जम्मू आणि काश्मीर असे म्हणताना लडाख हा देखील याच राज्याचा एक अविभाज्य भाग आहे, याचा आपल्याला नेहमीच विसर पडतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये आलेल्या महापुराच्या वेळेस लडाखचीही आठवण होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सुमारे तीन वर्षांपूर्वी लडाखमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर अशीच विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. लडाखमध्येही त्यापूर्वी असा प्रकार कधीच घडलेला नव्हता. सध्या काश्मीरमध्ये थैमान घातलेल्या महापुरासारखा प्रकारही गेल्या सहा दशकांमध्ये काश्मीरमध्ये कधीच घडलेला नाही. त्यामुळे सध्या तरुण असलेल्या आणि साठीकडे झुकलेल्या पिढीनेही असे थैमान आजवर कधीच अनुभवलेले नाही! त्यामुळे हा महाप्रलय सर्वासाठी तसा नवाच होता. पण अनपेक्षित मात्र नव्हता. कारण काश्मीरमधील नद्या, तिथला भूप्रदेश ज्यांनी पाहिला आणि अनुभवला आहे ते सहज सांगू शकतात की, तिथे आपत्ती आल्यास सुटकेचे सारे मार्ग एकाच वेळेस प्रचंड वेगात बंद होतात!
जम्मू-काश्मीरचे हिमालयाशी घट्ट नाते आहे. भूखंड एकमेकांवर प्रचंड वेगात घासण्याची भौगोलिक प्रक्रिया घडली त्या वेळेस हिमालयाच्या ठिकाणी अगोदर असलेला तेथिस नावाचा महासागर हा पृथ्वीच्या पोटात गडप झाला आणि त्या ठिकाणी असलेला वालुकामय प्रदेश एकमेकांवर घासला जात त्याच्या घडय़ा व वळ्या पडल्या आणि त्यातूनच आज आपल्याला दिसणारा हिमालय पर्वत निर्माण झाला आहे. हा पर्वत बहुतांश काळ पांढऱ्याशुभ्र अशा बर्फाच्या चादरीखाली लपलेला असतो. त्यामुळे या बर्फाच्या चादरीखाली नेमके काय आहे, याची कल्पना बाहेरून येत नाही. परिस्थिती आणि तेथील वातावरण अतिशय कडाक्याचे असल्याने खाली असलेला भूस्तरही कडकच असणार असे माणसाला साहजिक वाटते पण वस्तुस्थिती तशी नाही! वालुकामय बाबी किती काळ तग धरणार.. त्यामुळे काश्मीरमधील भूप्रदेश हा बहुसंख्येने वालुकामय आणि भुसभुशीत आहे. त्यामुळे त्यावर कोणतीही गोष्ट फार काळ तग धरून राहत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा बहुतांश ठिकाणी अनेक नद्यांमधून जाते. कधी झेलम, कधी सिंधू तर कधी मनावर तवी. नद्यांची नावे बदलत असतात. या नद्या अनेकदा प्रवाह आणि पात्रंही बदलतात. कारण त्यातून येणाऱ्या पाण्याचा वेग अतिप्रचंड असतो.. त्या हिमालयाच्या उंचीवरून खाली वेगात येतात, त्यावरून याची नेमकी कल्पना यावी. म्हणून सीमेच्या संदर्भातील वाद अनेकदा विकोपाला गेले आहेत. कारण गेल्या खेपेस झालेला निर्णय आताच्या भूपातळीतील बदलामुळे प्रत्यक्षात वेगळा दिसतो किंवा भासमान होतो. काश्मिरातील नद्यांनी पावसाळ्यात दुथडी भरून वाहणे यात नवीन काहीच नाही. पावसाळ्यात इथे नदीत पडलेली वस्तू शोधण्याच्या फंदात काश्मिरी माणूस कधीच पडत नाही. कारण काही मिनिटांतच ती शेकडो किलोमीटर्सचे अंतर पार करणार याची त्याला पूर्ण कल्पना असते!
हे सारे माहीत होते तर मग ओमर अब्दुल्ला सरकार कमी कुठे पडले, असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. त्याचा शोध घेतला तर असे लक्षात येईल की, लहान-मोठे पूर तर येतच असतात, ते आपण सहज हाताळू. या भ्रमात ते राहिले होते. त्यामुळे महापूर येऊन दोन दिवस झाल्यानंतरही अनंतनागच्या संगम जिल्ह्य़ामध्ये पूरनियंत्रण विभागाचे अधिकारी पूरमापन करण्याची यंत्रणा कुठे ठेवली आहे, त्याचा शोध घेत होते! ही म्हणजे जनतेची त्यांनी केलेली क्रूर थट्टाच म्हणायला हवी!
सांगायचा मुद्दा हा की, काश्मीरमधील भूगोल आणि तिथली नद्यांची परिस्थिती गेल्या अनेक दशकांतील त्यांचे वर्तन पाहता पाऊस जोरदार झाला तर इथे पूर नक्की येणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाचीही गरज नव्हती. काश्मीरमध्ये तर नदीमध्ये कुंपण घालता येत नाही म्हणून ते नदीपासून काही किलोमीटर्स अंतरावर आपल्या भागामध्ये घातले जाते. मात्र तेथील भुसभुशीत मातीमुळे तेही फार काळ टिकत नाही, असा लष्कराचा अनुभव आहे..
या संपूर्ण पाश्र्वभूमीवर कुणी आदर्श घालून दिलेला असेल तर भारतीय लष्कराने! पूरपरिस्थितीत अक्षरश: २४ तास काम करणारे होते ते भारतीय जवान! भारतीय सीमेचे रक्षण त्यांनी जसे तळहातावर शिर घेऊन डोळ्यांत तेल घालून केले त्याचप्रमाणे त्यांनी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनाही मदतीचा हात दिला. लष्कराने केलेल्या मदतीच्या तुलनेने स्थानिक ओमर अब्दुल्ला सरकारने केलेले मदतकार्य फारच किरकोळ आहे. केवळ तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा फार काही कर्तृत्व अब्दुल्ला यांना दाखवता आलेले नाही. त्यांचे लक्ष याही महापुरामध्ये लागून राहिले होते ते येत्या महिन्याभरात काश्मीरमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांवर. त्यामुळेच त्यांचा पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरमध्ये मदतकार्यात केवळ त्यांना मदत करणाऱ्या आणि अधिक मते देणाऱ्या वस्त्यांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. असा कोणताही आरोप भारतीय लष्करावर झाला नाही!
याशिवाय आणखी एक बाब महत्त्वाची ठरली ती म्हणजे अशा प्रकारचा कोणताही भेदाभेद तर लष्कराने केला नाहीच, शिवाय मदत करताना याच काश्मिरींनी लष्कराविरोधातील हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केली म्हणून त्यांना वाऱ्यावरही सोडून दिले नाही. सद्भावनेचे स्मरण करून सर्वप्रथम मदतीचा हात देणारे भारतीय लष्कराचे जवानच होते, याचा प्रत्यय या कालखंडात काश्मिरी जनतेला प्रकर्षांने आला. शिवाय या राज्यात अशी आपत्ती आली तर आपल्या पाठीशी ठामपणे कोण उभे राहते याचाही प्रत्यय त्यांना आलाच. यातून काश्मिरी जनता योग्य तो धडा घेईल अशी अपेक्षा आहे. कारण काश्मीरमधल्या मदतकार्यात एरवी ‘स्वतंत्र काश्मीर’ आणि ‘कश्मिरिअत’ची हाक देणारे फुटीरवादी नेते औषधालाही कुठे दिसले नाहीत! फुटीरवाद्यांच्या संघटनांनी काडीचीही मदत केली नाही. या संपूर्ण कालखंडात ते भिजलेल्या मांजराने दडी मारावी तसे लपून राहिले होते. हे ‘स्वतंत्र काश्मीर’चे नागरिक आहेत आणि त्यांची केवळ आपल्यालाच सर्वाधिक चिंता आहे, असे एरवी छातीठोकपणे सांगणारे यासिन मलिक असोत किंवा मग फुटीरतावादी हुरियतचे नेते; या कालखंडात कुणीच दिसले नाहीत. मात्र हेच ते नेते होते जे ‘स्वतंत्र काश्मीर’च्या मागणीसाठी दोनच आठवडय़ांपूर्वी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या भेटीस गेले होते. खरे तर या महापुराने त्यांचा बुरखा फाडण्याचेच काम केले आहे! काश्मिरी जनतेचे खरेच त्यांना काही पडलेले असते तर ही मंडळी आणि त्यांचे समर्थक मदतकार्यात नजरेस पडले असते! हे तर सोडाच सारी परिस्थिती पूर्वपदावर येते आहे, असे लक्षात येताच हे बिळात शिरलेले फुटीरतावादी उंदीर बाहेर आले आणि त्यांनी लष्कराच्या मदतकार्यात सहभागी हेलिकॉप्टर्सवर समर्थकांना दगडफेक करायला लावली! हा अश्लाघ्य प्रकार काश्मिरी जनताही लक्षात ठेवील, अशी अपेक्षा आहे!
याही कालखंडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेली कौतुकास्पद बाब म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हा आपल्यासाठी कळीचा मुद्दा राहिलेला असला तरी प्राप्त परिस्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे महापुराची परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी भारतातर्फे सर्वतोपरी मदतीचा हात पुढे केला. मानवतेच्या मुद्दय़ावर केलेली ही मदत खूप महत्त्वाची आहे आणि भारताचा चांगुलपणा आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करणारीही! असे काही प्रथमच घडलेले नाही. २००५मध्ये भारताच्या सीमावर्ती भागामध्ये महाभयानक भूकंपाने हानी झाली होती, तशीच हानी पाकव्याप्त काश्मीरमध्येही झाली होती, त्याही वेळेस भारत सरकारने आणि लष्कराने असाच मदतीचा हात पुढे केला होता. पाकव्याप्त काश्मिरातील घरे बांधून देण्याचे कामही लष्कराने केले होते. आज त्याचा अनेकांना विसर पडला आहे. पाकिस्तानी सैन्याचे उद्ध्वस्त बंकर आणि त्यातील सैनिकांना भारतीय सैनिकांनीच मदतीचा हात देत बाहेर काढले होते!
मात्र भारताच्या या सहिष्णुतेचा गैरफायदाच आजवर पाकिस्तानने उचलण्याचा प्रयत्न केला आहे. पण जनता जेव्हा एखाद्या मोहिमेची साथ सोडते तेव्हा काय अवस्था येते, याचा प्रत्यय येणाऱ्या काळात दहशतवादी घेतील आणि काश्मिरी जनताही आपल्याला आपत्तीच्या अवस्थेत मदत कुणी केली याचे भान ठेवील, अशी अपेक्षा आहे. काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सद्भावना’ला आता बराच काळ लोटला. त्या मोहिमेला लागलेल्या चांगल्या फळांमुळे काश्मीरमधील वातावरणात आता काहीसा चांगला फरक दिसू लागला आहे. यापूर्वी ‘ऑपरेशन सुमवली’च्या वेळेस लक्षात आले होते की, भारतीय लष्कराने केलेली मदत काश्मिरींनी लक्षात ठेवली आणि दहशतवादाचा हात सोडला.. आता आलेल्या या महापुरात भारतीय जवानांनी दाखविलेले धाडस आणि दिलेला मदतीचा हात पाहून ‘खरा हात कुणाचा पकडायचा’ याचे भान काश्मिरी जनतेला निश्चितच येईल, अशी मनोमन तीव्र इच्छा आहे!
 

Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
indian constitution to
संविधानभान: एकलव्याच्या अंगठय़ाचे रक्षण
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Red orange and yellow alert for rain in many parts of the state
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट