जुनी फॅशन नव्याने ट्रेंडमध्ये येण्यालाही आता काळ लोटला. म्हणूनच लेगिंग्ज, बेल बॉटम, शॉट कुर्ते असं बरंच काही पुन्हा फॅशनेबल वाटू लागलं. यात भर पडतेय आता कुर्तीची. जुनाट किंवा काकूबाई असा टॅग असलेली कुर्ती आता नव्या स्टाइलमध्ये तरुणाईमध्ये लोकप्रिय होतेय.
‘कसली बोर आहेस तू, इतक्या मोठय़ा पार्टीला तू कुर्ता घालून येणार आहेस?’ असं कुणी म्हटलं तर कुर्ता वापरणारी व्यक्ती ओल्ड फॅशण्ड आणि कुर्त्यांला बोअर म्हणणारी व्यक्ती फॅशनेबल, ट्रेंडी हे वेगळं सांगायलाच नको. पण, आता उलटं झालंय. कुर्त्यांला बोर म्हणण्याचा कोणी प्रयत्न केला तरी त्यावर ‘ओल्डफॅशण्ड’चा ठपका सहज लागू शकतो किंवा तिला वेडय़ात तरी नक्कीच काढलं जाऊ शकतं. कारण अगदी गेल्या
दोन–तीन वर्षांपूर्वी जुनी, आजीबाई स्टाइल, बोरिंग असे विविध ठपके लागलेल्या कुर्तीजनी सध्या फॅशन जगताला दणाणून सोडलं आहे. अगदी आता आतापर्यंत चाळिशीनंतरच्या काकूबाई स्टाइल बायकांचा पोशाख म्हणून ओळख असलेल्या कुर्तीज आज रॅम्पपासून सेलेब्रिटीजपर्यंत सर्वत्र गाजताहेत. तरुणाई तर या कुर्तीजच्या पूर्ण प्रेमात आहे. तरुणाई म्हणजे फक्त मुली नाही तर मुलांनीही कुर्ताजवर त्यांच्या पसंतीची मोहर उमटवली आहे.
१८७३च्या काळात डेनिम्सचा जन्म झाला तो कारखान्यातील कामगारांचा पोशाख म्हणून. सुटसुटीत, पटकन खराब न होणारी डेनिमनंतर लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनू लागली. तरुणाईला तर या डेनिमने लगेचच आपल्या प्रेमात पाडलं. चार–चार दिवस वेळ आल्यास महिनाभर न धुता वापरता येणारी, कोणत्याही टॉपवर सहज घालता येणारी आणि ट्रेकपासून सणसमारंभापर्यंत प्रत्येक ठिकाणी घालता येऊ शकणारी ही डेनिम म्हणजे तरुणाईची जीव की प्राण बनली होती. पण, गेल्या दोन वर्षांत हे चित्र काहीसं बदलू लागलं. भारताच्या बाबतीत तर प्रकर्षांने, अर्थात त्याला वेगवेगळी कारणं होती. पण, एकीकडे जगभरातील तरुण स्कर्ट्स, कार्गो, शॉट ट्राउझरला डेनिमचा पर्याय म्हणून पाहू लागले. तेथेच भारतीय तरुणांनी मात्र आपल्या लाडक्या देशी कुर्तीजना आपलंसं केलं. अर्थात कुर्तीजनीसुद्धा या तरुणाईच्या रंगत स्वत:ला रंगवत, नवे बदल स्वीकारत आपलं रूप पालटलं. त्यामुळेच ती काळासोबत टिकून राहिली.
हवामानातील बदल आणि पेहराव
आपण कितीही म्हटलं, नवीन ट्रेंडस, फॅशननुसार आपला पेहराव ठरतो, तरी आपल्या आजूबाजूचं हवामान आपला पेहराव ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत हे सत्य कधीच नाकारता येणार नाही. म्हणजे बघा, पावसाळ्यात कितीही इच्छा असली तरी तुम्ही लांब घेरेदार स्कर्ट घालून बाहेर पडू शकणारच नाही. पाऊस, चिखल, स्कर्टचा घेरा सांभाळताना नाकीनऊ येणारच. तसच उन्हाळ्यामध्ये जाड लेदर जॅकेट कितीही आवडत असेल तरी घालता येणं शक्य आहे का? त्यामुळे बाहेरचं हवामान आपल्या पेहरावावर महत्त्वाचा परिणाम करतं हे सत्य स्वीकारलंच पाहिजे. गेल्या काही वर्षांत उठणारी ग्लोबल वॉर्मिगची बोंब फॅशनचे वारे बदलण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. तापमानातील वाढ, अनियमितता यामुळे एरवी पँट्स, ट्राऊझरना पसंती देणाऱ्यांनीही सुटसुटीत, वजनाला हलक्या, आरामदायी कपडय़ांची मागणी करण्यास सुरुवात केली. या मागणीकडे दुर्लक्ष करणं अर्थात डिझायनर्स, ब्रँड्सना शक्य नव्हतच. त्यामुळे डेनिम, ट्राऊझरला पर्याय म्हणून स्कर्ट, वन पीस ड्रेस, हॉट पँट, पलॅझो, शॉर्ट पँट रॅम्पपासून दुकांनापर्यंत पाहायला मिळू लागले. भारतात बदलत्या काळानुसार आखूड स्कर्ट, हॉट पँट, वन पीस ड्रेसेसना दैनंदिन पेहरावात जागा मिळत गेली असली, तरी त्यांच्या वापरात मर्यादा होत्याच. त्यामुळे भारतीय डिझायनर्सनी या परिस्थितीत पर्याय म्हणून आपल्या पारंपरिक पेहरावाकडे मोर्चा वळवला आणि त्यातून कुर्त्यांला संजीवनी मिळण्यास सुरुवात झाली.
कुर्तीचं भारतीयत्व
कुर्ती किंवा त्यात मिळणारी विविधता हा फॅशन जगताला लागलेला नवा शोध आहे, असं कोणताही डिझायनर कधीच म्हणणार नाही. कुर्ती आपल्या पारंपरिक पेहरावाचा महत्त्वाचा भाग आहे आणि याआधी तो विविध प्रकाराने घालता यायचा. पण, ओल्ड फॅशण्ड, काकूबाई असं लेबल लावत त्याला काहीसं दूर करण्यात आलं होतं. अर्थात त्याला काही अंशी नव्वदीचं दशक कारणीभूत होतं असं म्हणायला हरकत नाही. नव्वदीच्या दशकात आलेल्या ढगाळ कपडय़ांच्या ट्रेंडमध्ये कुर्तीचं रूपांतर एका आयताकृती चौकोनात झालं. त्यामुळे ढगाळ कुर्ती किंवा त्यावेळेच्या भाषेत म्हणायचं झालं तर कमीज, सलवार आणि कॉटनचा दुप्पटा असं काहीसं बेढब रूप तिला मिळालं. त्यामुळे काळानुरूप फिटिंगचे कपडे पसंत करू लागलेल्या तरुणाईने कुर्तीला बाजूला केलं. पण, एखादं चक्र पूर्ण व्हावं तसं कुर्तीज पुन्हा ट्रेंडमध्ये येऊ लागल्या आहेत. ‘आपल्याला घरातल्या वस्तूंपेक्षा बाहेरच्या वस्तूंचं जास्त आकर्षण असतं. तसचं काहीसं कुर्तीजसोबत झालं. आपल्या भारतीय वातावरणात घालायला कुर्तीज सोयीच्या, आरामदायी असूनही त्या फॅशन, ट्रेंडच्या नावाखाली एकेकाळी मागे पडत गेल्या. पण, आता त्यांचं महत्त्व आपल्याला पटू लागलं आहे. त्यामुळे फॅशनमध्ये त्या नव्याने दाखल होतं आहेत,’ असं डिझायनर वैशाली एस सांगते. गंमत म्हणजे तरुणाईच्या भाषेत कुर्तीच्या या मॉडर्न अवतारात नव्वदीच्या दशकातील ती ढगाळ, बेढब कुर्तीसुद्धा समाविष्ट आहे. फक्त तिचं थोडं रूप पालटलं आहे.
सेलिब्रेटी आणि कुर्ती
दीपिका पदुकोनच्या चाहत्यांची यादी न संपणारी आहे यात वादच नाही. केवळ मुलांमध्ये नाही तर मुलींमध्येसुद्धा तिच्या दिसण्याचे, अभिनयाचे आणि नृत्याचे अनेक चाहते आहेत. यासोबत दीपिकाने आपल्या फॅशन सेन्सनेही चाहत्यांवर भुरळ घातली आहे. मग अशा वेळी तिने कुर्तीवर आपल्या पसंतीची मोहर लावल्यावर तरुणाई त्याला नाकारेल असं होऊच शकत नाही. ‘लव्ह आज कल’मधील तिचा कुर्ती आणि लेगिंग हा लुक कुर्ती ट्रेंडमध्ये येण्याची नांदी होती. या सिनेमानंतर मुलींमध्ये कुर्ती आणि लेगिंगची प्रचंड क्रेझ पसरली. त्यानंतर ‘पिकू’ सिनेमामध्ये ती पुन्हा एकदा कुर्ती मिरवताना दिसली. यावेळी लाल, काळा, पांढरा अशा बोल्ड रंगांची कुर्ती, स्ट्रेट सलवार आणि कपाळावर टिकली या साध्या लुकमध्येसुद्धा फॉर्मल्स आकर्षक दिसू शकतात हे तिनं दाखवून दिलं. तिच्यासोबतच आलिया भटचा ‘२ स्टेट्स’ लुक, सोनम कपूरचा ‘रांझना’मधील लुक कुर्तीला ग्लॅमरस करण्यात कारणीभूत होताच की.
पाकिस्तानी कुर्तीची दखल
लांब काहीसा ढगाळ कुर्ता, सोबत स्ट्रेट सलवार किंवा पलॅझो हा लुक काहीसा पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचला आणि इथे लोकप्रियही झाला. मध्यंतरी पाकिस्तानी नायिकांचे बॉलीवूडमध्ये पदापर्ण, पाकिस्तानी डिझायनर्सनी भारतात सादर केलेली कलेक्शन्स, पाकिस्तानी मालिकांचे भारतात प्रक्षेपण या घटनांमध्ये तेथील कुर्त्यांची ही स्टाईल भारतात सहजच आली. कॉटन, सिल्कच्या कुर्त्यांवर बारीक नक्षीकाम किंवा बोल्ड प्रिंट असलेले, पांढऱ्याशुभ्र रंगापासून ते थेट नेव्ही रंगापर्यंत सर्व रंगात रंगलेले, हाताच्या बाह्यांना किंवा हेमला नाजूक लेसची झालर या धाटणीचे कुर्ते स्त्रियांमध्ये भलतेच लोकप्रिय झाले.
कुर्तीजची प्रयोगशीलता
तुम्हाला लेगिंग आवडते तर कुर्ती त्यासोबत जुळून येते. स्कर्टसोबतही ती घालता येते. पलॅझोसारखा मॉडर्न पेहराव तुम्हाला आवडत असेल तर त्यासोबत घाला. स्ट्रेट सलवार, धोती पँट, घागरा, पटियाला, जीन्स नाव घ्या आणि त्या प्रकारच्या ड्रेससोबत तुम्ही कुर्ती घालू शकता. साडीवर ब्लाउजऐवजी शॉर्ट कुर्ता घालायची परंपरा कित्येक राज्यांमध्ये फार पूर्वीपासून आहे. आता तर साडीसोबत लांब कुर्तीसुद्धा घातली जातात. बरं, यापैकी काहीच नको असेल तर वन पीस ड्रेस म्हणूनही वापरू शकता. घेरेदार कुर्ती, स्ट्रेट कुर्ती, बॉक्स स्टाइल कुर्ती, शॉर्ट कुर्ती, एम्ब्रोयडर कुर्ती, प्रिंटेड कुर्ती, अंगरखा स्टाइल किंवा अनारकली स्टाइल कुर्ती नाव घ्या आणि तसं तिचं रूप तुम्हाला मिळेल. ‘पाश्चात्यांकडे टय़ुनिकची संकल्पना आहे. सुटसुटीत पॅटर्न असलेला टय़ुनिक तिथे पसंत केला जातो. भारतीय डिझायनर्सनी कुर्तीला या टय़ुनिकच्या संकल्पनेत टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुर्तीला एक ग्लोबल लुक मिळालं आहे. हा आता केवळ एक पारंपरिक पेहराव राहिला नसून त्याला जागतिक ढंग मिळाला आहे. त्यामुळे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कुर्तीला स्टाइल करून तुम्ही ती वापरू शकता,’ कुर्तीमधील या विविधतेबद्दल सांगताना डिझायनर पूनम भगत सांगते. हल्ली मुलांनाही टी–शर्टपेक्षा शॉर्ट कुर्ता आणि डेनिम कॉलेज, ऑफिसमध्ये घालायला आवडतं. घरातली कॉलेजला जाणाऱ्या मुलीपासून ते आई अगदी आजीपर्यंतही ही कुर्ती पोहोचली आहे. पुरुषमंडळीसुद्धा पुन्हा एकदा कुर्त्यांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे घरातल्या सर्वासाठी त्यांच्या पसंतीनुसार कुर्तीचं बदलतं रूप आपल्याला आज पहायला मिळतं. ‘रोज घालायची असल्यास कॉटर्नची कुर्ती तुम्ही वापरू शकता. एखादी शिफॉनची कुर्ती घ्या, ती तुम्ही पार्टीला घालू शकता. सिल्कची कुर्ती सणांमध्ये तारीफ मिळवते. आणि खादी कुर्ती तर कधीही उत्तमच. कुर्तीमध्ये जितकी विविधता आणाल तितकं थोडं आहे. त्यामुळे कुर्ती आज फक्त तरुणीची नाही तर सर्वाचीच लाडकी बनत आहे,’ असे डिझायनर श्रुती संचेती सांगते. असं असताना याची किंमत अव्वाच्या सवा असते असंही नाही. अगदी स्ट्रीट शॉपिंग करताना फेरीवाल्याकडे दोनशे रुपयापासून ते वातानुकूलित दुकानात काही हजाराच्या किमतीमध्ये या कुर्ती उपलब्ध असतात. आपल्याला आपल्या बजेटनुसार त्यांची निवड करायची असते इतकंच.
दरवेळी बदलता रंगढंग
सध्या ‘मल्टी युझ’ पेहरावाची संकल्पना रुजू होतेय. यामध्ये एक ड्रेस किती वेगवेगळ्या पद्धतीने घालता येऊ शकतो, याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दरवेळी लुकमध्ये बदलही मिळतो आणि वॉर्डरोबचा खर्च बजेटमध्येसुद्धा बसतो. कुर्ती या संकल्पनेमध्ये अगदी चपखल बसते. एक कुर्ती तुम्ही लेगिंगपासून ते स्ट्रेट सलवार, धोती पँट, घागरा, पतियाला कशावरही सहज घालू शकता. त्यामुळे दरवेळी तिला एक वेगळं रूप मिळतं. मुलांच्या वॉर्डरोबमध्ये आधीच पर्याय कमी असतात. पण, मुलांनासुद्धा अगदी डेनिमपासून ते थेट धोती पँट, धोती, पतियाला, सलवापर्यंत सगळ्यावर कुर्ता घालता येतो. त्यात त्यावर एखादं जॅकेट, श्रग, शर्ट घातल्यास त्याचं रूप अजूनच खुलतं. जिममध्ये जाऊन पीळदार दंड कमावणाऱ्या मुलांची शरीरयष्टी कुर्त्यांमध्ये उठून दिसते. त्यामुळे आखूड बाह्य़ांचे कुर्ते मिरवणे त्यांनाही आवडतं. अगदी लग्नातही मुली अनारकली किंवा स्ट्रेट कुर्ता विथ घागरा या लुकला पसंती देत आहेत. या कुर्तीजनंतर सलवारसोबत घालता येतात. घागराही चोलीसोबत वेगळा घालता येतो. त्यामुळे रिसेप्शनला लागणाऱ्या एका ड्रेसचा पुढे तीन प्रकारे वापर करता येतो. ‘कुर्ती आता केवळ कपडय़ांचा एक प्रकार राहिलेला नाही. त्याला फ्युजनच रूप मिळालं आहे. त्यात तुमची परंपराही जपली जाते आणि नवेपणासुद्धा साधला जातो. हे कुर्ती फॅशनमध्ये येण्याचं मोठं कारण आहे,’ असे डिझायनर वैशाली एस सांगते.
अर्थात ‘कारण काही असो, पारंपरिक असो किंवा मॉडर्न, आपले असो किंवा परदेशी जे आम्हाला घालायला सोयीचं असेल, खिशाला परवडेल आणि दिसायला छान दिसेल ते आम्ही वापरणार,’ हा नारा केवळ तरुणाईचा नाही तर कपडे निवडताना प्रत्येकाचा असतो. आणि कुर्तीचं प्रत्येक रूप तुमच्या या अटी–शर्ती मान्य करतं. त्यामुळे तिला नाकारायचं काही कारणच उरत नाही. त्यामुळे येत्या काही वर्षांसाठी तरी ही कुर्ती आपलं स्थान टिकवून ठेवणार यात शंका नाही.
दुपट्टा, जॅकेट आणि बरंच काही..
पारंपरिक कुर्तीचा विषय निघाल्यास दुपट्टाचा विषय निघणार नाही असं होणं शक्य नाही. पण नव्या स्वरूपाच्या कुर्तीमध्ये दुपट्टा काहीसा बाजूला पडला. रोज ऑफिस, कॉलेजच्या धावपळीत दुपट्टा सांभाळणं कित्येकींना कठीण जातं. त्यामुळे दुपट्टय़ाची जागा श्रग, एम्ब्रॉयडर जॅकेट, केप यांनी घेतली आहे. कित्येकदा छोटे स्कार्फ, स्टोल, स्टेटमेंट नेकपीस वापरून दुपट्टय़ाची कसर भरून काढली जाते. तरीही दुपट्टय़ाचं अस्तित्व पुसलं गेलं असं अजिबात नाही. उलट कुर्त्यांसोबत त्याचंही रूप पालटलं. मोठाले गोंडे, लटकन लावलेले, आकाराने लहान, रंगीत प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, नक्षीकाम केलेले दुपट्टे आता बाजारात येऊ लागले आहेत. ‘एक कुर्ता एक दुपट्टा’ ही संकल्पना मागे पडत एक दुपट्टा विविध कुर्त्यांवर वापरला जाऊ लागला आहे.