यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकापाठोपाठ सामने जिंकत भारतीय टीमने जनमानसाचा पुरता ताबा घ्यायला सुरुवात केली तसा वर्ल्डकपचा फीव्हर जोमाने चढू लागला. दूरचित्रवाणीवर सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांचे आकडे कोटी कोटींचा टप्पा पार करू लागले आणि दुसरीकडे जाहिरातींच्या दरांचा पारादेखील कैक पटींनी वाढू लागला. भांडवलदारांना सोयीस्कर निर्णय घेणाऱ्या पक्षाचं सरकार सत्तेत आलं की जसा शेअर बाजार उसळी घेतो अगदी तसेच भारताच्या सेमी फायनल प्रवेशानंतर जाहिरातींच्या दरांनी उसळी घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या सामन्यात दहा सेकंदांच्या जाहिरातींसाठी चार-पाच लाख मोजावे लागले होते तेथेच आता १५-१८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. भारतीय जनमानसाचं क्रिकेटवेड एन्कॅश करण्याचा पुरता चंगच वाहिन्यांनी बांधला आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. याची सुरुवात खरंतर उपउपान्त्य सामन्यांपासूनच झाली होती. भारत बांगलादेश सामन्याच्या वेळीच दहा सेकंदांच्या जाहिरातींनी दहा लाखांचा टप्पा पार केला होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे झालं दूरचित्रवाणीसंदर्भात. पण यंदाच्या वर्ल्डकप सामन्यांच्या वेळा दिवसाच्या असल्यामुळे टीव्हीपासून दूर असणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्यामुळे डिजिटल माध्यमानेदेखील मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येतं. स्टार स्पोर्ट्सने खास वर्ल्डकप सामन्यांसाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने दहा दशलक्ष डाउनलोडचा आकडा पार केला आहे. अर्थातच हे अ‍ॅप विनाशुल्क असल्यामुळे खर्चवसुलीसाठी जाहिरातींशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. या अ‍ॅपवर प्रत्येक दर्शक सर्वसाधारणपणे २४ मिनिटे खर्च करत असल्यामुळे जाहिरातदारांनी याला पसंती दाखवली असली तरी सध्या तरी ही बाजारपेठ बाल्यावस्थेत आहे असेच म्हणावे लागले.
असो.. तर जाहिरातींचा इतका भडिमार होत असताना या जाहिराती खरंच कितपत पाहिल्या जातात हा प्रश्न उरतोच. दोन ओव्हर्सच्या मध्ये जसा खेळाडू क्षणभर विसावतो इतपतच नजरेने जाहिरातींकडे पाहण्याची भारतीय प्रेक्षकांची मानसिकता असते. मग लाखो रुपये खर्चून केलेल्या आणि कोटी रुपये ओतून दूरचित्रवाहिनीवर या जाहिराती दाखवताना उत्पादक नेमकं काय गणित बांधत असतील. अशा ठिकाणी केवळ क्रिएटिव्हिटी उपयोगात येते का? स्ट्रॅटेजी महत्त्वाची ठरते का? उत्पादनाची लोकप्रियता प्रेक्षकाला खेचून घेते का? असे एक ना दोन हजारो प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळेच वर्ल्डकपसारख्या लोकप्रिय इव्हेंटमध्ये केवळ प्रेक्षक आहेत म्हणून जाहिराती करून चालत नाही. प्रेक्षकांना सामन्याबरोबरच जाहिरातीदेखील पाहाव्या वाटत असेल तर फार घोळ न घालता, आविर्भाव न ठेवता हलकीफुलकी मांडणी करत आपलं म्हणणं मांडायचं आणि चालू लागायचं हाच फंडा वापरावा लागतो असे जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपल्या प्रेक्षकांचं टेंपरामेंट कसं असेल यावरच तुमची जाहिरात पाहिली जाते. मात्र वर्ल्डकप दरम्यान अशा जाहिरातींचं प्रमाण तुलनेने कमीच होतं असं म्हणावं लागेल.
वर्ल्डकप दरम्यान नेमक्या कोणत्या जाहिराती लक्षात राहिल्या या प्रश्नावर सध्या तरी फार काही आशादायक उत्तर देता येत नाही असाच अनेक दर्शकांचा सूर दिसून येतो. जाता जाता हलकाफुलका ह्य़ूमर असणाऱ्या काही जाहिराती मात्र लक्षात राहिल्या. त्यामध्ये फेविक्विकची ‘तोडमे नही जोडमे’ ही काहीशी वेगळी म्हणावी लागेल. त्याची कारणे दोन. एक म्हणजे ही जाहिरात त्यांनी थेट भारत-पाकिस्तान सामन्यातच लाँच केली. भारत-पाक सामन्याबद्दल आपल्या देशातील प्रेक्षकांची मानसिकता आणि जाहिरातीतलं वातावरण हे एकमेकांना पूरक आहे. दुसरं म्हणजे फेविक्विकच्या उत्पादकांनी आजवर त्यांच्या जाहिरातीत असणारं बॉण्डिंग तर दाखवलंच पण ते दाखवताना चेहऱ्यावर नकळत हसूदेखील फुलवलं. एकही संवाद नसणारी ही जाहिरात हलकीफुलकी तर आहेच, पण त्याला देशभक्तीची जोड मिळाल्यामुळे ती थेट भिडली असंच म्हणावं लागेल.
पेप्सीनं तर वर्ल्डकप सामन्यांचा वापर करत थेट पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या जाहिरातींची जुळणी केली आहे. पेप्सीच्या या प्रयोगावर अनेकांनी पेप्सीकडे आयडियांचा तोटा आहे का अशी टीकादेखील केली. तरी पेप्सीची मात्रा चांगलीच लागू पडली असून प्रेक्षकाला सामावून घेण्याची ही संकल्पना भविष्यातदेखील अन्य कोणाकडून एखाद्या वेगळ्या प्रसंगी वापरली जाऊ शकते.
असो.. गेल्या महिना दीड महिन्याच्या काळात अनेक नवनव्या उत्पादकांनी या निमित्ताने पैसा ओतला असला तरी खुमासदारपणे सादर झालेल्या जाहिराती हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्याच होत्या. पण तरीदेखील करोडोची उलाढाल झालीच आहे आणि भारतीय संघ पुढील मजल कशी मारतो यावर आणखीन काही करोडो खर्च झाले तर नवल वाटणार नाही, कारण आपल्या देशात क्रिकेट हे मैदानावर खेळ म्हणून खेळले जात असले तरी आपल्या मानसिकतेत त्याचं यश दडलेलं आहे.
सुहास जोशी

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2015 fever
First published on: 27-03-2015 at 01:17 IST