12 July 2020

News Flash

हिरवाई : डिस्चिडिया

डिस्चिडिया बेंगालेन्सिस (ऊ्र२ूँ्र्िरं ुील्लॠं’ील्ल२्र२) ही एक छोटुकली व गर्द वाढणारी वेल आहे. ही वेल भारतातीलच असून बंगालमधील वनांत ही आढळून येते. ही होया वेलीची जवळची

| February 6, 2015 01:24 am

डिस्चिडिया बेंगालेन्सिस (Dischidia bengalensis) ही एक छोटुकली व गर्द वाढणारी वेल आहे. ही वेल भारतातीलच असून बंगालमधील वनांत ही आढळून येते. ही होया वेलीची जवळची नातलग. दोन्ही (Asclepiadaceae) कुळातील. ह्य वेलीला अगदीच लहान, पांढरी फुले येतात. फुलांना सुगंधही नसतो. तसे असल्यास आपणास वाटेल की असली वेल आपण का लावावी. ही लावण्याचा मुख्य फायदा हा की, ही वेलही मातीशिवाय, अगदी लाकडाच्या ओंडक्यावरही वाढवू शकतो. हिची मांसल, लंबगोलाकार पाने फारच आकर्षक दिसतात. डिस्चिडियाचे बरेच प्रकार उपलब्ध होऊ शकतात. त्यात व्हॅरिगेटेड पानांची (हिरव्या पानांवर पांढरे चट्टे असलेली जात), हृदयाकृती पानांची, पानांवर नाजूक सफेद रेघा असलेली अशा जाती उपलब्ध आहेत. 

ही वेलही कीटक व रोग यांना सहसा बळी पडत नाही. ही अनेक दिवस पाण्याविना तग धरू शकते. ही प्रथम मातीतच मूळ धरत असली तरीही नंतर ती एखाद्या वृक्षाच्या बुंध्याचा आधार घेत वाढते. ही वर चढत जाते तसतशी वृक्षाच्या खोडावर नक्षीकाम केल्यासारखी दिसते. वृक्षावर चढण्यासाठी तिच्या स्वत:च्या खोडावर फुटणारी मुळे वृक्षावर चढण्यास मदत करतात. मनीप्लांटला जशी खोडावर फुटणारी मुळे असतात, तशीच ह्या वेलीलासुद्धा असतात. वृक्षावर चढल्यानंतर ती फक्त आपल्या खोडावरील मुळांवरच तग धरून राहते; कारण एकदा ती वृक्षाच्या खोडावर जोमदारपणे वाढू लागली की मग तिचा जमिनीपासूनचा आधार सुटतो. त्यानंतर ती फक्ती epiphyte बनते. ‘Epiphyte’ म्हणजे जी वनस्पती दुसऱ्या वृक्षाचा आधारासाठीच वापर करते; ती बांडगुळ ‘parasite’ नसते. त्यामुळे आधारभूत असलेल्या वृक्षाला असल्या वेलींपासून कसलाही धोका नसतो; दोघेही आनंदी सहजीवन अनुभवत असतात.
म्हणूनच डिस्चिडिया वेलीच्या ह्या सवयीचा उपयोग आपण तिला मातीशिवाय वाढविण्यासाठी करून घेऊ शकतो. प्रथम हिची काही छाटकलमे (फांद्यांचे तुकडे) वाळूमिश्रित मातीत लावून घ्यावीत. छाटकलमांना मुळे फुटताच त्यांना मातीतून काढून त्यांचा मुळे असलेला भाग मॉसमध्ये गच्च बांधून घ्यावा. ज्या लाकडाच्या ओंडक्यावर ती चढवायची आहे, त्या ओंडक्यावरही मॉस बांधून घ्यावा. ओंडक्यावरील मॉसवर वेलीच्या मुळांवर बांधलेला मॉस ठेवून परत त्यावर आणखी थोडा मॉस बांधावा. मॉस बांधण्यास नायलॉनचा धागा वापरणे उचित असते; कारण नसíगक धागे लवकरच कुजून जाऊन तुटतात. वेलीची मुळे ओंडक्यावर चिकटण्याआधीच धागे तुटून गेल्यास ओंडक्यावर बांधलेली वेल पडून जाण्याची शक्यता असते. ओंडका न मिळाल्यास, लोंबती मॉस-स्टिक करून तिच्यावरही ही वेल चढवता येते. मॉस मिळवणे शक्य नसेल तर डिस्चिडियाला मातीतही लावता येते. लागवडीसाठी मातीचे मिश्रण करताना त्यात वाळूही मिसळावी. माती, शेणखत व वाळू समप्रमाणात मिसळून लागवडीची माती तयार करावी. छोटय़ा कुंडीत वरील मिश्रणात वेलीचे काही तुकडे लावून घ्यावेत. वेलीला चढण्यासाठी ताटीसारखा लहान आधार करावा. नायलॉनच्या धाग्यास गाठी घालून, कुंडी टांगण्यासाठी व वेलीला आधार देण्यासाठी सुबक हँगरही बनवता येतो.
नंदन कलबाग 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2015 1:24 am

Web Title: dischidia
टॅग Hirvai,Nature
Next Stories
1 मन:स्वास्थ्य : मन:स्वास्थ्याशी ओळख
2 चिंताजनक ‘बालपण’
3 ‘देवत्व’
Just Now!
X