नृत्यसंरचना हा खरंतर खूप मोठा विषय आहे. पहिल्या लेखामध्ये आपण कोरिओग्राफी कशाला म्हटले जाते, त्याचे स्वरूप कसे असते हे पाहिले. तर संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा तसेच नेपथ्य यांना संरचनेमध्ये किती महत्त्व आहे हे मागच्या लेखात पाहिले. ह्यच कोरिओग्राफीला आता सगळ्याच क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण कुठल्याही कलाविष्काराचा प्राण, त्यातून सांगितलेले कथानक किंवा त्यातून उलगडून दाखविलेला विषय हाच असतो. म्हणून एखादी नृत्यसंरचना सादर होताना त्या विषयाप्रमाणे नृत्यसंरचनाकाराचा ती सादर करण्याचा दृष्टिकोन बदलतो. चित्रपट, मालिका, नाटकामध्ये नृत्याला महत्त्व आहेच, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवरील कॉन्फरन्सेस, वेगवेगळ्या विषयांवरील सेमिनार्स, पत्रकार परिषदा इत्यादी ठिकाणीही नृत्यसंरचनेच्या प्रस्तुतीला स्थान मिळाले आहे. 

नुकतीच ‘इंटरनॅशनल काँग्रेस सायन्स असोसिएशन’तर्फे दोन दिवसांची एक परिषद मुंबई विद्यपीठातर्फे आयोजित केली होती. जवळपास दहा हजार शास्त्रज्ञ संपूर्ण जगभरातून या परिषदेसाठी उपस्थित होते. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी नालंदा नृत्य महाविद्यालयातर्फे ‘पृथ्वी आनंदिनी’ हा बॅले ह्य वेळी सादर करण्यात आला. त्यात सात भारतीय नृत्यशैलींचा आणि काही लोकनृत्यांचा यामध्ये मिलाफ बघायला मिळाला. खरं तर ह्य परिषदेचा उद्देश वेगळा होता परंतु सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ह्य परिषदेमध्ये थोडा वेळ राखून ठेवला होता.
आपल्या देशातही अशाच प्रकारच्या विविध विषयांवरील परिसंवाद, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम सतत होत असतात. त्या ठिकाणीही आता नृत्यसंरचनेचे अनोखे दर्शन घडते. बरेच वेळा हे सेमिनार अथवा परिषदा ज्या भिन्न विषयांवर असतात त्या विषयाला अनुसरूनच नृत्यप्रस्तुती व्हावी अशी मागणी असते. उदा. एखादी वैद्यकीय विषयावरील परिषद असेल तर त्या विषयाला अनुरूप संरचना सादर केल्यास तो विषय प्रेक्षकांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होऊ शकते. असे वेगवेगळे विषय निवडून त्यावर काम करणे हे एक मोठे आव्हान असते.
हल्ली एखाद्या चित्रपटातील एक गाणे प्रसिद्ध झाले की वर्षभरात जेवढे पुरस्कार सोहळे, सण समारंभ, उत्सव होतात अशा सर्व ठिकाणी त्या गाण्यावरील नृत्यरचना आपल्याला बघायला मिळते. मात्र प्रत्येक सोहळ्यामध्ये नृत्यसंरचनाकार आणि नृत्य सादर करणाऱ्या अभिनेंत्रींचे चेहरे बदलतात. तरीही गाणे तेच आहे, परंतु कोरिओग्राफर बदलल्यामुळे त्या गाण्याकडे बघण्याचा प्रेक्षकांचा ‘नजरिया’ कसा बदलतो आणि त्यामुळे सादरीकरणातही कसा फरक पडतो हे पाहण्याजोगे असते.
‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका दीड वर्षांपूर्वी सुरू झाली. सुरुवातीला त्याच्या शीर्षकगीताची नृत्यसंरचना देवेंद्र शेलार यांनी केली होती. परंतु काही महिन्यांपूर्वी मालिकेत ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर शीर्षक गीतामध्येही थोडा बदल करण्यात आला आणि त्याला अनुसरून नृत्यसंरचनाही थोडी बदलण्यात आली. नृत्यसंरचनाकार सुभाष नकाशे यांनी मालिकेत झालेल्या घडामोडी आणि सध्याच्या मालिकेतील परिस्थितीप्रमाणे ते बदल केले.
दूरदर्शन आणि रंगमंचावर सादर होणाऱ्या संरचना ह्य त्या माध्यमातील बलस्थाने लक्षात घेऊन आकाराल्या जातात. काही वर्षांपूर्वी स्व. विनय आपटे दिग्दर्शित ‘एक लफडं .. विसरता न येणारं’ या व्यावसायिक नाटकामध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी नाटकाचा विषय, त्याचे संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना यांचा परिपूर्ण अभ्यास करून अतिशय उत्तम नृत्यसंरचना त्यात केली होती. त्यामुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकले. नाटकामध्ये नाटकाचा विषय, त्याचे संगीत, नेपथ्य, प्रकशयोजना यांचा परिपूर्ण अभ्यास करून करणे हे एक वेगळे आव्हान असते. कारण कथानक हा नाटकाचा गाभा असतो. म्हणूनच कथानकाला धक्का पोहोचू न देता त्यावर काम करावे लागते. त्या नाटकात जी गाणी असतात ती केवळ दोन किंवा तीन मिनिटांची असतात. एवढय़ा अल्प काळात कथानक योग्य रीतीने पुढे सरकवण्याचे काम त्या गाण्यांना करायचे असते. कोरिओग्राफरना ही जबाबदारी मोठय़ा कौशल्याने पार पाडावी लागते.
तुम्ही ‘झनक झनक पायल बाजे’, ‘पाकिजा’, तसेच अलीकडच्या काळातील ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’, ‘ए बी सी डी’, ‘आजा नचले’ हे चित्रपट पाहिले आहेत का? खास नृत्यांसाठी म्हणून हे सिनेमे तयार झाले आहेत. वरील प्रत्येक चित्रपटाचे कथानक अर्थातच भिन्न आहे. परंतु त्या चित्रपटातील एकूण एक गाण्यावर करण्यात आलेली जी नृत्यसंरचना आहे ती फारच अप्रतिम आहे. आताच्या काळात चित्रपटांमध्ये नृत्यसंरचना करताना कोरिओग्रफर आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर आणि योग्य ठिकाणी वापर करत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे ती नृत्यसंरचना मोठय़ा पडद्यावर बघताना अधिक आकर्षक दिसते.
कार्यक्रम, उपक्रम आणि माध्यम ह्यप्रमाणे नृत्यसंरचनेच्या मांडणीमध्ये बदल होत जातो. चित्रपट, मालिका, नाटक, विविध पुरस्कार सोहळे, समारंभ अशा विविध ठिकाणी नृत्यसंरचना सादर करताना कार्यक्रमाचा उद्देश, कालावधी, अवकाशाचा विचार आणि कथानक या सर्वाचा नीट अभ्यास केल्यास त्यांची मांडणी करणे सोपे होते तसेच समोरच्या व्यक्तीपर्यंत ती गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने किंवा अधिक सोप्या पद्धतीने पोहोचू शकते आणि अशी नृत्यसंरचना दीर्घ काळापर्यंत स्मरणात राहते.
शीतल कपोले