scorecardresearch

नांदी फ्युचरिस्टिक फॅशनची

हॉलीवूडच्या एलियनपट, सायन्स फिक्शन, सुपर हिरोपट यातील पात्रांचे पेहराव कॉश्च्युम पार्टीत तर कधी रॅम्पवर दिसू लागले आहेत.

हॉलीवूडच्या एलियनपट, सायन्स फिक्शन, सुपर हिरोपट यातील पात्रांचे पेहराव कॉश्च्युम पार्टीत तर कधी रॅम्पवर दिसू लागले आहेत. मेटल, प्लास्टिक, अ‍ॅक्रेलिक अशा अनैसर्गिक गोष्टींचा वापर पेहरावात फॅब्रिक म्हणून डिझाइनर्स करू लागले आहेत ही ‘फ्युचरिस्टिक फॅशन’ची नांदी आहे.

आपल्या भविष्यात काय आहे? उद्या आपल्यासोबत काय घडणार आहे? किंवा दहा वर्षांनंतर आपण कुठे आणि काय करत असू? याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. कितीही नाही म्हटलं तरी वर्तमानपत्रात एखाद्या दिवशी आपल्या राशीसमोर ‘तुमचा आजचा दिवस चांगला जाईल’ असं लिहिलेलं असेल तर आपण सुखावतो. कॉलेजमध्ये मस्ती मस्तीमध्ये जेव्हा आपल्याच ग्रुपमधला एकजण आपला हात हातात घेऊन ‘अरेच्या, तुझ्या नशिबी लव्ह मॅरेज आहे’ असे सांगतो तेव्हा नकळतपणे आपल्या भावी त्याच्या किंवा तिच्या विचारात गुंततो. अगदी जत्रेमधल्या इतर अनेक गोष्टींपैकी भविष्य सांगणारा रोबो आपल्यालादेखील तितकाच आकर्षित करत असतो. अर्थात त्याच्याकडे आपण जाऊ की नाही ही गोष्ट वेगळी, तरी तो आपल्याला एकदा तरी खुणावतोच. आपल्या नशिबाचे पत्ते उचलणाऱ्या पोपटापासून ते टाइम मशीनबाबत आपल्या मनात असलेल्या कुतूहलाचे कारण एकच असते, ते म्हणजे भविष्यात आपल्यासोबत काय होणार आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता.
बरे हे आपल्याला केवळ आपल्याबद्दलच असते असेही नाही. आपल्या आजुबाजूच्या प्रत्येक गोष्टीबद्दल असते. त्याची झलक आपल्याला रोजच्या संवादातून येत राहतेच. ‘आमच्या काळात आम्ही झाडावरची फळे तोडून खायचो, आता काय तो बाटलीतला ज्यूस घ्या आणि प्या, पुढे कदाचित गोळ्याच काढाल, केळ्याच्या आणि सफरचंदाच्या.’ मग अशा वेळी तुमचा पेहराव, आजच्या भाषेत फॅशन कशी बरे मागे राहील? भविष्यात आपला पेहराव काय असेल, आपण कसे कपडे घालत असू याबद्दल आपल्याला कुतूहल असतेच ना. काळ बदलला तसा लोकांचा पेहराव बदलला, हे तर आपल्याला माहीत आहेच. या बदलाचे आपण काही प्रमाणात साक्षीदारही आहोत. त्यामुळे यापुढेही बदलत्या काळानुसार आपल्या फॅशनमध्ये बदल होत राहणार हे मात्र नक्की. ते बदल नक्की कसे असू शकतील यासंबंधी काही प्रयोग डिझाइनर्स करू लागले आहेत.
या प्रयोगात त्यांना सर्वात जास्त कोणाची साथ मिळत असेल तर ती आहे, टेक्नॉलॉजीची. सुईचा शोध लागला आणि माणसाने कपडे शिवायला सुरुवात केली. ती एक छोटीशी सुईसुद्धा या टेक्नॉलॉजीचा एक भाग होती. तिथपासून ते आज प्रिंटिंग मशिन्स, स्टिचिंग टेक्निक्सनी मोठय़ा प्रमाणात प्रगती केली आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज आपल्याला फॅशनच्या बाबतीत दररोज नवीन बदल पाहायला मिळत आहेत. आता तर चक्क थ्रीडी ड्रेस बनवले जातात. म्हणजे तुम्हाला फक्त संगणकामध्ये ड्रेसचे डिझाइन करायचे असते, संगणक स्वत:हून तो ड्रेस प्रिंटरच्या माध्यमातून तयार करून तुमच्यासमोर हजर करतो. अगदी स्प्रेच्या साहाय्याने केवळ अंगावर पेंट करून, सुकल्यावर त्याचे टी-शर्टमध्ये रूपांतर करण्याचा प्रयोगही करण्यात येत आहे.
सुरुवातीच्या काळात आपल्याकडे नैसर्गिक कापड हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे कॉटन, सिल्क, लोकर असे मर्यादित पर्याय होते. कित्येक ठिकाणी प्राण्यांच्या कातडय़ाचा वापर कपडय़ांसाठी होत असे. त्यातून लेदर, फर मार्केटची वाढ झाली. पण हळूहळू सिंथेटिक कापडाचा शोध लागला आणि लायक्रा, पोलिएस्टर, नायलॉन या फायबर्सची भर पडू लागली. सिल्क, वूल, शिफॉन, जॉर्जेट, लेदरसारख्या कापडांना आर्टिफिशिअल पर्याय मिळू लागले. त्यामुळे कापडाची बाजारपेठ वाढली आणि निवड करायला स्वातंत्र्य मिळू लागले. अगदी प्रिंटिंग किंवा एम्ब्रॉयडरीच्या बाबतीत हीच गोष्ट लागू पडते. सुरुवातीच्या काळात कपडय़ांवर हाताने चित्रे रेखाटली जायची किंवा नक्षीकाम होत असे. पण आता त्याची जागा मशिन्सनी घेतली आहे. या सर्वाचा फॅशन या संकल्पनेवर खूप प्रभाव पडत गेला आणि पुढेही पडत राहणार आहे.
डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे कित्येक नवीन रंगांची, पॅटर्नस्ची ओळख फॅशन जगताला झाली आहे. त्यामुळे आज काम करताना १६ कोटी रंगांची मोठी पॅलेट डिझाइनर्ससमोर उपलब्ध होते. त्याच्या साहाय्याने तो कपडय़ावर हव्या त्या पद्धतीने खेळू शकतो. एम्ब्रॉयडरीच्या पद्धतीमध्येही आज अनेक बदल झाले आहेत.
आता डिझाइनर्सना भविष्याची ओढ लागली आहे. या रंगांचा आणि विविध साधनांचा वापर करून नेहमीच्या पद्धतींशिवाय इतर वेगळ्या पद्धतीची फॅशन आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापैकी काही याआधी आपण हॉलीवूडच्या एलियनपट, सायन्स फिक्शन, सुपर हिरोपट यांमध्ये लेदर, मेटलचे कपडे घातलेले, रोबोसारखी चालणारी किंवा वागणारी पात्रे पाहिलेली आहेत. त्यांच्यासारखे कपडे आपण कधी घालू शकू का? असा विचारच कधी आपल्याला शिवू शकत नाही. फार तर कॉश्च्युम पार्टीमध्ये असे कपडे घातले जातात. त्याशिवाय यांचा आणि आपला काहीच संबंध नसतो. पण आता हे कपडे रॅम्पवर दिसू लागले आहेत. याला ‘फ्युचरिस्टिक फॅशन’ म्हणतात.
डिझाइनर्स आता अनैसर्गिक गोष्टींचा वापर पेहरावात करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. मेटल, प्लास्टिक, अ‍ॅक्रेलिक अशा विविध गोष्टींचा वापर फॅब्रिक म्हणून होऊ लागला आहे. कित्येकदा लेस, शिफॉन, जॉर्जेट या फॅब्रिक्सचा वापरही यात केला जातो. या स्टाइलमध्ये रंगांच्या बाबतीतही गडद काळ्या रंगाचा वापर असला तरी इतर रंगांनाही नकार नाही. प्रिंट्सच्या बाबतीतही खूप प्रयोग करण्यात येत आहेत. जॉमेट्रिक प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरीजचा वापर प्रामुख्याने केला जातो. स्ट्रक्चर्ड गारमेंट्सचा वापर यात केला जातो. अगदी वन पीस ड्रेसपासून ते साडीपर्यंत, ट्राऊझर्सपासून ते पार्टी गाऊनपर्यंत विविध प्रकारच्या गारमेंट्सचा या स्टाइलमध्ये समावेश होतो. पण त्यातील स्ट्रक्चर्ड लुक कायम असतो. मेकअपच्या बाबतीतसुद्धा स्ट्रॉँग रंगांचा वापर होतो. टायडअप हेअरस्टाइल असा साधारणपणे लुक असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, बोल्ड आणि ब्यूटिफुल हा सोप्पा मंत्र यात वापरला जातो.

सध्या हे सगळे ऐकायला कितीही छान वाटले तरी, प्रत्यक्षात आणणे तितकेसे सोपे नाही, याची कल्पना येऊनच सुरुवात छोटय़ा पावलांनी केली जात आहे. अ‍ॅक्रेलिक आणि मेटलचा वापर अ‍ॅक्सेसरीजमध्ये सर्रास केला जातो. बॅग्ज, शूज, बेल्ट्स, ज्वेलरी यांमध्ये अ‍ॅक्रेलिक वापरले जातेय. या अ‍ॅक्सेसरीजना सध्या प्रचंड मागणी आहे. पारदर्शक अ‍ॅक्सेसरीजनी बाजारपेठ भरून गेली आहे. कपडय़ांमध्येही मेटलचा वापर एम्ब्रॉयडरीमध्ये केलेला दिसतोच. शिअर फॅब्रिक्स आणि स्ट्रक्चर्ड आऊटफिट यांचा मेळ घातलेला दिसतोय. कित्येक जुन्या प्रिंट्स, एम्ब्रॉयडरीजचा वापर पुन्हा एकदा नव्याने केला जात आहे. यामुळे कपडय़ांच्या बाबतीत प्रयोग होत असले तरी, त्याचे काही सकारात्मक फायदेही आहेत. अ‍ॅक्रेलिकपासून बनवलेल्या अ‍ॅक्सेसरीज ऑल वेदर असतात. त्यामुळे उन्हाळा असो वा पावसाळा त्याचा या अ‍ॅक्सेसरीजवर काहीच परिणाम होत नाही. डिस्को, पार्टीज्मध्ये मेटॅलिक ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळतो. पारंपरिक कपडय़ांमध्ये पण या मेटलच्या वापराने वेगळा लुक मिळतो.
त्यामुळे इतर कोणत्याही पद्धतीने आपल्या भविष्याचा वेध घेता आला नाही, तरी फॅशनच्या बाबतीत तरी हा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुढे कधी टाइम मशीन येईल तेव्हा येईल, फॅशनच्या माध्यमातून तरी आपण भविष्याची सफर करायला काय हरकत आहे..

मराठीतील सर्व रॅम्पवर ( Rampvar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Futuristic fashion

ताज्या बातम्या