नृत्य कला हीदेखील इतर अनेक कलांप्रमाणेच अत्यंत प्राचीन व अनन्यसाधारण कला आहे. सुंदर सादरीकरण, गायन व वाद्यवृंदाची साथ, आकर्षक वेशभूषा, रंगभूषा इ. अनेक पैलूंमुळे नृत्यकलेची विशेषत: दिसून येते. अगदी पुरातन काळापासूनच विविध प्रसंगी मानवाने कलेद्वारे मानवी भावना व्यक्त केल्या आहेत, तसेच मनोरंजनाचे साधन म्हणून कलांचा वापर केला आहे. मानवी जीवन विविध प्रकारे कलेद्वारे परिवर्तित झालेले आपल्याला दिसून येते. रंगमंचावरील सादरीकरण, मनोरंजन याव्यतिरिक्तसुद्धा कलांचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून कलेचा विचार केला तर नृत्यशास्त्राचे वेगवेगळे पैलू आपल्याला आढळून येतील. नृत्य करताना आत्मिक आनंद मिळतो, तणावमुक्त, स्वछंदी वाटते; हादेखील नृत्याचा एक उपयोगच आहे. आजकाल पार्टीमध्येसुद्धा वातावरण तणावमुक्त बनवण्यासाठी, अधिक चांगल्या प्रकारे पार्टी एन्जॉय करायला डान्स हा अविभाज्य भाग असतो. ढोबळमानाने आपल्याला नृत्याचे अनेक फायदे माहीत आहेत, परंतु नृत्योपचार ही विविध समस्या, रोगांवरील शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आहे. पण याबद्दल भारतीय समाजात अजूनही फार प्रचार झालेला दिसत नाही. नृत्योपचार हे तसे नवीन क्षेत्र आहे, परंतु त्यात झपाटय़ाने प्रगती होत आहे व विविध प्रयोगही केले जात आहेत.
मन आणि शरीर यामध्ये निकटचा संबंध असतो, याबद्दल अनेक उदाहरणं आपण दैनंदिन आयुष्यात अनुभवली असतील. परीक्षेच्या आधी टेन्शनमुळे पोटात दुखणं, डोकं दुखणं किंवा तब्येत बरी नसताना कशात मन न लागणं, शरीराला दुखापत झालेली असताना कुठल्या गोष्टीत मूड न लागणं; असे कित्येक अनुभव आपल्याला सगळ्यांनाच कधी न कधी आले असतील. ‘मन आणि शरीर एकमेकांशी सलग्न असतात’ हेच नृत्योपचाराचे मूलभूत सूत्र आहे. मन आणि शरीरातील बंधनच या उपचार पद्धतीचा पाया आहे.
‘युवर वर्ड्स मे, बट युवर बॉडी कान्ट लाय’ हे प्रसिद्ध वाक्यदेखील नृत्योपचाराला पुष्टी देतं. बरेचदा एखादी गोष्ट बोलून व्यक्त करता येत नाही, पण कृतीमधून आपण ती दाखवू शकतो. सर्व मानवी भावनांनासुद्धा अनुरूप कृती जोडल्या गेल्या आहेतच. प्रेमामध्ये मिठी मारणे, रागामध्ये हातपाय आपटणे, नाराजी व्यक्त करण्यासाठी नाक मुरडणे, आनंदामध्ये हसणे, उडय़ा मारणे, दु:खात रडणे; अशा अनेक कृतींमधून आपण वेळोवेळी भावना व्यक्त करीत असतो आणि अशा प्रकारे भावना व्यक्त केल्याने मन हलकं होतं यात काही शंका नाही. अशाच प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने शारीरिक कृतींचा वापर नृत्योपचारातसुद्धा केला जातो. इथे एक मात्र गैरसमज दूर करायला हवा की नृत्योपचारामध्ये कुठलीही विशिष्ट नृत्य पद्धती वापरली किंवा शिकवली जात नाही. किंबहुना, नृत्य शिकवणं हा नृत्योपचाराचा हेतू नसतोच; परंतु उत्स्फूर्त शारीरिक क्रियांना वाव देणं, जेणेकरून प्रभावी प्रकारे भावना व्यक्त करता येतील यासाठी प्रयत्न केले जातात.
थोर नृत्यसंशोधक वोसिअन (Wosien,1974) याने म्हटले आहे की, ‘बीफोर मॅन एक्स्प्रेसेस हीज एक्स्पीरियन्सेस ऑफ लाईफ थ्रू मटेरियल; ही डझ सो विथ हीज ओन बॉडी’’. मानवाला भाषा नंतर अवगत होते, पण शारीरिक क्रिया मात्र जन्मापासून त्याला अवगत असतात. नृत्योपचाराला इंग्रजीमध्ये ‘‘डान्स मुव्हमेंट थेरपी’’ असे म्हटले जाते. त्यामुळे नृत्याचा अविभाज्य भाग असलेल्या शारीरिक हालचालींचा यात प्रामुख्याने समावेश होतो. सादरीकरण किंवा नृत्याचे शिक्षण या उपचार पद्धतीत अभिप्रेत नसते, परंतु स्वत:साठी, स्वत:च्या सुखासाठी डान्स करणे व त्या प्रक्रियेतून आपली समस्या दूर होण्यास मदत होणे; हाच नृत्योपचाराचा प्रमुख हेतू असतो. स्टॅन्टन जोन्स (Stanton-Jones 1992) याने नेमक्या शब्दांत या उपचार पद्धतीचा हेतू स्पष्ट केला आहे-‘‘द एम ऑफ डान्स थेरपी इज नॉट टू मूव्ह फ्रीली ऑर परफेक्टली, वट टू यूज मूव्हमेंट एक्स्परिमेंटेशन टू एक्स्प्लोअर न्यू वेज ऑफ बीईंग अ‍ॅण्ड फिलिंग अ‍ॅण्ड टू गेन अ‍ॅक्सेस टू फिलिंग दॅट कॅनॉट बी व्हर्बलाइज्ड’’. शब्दांत व्यक्त करायला कठीण असलेल्या भावांना शारीरिक क्रियांद्वारे व्यक्त केले जाते.
मरीअन चेझ (Marian Chace, १८९६-१९७०) यांना ‘नृत्योपचाराचे जनक’ मानले जाते. १९४० मध्ये दुसरे महायुद्ध संपले तेव्हा युद्धात सामील असलेल्या सैनिकांचे पुनर्वसन करणं फार आवश्यक होतं, बरेच सैनिक मानसिक असमतोलाला सामोरे जात होते. विविध, नवीन नवीन उपचार पद्धतींना या काळात प्रोत्साहन दिले गेले व अमेरिकेतील वाशिंग्टन डी.सी.मधील ‘सेंट एलिझाबेद’ इस्पितळाकडून मरिअन चेझ या नर्तकीला पाचारण करण्यात आले, कारण काही रुग्ण सामान्य उपचार पद्धतींना साथ देत नव्हते. त्यांनी विविध शारीरिक हालचाली, व्यायामाचे प्रकार, गाण्याबरोबर नृत्य अशा अनेक मार्गातून प्रयोग करण्यास सुरुवात केली व त्याचा परिणाम असा झाला की त्या रुग्णांची हालचाल करण्याची क्षमता वाढली, एकाकीपणा आणि एकलकोंडेपणा दूर होण्यास मदत झाली. हळूहळू त्यांच्या मानसिक स्थितीत सकारात्मक बदल दिसून यायला लागले. अशा प्रकारे ‘नृत्योपचारा’चा उगम झाला. नंतर मरिअन चेझ यांनी अनेक ठिकाणी या पद्धतीचा उपयोग केला व त्याचे शास्त्रोक्त शिक्षण देण्यास सुरुवात केली. १९६६ साली ‘अमेरिकन डान्स थेरपी असोसिएशन’ या ‘नृत्योपचारा’च्या पहिल्या संस्थेची स्थापना झाली व मरिअन चेझ या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या. आजपर्यंत या संस्थेने या क्षेत्रात अनेक मोलाची कामे केली आहेत व या संस्थेला नृत्योपचारातील श्रेष्ठ संस्थेचा मान प्राप्त झाला आहे.
भारतामध्येसुद्धा हळूहळू या उपचार पद्धतीचा प्रसार आणि विकास होत आहे. ‘त्रिपुरा कश्यप’ यांनी १९९० मध्ये अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात नृत्योपचाराचा प्रचार करण्यास सुरुवात केली व २०१४ मध्ये त्यांनी क्रिएटिव्ह मूव्हमेंट थेरपी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची दिल्ली येथे स्थापना केली. याअंतर्गत नुकतीच नोव्हेंबर २०१४ मध्ये भारतातील पहिली ‘जागतिक नृत्योपचारातील कॉन्फरन्स’ आयोजित केली गेली. अशा वैशिष्टय़पूर्ण, आधुनिक ‘नृत्योपचार’ पद्धतीसारख्या विविध पद्धतींचा अधिकाधिक विकास होणे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
पुढील भागात आपण या उपचार पद्धतीबद्दल अजून सविस्तर माहिती जाणून घेऊया. (क्रमश:)
तेजाली कुंटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance and health
First published on: 16-01-2015 at 01:11 IST