lp19lp39पाइनापल पुलाव
साहित्य : १ वाटी तांदूळ, १ मध्यम आकाराची कैरी, १ कांदा, १ मोठा चमचा, आलं-लसणाची पेस्ट, १ टी स्पून जिरेपूड, ५-६ हिरव्या मिरच्या, मूठभर शेंगदाणे, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता.
कृती : प्रथम वरील तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्या व परातीमध्ये थंड करण्यास ठेवा. कांदा- मिरच्या उभ्या चिरून घ्या. कैरीचे साल काढून किसून घ्या. कढईत अर्धी वाटी तेल गरम करून जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा-मिरच्या टाकून कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात आलं-लसणाची पेस्ट, किसलेली कैरी, हळद घालून गॅसवर दोन ते तीन मिनिटे झाकण लावून शिजवा. चवीसाठी एक टी स्पून साखर घाला. हा भात प्रवासासाठीही उपयुक्त आहे.

lp38पोह्य़ांचा नारळीभात
साहित्य : ३ वाटय़ा पोहे, १ वाटी ओले खोबरे, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, थोडी वेलदोडय़ाची व जयफळाची पूड, तूप व २-३ लवंगा.
कृती : पोहे धुऊन ठेवावे, थोडय़ा तुपावर लवंगा टाकून त्यात गूळ व खोबरे घालून मिश्रण सारखे करावे. जरा वेळ ढवळावे. मिश्रण जरा शिजले की त्यात धुतलेले पोहे घालावे. चांगले ढवळून घ्यावे. जरा वेळ मंदाग्नीवर असावे. नंतर त्यात वेलदोडय़ाची व जायफळाची पूड घालून ढवळावे व उतरावे. गरमच खायला द्यावा.

lp40कडधान्यांचा पुलाव
साहित्य : एक छोटय़ा वाटीने छोटे, हिरवे हरबरे, हिरवे वाटाणे, डबल-बी, राजमा, मटकी व हिरवे मूग, २ कांदे, टोमॅटो, १ इंच आले, ८-१० लसूण पाकळय़ा, कोथिंबीर, पुदिना, १ छोटी वाटी दही, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, मीठ, ३ वाटय़ा बासमती तांदूळ, जिलेबी रंग, काजूपाकळी, मनुके, तूप, तेल, हळद.
कृती : मूग व मटकी सोडून उरलेली सर्व कडधान्ये थोडे मीठ घालून उकडून घ्यावीत. (गाळ होऊ देऊ नये.) कांदा, टोमॅटो लांबलांब पातळ चिरून घ्यावे. आले, लसूण, कोथिंबीर, पुदिना यांची पेस्ट करून घ्यावी. कुंडय़ात उकडलेली सर्व कडधान्ये घ्यावी. त्यातील पाणी काढून टाकावे. नंतर त्याच कुंडय़ात कडधान्यांवर वाटून ठेवलेला मसाला, दही, हळद सर्व चांगले कालवावे. अर्धा तास तसेच ठेवावे. तोपर्यंत थोडय़ा तेलावर हिंग, हळद घालून मटकी व मूग परतून घ्यावेत.
पातेल्यात तेल घालावे. त्यावर तमालपत्र घालून कांदा घालावा. कांदा परतवून होत आला की, त्यावर टोमॅटोच्या बारीक फोडी घालाव्यात. हळद घालून लाल मिरची पावडर व गरम मसाला पावडर घालावी. चवीनुसार मीठ घालून लगेच कुंटय़ात मसाला लावून ठेवलेली कडधान्ये घालावीत. सर्व चांगले हलवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
बासमती तांदळाला तूप व गरम मसाल्याची फोडणी देऊन तांदूळ चांगले उकळून (शिजवून) घ्यावे. त्यात शिजवतानाच भरपूर पाणी घालावे. भात शिजला की उरलेले पाणी चाळणीने गाळून घ्यावे. तो शिजवलेला थोडा भात पातेल्यात भाज्यांवर घालावा. नंतर त्यावर फ्राय केलेले मूग व मटकी घालावे. काजू व मनुके घालावे व उरलेला भात त्यावर घालून एकसारखा चमच्याने करावा. चमच्याने त्या भातावर ४-५ छेद करावेत. त्यात जिलेबीचा रंग थोडय़ा पाण्यात कालवून घालावा. नंतर त्यावर तूप सोडावे व झाकण घालून ठेवावे. तव्यावर ते पुलावाचे भांडे ठेवावे. मंद आचेवर १० ते १५ मिनिटे पुलाव होऊ द्यावा.
पुलाव खाण्यास देताना एका बाजूने काढावा व सर्व मसाला वगैरे चांगले मिक्स करून वाढावे. त्यासोबत लिंबू व कोशिंबीर द्यावी. सर्व कडधान्यामुळे हा पुलाव चवदार लागतो.

टीप- आपल्या अंदाजाने सर्व कडधान्ये थोडी-थोडी घ्यावीत. कारण कडधान्ये पाण्यात भिजत घातल्यावर फुगतात. त्यामुळे प्रमाणशीर घ्यावीत. शक्यतो बासमती तांदूळ (दिल्ली राइस) वापरावा. म्हणजे भात छान मोकळा होतो.

lp41वेल पोंगल
साहित्य : अर्धा किलो तांदूळ, त्याच्या एकतृतीयांश मुगाची डाळ घ्या. एक टेबलस्पून काजू तुकडे, एक चमचा जिरे, एक चमचा मिरे, एक इंच आले, चार टेबलस्पून तूप.
कृती : डाळ, तांदूळ एकत्र शिजवा. काजू तुपात तळून घाला. मिरे, जिरे कुटून, आलं बरीक चिरून घाला. मीठ व तूप घालून एकत्र शिजवा. हा भात खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो चटणीबरोबर छान लागतो.

lp42पौष्टिक स्वीट परोठा
साहित्य : एक मोठी वाटी बी काढलेला पेण खजूर, मूठभर किसमिस, एक पिकलेलं केळं, अर्धी वाटी नारळाचा चव, तूप, चिमूटभर मीठ, मोहनासाठी डावभर तेल.
कृती : प्रथम खजूर धुऊन थोडय़ा पाण्यात भिजत घाला. त्यातच किसमिस धुऊन घाला. दोन-तीन तास भिजल्यावर मिक्सरमधून फिरवा. त्यातच केळं सोलून तुकडे करून घाला. परत मिक्सरमधून वाटा. तयार झालेलं मिश्रण घेऊन त्यात चिमूटभर मीठ, खवललेला नारळ, डावभर तेल घालून नीट कालवा. त्यात नाचणीचे पीठ व सोयाबीनयुक्त कणीक घालत जाऊन लाटताना पिठाची गरज भासू नये, असा घट्ट गोळा भिजवा. नंतर फुलक्याच्या आकारात जाडसर लाटून तव्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून खमंग गुलाबी रंगावर भाजा. घट्ट साजूक तुपाबरोबर खाण्यास द्या.

पुरणपुरीlp43
साहित्य : १ वाटी हरबरा डाळ, १ वाटी गूळ, अर्धा टीस्पून जायफळ किसलेले, २ वाटय़ा कणीक, १ वाटी मैदा, मोहन, तळण्यासाठी तेल.
कृती : पुरण शिजवून वाटून घ्यावे. जायफळ पूड घालावी. कणीक मोहन घालून किंचित मीठ व १ वाटी मैदा घालून घट्ट मळावी. पुरी करून त्यात पुरणाचे सारण भरावे. व तोंड बंद करून हलक्या हाताने पुरी लाटावी. या पुऱ्या करून तळून काढाव्यात.

अमृत पोळ्या
साहित्य : गाजर, गूळ, तांदळाची पिठी, ओल्या नारळाची वाटी, मुगाच्या डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ, तीळ, गोडेतेल, साजूक तूप, वेलची, साखर, कणीक, मीठ.
कृती : प्रथम चांगली केशरी रंगाची गाजरे स्वच्छ पुसून बारीक किसणीने किसावी. नंतर ती मिक्सरमधून बारीक करावी. कणीक सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यावी. त्यात चवीला मीठ, अर्धी वाटी गरम केलेले गोडेतेल घालावे. पुरणपोळीप्रमाणे तांदळाच्या पिठीवर ही पोळी लाटावी. दोन वाटय़ा गाजराचा कीस परतावा. तुपावर त्यात अर्धी वाटी नारळाचा चव. दीड वाटी गूळ व अर्धी वाटी साखर घालून गोळ तयार करावा. त्यात मुगाचे अगर डाळीचे पीठ अर्धी वाटी तेलावर खमंग भाजून घालावे. तीळ भाजून त्यातच १-२ वेलची सबंध टाकावी म्हणजे साल वाया जात नाही. छान पूड करून तीळ वेलची मिश्रण घालावे. मंद आचेवर तूप सोडून भाजाव्यात.

lp44अननसाची भाजी
साहित्य : एक पिकलेला अननस, फणसाचे गरे दोन वाटय़ा, तीन-चार हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी खोबरे, पाच-सहा काळी मिरी, मीठ, चमचे साखर.
कृती : अननसाचे छोटे चौकोनी तुकडे करावेत. फणसाचे (कापा) पण चौकोनी तुकडे करावेत. खोबरे व मिरी जरा जाडसर वाटून घ्यावे. तूप-जिऱ्याची फोडणी करावी. त्यात मिरचीचे तुकडे घालावेत. त्यावर कापून ठेवलेले अननस व फणस घालावे. वाटलेले खोबरे घालावे. मीठ व साखर घालावी. नैसर्गिक पिवळसर लाल रंग आल्यामुळे हळद घालण्याची गरज नाही. पाच ते सहा मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. वरून कोथिंबीर घालावी. गरम गरम खाण्यास द्यावे.

lp45भाज्यांचा दलिया
साहित्य : अर्धी वाटी दलिया + चिमूटभर तांदूळ पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. ताटात पसरून गार करायला ठेवा. प्रत्येकी २ चमचे कोबीचा कीस, बारीक चिरलेला कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, पाव चमचा वाटून, साखर, मीठ, कांदा, लिंबाचा रस, ओले खोबरे, तेल.
कृती : कढईत ४ चमचे तेल घाला. हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा. भाज्या परत परता, मग सारखे करून दलिया घाला. साखर-मीठ घाला. थोडेसे पाणी घालून शिजवा. २ मिनिटे झाकण ठेवून मंद गॅसवर चांगली वाफ आणा आणि लिंबाचा रस घालून हलवा. ओले खोबरे, कोथिंबीर घालून डब्यात द्या.

lp46पूड पाटोडी रस्सा
साहित्य : १ वाटी हरभरा डाळीचे पीठ, १ वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ४/५ कांदे, १/१ चमचा तीळ व खसखस, १ चमचा धने, आले-लसूण-कोथिंबिरीची पेस्ट, हळद, तिखट, मीठ, तेल, १ चिमूट गरम मसाला.
कृती : रस्सा- १ मोठा कांदा चिरून तेलावर परतून घ्यावा. खोबऱ्याचा कीस, खसखस, धने परतून घ्यावे. त्यात आले-लसूण-कोथिंबिरीची पेस्ट घालून सर्व मिक्सरवर बारीक करावे. तेल फोडणीस घालून त्यात तिखट, गरम मसाला व वरील ओला मसाला चांगला परतून घ्यावा. तेल सुटले की पाणी घालून रस्सा उकडावा.
सारण : २-३ कांदे बारीक चिरून तेलावर परतावे. त्यात तिखट, मीठ, खोबऱ्याचा कीस, भाजलेले तीळ व चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा परतावे. हे झाले सारण.
पूड : हळद, मीठ घालून बेसन भज्याच्या पिठासारखे भिजवावे. त्याची तव्यावर पातळ धिरडी करावीत. प्रत्येक धिरडय़ावर वरील सारण पसरून त्याची गुंडाची (रोल) करावी व नंतर सुरीने सारखे तुकडे करावेत. काही तुकडे डिशमध्ये रश्श्यात वाढण्याच्या वेळी सोडावेत तर काही तुकडे नुसतेच खाण्यासाठी वाढावेत.

lp47म्हाद्या
साहित्य : दूध ४ वाटय़ा, दही १ वाटी, हिरव्या मिरच्या ४ ते ५, टोमॅटो १, कोथिंबीर अर्धी वाटी, साखर १ टीस्पून, धने, जिरेपूड १ टीस्पून, मीठ.
कृती : डावभर तेलाची जिरे, मोहरी, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदा बदामी रंगावर परतावा. टोमॅटोचे तुकडे घालून पूर्णपणे शिजू द्यावेत. नंतर मसाला, तिखट, हळद घालून ग्लासभर पाणी घालावे. उकळी आली की हळद, मीठ, दाण्याचे कूट घालावे. पाच मिनिटे मंद आचेवर शिजले की कोथिंबीर पेरावी. भाकरी पोळीबरोबर हा म्हाद्या (शेंगदाण्याचं पिठलं) छान लागतो.

lp48लबाड वांगी
साहित्य : चार मध्यम वांगी, एक वाटी जाडसर बेसन, चवीपुरते लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, धने-जिऱ्याची पूड प्रत्येक एक चमचा, १ टे.स्पून पांढरे तीळ, १ चमचा खसखस, बारीक चिरलेला १ कांदा, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, नारळाचा चव १ टे. स्पून, १ चमटा आलं-लसूण पेस्ट, थोडासा लिंबाचा रस, तेल.
कृती : प्रथम वांग्याचे देठ काढून बाजूला ठेवावेत. वांगी भरतासाठी भाजतो तशी भाजून घ्यावीत. ती सोलून त्याच्या गरात बेसन भाजून घेऊन घालावे. त्यात वरील सर्व मसाला घालून चांगले एकत्र करावे. नंतर तेलाचा हात लावून त्याचे वांग्याच्या आकाराचे गोळे करून त्याला ती बाजूला ठेवलेली देठे दाबून बसवावीत. आता ही ‘लबाड वांगी’ तेलात तळून काढावीत. ही लबाड दिसली तरी रुचकर लागतात.

lp49पेणपाला
साहित्य : २ वाटय़ा तूरडाळ, १ मूठ हरभरा डाळ, १ मोठा गड्डा लसूण, २ मोठी नीट केलेली गवार, अर्धी वाटी कारळाचा कूट, अर्धी वाटी दाण्याचा कूट, दोन लाल सुक्या मिरच्या, अर्धा चमचा तिखट, १ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा काळा मसाला, मीठ.
कृती : चार वाटय़ा पाणी घालून दोन्ही डाळी एकत्र शिजवाव्यात. फार मऊ करू नये. त्यातच शिजताना गवार घालून शिजवावे. लसूण सोलावा. आठ-दहा पाकळ्या ठेवून बाकीचा लसूण ठेचून शिजलेल्या डाळीत घालावा. कारळे भाजून कूट करावा. व दोन्ही कूट तिखट, मीठ, धने-जिरे पूड, काळा मसाला घालून हलवावे व वाफ आणावी. थोडय़ा तेलाची सुक्या मिरच्यांचे तुकडे करून फोडणी करून घालावी. मिश्रण एकसारखे करावे. उरलेल्या लसणांचे तुकडे घालून भरपूर मोहरी घातलेली फोडणी करावी. पानात पेणपाला वाढल्यावर वरून ही फोडणी घालावी. पदार्थ भाकरी, कच्च्या कांद्याबरोबर छान लागतो.

lp50भाज्या मिश्रित मुठिया
साहित्य : १ किलो बेसन, कोबी, भोपळा (दुधी), गाजर अंदाजे १ पाव (प्रमाण कमी-जास्त करता येते.) हिरव्या मिरच्या, जिरे, आले, धनेपूड यांची पेस्ट, तीळ भाजलेले २ चमचे, कोथिंबीर, ओले खोबरे, मोहरी, तेल, हिंग, मेथी, फोडणीसाठी. हळद, मीठ, लिंबू व साखर चवीप्रमाणे.
कृती : सर्व भाज्या किसाव्यात व बेसनात भाज्या व फोडणीचे साहित्य व कोथिंबीर, खोबरे सोडून सर्व मिसळावे. थोडी कोथिंबीर टाकावी व बाकीचे शिल्लक ठेवावी. सर्व साहित्य मिसळल्यावर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवावे. थोडे तेल टाकून पीठ चांगले मळावे. नंतर गोळ्याचे लांबट आकाराचे मुटकुळे (मुठीत दाबून) करून कुकरमध्ये शिटी न लावता किंवा मोदकपात्रात वाफवावेत. थंड झाल्यावर त्याचे जाडे काप करून तेल, मोहरी, हिंग, मेथ्या याची फोडणी करून ती त्या कापावर वरून घालावी. काप खालीवर करून फोडणी सगळीकडे लागेल असे करावे. नंतर वरून कोथिंबीर व खोबरे टाकून जेवणात वाढावे किंवा एका प्लेटमध्ये ठेवून बारीक शेव टाकून तसेही खाण्यास द्यावे. भाज्यांमुळे मुटकुळे चवदार लागतात. भाताबरोबर किंवा मसालेदार रस्सा करून त्यात टाकूनही चांगले लागतात.

lp51फूलवडी
साहित्य : एक वाटी बेसन पीठ, कोथिंबीर, किसलेले खोबरे, तीळ, गरम मसाला, हळद, मीठ, लाल तिखट, हिंग, धनेजिरे, तेल, पाणी, मोहरी, इ.
कृती : प्रथम कढईत तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकावी व फोडणी झाल्यावर त्यात हिंग टाकून सव्वा वाटी पाणी टाकावे. त्यात मीठ, हळद, मिरची, धने पूड टाकावे. पाणी चांगले उकळल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ टाकून चांगले हलवावे. पाच मिनिटे वाफ आणावी. नंतर पाटावर एक ओले फडके घ्यावे व ते अंथरावे. त्यावर तयार झालेले बेसन चौकोनी आकारत थापावे. वरून पोळीसारखे थोडे लाटावे. नंतर त्या लाटलेल्या बेसनावर कोथिंबीर, तीळ, खोबरे, मिरची, धने पावडर, गरम मसाला हे सर्व एकत्र करून पसरावे. नंतर त्याचा रोल करावा. नंतर त्याचे लहान लहान तुकडे पाडावेत. नंतर ते उभे करून ठेवावेत. वरून त्याला तेलाची फोडणी द्यावी, ही फूलवडी खाण्यास खूप स्वादिष्ट लागते.

lp52सुरण पिठलं भाजी
साहित्य : चिंच घालून शिजलेला सुरण पल्प २ वाटी (सालपट काढून), हिरवा पातीचा कांदा चिरलेला १ वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी, अद्रक, लसूण पेस्ट प्रत्येकी २ चमचे, हिरव्या मिरचीचे तुकडे २ चमचे, धने पूड, तीळ पूड प्रत्येकी २ चमचे, जिरेपूड १ चमचा, तिखट, मीठ, चवीनुसार हळद अर्धा चमचा, आमचूर, साखर प्रत्येकी २ चमचे, तेल १ डाव, फोडणीचे साहित्य.
कृती : गॅसवर कढईत गरम तेलात फोडणी तडतडल्यावर मिरचीचे तुकडे खमंग होऊ द्या. कांदा, पेस्ट परतल्यावर सुरणाचा गोळा तिखट, मीठ, हळद, धनेपूड, तीळपूड, जिरेपूड घालून सुरण खूप परता. नंतर पाणी टाकून आमचूर व साखर घाला. पिठल्यासारखं सुरण खदखद शिजू द्या. शिजल्यावर कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा.

lp53रायता बादशाही
साहित्य : १० ग्रॅम बारीक कापलेला अननस, १० ग्रॅम कापलेले सफरचंद, १० ग्रॅम कापलेली पिकलेली पपई, १० ग्रॅम कापलेले केळे, २०० ग्रॅम फेटलेले दही, २० ग्रॅम साखरेचा सिरप. सजवण्यासाठी प्रत्येकी १० ग्रॅम काजू, मनुका आणि चेरी.
कृती : एका भांडय़ात सर्व फळांचे तुकडे एकत्र करून त्यात दही साखरेचा सिरप मिसळा. मग थोडा वेळ हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवावे. रायत्याला काजू, मनुका, चेरीने सजवावे.

lp55पंचामृत
साहित्य : अर्धी वाटी तीळ, शेंगदाणे, काळा मसाला, मीठ, आमसूल, जिरे, तूप, गूळ, लाल तिखट, कोंथिबीर, कढिपत्ता, नारळाचा चव.
कृती : प्रथम तीळ व शेंगदाणे भाजून मिक्सरमधून फिरवून कूट करावे. एक पातेल्यात तूप घालून त्यात जिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, आमसूल घालून परतावे. थोडेसे पाणी घालावे. पाण्यास उकळी आल्यावर त्यात मीठ, गूळ, काळा मसाला, लाल तिखट घालावे. वरील मिश्रणास चांगली उकळी येऊ द्यावी. गॅस बंद केल्यावर पंचामृतामध्ये कोथिंबीर व नारळाचा चव घालावा. हे पंचामृत भात अथवा पोळी कशाबरोबरही तोंडीलावणे म्हणून चालते.

lp54बैगन पचडी
साहित्य : १ मध्यम वांगी पातळ काप करून, १ मध्यम कांदा चिरलेला, १ मध्यम टोमॅटो चिरलेला, १ हिरवी मिरची चिरलेली, १/२ लहान चमचा मोहरी, १ चिमूट गरम मसाला, ३ मोठे चमचे पाणी, २ मोठे चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली, २ कप दही घोटलेले, १ मोठा चमचा तेल, चवीनुसार मीठ.
कृती : तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात कांदा व मिरची घालून ते परतावे. नंतर वांगी परतावी. यानंतर टोमॅटो, मीठ व गरम मसाला घालून परतावे. पाणी घालून झाकण ठेवून वांगी शिजवावी. चमच्याने वांगी व टोमॅटो कुस्करावी. ते थंड झाल्यावर त्यात दही व कोथिंबीर घालून एकत्र करावे. थंड करावे. कोथिंबीर घालून सजवावे.

lp56पोह्यची इडली
साहित्य : १ वाटी जाडे पोडे, ३ वाटय़ा तांदळाचा रवा, १ वाटी आंबट ताक, ८-१० हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, मीठ, १ चमचा खायचा सोडा, १ चमचा उडदाची डाळ, आल्याचा तुकडा व ओले खोबरे.
कृती : रात्री जाडे पोहे धुऊन घ्यावेत. नंतर थोडय़ा वेळाने ते मिक्सरमधून काढावेत. त्यात तांदळाचा रवा व आंबट ताक घालून पीठ भिजवावे. जरूर वाटल्यास रवा व आंबट ताक घालून पीठ भिजवावे. जरूर वाटल्यास थोडे कढत पाणी घालावे. त्यात मीठ घालून रात्रभर पीठ झाकून ठेवावे.
दुसऱ्या दिवशी त्यात बारीक चिरलेले आले, वाटलेल्या मिरच्या, कोथिंबीर व ओले खोबरे घालावे. वरून तेलाची, उडदाची डाळ व कढीपत्ता घातलेली फोडणी द्यावी. नंतर मिश्रणात खायचा सोडा घालावा. पीठ चांगले कालवून नेहमीप्रमाणे इडल्या कराव्यात. गरम असताना वरून साजूक तूप घालून खायला द्याव्यात. बरोबर दह्य़ातली नारळाची चटणी द्यावी.

lp58पोह्यचे सांदणे
साहित्य : दीड वाटी जाडे पोहे, दीड वाटी दूध, दीड वाटी साखर, थोडा पिवळा रंग, अर्धी वाटी तूप, वेलदोडय़ाची पूड, बदाम-पिस्त्याचे काप, थोडे केशर व १ टे. स्पून भाजलेली खसखस.
कृती : पोहे धुऊन ठेवावेत. चांगले भिजले की हाताने जरा कुस्करून घ्यावेत. दूध गरम करावे. त्यात साखर घालून विरघळवून घ्यावी. त्यात थोडा पिवळा रंग घालावा.
तुपावर पोहे परतून घ्यावे. नीट ढवळावे. जरा वेळ हलवत राहावे. नंतर त्यात साखरमिश्रित दूध घालावे. चांगले ढवळावे. मिश्रण घट्टसर झाले की त्यात वेलदोडय़ाची पूड घालावी. केशर घालावे. चांगले ढवळावे.
एका तूप लावलेल्या थाळीत वरील घट्ट झालेले मिश्रण ओतावे व थापावे. वरून खसखस घालून पुन्हा थापावे. बदाम-पिस्त्याचे काप घालावेत. गार झाल्यावर वडय़ा पाडाव्या.

lp57पोह्यचे पकोडे
साहित्य : दीड वाटी पातळ पोहे, १ वाटी डाळीचे पीठ, १ कांदा, तिखट, मीठ, हिंग, हळद व १ टे.स्पून गरम तेलाचे मोहन.
कृती : पोहे धुऊन ठेवावेत. बटाटय़ाची साले काढून फोडी कराव्यात व पाण्यात टाकून शिजवून घ्याव्यात. मिरच्या वाटून घ्याव्यात. नंतर सर्व एकत्र करून चांगले मळून घ्यावे. नंतर या पिठाचे लहान आकाराचे लांबट वडे करावे व तळावे.

lp59चुरमुऱ्याची झटपट कचोरी
साहित्य : १०० ग्रॅम चुरमुरे, मीठ, लाल तिखट, धने पूड, साखर, लिंबू, गरम मसाला, मैदा, तेल, मीठ, हळद, इ.
कृती : चुरमुरे मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यावेत. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, लिंबू, धने पूड व साखर हे सर्व एकत्र करावे. मैद्यामध्ये तेल व मीठ टाकून कणीक भिजवावी. त्याच्या लहान लहान पुऱ्या लाटून चुरमुऱ्याचे सारण घालून त्याची कचोरी बनवावी व मंदाग्नीवर गुलाबी तळावी. ती कचोरी खुसखुशीत लागते.

खवा पुरीlp60
साहित्य : ३ वाटय़ा मैदा, १ वाटी रवा, मीठ व तुपाचे मोहन.
खव्याचे सारण : पाऊण वाटी खवा, १ टे. स्पून भाजलेले डाळीचे पीठ, अर्धी वाटी पिठीसाखर व थोडी वेलदोडय़ाची पूड.
कृती : मैदा, रवा, मीठ व तुपाचे मोहन एकत्र करून पीठ भिजवून ठेवावे. खवा थोडा भाजून घ्यावा. त्यात इतर वस्तू घालून सारण करावे. दोन लहान पुऱ्या लाटाव्या. एका पुरीवर खव्याचे सारण पसरावे. त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा जुळवाव्या व जरा लाटणे फिरवावे व पुऱ्या तळाव्या.

lp61पोह्यची बिरंजी
साहित्य : २ वाटय़ा जाडे पोहे, १ वाटी साखर, वेलदोडय़ाची पूड, थोडे बदामाचे काप, बेदाणे, केशर, २-४ लवंगा व तूप.
कृती : पोहे धुऊन ठेवावेत. तुपावर लवंगा टाका. त्यात धुतलेले पोहे घालावेत. मिश्रण चांगले ढवळावे. झाकण ठेवून जरा वाफ फेऊ द्यावी. नंतर त्यात साखर घालावी. मिश्रण चांगले ढवळावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. साखर घातल्यावर मिश्रण जरा पातळ होते. ते पुन्हा घट्ट झाले की थोडे तूप सोडावे. वेलदोडय़ाची पूड, बदाम, बेदाणे व
केशर घालून मिश्रण सारखे करावे व उतरवावे.

lp62शेगाव कचोरी
साहित्य : मैदा २५० ग्रॅम, तेल किंवा तूप ५० ग्रॅम, सायट्रिक अ‍ॅसिड पाव टी स्पून, मीठ पाव टी स्पून, बडीशेप १ टी स्पून, सोडा चिमूटभर, कोथिंबीर २ टे. स्पून, मीठ-साखर चवीनुसार, मूगडाळ १ कप, आले १ टी स्पून, तिखट १ टी स्पून, गरम मसाला पाव टी स्पून, तेल तळण्यासाठी व फोडणीसाठी तेल – २ टे. स्पून, मिरची २ टी स्पून, लसूण १ टी स्पून, हळद पाव टी स्पून, धने-जिरे पूड २ टी स्पून.
कृती : कचोरी कव्हरसाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्या. सारणासाठी तेल गरम करून त्यात आले, लसूण व मिरची पेस्ट टाकून धुतलेली डाळ व १ कप पाणी टाकून डाळ शिजवून ठेवा.
डाळ शिजवून त्यातील पाणी आटत आले की त्यात बाकीचा मसाला घाला. सारण घट्ट झाले की गॅस बंद करून कढईत सारण परतवून गार होऊ द्या.
पिठाची लिंबाइतपत गोळी हातावर थापून त्यात सारणाची लहान गोळी ठेवून कचोरी बनवा. छोटय़ा पुरीएवढय़ा लाटाव्या व नंतर तव्यावर हलकेच भाजाव्या व नंतर तेलात बदामी रंगावर तळाव्यात.
शेगाव कचोरी खमंग होते. तसा हा पदार्थ फार महाग पडत नाही. करायला फारसा अवघड नाही. या प्रमाणात १८ ते २० कचोऱ्या होतात. या प्रमाणात कचोरीला साधारण २५ ते ३० रु. लागतात. या प्रमाणात कचोरी ६०० ते ७०० ग्रॅम बनतात.

lp63बासुंदीतील मोदक
साहित्य : १ नारळ, गूळ, १ लिटर दूध, ३ वाटय़ा कणीक, रवा, तेल, ड्रायफ्रुट्स, साखर, मीठ, वेलची, केशर.
कृती : नारळ-गुळाचे सारण करून घ्या. नारळाची चव पाहून गुळाचे प्रमाण ठरवा. दूध आटवायला ठेवा. नंतर साखर घाला. कणकेत रवा, मीठ आणि तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवा. अध्र्या तासाने कणकेची पारी करून त्यात सारण भरून मोदक करून घ्या. हे सर्व मोदक मोदकपात्रातून उकडून घ्या. थंड झाल्यावर तयार मोदक बासुंदीमध्ये घालून दहा मिनिटे शिजवून घ्या. खायला देताना वरून ड्रायफ्रुट्स, केशर घाला.

lp64मुगाच्या डाळीचे मोदक
साहित्य : १ वाटी मुगाची डाळ, आले, मिरची पेस्ट, थोडे तिखट, मीठ, हळद, थोडे तेल, फोडणीचे साहित्य (मोहरी, हिंग, हळद), वाटीभर तांदळाचे पीठ.
कृती : मुगाची डाळ चार तास पाण्यात भिजवून ठेवावी. नंतर पाण्यातून काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. त्यात आले-मिरची पेस्ट, मीठ, हळद घालून फोडणी करून त्यात खरपूस परतून घ्यावी. म्हणजे मुगाची वाटलीडाळ होईल. नंतर एक वाटी तांदळाची पिठी घेऊन मोदकाप्रमाणे उकड काढावी. उकड गरम असतानाच त्यात तिखट, मीठ, हळद थोडे जिरे घालून तेलाचा हात लावून मऊसर मळावी. नंतर त्याचे लहान गोळे करून मोदकाप्रमाणे पाऱ्या कराव्यात व त्यात मुगाची वाटलीडाळ सारण म्हणून भरून मोदकासारखा मोदक करावा. ते मोदक मोदकपात्रात अगर इडलीपात्रात ठेवून उकडावेत व वर तूप घालून गरम गरम खायला द्यावेत.

lp65मडगणं (गोव्याचा गोड पदार्थ)
साहित्य : पाव किलो हरभरा डाळ, पाऊण कप नारळाचं घट्ट दूध, अर्धा कप नारळाचे तुकडे, १ चमचा साबुदाणा, १०-१२ काजू तुकडे, पाव किलो गूळ, चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ.
कृती : डाळ निवडून धुऊन अर्धा तास भिजवा. त्यात
हळद, मीठ, थोडे पाणी, नारळाचे तुकडे घालून शिजवा. नंतर त्यात धुतलेला साबुदाणा आणि काजूचे तुकडे घाला. साबुदाणा शिजल्यावर गूळ चिरून घाला. सारखे हलवत राहा. गॅस बंद करून नारळाचे घट्ट दूध घाला. पुरीबरोबर वाढा.
टीप : डाळ शिजवताना त्यात हळदीची दोन कोवळी पाने घाला. त्याचा स्वाद छान लागतो. ही पाने उपलब्ध असतीलच असे नाही. म्हणून चिमूटभर हळद घालावी.


 lp112पोह्यंची कचोरी

साहित्य : ४ वाटय़ा जाड पोहे, पाव वाटी मैदा, २ इंच आले, ५/६ हिरव्या मिरच्या, २ चहाचे चमचे मीठ, ८-१० लसूण पाकळ्या, २ वाटय़ा तेल (तळणीसाठी) सारणाचे साहित्य : १ वाटी भिजलेले मसूर, १ वाटी बारीक चिरलेला कच्चा बटाटा, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, १ टे. स्पून ओले खोबरे, २ टे. स्पून ओले खोबरे, २ टे. स्पून तिखट, २ चहाचे चमचे मीठ, १ टे. स्पून तेल व फोडणीचे साहित्य.
कृती : एक टे. स्पून तेल घालून फोडणी करा. कांदा, बटाटा, मसूर सर्व एकत्र करून फोडणीत टाका. एक वाफ आणा. त्यात तिखट, मीठ, साखर, लिंबाचा रस घाला व परता. नारळ-कोथिंबीर घालून परता व खाली उतरवा. आता हे सारण तयार झाले.
पोहे स्वच्छ धुऊन १० मिनिटे ठेवा. आले-लसूण, मीठ-मिरच्या वाटून घ्या. पोहे-मैदा एकत्र कालवून घ्या. वाटण घालून पुऱ्या वाटायच्या यंत्रातून काढून घ्या. मोठय़ा सुपारीएवढी गोळी घेऊन पुरणपोळीप्रमाणे उंडा तयार करा. तयार भाजी त्यात भरा व त्याचे तोंड बंद करून तळहातावर दाबून थोडा चपटा आकार द्या व तळून काढा. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम खायला द्या.

lp67पंचम लाडू
साहित्य : १॥ वाटी मूगडाळ, अर्धी वाटी उडीदडाळ, पाव वाटी हरभरा डाळ, प्रत्येकी २ टे. स्पून तांदूळ, गहू व सोयाबीन, साजूक तूप, गूळ किंवा पिठीसाखर.
कृती : सर्व धान्य व डाळी कोरडय़ाच खमंग भाजा व दळून बारीक पीठ करा. त्यातील एक वाटी पीठ घ्या. तूप घालून परत भाजा. खमंग झाल्यावर गॅस बंद करा. कोमट असतानाच त्यात गूळ किंवा पिठीसाखर घाला व लाडू वळा. यात सहा लाडू बनतात.
पोषणमूल्य : या पदार्थात एकदल धान्याबरोबर द्विदल धान्य वापरल्याने पोषणमूल्य खूपच वाढते. पूर्ण प्रथिनयुक्त असे हे झटपट लाडू आहेत. पीठ करून ठेवले की तूप पातळ करून झटपट लाडू तयार होतात.

lp68निनावं (रव्याचा पूर्ण शाकाहारी केक)
साहित्य : रवा, साखर, दही, दूध, मीठ, लोणी, सोडा, बाय कार्ब, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, सफरचंद.
कृती : रवा, साखर दोन्ही सारख्या मापात घ्यावे. त्यात दही, लोणी, दूध व चिमूटभर मीठ घालून सरसरीत भिजवावे. अध्र्या तासानंतर त्यात थोडा सोडा, बाय कार्ब व थोडी बेकिंग पावडर व थोडा इसेन्स घालावा. सफरचंद किसून घालावे. उपलब्धतेनुसार दुसरेही फळ चालेल. उदा. केळे, आंबा इ. निर्लेपच्या फ्रायपॅनला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे. पॅन डायरेक्ट गॅसवर ठेवावे. गॅस मात्र पूर्णपणे मंद व बारीकच ठेवावा. साधारण पंधरा-वीस मिनिटांत केक तयार होतो; पण गार झाल्यावरच वडय़ा पाडाव्यात. चविष्ट असल्यामुळे फार लवकर संपतो.

lp69ओट्सची खांडवी
साहित्य : ओट्स १ वाटी, साजूक तूप २ टी स्पून, गूळ पाव वाटी, वेलची पूड अर्धा टी स्पून, पाणी १ वाटी.
कृती : तूप गरम करून त्यावर ओट्स खमंग भाजून घेणे. नंतर पाण्यामध्ये गूळ, खोबरे घालून उकळत ठेवावे. उकळल्यावर गॅस बंद करावा व ते भाजलेल्या ओट्समध्ये घालावे. झाकण ठेवावे. १ वाफ आणावी. नंतर वेलची पूड घालावी. डिशला तुपाचा हात लावून त्यावर वरील मिश्रण थापावे. गार झाल्यावर त्याच्या वडय़ा पाडाव्यात.
सजावटीसाठी खोबरे लावावे. या प्रमाणाच्या १५ ते २० खांडवी पीस तयार होतात.

lp71हुलग्याचं बुळगं
साहित्य : हुलगे भाजून केलेले पीठ एक वाटी, दीड चमचा गूळ, मीठ चवीपुरते, दोन चमचे तेल, चिमूट जिरे.
कृती : पातेल्यात पाणी गरम करा. दुसऱ्या पातेल्यात दोन चमचे तेल व चिमूट जिरे घाला. थोडय़ा कोमट पाण्यात हुलग्याचं पीठ एक वाटी घालून सरसरीत भिजवा. पाण्यात गूळ घालावा व हलवावे. हुलग्याचे मिश्रण घालून हलवावे. मंद गॅसवर शिजवावे व गरमागरम द्या
वे. हे हुलग्याचं बुळगं वयोवृद्ध मंडळींना व कुपोषणात खूप उपयोगी आहे. डिलिव्हरीनंतर महिलांना येणारा थकवा यामुळे कमी होतो.

lp70पंचामृती करंजी
साहित्य : २ वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, एक नारळ, अर्धी वाटी गूळ, २ टी स्पून तिखट, चवीपुरते मीठ, १ टी स्पून चिंचेचा घट्ट कोळ, १ टे. स्पून तीळ, थोडे काजूचे तुकडे व तळण्यासाठी तेल.
कृती: नारळ खवून उन्हात जरासा वाळवून घ्यावा व नंतर हलकासा भाजून घ्यावा व त्यात साहित्यात दिल्याप्रमाणे चिंच, तिखट, मीठ, गूळ व काजूचे तुकडे घालून नीट कालवावे. त्यानंतर एक पातेलीत अंदाजे १ टे. स्पून तेल घालून त्यात हिंग, मोहरी व १ टे. स्पून तिळाची फोडणी करून त्यात वरीलप्रमाणे तयार केलेले सारण घालून नीट ढवळून खाली उतरवून गार करावे.
रवा व मैदा कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावे. चांगले कुटून पातळ पाऱ्या लाटून वरील सारण भरून करंज्या तळाव्यात.

lp72खजुराच्या वडय़ा (खांडवी)
साहित्य : १ वाटी बारीक रवा, अर्धा डाव साखर, १ डाव साजूक/साधे तूप, १०-१५ खजूर (बी काढलेला), पाव वाटी खरवडलेला नारळ.
कृती : प्रथम खजूर बी काढून स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. नंतर तुपावर रवा भाजावा आणि खजूर-रवा शिजल्यावर साखर घालावी आणि घट्ट गोळा करावा. नंतर तूप सोडावे आणि ताटाला तूप लावून तो गोळा पसरावा. गार झाल्यावर वडय़ा कापाव्यात. वडय़ा कापायच्या आधी ओले खोबरे घालावे.

lp73खंबायती हलवा
साहित्य : १ लिटर दूध, १०० ग्रॅम तांदूळ पिठी, २०० ग्रॅम साखर, २ टे. स्पून चमचे गुलाबपाणी, पाव चमचा वेलची पूड, १०० ग्रॅम सुक्या मेव्याचे तुकडे.
कृती : मिक्सरमध्ये तांदळाची पिठी थोडय़ा दुधात एकजीव करून घ्यावी. जाड बुडाच्या भांडय़ात दूध आणि तांदळाच्या पिठीचे मिश्रण ओतावे आणि गॅसवर शिजवण्यास ठेवावे. सतत हलवावे. घट्ट झाल्यावर त्यात ५० ग्रॅम साखर घालावी. हे मिश्रण एका सपाट डिशमध्ये ओतावे आणि थंड करण्यास ठेवावे. उरलेल्या साखरेचा पाक करावा. त्यात गुलाबपाणी आणि सुकामेवा मिसळून हलव्यावर ओतावे. वरून वर्ख लावावा. तळलेल्या काजूंची सजावट करावी.

lp74खजुराच्या कापण्या
साहित्य : २५० ग्रॅम खजूर, १ वाटी शिंगाडय़ाचे पीठ, पिठीसाखर.
कृती : प्रथम खजुरातील सर्व बिया काढाव्यात. नंतर खजूर बारीक कुटावेत. कुटल्यानंतर त्यात शिंगाडय़ाचे पीठ घालावे. थोडी पिठीसाखर घालावी. हे सर्व एकत्र करून कणकेसारखे मळावे. त्याला खोडा तुपाचा थोडा तुपाचा हात लावून १०-१५ मिनिटे मुरत ठेवावे. मुरल्यानंतर त्याचा गोळा करून शिंगाडय़ाची पिठी लावून त्याची पोळी लाटावी आणि त्याच्या कापण्या करून तेलात तळून घ्याव्यात किंवा तव्यावर फ्राय केल्या तरी चालतात. जर उपासाचे करायचे नसेल तर शिंगाडय़ा पिठाऐवजी रवा किंवा कणीक घातली तरी चालेल.

lp75कोबीची खीर
साहित्य : पाव किलो कोबी, एक लिटर दूध, एक वाटी साखर, एक पारले-जी बिस्कीट पुडा व दूध मसाला.
कृती : प्रथम कोबी स्वच्छ धुऊन बारीक किसून घ्यावा. त्यानंतर गॅसवरच मोकळय़ा भांडय़ात चांगला उकडून घ्यावा. शिजवल्यानंतर चाळणीवर उपसून चांगला पिळून घ्यावा. दूध थोडेसे आटवून थंड करून बिस्कीट मिक्सरमधून बारीक करून थंड दुधात बिस्किटाचा चुरा व साखर घालून मिक्स करावे व त्यात कोबी घालून चांगले मिसळावे व फ्रिजमध्ये थंड करावे. वरून दूध मसाला घालावा. ही खीर खूपच छान होते व पाहुणे आल्यावर ऐन वेळी वेगळा गोड पदार्थ म्हणून चटकन करता येते.

lp76बुंदीची खीर
साहित्य : २ लिटर दूध, १५० ग्रॅम गोड बुंदी अगर मोतीचुराचे २ लाडू, अर्धी वाटी साखर, २-३ वेलदोडय़ांची पूड, पाव चमचा जायफळ पूड.
कृती : दूध २ लिटरचे १ लिटर होईपर्यंत आटवावे. त्यात साखर घालून पुन्हा उकळी आणावी. बुंदीचा लाडू असल्यास कुस्करून बुंदी मोकळय़ा कराव्यात. दुधात बुंदी घालून एक उकळी आली की खीर खाली उतरवावी. गार होऊ द्यावी. वेलची व जायफळ पूड घालावी. फ्रिजमध्ये गार करून पुडिंगसारखा उपयोग करावा. पुडिंग असल्यास साखर थोडी कमी करावी किंवा क्रीम घालावे.

lp77बिटाची खीर
साहित्य : २ मोठे बीट, २ वाटय़ा दूध, १०-१२ काजू, बेदाणे, साखर, वेलची, चमचाभर साजूक तूप.
कृती : बीट उकडून सोलावेत. किसून घेऊन तो कीस तुपावर परतावा. नंतर त्यात दूध घालून उकळी आणावी. साखर, काजूची पेस्ट (काजूचा कूटही केला तरी चालेल) बेदाणे, वेलची पावडर सर्व एकत्र करून खिरीत घालावे. खीर एकजीव झाली पाहिजे. या खिरीला रंग खूप छान येतो.

lp78पपईची खीर
साहित्य : १ अर्धवट पिकलेली पपई (अर्धवट पिकलेल्या पपईमुळे खिरीला रंग चांगला येतो.) १ टे.स्पून तूप (शक्यतो साजूक असावे), अर्धी वाटी साखर, पाव चमचा वेलदोडा पूड, सजावटीसाठी बदामाचे काप, चार वाटय़ा आटवलेले दूध.
कृती : पपईची साल काढून किसून घ्या. जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाकून कीस वाफवून घ्या. चांगला मऊ शिजला की साखर घाला. साखर घातल्यावर पाणी सुटेल, ते आटवून घ्या. म्हणजे खीर पांचट होणार नाही. पाणी आटल्यावर दूध घाला. पाच मिनिटे आटवा. वरून वेलदोडा पूड आणि बदामाचे काप घाला. बाऊलमध्ये खायला द्या.

lp79पोह्य़ाच्या वडय़ा
साहित्य : ४ वाटय़ा पातळ पोहे, १ वाटी रवा, २ वाटय़ा साखर, थोडी वेलदोडय़ाची पूड, तूप.
कृती : थोडय़ा तुपावर पोहे व रवा वेगवेगळे भाजून घ्यावे. नंतर पोहे हाताने चुरून घ्यावे. साखरेत १ वाटी पाणी घालून दोनतारी पाक करावा. पाकात भाजलेला रवा, चुरलेले पोहे व वेलदोडय़ाची पूड घालून जरा वेळ गॅसवर ढवळावे. नंतर तूप लावलेल्या पोळपाटावर मिश्रण ओतावे. हाताने जरा थापावे व तूप लावलेल्या लाटण्याने जरा लाटल्यासारखे करावे. गार झाल्यावर वडय़ा पाडाव्यात.

lp80पोह्याचे लाडू
साहित्य : ४ वाटय़ा जाडे पोहे, अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे (थोडे खरंगटून घेणे), थोडे काजूचे काप, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, १ टेबल स्पून भाजलेली खसखस, १ टेबल स्पून मध्यम कुटलेला डिंक, वेलदोडय़ाची पूड व गूऴ.
कृती : कढईत तूप तापत ठेवावे. त्यात थोडे पोहे घालून घ्यावे. पोहे तळायचे गाळणे असल्यास सोपे पडेल. डिंकही तळून घ्यावा. खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. नंतर गुळाखेरीज सर्व मिश्रण एकत्र करावे. नंतर हे मिश्रण एखाद्या लहान पातेलीने मोजून घ्यावे. २ पातेली मिश्रण असेल तर १ पातेली बारीक चिरलेला गूळ घ्यावा. गुळावर अगदी थोडे पाणी शिंपडून पाक करावा. त्यात वरील मिश्रण घालून ढवळावे व लगेच उतरवावे. झटपट लाडू वळावे.

lp81अन्नपूर्णा वडी
साहित्य : २ वाटय़ा गव्हाची कणीक, १ वाटी मूग डाळ, अर्धी वाटी नाचणी, प्रत्येकी २ टेबलस्पून तीळ, खसखस, दाण्याचे कूट, सुके किसलेले खोबरे, २ वाटय़ा साखर, १ वाटी पाणी, थोडी वेलचीपूड, साजूक तूप, सजावटीसाठी चारोळी, थोडा खायचा पिवळा रंग.
कृती : मूग डाळ, नाचणी, तीळ, खसखस, खोबरे वेगवेगळे भाजून घ्या. थंड करून मिक्सरमध्ये बारीक करा. गव्हाची कणिक, मूग डाळ, नाचणी पीठ तुपावर वेगवेगळे मंद गॅसवर भाजा. सगळे मिश्रण एकत्र करून कच्चा पाक तयार करा व त्यात मिश्रण घालून गोळा होईपर्यंत परता. वेलची पूड, रंग टाकून मिश्रण सारखे करावे. ताटाला तूप लावून मिश्रण सारखे थापा व लगेचच वडय़ा कापा. वरती चारोळी लावा. याचे लाडूसुद्धा केले तरी चालेल.

lp82तांदळाची वडी
साहित्य : १ वाटी तांदूळ, २ वाटय़ा पाणी, २ वाटय़ा साखर, पाव वाटी तूप, वेलची पूड, शोभेसाठी खसखस, किसलेले खोबरे, काजू, किसमिस.
कृती : प्रथम तांदूळ लालसर भाजून दळून आणणे. नंतर भांडय़ात पाणी, तूप व साखर उकळत ठेवावे. चांगली उकळी आली की गॅस बंद मंद करुन पीठ कालवावे. पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. झाकण ठेवून पीठ चांगले शिजू द्यावे. नंतर थाळीला तूप लावून त्यात हे मिश्रण ओतावे. व सपाट वाटीने थापावे. वर भाजलेली खसखस, किसलेले खोबरे, किसमिस घालून पुन्हा थापावे व सुरीने सारख्या वडय़ा कराव्यात.

lp83पोह्य़ाचे गुलाबजाम
साहित्य : २ वाटय़ा पातळ पोहे, पाऊण वाटी मैदा, चिमूटभर मीठ व तळण्यासाठी तूप.
सारण : दीड वाटी ओले खोबरे, पाऊण वाटी साखर व ७-८ वेलदोडय़ाची पूड. पाकासाठी- १ वाटी साखर, दीड वाटी पाणी, पाव चमचा रोझ इसेन्स.
कृती : पोहे धुऊन घ्यावे. त्यात थोडे पाणी ठेवून पोहे फुगू द्यावे. नंतर त्यात मैदा, चिमूटभर मीठ घालून मिश्रण चांगले तळून घ्यावे. सारणासाठी साखर-खोबरे शिजवून घ्यावे. त्यात वेलदोडय़ाची पूड घालावी. साखरेत पाणी घालून एकतारी पाक घालावा. त्यात रोझ इसेन्स घालावा. मळलेल्या पोह्य़ाचा लिंबाएवढा गोळा घ्यावा. प्लॅस्टिकवर थापावा. त्यात थोडे सारण घालून, करंजीप्रमाणे दुमडून, हळूहळू हाताने दाबून लांबट आकार द्यावा. नंतर तुपात तळून घ्यावे व पाकात टाकावे.

lp84बहुगुणी वडय़ा
साहित्य : १ वाटी शेंगदाणे, १ वाटी रवा, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, १ चमचा काजूचे तुकडे, १ चमचा डालडा, वेलदोडय़ाची पूड, साखर, २ वाटय़ा दूध.
कृती : रवा तुपावर खमंग भाजावा. शेंगदाणे व तीळ भाजून त्यांचे बारीक कूट करावे. खोबऱ्याचा कीस परतून घ्यावा. या सर्व मिश्रणाइतकी साखर घ्यावी. साखरेत साईसकट दूध घालून गोळीबंद पाक करावा. त्यात वरील सर्व मिश्रण, काजुचे तुकडे, वेलदोडय़ाची पूड घालून ढवळावे. लगेच गरम आहे तोपर्यंत तूप लावलेल्या ताटात घालून नंतर पाहिजे त्या आकाराच्या वडय़ा पाडाव्यात.

lp85मशरूमची शाही खीर
साहित्य : मशरूम १०० ग्रॅम, एक लिटर दूध, पाऊण वाटी साखर, बदाम-पिस्त्यांचे काप २० ग्रॅम, चवीप्रमाणे जायफळ, वेलची पूड (उन्हाळ्यात इसेन्स) तूप.
कृती : मशरूमचे तुकडे करून घ्यावेत. ते कढईत तुपात खमंग भाजावेत. नंतर मिक्सरमध्ये त्याची पूड करून घ्यावी. दूध चांगले दाट होईपर्यत आटवून त्यात मशरूमची पूड आणि साखर घालून शिजवून घ्यावे. त्यात बदाम-पिस्त्याचे काप घालून थंड करून आवडीप्रमाणे इसेन्स किंवा जायफळ-वेलची पूड घालून खीर बनवावी.

lp86सुक्या शेवया
साहित्य : पावशेर शेवया, तूप, दूध, साखर, खारीक, बदाम, चारोळी, वेलची, काजू.
कृती : प्रथम तुपात शेवया तळून घ्या. नंतर बदाम, खारका, वेलची, चारोळी तुपात तळून घ्या. शेवयांमध्ये एक वाटी दूध, एक वाटी साखर टाकावी. त्यात खारका, बदाम, चारोळी बारीक तुकडे करून टाकावी. गॅस बारीक करून झाकण लावून वाफ द्यावी. या सुक्या शेवया चविष्ट लागतात.

lp88स्वीट बॉल्स
साहित्य : ३ काकडय़ा, २ चमचे साखर, दीड वाटी ज्वारीचे पीठ, एक चमचा तांदळाचे पीठ, चिमूटभर मीठ
कृती : काकडी किसून त्यातले पाणी पिळून काढा. उरलेल्या काकडीत सर्व साहित्य घालून एकत्र मळून घ्या. तुपाचा हात लावून चपटे गोळे बनवून घ्या. हे गोळे इडलीप्रमाणे वाफवून घ्या. हवा असल्यास थोडा गुलकंद घालून खायला द्या. लो कॅलरी स्वीट बॉल्स तयार. काकडी पिळून निघालेल्या रसात आवडीप्रमाणे सुंठ पूड, वेलची पूड, मीठ, साखर आणि बर्फ घालून सरबताप्रमाणे घ्या.

lp87साळीच्या लाह्य़ांचे लाडू
साहित्य : २५० ग्रॅम साळीच्या लाह्य़ा, १०० ग्रॅम गूळ, वेलदोडा पूड.
कृती : प्रथम गुळात तूप घालून गोळीबंद पाक बनवून घ्या. नंतर लाह्य़ांमध्ये पाक आणि वेलदोडा पूड घालून ते मिश्रण गरम असेपर्यंत लाडू वळावेत. हे लाडू चवीला छान लागतात.