विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या जगभरात करोनाखालोखाल चर्चा होणारा विषय आहे तो चीन. सुरुवातीला चर्चा झाली ती करोनाचे केंद्र ठरलेल्या वुहानबद्दल; तिथेच अनेक विषाणूंच्या संक्रमणाला कशी आणि का सुरुवात होते. काही काळ वुहानमध्ये प्राण्यांची मांसविक्री करणारा बाजार चर्चेत होता. त्याच वेळेस पलीकडे करोना हा चीनने जैविकयुद्धासाठी तयार केलेला विषाणू आहे इथवर चर्चा झाली. खुद्द महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही चीनला लक्ष्य केल्यानंतर मग पुन्हा चर्चेला ऊत आला. बंद दरवाजाआड बळींची संख्या चीन लपवतो आहे इथपासून ते आता जगातील मोठे उद्योग चीनमधून गाशा गुंडाळणार इथवर. अमेरिकेने तर थेट जागतिक आरोग्य संघटनेवरही टीकास्त्र सोडले. त्यात काही अंशी तथ्यही होते. कारण या काळात जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका चीनबाबत मवाळ असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. प्रश्न असा की, यामागचे कारण काय? चीन महासत्तेच्या दिशेने जाणारा देश आहे हे की, जगातील बहुसंख्य देश अनेक उत्पादनांसाठी चीनवर अवलंबून आहेत हे? अर्थात चीनला हे पक्के ठाऊक आहे की, अमेरिकेसह जगातील अनेक देश त्याच्यावर अवलंबून आहेत. कारण काहीही असले तरी चीन चर्चेत आहे आणि राहील.

पलीकडच्या तीरावर असलेले भारतासारखे देशही चीनवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आता चीनमधील उद्योग पर्याय म्हणून भारताकडे पाहतील आणि इथे येतील अशी एक हाळी देण्यात आली. ही हाळी सत्यात आणायची तर गुंतवणूकप्रिय ठरणारे असे अनेक निर्णय उद्योगांसाठी घ्यावे लागतील. ते कदाचित सरकार घेईलदेखील, पण सरकारी धोरणांबाबत शाश्वती निर्माण होईल, असे विश्वासार्ह वातावरण आणि सामाजिक सुरक्षेचे कवचही निर्माण करावे लागेल.

दरम्यान, चीनमध्ये काय सुरू आहे याकडे लक्ष देणे रोचक ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कोविडवर यशस्वी नियंत्रण मिळवून उद्योगधंदे सुरू केले. तेथील कंपन्या सुरू झाल्या आहेत, उत्पादनाला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर तेथील डिस्नीलॅण्डही सुरू झाले असून पर्यटकांनी त्याला भेट देण्यास याच आठवडय़ात सुरुवात केली आहे. यावर अनेकांचे म्हणणे असे की, तिथे लोकशाही कुठाय? अमेरिकेने तर चीनला हे का जमले आणि त्यामागे कटकारस्थान कसे आहे याचा अहवाल जारी केला आहे. त्यात आकडेवारी दिली आहे की, जानेवारीत ही साथ येणार याची कुणकुण लागताच चीनने पीपीई किटस, सॅनिटायझर जगभरातून आयात केले आणि चीनची निर्यात जाणीवपूर्वक कमी केली. गरजेला लागले तर ते स्वत:कडे असावेत आणि जगाला मात्र उपलब्ध होऊ नयेत, असा दुहेरी कुटिल हेतू असल्याचा आरोप अमेरिकन अहवालात आहे. चीन पारदर्शी नाही, त्याने अनेक गोष्टी लपवल्या. हे दोन्ही आरोप खरे आहेत, असे वादासाठी गृहीत धरले तरी त्यांनी कोविडप्रसार नियंत्रणात आणला आणि उद्योग व उत्पादन सुरू केले या महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करता येत नाही. शिवाय तिथून जागतिक मोठय़ा कंपन्यांनीही खूप मोठा काढता पाय अद्याप घेतलेला नाही. उलटपक्षी उद्योगजगतात त्यांनी उत्पादन सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक अधिक होत आहे. शिवाय भारतासारख्या देशाला असे वाटतही असले की, या कंपन्या लगेचच भारतात येतील, तर तशीही थेट शक्यता नाही. कारण गेल्या तीन वर्षांतील ट्रेण्ड सांगतो आहे की, चीनला पर्याय म्हणून थायलंड, व्हिएतनाम, कम्बोडिया, तैवान पुढे आले आहेत. कंपन्यांची पसंती त्यांना आहे. कारण तिथे आवश्यक ते वातावरण आणि कमी पैशांत सारे काही चांगले उपलब्ध आहे. त्यामुळे इतरांच्या अपयशात संधी शोधण्यापेक्षा आपल्याकडे उद्योगप्रिय आणि सर्वार्थाने सुरक्षित वातावरण निर्माण करणे हाच महत्त्वाचा धडा घ्यावा लागेल. केवळ ‘चीन चीन चून’ असे म्हणून टीका करण्यात काहीच अर्थ नाही. जगात काय घडतेय याचा मथितार्थ समजून घेत पावले उचलायला हवीत!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pandemic china products china industries matitartha dd70
First published on: 15-05-2020 at 06:57 IST