स्त्रियांच्या नोकरी -व्यवसायाच्या व्यापामुळे हल्ली रेडिमेड फराळ आणणं सोयीचं ठरायला लागलं आहे. ती काळाची गरज असली तरी एकेकाळी दिवाळीची चाहूल लागे ती त्याआधी आठ दिवस घरोघरी सुरू असलेल्या फराळाच्या तयारीमुळे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आताच्या काळात मिक्सर, मायक्रोवेव्ह यांच्या मदतीने पदार्थ करणं तुलनेत सोपं झालं आहे. ही यंत्रे नव्हती तेव्हा दिवाळीचे पदार्थ कसे केले जात आणि आता या यंत्रांच्या मदतीने कसे केले जातात (पाहा सर्व चौकटी) याविषयी साद्यंत माहिती सोबत दिली आहे. पारंपरिक पद्धतीची माहिती पद्धत १ मध्ये लक्ष्मी खडीवाले तर नव्या पद्धतीची माहिती पद्धत २  मध्ये यशगौरी गोखले यांनी दिली आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी आईच्या सांगण्यावरून मी, आईकरिता एक कप ‘बुडबुडेवाला चहा’ बनविला. आमच्या आईला तो एकदम पसंत पडला. आमच्या घरात आम्ही पाच भावंडे, कोकणातील चुलत भावंडे व वडिलांच्या कापडाच्या दुकानातील नोकर मंडळी, अशा जवळपास पंचवीस जणांकरिता, आमच्या आईला सकाळ-सायंकाळ भोजनाचा मोठा ‘कारोभार’ न कंटाळता करावा लागे. त्या काळात आजच्यासारखा लहान मुलांवर अभ्यासाचा बोजा अजिबात नव्हता. त्यामुळे मला, आईला तिच्या स्वयंपाकघरात हर तऱ्हेची मदत करण्याची हक्काची संधी मिळाली. तेव्हापासून रोजची पाककला हा मी घेतलेला एक ‘ध्यासच’ आहे. आपण जे अन्न करू ते खाणाऱ्याला एकदम बढिया, रुचकर असे वाटले पाहिजे. त्याने आग्रहाने खाऊन, स्वयंपाक करणाऱ्याचे दिवाळे काढले पाहिजे अशी माझी मनोमनची अन्नधारणा आहे.

भारतीय अन्नपदार्थ साधे असूनही त्यांचा इतिहास समृद्ध आहे. भारताएवढा विविधतेने भरलेला देश दुसरा क्वचितच असेल. भारतात उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम अशी वेगवेगळी पाकसंस्कृती आहे. बुद्ध धर्म आणि जैन धर्म यांचाही परिणाम त्यावर झाला आहे. प्राचीन काळातील आर्य, अरब, चिनी व्यापारी आणि पर्शियन, मंगोल, तुर्क, ब्रिटिश व पोर्तुगीज असे आक्रमक यांचा प्रभावसुद्धा भारतीय पाककलेवर पडलेला आढळतो. माझ्या लहानपणापासून माझ्यावर मध्यमवर्गीय शाकाहारी संस्कृतीचे अन्नसंस्कार घडलेले आहेत. या मध्यमवर्गीयांना आपल्या दैनंदिन साध्यासुध्या जेवणातही विविध पदार्थाची रुची, दिसणे व वैविध्य यामध्ये खूप खूप रस असतो. त्यांच्या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या पदार्थाना दमदार असा गंध असतो. त्यांचा स्पर्शही जिव्हा तृप्त करणारा असतो.

‘विजयाचे वारस आम्ही, सांगतो आमुचा दसरा!’ असा दसरा सण आपण सर्वानीच मोठय़ा उत्साहाने आनंदाने साजरा केला. आता ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ अशी दिवाळी झपाटय़ाने येत आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय गृहिणी; दसरा सण आटोपल्यावर येणाऱ्या दिवाळीकरिता काय काय दिवाळीचे फराळाचे पदार्थ करावयाचे; आल्या गेल्यांना व घरातील खवय्यांना काय काय द्यायचे; याकरिता खूप उत्साहाने चिंतन करत असत. मुख्य म्हणजे नंतर प्रत्यक्षात कृती करत असत. तीस वर्षांपूर्वीच्या ‘गृहलक्ष्मीला त्या काळात तुलनेने मोकळा वेळ असे. बहुसंख्य मध्यमवर्गीय महिला दिवाळीचे फराळाचे पदार्थ घरीच करत असत. आताचे जग खूप फास्ट झालेले आहे. मध्यमवर्गीय महिला बाहेरची नोकरी व घरातील सांसारिक जबाबदारी अशी दुहेरी जबाबदारी मोठय़ा हिमतीने लढत आहे. त्यामुळे बहुसंख्य त्रिकोणी वा चौकोनी कुटुंबात येणाऱ्या दिवाळीकरिता त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्ध मिठाईवाल्यांकडून, खाऊ गल्लीतून विविध प्रकारची मिठाई खरेदी केली जाते.

मी एक सुखी मध्यवर्गीय वृद्ध गृहस्थ आहे. माझ्या पत्नीचे वय अठय़ाहत्तरच्या आसपास आहे. अजून तिला दिवाळीकरिता विविध फराळाचे पदार्थ, तिच्या आईने शिकविल्याप्रमाणे करण्याची हौस आहे. माझी मोठी कन्या ही ५६ वर्षांची आहे. ती तिचे कुटुंब व चार भाऊजींच्या कुटुंबाकरिता दरवर्षी मोठय़ा हौसेने दिवाळीचे विविध पदार्थ करण्यात मोठा रस घेत असते. माझ्या पत्नीचे नाव लक्ष्मी. ती ‘कडकलक्ष्मी’ असली तरी तिने केलेले दिवाळीतील पदार्थ सर्वानाच हवेहवेसे असतात. माझ्या कन्येनेही विविध पाककला स्पर्धेत एक क्रमांकाची मानचिन्हे मिळविली आहेत. ‘साप्ताहिक लोकप्रभा’च्या खवय्या वाचकांकरिता पंचवीस वर्षांचे दोन पिढय़ांतील अंतर असणाऱ्या विविध फराळाच्या पदार्थाच्या कृती मी आपणासमोर मांडत आहे. आपण जरूर करून पाहा व आपल्या घरातील बालगोपाल व मित्रमंडळींना आग्रहाने आस्वाद घ्यायला सांगा. अन्नपूर्णेला सहस्र प्रणाम!

अनारसे

पद्धत – १

अनारसे हा पदार्थ कधीही घाईत केला जाऊ नये. त्याकरिता तीन दिवस अगोदर तांदूळ भिजत घालावे व त्याची पिठी करावी. त्यानंतर त्यात वजनाने बरोबरीने गूळ व गरजेपुरते तूप मिसळून एकत्र कुटावे. त्याचा कणकेसारखा घट्ट गोळा करावा. हा गोळा जमल्यास आठ-दहा दिवस मुरला तरी चालतो. अनारसे करताना भिजलेल्या पिठाच्या गोळ्या करून खसखसीच्या साहाय्याने थापाव्यात. तळताना तूप प्रथम तापवून घ्यावे. चुकूनही गार तूप नको. अनारसे गुलाबी रंगाचे झाले पाहिजेत. आमच्या लहानपणी दिवाळीचे अनारसे करताना आम्हा भाडंवांना आई म्हणायची; ‘तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा. चुकून तुमची दृष्ट लागेल आणि अनारसे खराब होतील’ असो.

पद्धत – २

साहित्य- पाव कि. तांदूळ, पाव कि. गूळ, साजूक तूप, खसखस, तळणीसाठी रिफाइंड तेल.

कृती- शक्यतो जुने तांदूळ घेऊन ते ३ दिवस भिजत ठेवावे. रोज त्यातील पाणी बदलावे. नंतर ते धुवून, थोडे कोरडे करून मिक्सरमधून पीठ करून घ्यावे. पीठ सपीटाच्या चाळणीने चाळून घ्यावे. पीठ किंचित ओलसर व हाताला गार लागते. नंतर त्यात गूळ घालावा. आवडीनुसार गुळाऐवजी साखर किंवा दोन्ही निम्मे निम्मे घातले तरी चालेल. दोन वाटय़ा पीठ असेल तर खायचे चार चमचे तूप त्यात घालावे. मिश्रण एकजीव करून चांगले कुटावे. गोळे करून डब्यात भरून ठेवावे. आठ-दहा दिवसांनी पीठ अनरसे करावयासाठी तयार होते. प्रत्यक्ष अनरसे करताना पीठ जास्त कोरडे वाटल्यास थोडे केळे त्यात कालवून घ्यावे. पीठ मळून पुरीसाठी घेतो तसा गोळा करून घेऊन एका प्लास्टिकच्या पिशवीला तूप लावून त्यावर तो थापावा व ती जाड पुरी खसखशीत घोळून घेऊन गरम तेलात अनरसा तळून घ्यावा. खसखस लावलेली बाजू तळताना वर ठेवावी व त्यावर झाऱ्याने तेल उडवून मंद आचेवर तळावा. तळताना तो उलटू नये. नंतर गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून ठेवा.

करंज्या
पद्धत – १

सुक्या खोबऱ्याचा काळा भाग काढून घेऊन, ते किसून तसंच भाजून घ्यावे. त्यामध्ये थोडी कणीक म्हणजे एक वाटी खोबऱ्याकरिता चिमूटभर कणीक, अल्प प्रमाणात खसखस व वेलची कुटून घ्यावी. मग गरजेपुरती पिठी साखर घ्यावी. रवा व मैदा दोनास एक या प्रमाणात घ्यावा व ते मिश्रण भिजवावे. या मिश्रणात मोहन म्हणून तूप वापरावे. असा गोळा दोन तास मुरू द्यावा. गरज पडली तर वरवंटय़ाने मिश्रण ठेचावे. मिश्रण उत्तम मऊ झाले पाहिजे. नाही तर करंज्यांना भोके पडतात. त्यानंतर पातळ पुरी लाटून करंज्या तयार कराव्यात.

पद्धत – २

साहित्य- १ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा, दूध, १ मोठा नारळ, १-अर्धा वाटी साखर, वेलदोडे, मोहनासाठी ४ चमचे तेल, तळणीसाठी रिफाइंड तेल.

कृती- साखर व खोवलेले खोबरे एकत्र करून गॅसवर शिजवून घ्यावे. शिजवतानाच त्यात दूध किंवा खवा घालून सारण बनवावे. त्यात वेलदोडा पूड मिसळावी. रवा व मैदा एकत्र घेऊन त्यात कडकडीत गरम तेलाचे मोहन घालून ते घट्ट भिजवावे. साधारण तीन तासांनंतर ते चांगले कुटून त्याच्या लहान लहान पेढय़ासारख्या गोळ्या करून त्यावर ओले फडके घालून ठेवावे. नंतर १-१ पुरी लाटून त्यात पुरेसे सारण भरून करंजी नीट चिकटवून बंद करून कातून घ्यावी व मंद आचेवर तळून घ्यावी.

बेसन लाडू

पद्धत – १

हरबरा डाळीचे थोडे जाडसर पीठ दळून आणावे. त्यात जिरेल एवढे तूप मिसळावे. गुलाबी रंग येईल इतपत खमंग भाजावे. मग थोडे दूध मिसळावे. त्यामुळे बेसनाचे लाडू खाताना टाळूला चिकटत नाहीत. या लाडवांकरिता बेसनपिठाच्या बरोबरीने पिठी साखर व अत्यल्प प्रमाणात आवडीनुसार बेदाणा, काजू मिसळावा.

पद्धत – २

साहित्य- किंचित जाडसर डाळीचे पीठ अर्धा किलो, अर्धा कि. पिठीसाखर, वेलदोडे, बेदाणे, काजू, साजूक तूप, दूध पाव वाटी.

कृती- बेसन (डाळीचे पीठ) सैल होईल व भाजता येईल एवढे साजूक तूप घालून ते गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजून होत आल्यावर त्यात दूध घालावे. थोडे भाजून गॅस बंद करावा. त्यात पिठीसाखर मिसळावी व वेलदोडे पूड, काजू, बेदाणे घालावे. गार झाल्यावर लाडू वळावेत.

रवा लाडू

पद्धत – १

याकरिता कटाक्षाने बारीक रवा घ्यावा. एक वाटी रव्याकरिता अर्धी वाटी ओल्या नारळाचे खोबरे घ्यावे. रवा तुपावर भाजताना अर्धवट रवा भाजल्यावर ओले खोबरे मिसळून रवा पूर्ण भाजून घ्यावा. रव्याला भाजका वास आला पाहिजे. त्यात पाऊण पट साखरेचा एक तारीपाक मिसळावा. पाकात मुरल्यावर मग दोन तासाने घट्ट लाडू वळावेत.

पद्धत – २

साहित्य- ५ वाटय़ा मध्यम रवा, ४ वाटय़ा साखर, १ नारळ, १-अर्धी वाटी साजूक तूप, वेलदोडे, काजू, बेदाणे.

कृती- रवा तुपावर खमंग भाजावा. भाजतानाच त्यात ओले खवलेले खोबरे घालावे. तेही रव्याबरोबर भाजले जावे. भाजून झाल्यावर रवा ताटात काढावा. मग कढईत साखर व दोन वाटय़ा पाणी घालून त्याचा एकतारी पाक करावा. त्यात रवा घालून गॅस बंद करावा. वेलदोडा पूड घालून, ढवळून मिश्रण ठेवून द्यावे. थोडे घट्टसर झाल्यावर काजू, बेदाणे लावून लाडू वळावेत.

शेव

पद्धत – १

हरबरा डाळीचे ताजे पीठ म्हणजेच बेसन, कोमट पाणी, चवीप्रमाणे मीठ, तिखट, ओवा यांचा अंदाजाने वापर करावा. सैलर मिश्रण तयार करावे. शेवेकरिता लाकडी सोरे घरोघरी असतात. असा सोरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्या सोऱ्यातून शेवेचे मिश्रण खाली कढईमधील तेलात खाली सहजपणे आले पाहिजे, असे हवे. तेल खूप गार किंवा खूप गरम नाही याची काळजी घ्यावी.

पद्धत – २

साहित्य- हरभरा डाळीचे पीठ, आवडीप्रमाणे लसूण, ओवा, तिखट, पाणी, मीठ व तळणीचे तेल,

कृती- प्रथम अर्धा वाटी तेल व १-अर्धा वाटी पाणी एकत्र करून ते मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे लसूण/ तिखट/ ओवा बारीक करून घालावा व ते मिश्रण गाळून घ्यावे. त्यात मावेल तेवढे डाळीचे अगदी बारीक पीठ घालून सैलसर भिजवावे व शेवपात्राने किंवा सोऱ्याने गरम तेलात शेव पाडून तळावी.

गोडे शंकरपाळे

पद्धत – १

एक वाटी पाणी, एक वाटी तूप, एक वाटी साखर असे सर्व मिश्रण उकळून घेणे. त्या उकळत्या पाण्यात मैदा किंवा रवा कणीक मिसळावी. सर्व मिश्रण चांगले भिवून पोळीसारखे लाटावे. शंकरपाळे काळजीपूर्वक तळावे. ते खुसखुशीत व्हायला हवे. अजिबात कडक होता कामा नये, याची काळजी घ्यावी.

पद्धत – २

साहित्य- १ वाटी दूध/पाणी, १ वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, मैदा, मीठ, तळणीसाठी रिफाइंड तेल.

कृती- १ वाटी दूध किंवा पाणी घेऊन त्यात साखर, तूप, किंचित मीठ घालून उकडून घ्यावे. त्यात मावेल एवढा मैदा घालून मऊसर गोळा करावा. गार झाल्यावर चांगला मळून ठेवावा. दोन-तीन तासांनंतर त्याच्या पोळ्या लाटून हव्या, त्या आकाराची शंकरपाळी कातावी/ कापावी व तेलात वा वनस्पती तुपात मंद आचेवर सारखी उलटत तळून घ्यावी.

खारे शंकरपाळे

पद्धत – १

उकळत्या पाण्यात थोडा ओवा, जिरे, कणभर मीठ व किंचित गोड पदार्थ गूळ वा साखर व पूर्वीप्रमाणेच मैदा, रवा अथवा कणीक मिसळून पोळी लाटावी व शंकरपाळे तळावेत.

पद्धत – २

साहित्य- २ वाटय़ा मैदा, पाव वाटी तेलाचे मोहन, चवीप्रमाणे ओवा/ तिखट/ जिरे, मीठ, तळणीसाठी तेल.

कृती- मैद्यात कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. त्यात मीठ, आवडीप्रमाणे ओवा किंवा तिखट किंवा जिरे कुटून घालावे. घट्ट गोळा भिजवावा. २-३ तासांनी तो चांगला कुटून घेऊन त्याच्या पातळ पोळ्या लाटून हव्या त्या आकाराची शंकरपाळी कातून घ्यावी व मंद आचेवर तळावी. तळताना सारखी उलटावीत.

चकली

पद्धत – १

प्रथम चकलीची भाजणीसाठी एक किलो तांदूळ, अर्धा किलो मूगडाळ, पाव किलो उडीद डाळ व पाव किलो हरबरा डाळ.

तांदूळ धुवून घ्यावे. सुकल्यावर गुलाबी रंगावर भाजावे. त्याचा रूचकर वास यावा. तसेच डाळी स्वतंत्र भाजून घ्याव्यात. त्यात धने १०० ग्रॅम, अंदाजे दोन भांडी, खमंग भाजून मिसळावे. नंतर २५ ग्रॅ. जिरे मिसळावे. अशी एकत्रित भाजणी दळून आणावी. आवडीप्रमाणे या भाजणीच्या पिठात तिखट, मीठ, ओवा व मोहन मिसळावे. असा गोळा गरम पाण्यातच मळून घ्यावा. हा गोळा सोऱ्यातून सहज खाली येईल इतपत सैल हवा. चकल्या तळण्याकरिता तेलाचा दर्जा चांगला हवा.

पद्धत – २

साहित्य- ४ वाटय़ा तांदूळ, २ वाटय़ा हरभरा डाळ, १ वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी धने, पाव वाटी जिरे, तीळ, ओवा, तिखट, मीठ, हिंग, हळद, तेल.

कृती- धान्ये धुवून भाजावी. त्यात धने, जिरेही घालावे. गार झाल्यावर भाजणी दळून आणावी. चकल्या करताना ४ वाटय़ा भाजणी घेतली, तर त्यात ४ टेबल स्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन व २ वाटय़ा गरम पाणी घालावे. आवडीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग, थोडी हळद, तीळ व ओवा घालून, मिसळून पीठ झाकून दडपून ठेवावे. १ तासाने जरूर तेवढे पाणी घालून पीठ चांगले मळावे व सोऱ्यातून चकल्या काढून चांगला ताव आलेल्या तेलात मध्ये एकदा उलटय़ा करून चांगल्या तळून व निथळून काढाव्या.

कडबोळी

कडबोळ्यांकरिता थालीपिठाचीच भाजणी घ्यावी. त्याकरिता अर्धा किलो बाजरी, पाव किलो तांदूळ, आतपाव हरबरा किंवा चणा डाळ, आतपाव उदीड डाळ व चवीनुसार धने, जिरे, मीठ, तिखट मिसळावे. हे कडबोळी मिश्रण घट्ट भिजवावे. हाताला तेल लावून या मिश्रणाची कडबोळी वळावी. भिजवताना आठवणीने तेलाचे मोहन वापरावे.

पातळ पोह्यंचा चिवडा

पद्धत – १

याकरिता शेंगदाणे, खोबरे, डाळ आपल्या आवडी-निवडीप्रमाणे घ्यावे. ते खूप तळू नये. खोबऱ्याचे पातळ काप गुलाबी रंगावरच तळावे. पोहे
प्रथम भाजून घ्यावे. मग त्यावर तळलेले खोबरे टाकावे. त्यानंतर हिंग, जिरे याची फोडणी घालावी. याकरिता मोठे पसरट भांडे असावे. पोहे होता होता नाममात्र हळद, हिंग मिसळावा. जादा पदार्थ म्हणून बेदाणे, काजू मिसळावे. याच प्रकारे भाजक्या पोह्य़ांचा चिवडा करता येतो.

पद्धत – २

साहित्य- अर्धा कि. पातळ पोहे, हिरवी मिरची, लसूण धने-जिरेपूड, तीळ, शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप, डाळे, तेल, पिठीसाखर, कढीलिंब, फोडणी साहित्य

कृती- प्रथम पातळ पोहे मंद आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, लसूण, कढीलिंब, मिरच्या चांगल्या तळून घेऊन पोह्य़ांवर घालावे. मग फोडणी करून त्यात मीठ, तीळ, धने-जिरे पूड घालून गॅस बंद करावा. आवडत असल्यास थोडा आमचूर किंवा लिंबूक्षार घालावा. त्यात पोहे चांगले मिसळून वरून किंचित पिठीसाखर व डाळे घालून चिवडा सारखा करावा व गार झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत घट्ट बांधून ठेवावा.

चिरोटे

चिरोटय़ांकरिता रवा, मैदा घट्ट भिजवावा. त्यात थोडे मोहन मिसळावे व ते मिश्रण चांगले कुटून घ्यावे. हाताला तेल लावून चांगला गोळा करावा. त्याची पातळ पोळी लाटावी. तांदळाची पिठी अर्धी वाटी व दोन चमचे घट्ट तूप एकत्र करून चांगले एकजीव करावे. हे मिश्रण हलके व्हायला हवे. मैद्याची पोळी लाटावी. त्यावर ठेचलेले पिठी तुपाचे मिश्रणाचा थर घालावा. पुन्हा लाटावे. पुन्हा थर घालावा. असे युक्तीने काम करावे. चिरोटे हलक्या हाताने लाटावे व कटाक्षाने मंद तळावे. वरून पिठीसाखर घालावी.

भाजक्या पोह्यंचा चिवडा

साहित्य- अर्धा कि. भाजके पोहे, तिखट, मीठ, धने पूड, जिरे पूड, तीळ, खोबऱ्याचे पातळ काप, शेंगदाणे, साखर, कढीलिंब, वाळवलेले कांद्याचे काप, भाजके डाळे, फोडणीचे साहित्य

कृती- प्रथम भाजके पोहे कढईत मंद भाजून घ्यावे. अगदी कुरकुरीत झाल्यानंतर ते वर्तमानपत्रावर काढून ठेवावेत. कढईत ४ डाव तेल घेऊन त्यात शेंगदाणे व खोबऱ्याचे काप तळून ते पोह्य़ांवर घालावेत. मग त्याच तेलात मोहरी, हिंग, हळद व कढीलिंब घालून फोडणी करावी. कढीलिंबाची पाने कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करून त्यात तिखट, मीठ, तीळ, धने-जिरे पूड, आवडत असल्यास बडीशेप, लवंग, दालचिनी पूड घालावी. त्यात पोहे इ. मिसळावे. वरून पिठीसाखर व डाळे घालावे. कांदा आवडत असल्यास तळून घालावा. चिवडा नीट खाली-वर करून मिसळावा व गार झाल्यावर प्लास्टिक पिशवीत घट्ट बांधून ठेवावा म्हणजे तो पोचट होत नाही.

सकाळच्या फराळाच्या पदार्थाबरोबरच दुपारच्या भोजनाकरिता, दिवाळीच्या चार दिवसांत श्रीखंड, बासुंदी-रबडी, जिलेबी व उत्तम दर्जाच्या तुपात बनविलेला शिरा अशी निवड करावी. थोर आयुर्वेदीय ग्रंथात ‘जयति रसाला प्रतिश्यायम्’ असा श्रीखंडाबद्दलचा सांगावा आहे. या श्रीखंडाकरिता बाजारातून चक्का आणण्याऐवजी घरी आदल्या दिवशी चांगले दही विरजावे. ते एका स्वच्छ पांढऱ्या कपडय़ात बांधून रात्रभर टांगून ठेवावे. त्यातले सगळे पाणी निघून जाते. चक्क्य़ाचा घट्ट गोळा उरतो. त्यात मापाने साखर घालावी. जायफळ, वेलदोडा पूड घालावी. अगदी थोडेसे तापवून थंड केलेले दूध घालावे. हे सगळे मिश्रण एकत्र केले की झाले श्रीखंड तयार. अशा चविष्ट श्रीखंडांचा लाभ घ्यावा.

बासुंदी किंवा रबडी करताना स्वच्छतेचे सर्व नियम पाळून काळजीपूर्वक बासुंदी-रबडी बनवावी. ती पुरेशी दाट असावी. लगेचच वापरावी. ती अजिबात शिळी होऊ देऊ नये. घरी जिलब्या करणे सगळ्यांनाच जमत नाही. ती आपापल्या आवडीप्रमाणे बाहेरून आणायला हरकत नाही. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी चांगल्या तुपातला उत्तम रवा भाजलेला शिरा करावा. त्याकरिता वेलचीचा मुक्त वापर करावा. अशा विविध गोड खाद्य पदार्थाचा मुक्त वापर करून खवय्यांचे चार समाधानाचे शब्द जरूर ऐकावे.

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीचे फराळाचे पदार्थ केल्यावर प्रथम घरातील दैवतांना अर्पण करून मगच वापरण्याची प्रथा आहे. त्याकरिता या पदार्थाच्या सोबत वेगळ्या मोठय़ा ताटात दही पोहे वाळवून ठेवावेत. त्यावर ओला नारळ, तूप, जिरे, हिंगाची फोडणी घालावी. काही मंडळी गूळ पोह्य़ाचा नैवेद्य ठेवतात. अशा तऱ्हेने अन्नपूर्णा देवीची अराधना करावी, कारण ‘अन्न हे पूर्णब्रह्म.’
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali faral
First published on: 30-10-2015 at 01:15 IST