सिनेमा-मालिकांप्रमाणे आता खऱ्याखुऱ्या लग्नातही आठवडाभर विविध कार्यक्रम असतात. त्यात लक्षवेधी असतो तो संगीत सोहळा. डीजे आणि बेंजोसोबत आता विविध संकल्पनांमधून हा संगीत सोहळा रंगतोय. तो अविस्मरणीय कसा होईल, यावर अनेकांचा भर असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्न म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते भरजरी कपडे, खूप खरेदी, मोठे हॉल, भरपूर लोक आणि चविष्ट जेवण. पण आता या यादीत भर पडतेय ती लग्नांमधल्या विविध कार्यक्रमांची. हळदी, मेहंदी, गेटटूगेदर, गप्पांची मैफल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगीत. हल्ली संगीत म्हणजे एक मोठा इव्हेंट असतो. संगीतासारखे कार्यक्रम पूर्वी केवळ पंजाबी, गुजराती, राजस्थानी अशा लग्नांमध्ये बघायला मिळायचे; पण हळूहळू या संगीत सोहळ्याचे वारे बदलले आणि मराठमोळ्या घरांमध्येही संगीताचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाऊ लागला.

खरं तर हे संगीत कार्यक्रम लग्नाच्या बजेटवर अवलंबून असतात. बिग बजेट लग्नांमध्ये तर बडय़ा कलाकारांना कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी बोलावण्यात येतं. कधी कोरिओग्राफर्स तर कधी मित्र-मैत्रिणींनी तयार केलेले विविध कार्यक्रम, तर कधी नुसती डी.जे. नाईट असते. पण हा संगीताचा कार्यक्रम आजच्या लग्नांमध्ये मस्ट असतो.

संगीत सोहळा म्हटलं की, गाणी आणि नाच तर असलंच पाहिजे. घरची मंडळी मित्रपरिवार सर्व मिळून विविध गाणी लावून त्यांना हव्या त्या पद्धतीने हव्या त्या गाण्यांवर नृत्य करतात. साधारण घरांमधून लग्नात संगीताचा हाच ट्रेंड दिसतो. बरेचदा संगीत सोहळ्यावर खूप खर्च तर करायचा नसतो, पण धमाल तर हवी असते. अशा वेळी घरच्याच मंडळींपैकी कुणी तरी बॉलीवूडमधली टिपिकल ‘शादी साँग्स’ डाऊनलोड करून लॅपटॉपवर लावतात आणि सगळे नातेवाईक धमाल करत असतात. दिल्लीची रुपाली करजगीर सांगते, ‘माझ्या लग्नात माझ्या सर्व परिवाराने आणि मैत्रिणींनी खूप धमाल करावी आणि मनसोक्त नाचावं अशी माझी इच्छा होती. जर संगीतासाठी कोरिओग्राफर्स बोलवले असते तर ज्यांना नाचता येत नाही किंवा ठरावीक स्टेप्समध्येच नाचणे ज्यांना अवघड आहे त्यांच्यासाठी ते योग्य ठरलं नसतं. तसंच केवळ संगीतासाठी खूप खर्चदेखील करण्याची इच्छा नव्हती म्हणून आम्ही घरच्यांच्या सोयीने आनंद लुटण्यासाठी साध्या संगीतसंध्येचं आयोजन केलं होतं.’

संगीत सोहळ्याचा हा ट्रेंड खरं तर बराच जुना आहे. पण त्यासोबतच आजची हौशी मंडळी स्वत:च्या कलागुणांचा वापर करून आपल्या भावाबहिणींच्या लग्नात मित्र-मैत्रिणींच्या लग्नात सुंदर नृत्य बसवतात. बऱ्याचदा लव्ह मॅरेज असल्यावर नवरा मुलगा व नवरी मुलगी यांची प्रेमकहाणी दाखवणारे किंवा परिवारातील मंडळींच्या स्वभावाला साजेसे गाणे वापरून एक-दोन तासांचा कार्यक्रम सादर केला जातो. यामध्ये मित्रमैत्रिणींचा सहभाग असल्यामुळे आपलेपणा असतो. तसेच सगळ्या परिवाराच्या स्वभावाशी जोडलेला कार्यक्रम असल्यामुळे लहान मुलांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्व मंडळी या आनंदाचा एक भाग होऊन जातात. मधुजा सावंत सांगते, ‘माझा प्रेमविवाह असल्यामुळे मित्र-मैत्रिणी, आई-बाबा व नवऱ्याकडून ‘संगीत सोहळा’ ही मला मिळालेली सगळ्यात मोठी भेट होती. आई-बाबांची अशी इच्छा होती की, केवळ तरुणांनाच नाही तर सर्व वयाच्या नातेवाईकांना या सोहळ्याचा आनंद घेता आला पाहिजे. माझ्या कॉलनीच्या मित्र मैत्रिणींनी जुन्या आठवणी ताज्या करणाऱ्या गाण्यांवर तर माझा नवरा व त्याच्या मित्रमंडळीने माझे स्वागत करणाऱ्या गाण्यांवर नृत्य बसवून मला मोठं सरप्राइझ दिलं. इतर नातेवाईकांनी ऑर्केस्ट्रावर जुन्या मराठी गाण्यांचा आस्वाद घेतला. सगळे एकदम खूश होते.’ या संपूर्ण सोहळ्यात आपलेपणा असल्यामुळेच लग्नापेक्षा संगीत सोहळ्याची रात्रच सगळ्यांच्या लक्षात राहिल्याचं मधुजा आवर्जून नमूद करते.

यामध्ये आणखी एक नवा ट्रेण्ड दिसतो. संगीत सोहळ्यातले नृत्य अनुभवी कोरिओग्राफर्सकडून बसवून घेण्याला अनेक जण प्राधान्य देतात. नवऱ्या मुला-मुलीच्या सगळ्या नातेवाईकांकडून नाच बसवण्याची महत्त्वाची कामगिरी अनुभवी कोरिओग्राफर्सकडून उत्तम बजावली जाते. तसंच नाचता न येणाऱ्या लोकांची क्षमता लक्षात घेऊन नाच बसवला जातो. यासाठी खूप आधीपासून तयारी लागते. कोरिओग्राफर्सची वेळ घेऊन त्यांना आपल्या आवडी आपली इच्छा सांगणे. त्यानुसार त्यांनी दिलेल्या गाण्यांवर शिकवलेले नृत्य याचा सराव करणे हे त्यात महत्त्वाचं असतं. यासाठी व्यवस्थित वेळ देऊन कार्यक्रमाची तयारी करावी लागते. या संपूर्ण उपक्रमाला आज एका व्यवसायाचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

 उच्च मध्यमवर्गीय परिवारांच्या लग्नांमधील संगीत सोहळ्याचं रूप आणखी वेगळं असतं. कला क्षेत्रातले अनुभवी, दिग्गज लोक अशा घरांमध्ये आपली कला सादर करतात. ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ असं चित्र जास्त दिसतं. अशा लग्नांमध्ये थीम ठरवण्यापासून ते त्यानुसार कपडे-ज्वेलरी घेण्यापर्यंत आणि सेलेब्रिटीजचे कार्यक्रम ठेवण्यापर्यंत असं सगळंच येतं. मुंबई येथील ‘मॅरियड आर्ट्स’ या इव्हेंट्स मॅनेजमेंटचं काम करणारा ग्रुप या संगीत सोहळ्यासाठी नेहमी सक्रीय असतो. या ग्रुपचा श्रेयस देसाई बिग बजेट लग्नांमधल्या सोहळ्याविषयी सांगतो, ‘आंतरराष्ट्रीय भारतीय विवाहांमध्ये संगीत सोहळ्याचा ट्रेण्ड वाढतोय. नुकत्याच झालेल्या एका लग्नात तमीळ कपलसाठी आम्ही अमेरिकेला टय़ुटोरियल व्हिडीओज पाठवले. यामध्ये विविध गाण्यांवर नृत्य बसविलेले होते. ते बघून या जोडीने सराव केला व संगीत सोहळ्याच्या एक आठवडय़ाआधी आमच्यासोबत कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली. तसेच याच कार्यक्रमासाठी आमच्या टीमतर्फे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि भारत या पाच देशांत असे टय़ुटोरियल व्हिडीओज् पाठवण्यात आले आहेत. येत्या १३ डिसेंबरला भारतीय वधू आणि ऑस्ट्रेलियन वर यांच्या होणाऱ्या विवाहातही आम्ही तिथल्या तिथे त्यांना नृत्य शिकवणार आहोत.’ या सगळ्यासाठी पुरेसा वेळ मिळणंही आवश्यक असतं. सध्याच्या धावपळीच्या जीवनात हा वेळ काढणं थोडंसं कठीण असतं. पण, अशांसाठीही श्रेयसचा ग्रुप वेगळ्या प्रकारे मदत करतो. ज्यांना वेळ मिळत नाही अशांसाठी लग्न असलेल्या ठिकाणी जाऊन ते तिथल्या तिथे इच्छुकांना नृत्य करण्यात मदत करत असल्याचं श्रेयस सांगतो. टय़ुटोरियल व्हिडीओ, लग्नाच्या किंवा संगीत सोहळ्याच्याच दिवशी जाऊन नृत्य शिकवणं हे ट्रेण्ड येत्या काळात नवा पायंडा पाडतील. कारण रोजच्या व्यग्र वेळापत्रकातून हौसमौज करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

संगीत सोहळ्यामुळे कुटुंबातल्या अनेकांची नाच करण्याची सुप्त इच्छा पूर्ण होते. तर काहींना त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी मिळते. प्रत्येक कुटुंबात हौशी कलाकार असतातच. त्यांच्यासाठी हा संगीत सोहळा म्हणजे खुला मंच ठरतो. त्यांना त्यांची कला सादर करण्याचं हक्काचं व्यासपीठ असतं. नागपूरच्या केतकी तेलंग-धर्माधिकारी हिच्या संगीत सोहळ्यामध्ये कोरिओग्राफर्सना बोलावून कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. ती सांगते, ‘माझ्या लग्नातला संगीत सोहळा म्हणजे माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा दिवस होता. या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे म्हणजे मित्रपरिवार, नातेवाईक एकत्र सराव करायचो. त्यानिमित्ताने भेटणं व्हायचं, मजा करायचो. धम्माल होती ती सगळी. कार्यक्रमाचं निवेदनही खूर छान झालं होतं. माझ्यासाठी ते सगळं होत असल्यामुळे त्या दिवशी मला ‘खास’ असल्याचं सारखं वाटत होतं. संपूर्ण परिवाराला एकत्र आणण्यासाठी संगीत सोहळा अतिशय महत्त्वाचा असतो असं वाटतं.’

बिग बजेट लग्नांमध्ये कलाकारांनी हजेरी लावणं हा प्रकार बॉलीवूडमध्ये रुजला आहे. मोठमोठय़ा बिझनेसमन, विविध क्षेत्रांतल्या बडय़ा हस्ती यांच्या लग्नांमध्ये बॉलीवूड ताऱ्यांनी हजेरी लावणं नवं नाही. यासाठी कलाकारांना योग्य तो मोबदलाही दिला जातो. पण, हाच ट्रेण्ड आता इतर स्तरांमधल्या लग्नांमध्येही आढळून येतो. लग्नसोहळ्यात कलाकारांनी उपस्थिती दर्शवली की, सोहळ्याची शोभा आणखीच वाढते. तसंच लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठीही ते आकर्षणाचं कारण ठरतं. ‘मॅरियड आर्ट्स’ने आयोजित केलेल्या एका संगीत सोहळ्यात जॉनी लिव्हर उपस्थित होते. संगीत सोहळ्याच्या बजेटनुसार त्याचं स्वरूप अधिकाधिक आकर्षक केलं जातं. त्यानुसार कलाकारही ठरवले जातात.

काही ठिकाणी बजेटचा मुद्दा महत्त्वाचा असतो तर काही ठिकाणी सोहळा आकर्षक कसा होईल याची काळजी असते. काहींना सगळं कुटुंब एकत्र व्हायला हवं असतं तर काहींना व्यवस्थित नियोजित कार्यक्रम लागतो. पण, काहींसाठी वेगळेपण महत्त्वाचं असतं. नेहमीसारखा साचेबद्ध संगीत सोहळा न करता तो वेगळा कसा होईल यावर जास्त भर असतो. मग यासाठी विशिष्ट थीम ठरवली जाते. त्यानुसार गाणी निवडली जातात. कपडय़ांचीही थीम ठरवली जाते. नृत्य आणि गायन अशा दोन्ही कला सादर केल्या जातात. असंच वेगळपणं तेजल खरे-सहस्रबुद्धे हिच्या संगीत सोहळ्यात होतं. ती सागंते, ‘माझ्या लग्नात मला नेहमीपेक्षा काही तरी वेगळा कार्यक्रम करायचा होता. म्हणून आम्ही राजस्थानच्या ‘बन्ना बन्नी’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये राजस्थानी बायका ढोलकी चमचा असे वाद्य वाजवत राजस्थानी लोकगीत म्हणतात. ज्यामध्ये मुला-मुलींना एकमेकांच्या नावाने चिडवलं जातं. या चिडवाचिडवीच्या खेळात सर्वानाच खूप मजा येते. ‘थारो बींद जैसे सागर गोटो म्हारो छैल छबिली िबदणिया’ असे बोल म्हणत या रंगारंग कार्यक्रमात नृत्य आणि गाण्यांची मजा असते.’

संगीतासाठी वेगळा कार्यक्रम न करता लग्नाच्या दिवशीच प्रस्थापित कलाकारांची संगीत मैफल आयोजित करण्यात येते. यामध्ये गायनापासून ते सतार, बासरी, तबलावादनाचेही कार्यक्रम असतात. प्रस्थापित कलाकारांची कला ऐकायला-बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. इतर सणासुदीच्या दिवसांमध्ये अशा मैफलींना प्रचंड गर्दी होत असते. पण, लग्नसोहळ्यातही अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रकार अलीकडे वाढताना दिसतो. याबद्दल विद्याधर निमकर सांगतात, ‘माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नात रिसेप्शनच्या थोडं आधी पंडित उपेंद्र भटांची गाण्याची मैफल तसेच बासरीवादनाची मैफल आयोजित केली होती. यामागे एक विशिष्ट उद्देश होता. लग्नसमारंभात लोकांना आमंत्रित करताना आपण त्यांना आपल्या आनंदात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु प्रत्यक्ष लग्नात यजमान कामांमध्ये व्यग्र असतात व आमंत्रित मंडळी आपल्या सोईनुसार येऊन जाते. यामुळे सगळे एका वेळी एकत्रित आनंदाचा आस्वाद घेऊ शकत नाही. म्हणूनच सगळ्यांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने आनंदात सहभागी व्हावं यासाठी आम्ही अशा मैफिलीचे आयोजन केले. ही सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या स्नेही परिवारातील आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी नाही तर सर्व परिवाराला एकत्र एका वेळी एका ठिकाणी आनंदात सहभागी करण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले.’

साध्या गाण्यांवर नाचण्यापासून ते साचेबद्ध संगीत कार्यक्रमांपर्यंत, सेलेब्रेटीजच्या सादरीकरणापासून ते ज्येष्ठ कलावंतांच्या संगीत मैफिलींपर्यंत संगीत कार्यक्रमात अनेक प्रकार असतील; पण आज घराघरांत प्रत्येक लग्नात संगीत सोहळा हा एक अविभाज्य अंग झालेले आहे. संगीताशिवाय लग्नाला मजा नाही. परिवाराला एकत्र आणणारा, मित्र मैत्रिणींना अनेक आठवणींचे क्षण देणारा, वधू-वराच्या जीवनात अविस्मणीय असा हा संगीत सोहळा लग्नसमारंभाची जान आहे; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
निहारिका पोळ

More Stories onलग्नMarriage
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding special sangeet program in wedding
First published on: 05-02-2016 at 01:20 IST