे. ओमानमधील बरेच विद्यार्थी इंग्लंडमध्ये किंवा युरोपातील देशांमध्ये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिकायला जातात. सर्व प्रकारची विमान वाहतूक बंद झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी खास विमाने पाठवून त्यांना परत आणण्यात आले आणि त्यांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये विलगीकरणात ठेवले आहे. येथील व्हिसाच्या कडक नियमांमुळे काही लोक आपल्या देशात जाऊ  शकलेले नाहीत. पण त्यांच्याजवळ इथे राहण्यायोग्य कायदेशीर अधिकार राहत नाही, सरतेशेवटी ते बेकायदेशीर ठरतात आणि त्यांना इथल्या कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. येथील प्रशासनाने मानवीय दृष्टिकोनातून विचार करून अशा सर्वाना सहभागी करून घ्यायचा एक योग्य निर्णय घेतला. करोना चाचणीसाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याचे कागदपत्र न मागण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर करोनाग्रस्त प्रत्येक व्यक्तीला विनामूल्य उपचार करून देण्याची हमी घेतली. सध्या ओमानमध्ये १६०० पेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या आहे. ८ जणांचा मृत्यू झालेला आहे. इतर देशांशी तुलना करता ओमानच्या प्रशासनाच्या दक्षतेमुळे आकडा खूपच कमी आहे.

सामान्यांची तपासणी गरजेची..

इंग्लंड
अक्षय उपाध्ये, लंडन

इंग्लंडमध्ये दोन आठवडय़ांपूर्वी करोनाबाधितांची संख्या ६० हजार ७०० होती आणि ७ हजार ९७ रुग्णांचा त्यामध्ये मृत्यू झाला. ही आकडेवारी केवळ हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रुग्णांचीच आहे. सद्य:स्थितीमध्ये १ लाख ३३ हजार ४९५ करोनाबाधित आहेत, तर मृतांची संख्याही १८ हजार १०० वर गेलेली आहे. म्हणजेच आजवर जी काही आकडेवारी वारंवार सांगितली जात होती ती केवळ हॉस्पिटलमधील होती. ज्यांना लक्षणे होती त्यांना इंग्लंडच्या शासनाने घरातच ठेवले. तसेच तपासणीची संख्याही कमी होती, त्यामुळे त्याची आकडेवारी जाहीर केलेली नव्हती. आणि ज्या तपासण्या होत होत्या त्या केवळ डॉक्टर, नर्सेस यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याच. सामान्यांसाठी करोनाची चाचणीच केली जात नाही. वृद्धाश्रमात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आणि बहुतेकांच्या मृत्यूच्या दाखल्यावर (इतर कारणे असतानाही) ‘करोनाने मृत्यू’ अशीच नोंद केली जात होती. त्यामुळे वृद्धाश्रमात मृतांची संख्या ही २२ हजारांपर्यंत गेली. इंग्लंडमध्ये दोन आठवडय़ांपासून टाळेबंदी सुरू आहे आणि इथले नागरिक स्वतहून नियम पाळताहेत. व्यायाम, सायकलिंगसाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच किराणा साहित्य खरेदीसाठीही परवानगी आहे. इतरांना मदत करायची असेल तर तीही परवानगी देण्यात आली आहे. या तीन बाबी वगळता इतर कोणत्याच बाबींना परवानगी नाही. इंग्लंडच्या अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या आर्थिक मदत योजना जाहीर केल्या आहेत. नोकरदारांना त्यांच्या वेतनाच्या ८० टक्के रक्कम सरकारकडून दिली जात आहे. त्यामुळे लोकांच्या नोकऱ्या वाचल्या आहेत. जे स्वयंरोजगारावर जगतात, त्यांनाही २० एप्रिलपर्यंत अर्ज करायला सांगितलेले होते. ज्यांनी ते अर्ज केले त्यांना सहा दिवसांमध्ये सरकारकडून वेतन देण्यात आले. एकूण जीडीपीच्या १५ टक्के रक्कम नागरिकांना दिल्यामुळे बेरोजगारीचा आणि आर्थिक फटका इंग्लंडला बसलेला नाही. सुरुवातीच्या काळात इंग्लंडच्या पंतप्रधानांनी करोनाला फारशा गांभीर्याने घेतलेले नव्हते. नंतर रुग्णांची संख्या जसजशी वाढू लागली तेव्हा ते गंभीर विचार करू लागले. व्हेंटिलेटर कमी होते, नंतर मात्र त्यांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, आजही पीपीई (वैयक्तिक सुरक्षा साधने) संख्या खूप कमी आहे. सामान्यांच्या तपासण्याच केल्या जात नाहीत, त्या होणं गरजेचं आहे.

‘करोना’संदर्भातील संख्या अवास्तव

बेल्जियम
शौनक खांडेकर, ब्रुसेल्स

बेल्जियमध्ये दोन आठवडय़ांपूर्वी २३ हजार ४०० करोना रुग्ण होते. त्यात हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ५ हजार ६०० होती आणि मृतांचा आकडा २ हजार २०० इतका होता. सद्य:स्थितीत इथे करोनाबाधितांची संख्या वाढलेली असून ती ४१ हजार ८०० वर गेली आहे आणि मृतांच्या आकडा ६ हजार २०० वर. ही आकडेवारी हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्यांची आहे. मात्र, वृद्धाश्रमांमधील मृत्यू पावलेल्यांचाही समावेश करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये करण्यात आल्याने करोनाचा मृत्युदर अचानक फुगल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर कुटुंबातील एक जण करोनाबाधित असला तरी संपूर्ण कुटुंबच करोनाबाधित म्हणून घोषित केले जात आहे, त्यामुळेही करोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसत असल्याचे आरोग्यसेवकांचे म्हणणे आहे.

१२ एप्रिलनंतर मात्र परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत होती. कारण प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि लोकांनी त्यांना दिलेला प्रतिसाद योग्य होता. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. खरं तर १२ मार्चला टाळेबंदी जाहीर झाली आणि वेगवेगळे नियम लागू करण्यात आले. सुपर मार्केटमध्ये केवळ दहा माणसांना परवानगी होती आणि साहित्य खरेदी करण्याची वेळ अर्धा तास देण्यात आली होती. कंपन्यांमधील नोकरदारांना परवनगीपत्राशिवाय ऑफिसला जात येत नव्हते. जे ऑफिसला जात होते त्यांची जबाबदारी संबंधित कंपन्यांना घेण्याची सक्ती केलेली होती. नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला जात होता. करोनामुळे वातावरण स्वच्छ झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या अनुभवासाठी लोक रस्त्यावर येत होते. कुटुंबासोबत फिरण्याची परवानगी होती. मात्र, मित्रांसोबत गर्दी करून फिरायला बंदी होती. कमीत कमी लोकांना भेटावे अशी अटदेखील घातलेली होती. जगभरात करोनामुळे आवश्यक वस्तूंचा तुटवडा असताना बेल्जियममध्ये सर्व वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. अद्याप १० दिवस टाळेबंदी उठवली जाणार नाही, अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.