lp17दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार, असे मानले जाते. दहा हजार पायऱ्या चढून तिथे जाणं हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.

भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. भौगोलिक दृष्टय़ा असंख्य छोटय़ा-मोठय़ा पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये ‘जुनागढ’ या शहरापासून गिरनार तळ पाच किमी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच १६ गावांपर्यंत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी- जगताने संपन्न, विविध औषधी-वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगीसिद्ध-महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेकजण  गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात.
गिरनार पर्वताच्या पायथ्याला (गिरनार तलेठी) भवनाथ महादेव मंदिर, मृगी कुंड, लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला हजारो साधू-संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगी कुंडामध्ये हे नागा-साधू स्नानाला उतरतात. अशी एक आख्यायिका आहे की त्या साधूमध्ये असा एक lp25 साधू असतो की जो स्नानाला मृगी कुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजनी आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचालित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्रीशेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.
आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालले आहे. गुरू-शिष्य (नाथ परंपरा) येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे ‘प्रसाद’ घेतला जाईल याकडे स्वत: श्रीशेरनाथ बापूंचा कटाक्ष असतो. लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि. मी आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्रीकाश्मिरी बापूंचा आश्रम आहे. श्रीकाश्मिरी बापूंचे वय अंदाजे दीडशे वर्षेच्या आसपास आहे, अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रद्धा आहे. याही आश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसादाचे भोजन घ्यावे लागते. अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तपाने पवित्र असे हे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे.
गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त-भक्ताची इच्छा असतेच. सुमारे दहा हजार पायऱ्यांवर हे स्थान आहे. वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिक दृष्टय़ा चढणे अशक्य वाटते त्यांना त्यासाठी या कमानीजवळ डोलीवाले आहेत. डोलीवाले एका व्यक्तीसाठी दहा हजार रुपये  आकारतात. पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर सुमारे २०० पायऱ्यांवर डावीकडे एक भैरवाची मूर्ती आढळून येते. पूर्वी एक सिद्ध श्रीलक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू-संतांमध्ये त्यांचा मान खूप मोठा होता. दोन हजार  पायऱ्यांवर ‘वेलनाथ बाबा समाधी’ असा फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिद्ध स्थान आहे, असे सांगतात. वाटेत आजूबाजूला चहा-कॉफी- सरबत मिळण्याची दुकाने आहेत. दोन हजार २५० पायऱ्यांवर श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर ‘माली परब’ घाट येतो. तेथे एक रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले lp26कुंड आहे. दोन हजार ६०० पायऱ्यांच्या आसपास राणकदेवी मातेची शिळा आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडेतीन हजार  पायऱ्यांपाशी प्रसूती बाई (देवी)चे स्थान आहे. संतान प्राप्त झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, कालिमाता, वरुडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला यात्रेकरूंना बसण्यासाठी जागा आहे. थोडा काळ येथे विश्रांती घेऊन यात्रेकरू पुढे मार्गस्थ होतात. सुमारे चार हजार पायऱ्यांवर जैन-मंदिर येते. मुख्य मंदिर ‘नेमिनाथाचे’ आहे. अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ हे २२ वे जैन तीथर्ंकर होय. या मंदिरातून थोडय़ा पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीथर्ंकर श्रीआदिनाथांची भव्य अणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन-दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकसुर-कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर ‘गौमुखी गंगा’ नावाचे स्थान आढळून येते. येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. आणि डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. (काही ग्रामस्थ, भाविक, साधू-बैरागी या मार्गाने येतात अथवा जातात. या मार्गावर कुठल्याही प्रकारची दुकाने अथवा मदतीसाठी माणसे-डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही.) गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायऱ्यांवर ‘अंबाजी टुंक’ येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळीपौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान, बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे पाचशे पायऱ्या चढल्यावर ‘श्री गुरू गोरक्षनाथ टुंक’’ हे स्थान येते.
गिरनार पर्वतवरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून तीन हजार ६६६ फुटांवर हे स्थान येते. नवनाथ संप्रदायातील श्रीगोरक्षनाथांनी येथे तपश्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे, अशी भाविकांची धारणा आहे. बाजूलाच गुरू गोरक्षनाथांची धुनी आहे. असे म्हणतात की याच स्थानावर गुरू गोरक्षनाथांनी चौऱ्यांशी सिद्धांना उपदेश केला. बाजूलाच एक पाप-पुण्याची खिडकी (बारी) आहे, म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था बघणाऱ्या महंत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील ‘सेवा’ या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहाणे, तपश्चर्या करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. गोरखटुंकनंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते पंधराशे पायऱ्या उतरायला लागतात.
वाटेत श्रीगिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्रीगिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देतात.  थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठय़ा कमानी दिसतात. एका उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्रीकमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर हजार पायऱ्या चढल्यावर ‘दत्त टुंक’ आहे. चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी-वारा-पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. याच स्थानावर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. दहा बाय बारा चौ. फूट जागेमध्ये दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात, असा समज आहे. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते तसेच आकाशातील चांदण्यांचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी जे अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते  येथे येऊनच अनुभवावे. पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढगसुद्धा या शिखरापासून खाली असतात. उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानाकडे जायला ३०० पायऱ्या उतरायला लागतात. इथे पाच हजार वर्षांपासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे सहा ते आठ या वेळेत ही धुनी प्रज्ज्वलित करण्यासाठी उघडतात. त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. महंत अमृतगिरी बापू म्हणून एक सिद्ध होऊन गेले. त्यांनी या स्थानावर राहून भरपूर तप केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने येथे सकाळी आठ ते रात्री आठ अव्याहत अन्नछत्र चालू असते. इतक्या दुर्गम स्थानी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नदान सेवा वृत्तीने देणाऱ्या कमंडलू स्थानाचा उपक्रम हा कौतुकास पात्र आहेच, पण अचंबित करणारा आहे. कमंडलू स्थानाची अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रेय ध्यानात अनेक वर्षे दत्तटुंकवर बसलेले असताना देवी अनुसूया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एका ठिकाणी अग्नी- (जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान.
कमंडलू स्थानापासून पुढे पायवाटेने गेल्यास अतिशय दुर्गम, निर्जन ठिकाणे आहेत. त्यामध्ये महाकाली खप्पर, अनुसूया टेकडी, पांडवगुंफा, कपिलधारा, अघोरी गुंफा या स्थानांचा प्रामुख्याने समावेश होतो. कृपया एकटय़ा-दुकटय़ाने या स्थानी जाण्याचा कुणी अट्टहास करू नये व गेल्यास कुणी स्थानिक माहीतगार व्यक्तीस बरोबर घेऊन जाणे हितकारक आहे.
परत येताना आहे त्या मार्गावरून येणे उत्तम, पण गौमुखी गंगा मंदिरापासून जी मागे उल्लेख केलेली वाट आहे त्या वाटेवरून आल्यास शेषावन मार्गे भवनाथ मंदिरापाशी (गिरनार तलेठी) पोहचता येते. वाटेमध्ये आनंद गुंफा, महाकाली गुंफा, सेवादास आश्रम-सीतावन-शेषावन-भरतवन- जांबुवंत गुंफा अशी अनेक स्थाने बघत बघत भवनाथ मंदिरापाशी पोहचता येथे. या मार्गावर यात्रेकरूंसाठी कुठलीही सोय नाही. तसेच अंदाजे एक हजार पायऱ्या अधिक आहेत. अशा या  स्थानावर जाऊन येणे, तेथील वातावरण अनुभवणे व्हावे. आयुष्यात किमान एकदातरी ही गिरनार यात्रा प्रत्येक दत्तभक्तांच्या नशिबी यावी, हाच या लेखनाचा उद्देश.
(संदर्भ: ‘गिरनार- एक दिव्य दर्शन’ )

Guru Nakshatra Transit 2024
२० ऑगस्टपर्यंत चांदीच चांदी! गुरू देणार पैसा, प्रेम, प्रसिद्धी; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Mars will do the goods With the entry of Rohini Nakshatra
मंगळ करणार मालामाल; मंगळाच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
swami samarth guru purnima marathi news
गुरूपौर्णिमेला स्वामी समर्थ दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी
Akkalkot, guru purnima, devotees,
अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
pl Deshpande, sunita Deshpande
हरिश्चंद्राची बहीण.. : औदार्याचा विलक्षण अनुभव
Horoscope sun By entering the Pushya Nakshatra
चार दिवसांनंतर सूर्याचा जबरदस्त प्रभाव; पुष्य नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार बक्कळ पैसा
Horse arena in Tukoba palanquin ceremony Pune print news
‘रिंगण सोहळा पाहिला म्या डोळा’; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अश्वांचे रिंगण
Saturn's Nakshatra transformation for 87 days the holders
पैशांचा पाऊस पडणार! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ८७ दिवस ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा अन् मान-सन्मान