तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच गोकुळाष्टमीला भारतात होते. कल्पना नव्हती की गोपाल-काला, दहीहंडी फोडणे हे सामूहिक उत्सव अजूनही भारतात जोमाने साजरे होत असतील. १९८५ साली भारत सोडून पहिल्यांदा विमानाने उंच भरारी घेतली होती तेव्हाच मनात विचार डोकावून गेले होते की, आपले आता आपल्या संस्कृतीशी नाते तुटणार की काय? आपल्या संस्कृतीशी आपल्याला बांधून ठेवणारे हे सण, आपल्याला एकत्रित आणणारे हे सामूहिक उत्सव कुणास ठाऊक केव्हा आणि कसे अनुभवता येतील?
आमच्यासारख्या भारताबाहेर राहणाऱ्यांचे आपले सण, आपल्या परंपरा आणि कौटुंबिक चालीरीती जोपासून ठेवण्याचे सतत प्रयत्न चालू असतात. आपल्या पुढच्या पिढय़ांना आपल्या प्रथा- परंपरा कळाव्यात, परदेशी राहणीबरोबरच भारतीय सांस्कृतिक मूल्ये सांभाळली जावीत, अशी आम्हाला अपेक्षा असते. त्यामुळे आपले सण आम्ही प्रकर्षांने साजरे करण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व सणांमध्ये गणपतीचे महत्त्व सर्वोच्चच.
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आम्ही कॅनडामध्ये स्थिरस्थावर होत असताना दोनचारच घरांमध्ये गणपती बसवला जायचा. बरेच लोक स्वत:हून दर्शनाला यायचे. त्यामुळे त्याला नकळतच सार्वजनिक गणपतीचे स्वरूप यायचे. आमच्या एका मित्रांकडे परंपरेने आलेला गणपती तेव्हापासून आत्तापर्यंत एकत्रित साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला धार्मिक सुट्टी जाहीर करून आम्ही दीड दिवसाचा गणपती उत्सवाचे आम्ही पाच दिवस साजरीकरण करतो. आधी चार-पाच जेवणाचे मेनू ठरवण्याकरिता बैठक-कम-पार्टी, मग मखर सजावट, सबंध दीड दिवसाच्या जेवणांच्या भाज्यांची कापाकापीसाठी, पुऱ्या आणि चपातीचे कणीक भिजवण्यासाठी, खास हरतालिकेचा प्रसाद मटकावण्याची तयारी या ना त्यानिमित्ताने आम्ही दहा-बारा कुटुंबे एकमेकांना जोडली जात असतो. दीड दिवसातील तीन प्रसादांची जबाबदारी तीन कुटुंबांनी स्वीकारली आहे. तरीही एकत्र स्वयंपाक, प्रसादाच्या जेवणातील पदार्थाच्या फर्माईशी. त्यासाठी होणारी मजेदार वादावादी (नोकझोक), प्रत्येकाचे डोहाळे पुरवणारी ही २२ पदार्थाची भली मोठ्ठी लिस्ट. पहिल्या प्रसादाचे उकडीचे मोदक, पुरी-भाजी-खीर, पंचामृत-मसालेभात, मग अळूची पातळ भाजी, वाटाणा उसळ, दुधीहलवा, सांबार भिशीबेळी भात; त्यानंतर खास उडद- मसुऱ्याची आमटी, काजू-फरसबी, श्रीखंड, गुजराती आमरस- ढोकळू, विसर्जनानंतरचं इडली-चटणी, गुजु कढी, वालाचं कुवळ आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे गणपतीनंतरचं तिखतीचं मटण, दह्य़ाची कोशिंबीर आहाहा!
काहीही न चुकवण्यासारखं असतं. गणेशस्थापनेपासून, अथर्वशीर्षांची सहस्रावर्तनं, पाऊणएक तास रंगणाऱ्या आरत्या, टाळ्या, झांजांचा दुमदुमाट, तो कापूर-उदबत्तीचा वास, नटलेलं-थटलेलं प्रसन्न वातावरण, वयस्कर मंडळींची हमखास हजेरी, आशीर्वाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांचा, इथे जन्मलेल्या पिढीचा सहभाग. पारंपरिक कपडय़ांमध्ये कॅनेडिअन मित्रमैत्रिणींना सजवणं, आपल्यामध्ये सामील करणं, व्यावसायिक सहकाऱ्यांनाही आपली संस्कृती अभिमानानी दाखवण्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो. आपल्या मुलांना आपल्या पद्धती समजाव्यात यासाठी कायम ठेवलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांची पावती मिळते ती विसर्जनानंतरच्या मुलांच्या तोंडपाठ असलेल्या आरत्या ऐकल्यावर!
पूर्वी गणपती साजरा व्हायचा तो मुख्यत: मराठी मंडळातच. टोरांटोचं मराठी भाषिक मंडळ गेली ४७ र्वष कार्यरत आहे. मंडळ वर्षभर अनेक कार्यक्रम सादर करत असते; पण पहिल्यापासून गणपतीचा कार्यक्रम हा स्थानिक युवा कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राखून ठेवला आहे. वार्षिक समितीतील युवा सभासद या कार्यक्रमाची आखणी, आयोजन आणि संचालन करत असतो. वाजतगाजत गणपती बाप्पाची स्थापना, प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती मंडळातील एखाद्या नवदाम्पत्याच्या हस्ते होते. सहा ते अठरा वयोगटातील कलाकारांचे नाटय़-नृत्य, गायन-वादन सादर केले जाते. त्यासाठी इथली पहिली पिढी आणि हल्ली दुसरी पिढी आपल्या मुलाबाळांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून हजर असते. उकडीच्या मोदकाचा खास मराठी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी ५००-६०० मंडळी उपस्थित असतात. आमच्या मंडळाची खासियत अशी की, मराठी भाषेशी जवळीक असणारा- तिची आस्था असणारा कोणीही मराठी-अमराठी, प्रांतिक-अप्रांतिक वा अगदी अभारतीयही आमच्या मंडळाचा सभासद किंवा प्रेक्षक असू शकतो. वर्षांनुवर्षे होत असलेल्या कार्यक्रमात नावीन्य आणण्यासाठी वार्षिक समिती त्यातही नवे उपक्रम सामील करत असते. २०१४ साली मंडळातील सर्व वयोगटांतील कलाकारांचे व्हिज्युअल आर्ट एक्झिबिशन भरवण्यात आलं होतं. त्यात नव्वदजणांनी भाग घेतला होता. प्रथमच परफॉर्मिग आर्टव्यतिरिक्त इतर कलेचं प्रदर्शन इथल्या समाजाला पाहायला मिळालं होतं. पाच ते ८० वयोगटातील स्थानिक कलाकारांची वॉटर कलर अॅक्रॅलिक आणि ऑइल पेंटिंग्ज, फोटोग्राफी, वूड वर्किंग पेपर आर्ट, क्राफ्ट फ्रेम्ड एब्रॉयडरी यांसारख्या घरोघरी दडलेल्या कलाकुसरींचं उच्चतम असं प्रत्यक्ष दर्शन घडलं.
टोरांटोमध्ये आता मात्र अनेक घरांमध्ये गणपती बसवला जातो. गौरीपूजन आणि गौरीजेवणाच्या भारतातील प्रत्येक प्रांतातील वेगवेगळ्या पद्धती, त्यातील पारंपरिक निराळेपणाही इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. नागपुरी पद्धत पुणे-मुंबईची पद्धत, देशावरची पद्धत आणि शिवाय खास कॅनेडियन संतुलन निभावणारी स्वत:ची अशी स्वतंत्र पद्धत अशा सर्वाचा मेळ मी स्वत: अनुभवला आहे तो केवळ मी भारताबाहेर आहे म्हणूनच.
कॅनडामध्ये मूर्ती विसर्जनास पूर्वी संमती नसे, त्यामुळे सुपारी विसर्जन प्रचलित होतं, पण आता मूर्ती बायो-डीग्रेडेबल असल्यामुळे तेही मान्य झालं आहे. त्यामुळे विसर्जनासाठी छोटय़ा छोटय़ा पायी मिरवणुका, दिव्यांनी सजवलेल्या गाडय़ांची रांग, एखाद्या पार्कमधल्या नदी-नाल्याकिनारी जमलेली विसर्जनाची गर्दी सहज पाहायला मिळते. पूर्वी हे असे नदीकिनारीचे रंगीबेरंगी चित्रविचित्र कपडे घातलेले, झांजांचे नाद आणि सो कॉल्ड विअर्ड चॅटिंग करणारे ग्रुप्स म्हणून स्थानिक मंडळी घाबरून पळून जाताना दिसायची; पण आता आपल्या धर्मातील या ठळक पारंपरिक पद्धतींना कॅनेडियन रुळावू लागले आहेत.
कॅनडामधील वास्तव्याची ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण विशेषता आहे की, कॅनडा सरकार बहुविध सांस्कृतिकता वाढविण्याला प्रोत्साहन देते. त्यामुळे सुरुवातीची पाच-सहा वर्षे अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर आम्हाला कॅनडामध्ये स्थायिक होण्याचा योग आला. इथल्या पुढच्या पिढय़ांमध्येही अशा उत्सवांमध्ये आपली सांस्कृतिक वीण गुंफली जाईल याची मला खात्री आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2015 रोजी प्रकाशित
टोरांटो (कॅनडा) – याचसाठी अट्टहास…
तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच गोकुळाष्टमीला भारतात होते.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 18-09-2015 at 01:14 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav celebration in toranto canada