अमेरिकी डान्स थेरपी असोसिएशनच्या नृत्योपचाराच्या व्याख्येनुसार द सायकोथेरपिक यूज ऑफ मूव्हमेंट दॅट फर्दर्स इमोशनल, कॉग्नेटिव्ह, सोशल, बिहेवियरल अ‍ॅण्ड फिजिकल इंटीग्रेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल (१९७०) (The psychotherapeutic use of movement that furthers emotional, cognitive, social, behavioral and physical integration of the individual) (ADTA, 1970). याप्रमाणे नृत्योपचारामध्ये मानवी हालचालींचा मनुष्याचे बौद्धिक, मानसिक, सामाजिक इत्यादी आयुष्यातील भागांचा विकास होण्यास उपयोग केला जातो. या उपचार पद्धतीमध्ये विविध शास्त्रांचा उत्तम समन्वय दिसून येतो. मानसशास्त्र, योग, विविध नृत्यशैली, विविध कला प्रकार इत्यादी अनेक क्षेत्रांचा सुंदर मिलाप नृत्योपचारामध्ये बघायला मिळतो. विविध आजार, समस्यांवरील उपचार पद्धती म्हणून याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. नैराश्य, स्किझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डर अशा मानसिक आजारांसाठी, तसेच लहान मुलांमधील अतिचंचलता (ADHD- Attention deficit hyperactive disorder), आत्मकेंद्रीपणा (Autism) अशा विविध समस्यांकरिता नृत्योपचाराचा वापर होतो. तसेच विविध शारीरिक आजारांमध्ये जलद सुधारणेसाठी, शरीराच्या व्यायामासाठीसुद्धा मोठय़ा प्रमाणात नृत्योपचाराचा उपयोग होतो. केवळ रुग्णांसाठी ही उपचार पद्धती फायदेशीर आहे असे नाही, तर सर्वासाठीच याचा उपयोग होऊ शकतो. मोठमोठय़ा ‘कॉपरेरेट कंपन्यांमध्ये’ आजकाल शारीरिक व्यायाम, तणावमुक्ततेसाठी (stress management), सांघिक भावना वाढवण्यासाठी (team building), तसेच कॉम्प्युटरवर बसून फार वेळ काम केल्याने होणाऱ्या शारीरिक त्रासांवर उपाय म्हणून, इत्यादी अनेक कारणांसाठी नृत्योपचाराचा वापर केला जातो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मरीअन चेझ यांना नृत्योपचाराचे जनक मानले जाते. त्यांनी या उपचार पद्धतीच्या सत्रांचे चार भागांत वर्गीकरण केले. सत्राची सुरुवात शारीरिक व्यायामाने (warm up) केली जाते, ज्यामुळे सत्रामधील पुढील क्रियांसाठी (activities) शरीर सतर्क व तयार होते. दुसरा भाग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, ज्यामध्ये त्या सेशनचे उद्दिष्ट ठरवले जाते (उदा:- अंगाची लवचीकता, तणावमुक्तता, शरीराबद्दल सतर्कता (body awareness), सांघिक मनोभावना इ. व त्या उद्दिष्टाला अनुरूप अशा अ‍ॅक्टिव्हिटिज् घेतल्या जातात. यानंतर सत्रातील सर्वाना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले जाते, कारण नृत्योपचाराच्या विविध क्रियांमध्ये मनातील विविध भावना, विचार जागृत होऊ शकतात. ज्या सहज बोलून दाखवता येऊ शकत नाही अशा भावना शरीराच्या साहाय्याने व्यक्त केल्या जाऊ शकतात. या भावनांना वाचा फोडणे नृत्योपचारामध्ये बरेचदा महत्त्वाचे ठरते, कारण अनेकदा विविध मानसिक आजारांच्या मुळाशी या न व्यक्त होऊ शकणाऱ्या भावना, विचार, संवेदना असण्याची शक्यता असते. (सिग्मंड फ्रॉइड या थोर मानसशास्त्रज्ञाने जो सिद्धांत मांडला त्यात त्याने म्हटले आहे की, मनाचा केवळ ३० टक्के भाग सचेतन असतो ज्यातील विचार, भावना आपल्याला सहज आठवू शकतात किंवा व्यक्त करता येतात; परंतु ७० टक्के भागात मुद्दामून विसरलेल्या, सहज व्यक्त न करता येण्यासारख्या, समाजाला न पटतील अशा अनेक भावना व विचार यांचा संचय असतो; ज्या सहज आठवता येत नाहीत किंवा व्यक्त करायलाही कठीण असतात. अशा मनाच्या अचेतन (unconscious) भागातील विचार विविध उपचार पद्धतींत जागृत होतात व उपचारतज्ज्ञ (therapist) त्या विचारांना व्यक्त होण्यास मदत करतात, जेणेकरून रुग्णाचे मन हलके होण्यास मदत होते व त्यामुळे आजाराच्या मूळ कारणावर उपाय करणेही शक्य होते. सेशनच्या तिसऱ्या भागात सहभागी व्यक्तींचे विविध अनुभव, विचार यांची देवाणघेवाण होते, तेव्हा उपचारतज्ज्ञ व इतर सहभागी व्यक्ती त्यावर टीकाटिपणी न करता त्यांचा स्वीकार करतात व प्रत्येक व्यक्तीला त्याचे मन मोकळे करण्याची संधी दिली जाते. समुपदेशनाशी मिळतीजुळती प्रक्रिया या भागात घडते. सत्राच्या अंतिम भागात विविध पद्धती वापरून रीलॅक्सेशन केले जाते, जेणेकरून सत्रादरम्यान थकलेले मन व शरीर पूर्ववत व्हायला मदत होते. प्रत्येक सेशन चालू करण्यासाठी व संपविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो, त्यामुळे बाकीचे विचार बाजूला ठेवून सत्रासाठी मन व शरीर यांची तयारी होते आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. नृत्योपचाराचे सत्र एका व्यक्तीसाठी किंवा समूहासाठी घेतले जाते; उपचाराच्या उद्दिष्टावर व आजाराच्या तीव्रतेवर सत्रामधील सहभागी व्यक्तींची संख्या ठरवली जाते. बहुतांश वेळा गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी वैयक्तिक उपचार पद्धती जास्त फायदेशीर ठरते, तर कमी तीव्रतेच्या आजारांकरिता सहा ते आठ लोकांसाठी समूह उपचार पद्धती उपायशीर ठरते. उपचाराचा कालावधीदेखील विविध घटकांवर अवलंबून असतो. साधारणपणे आठवडय़ातून दोन वेळा दीड ते दोन तासांचे एक सत्र याप्रमाणे तीन-चार महिन्यांचा कालावधी समूह उपचार पद्धतीसाठी आदर्श मानला जातो; परंतु सहभागी व्यक्तींमधील सुधारणा, त्याचे मोजमाप, त्यांचे अनुभव यावर उपचार कधी थांबवायचे हे ठरवले जाते.
नृत्योपचारातील विविध अ‍ॅक्टिव्हिटींसाठी संगीताचा वापरही केला जातो. संगीत आणि नृत्य या दोन अविभाज्य गोष्टी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गाणं चालू झालं कीआपोआपच हातपाय त्यावर थिरकायला सुरुवात होते. परंतु नृत्योपचारात गाण्यांपेक्षा केवळ वाद्यांचा वापर केलेले संगीत मुख्यत्वे वापरले जाते, कारण विविध गाण्यांशी नृत्याच्या काही ठरावीकच हालचाली (स्टेप्स) केल्या जातात. मात्र नृत्योपचारामध्ये केवळ गाण्यावर नृत्य करणं अभिप्रेत नसतं, तर संगीताचा वापर सहभागी व्यक्तींच्या अंगभूत हालचाली उद्युक्त करण्यासाठी केला जातो. इथे नृत्याचे सादरीकरण हा हेतू नसून स्वत:ला जाणवतील, मनापासून कराव्याशा वाटतील अशा उत्स्फूर्त हालचाली करणं हे अधिक महत्त्वाचे ठरते. या प्रक्रियेद्वारेच विविध भावभावना, इच्छा, विचार यांचे आकलन होऊन ते व्यक्त करण्यास मदत होते. रिबिन्स, फुगे, वर्तमानपत्र, ओढण्या इत्यादी अनेक वस्तूंचादेखील समर्पकपणे उपयोग केला जातो. विशेषत: लहान मुलांबरोबर काम करताना, त्यांची रुची वाढवण्यासाठी तसेच त्याच्या हालचालींना एकप्रकारची सहजता आणण्यासाठी या वस्तूंचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, जर रिबिनची हालचाल, तिची गती मुलांना निरीक्षण करायला सांगून, नंतर त्यांना स्वत: रिबिन आहे असं कल्पना करायला सांगितली व त्यानंतर रिबिनीप्रमाणे हालचाल करायला सांगितली तर इतर वेळी कठीण वाटणारी शरीराची हालचाल ते सहज करू शकतात, त्याचबरोबर त्यांच्या शरीराची लवचीकता वाढण्यास खूप मदत होते किंवा फुग्यांचा वापरही शरीराबद्दलची सतर्कता वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. विविध अवयवांनी फुग्याबरोबर खेळण्यास सांगितले तर शरीराचे विविध अवयव कशा प्रकारे वापरता येऊ शकतात याची जाणीव होते व लवचीकता वाढण्यास देखील मदत होते. हा खेळ तर सगळ्या वयोगटातील व्यक्ती अगदी आवडीने खेळतात.
मी काही महिन्यांपूर्वी एका शोधप्रकल्पासाठी मुंबईतील एका मतिमंद मुलांच्या शाळेत चार महिने नृत्योपचाराची सत्रे घेतली. १०-१८ या वयोगटातील दहा मुले यात सहभागी झाली होती. कमी स्मरणशक्ती, चिडचिडेपणा, अत्यल्प शारीरिक क्रियांची मर्यादा, शरीराबद्दल कमी सतर्कता इ. काही समस्या त्यांच्यात मला आढळल्या व त्यासाठी विविध उद्दिष्टे ठेवून मी त्याप्रमाणे अ‍ॅक्टिव्हिटीज आखल्या. स्मरणशक्तीवर आधारित विविध नृत्यातील हालचाली वारंवार केल्या, विविध वस्तूंचा वापर त्यांची रुची वाढवण्यासाठी, तसेच विविध खेळ त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी घेतले गेले आणि ७२ तासांच्या या उपचाराच्या कालावधीनंतर त्यांच्यात खूप प्रगती दिसून आली. मुलांची शारीरिक लवचीकता वाढली, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यास मदत झाली. त्यांच्या भावनांना नृत्याद्वारे वाचा मिळाली आणि चिडचिडेपणा मारामारीत रूपांतरित होण्याऐवजी शारीरिक हालचालींमधून बाहेर पडू लागला. त्यामुळे आपापसातील भांडणं कमी झाली आणि त्यामुळे सांघिक भावना वाढण्यास मदत झाली. अशा मुलांना त्यांच्या भावना, विचार शब्दात मांडणे कठीण जाते; त्यामुळे नृत्योपचार त्यांच्यासाठी विशेष फायदेशीर ठरला. त्यांची नृत्यातील रुची वाढण्यासदेखील खूप मदत झाली.
आज जगभरात अशा विविध उपचार पद्धतींवर शोधकार्य, प्रकल्प चालू आहेत. भारतातसुद्धा याबद्दल जागरूकता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आपल्या देशात या विषयातील लेख, शोधनिबंध जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत. तेव्हा ज्या व्यक्ती या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि या नावीन्यपूर्ण उपचार पद्धतींचा अधिकाधिक प्रचार, प्रसार व वापर होण्यास मदत केली पाहिजे.
तेजाली कुंटे

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancing therapy
First published on: 30-01-2015 at 01:05 IST