गणेश विशेष
सावंतवाडीच्या शेजारी नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोटेखानी मळगांवमध्ये राऊळ कुटुंबातील सुमारे ७५० वर्षांपूर्वीचा गणपती प्रसिद्ध आहे. या घरात ४० किलोचा एक गोळा अशा २१ गोळ्यांची भव्य मूर्ती बनविण्याची ७५० वर्षांची परंपरा आहे.
साडेसातशे वर्षांची गणेश परंपरा
मळगांव येथील राऊळ कुटुंबीयांच्या माळीच्या घरातील गणपतीला ७५० वर्षांची परंपरा आहे. हा गणपती २१ गोळ्यांचा बनविला जातो. त्याला नागपंचमीपासून आकार देण्यास कलाकार पुढाकार घेतात. मातीच्या २१ गोळ्यांच्या गणपतीला आकार राऊळ कुटुंबीयच देतात. ही परंपरा कायम सुरू आहे. या अवाढव्य गणपतीला उचलून आणण्यासाठी सुमारे २४ माणसांना परिश्रम घ्यावे लागतात.
राऊळ कुटुंबीयांच्या ८० कुटुंबांतील सुमारे ८०० लोक गौरी-गणपती सणाच्या काळात एकत्र येतात. आज एकत्र कुटुंब पद्धती कमी होत जात असली तरी या कुटुंबातील एवढे लोक सणानिमित्ताने दर वर्षी एकत्रित येतात. या कुटुंबातील सुमारे १२०० लोक म्हणजेच ११० बिऱ्हाडे आज कामाधंद्यानिमित्त वेगवेगळ्या शहरांत असली तरी सणाच्या निमित्ताने एकत्रित येऊन मंगलमय वातावरणात सण साजरा करण्याची त्यांची परंपरा आजही सुरू आहे.
मळगांव येथे सन १४३६ मध्ये स्थायिक झालेल्या राऊळ कुटुंबीयांकडे पोलीसपाटीलकी होती. त्यामुळे कुटुंबांचा व गावाचा न्यायनिवाडा करण्याची परंपरा त्यांच्याकडे त्यावेळेपासून चालून आलेली. आजच्या तंटामुक्तीच्या पाश्र्वभूमीवर या कुटुंबीयांच्या घरात चावडी असायची. या चावडीवर तंटे मिटविले जात. त्यामुळे या कुटुंबाला मानाचे स्थान होते.
२१ गोळ्यांची सात फुटांची लाल रंगाची गणेशमूर्ती पुरी असायची. हल्ली या रंगात बदल केला गेला. मंगेश राऊळ हे अग्रपूजेचे मानकरी आहेत. गणेशमूर्ती भरीव मातीची असते. आज ५० वर्षीय प्रभाकर बाबाजी राऊळ मूर्तीला आकार देत आहेत. महागाई वाढली असली तरी गणेशमूर्तीचं सौंदर्य, मांगल्य यांना जास्त महत्त्व दिलं जातं.
चपई व घुमटांचा मांड आजही या कुटुंबाकडे असून सात दिवसांच्या मंगलमूर्तीच्या आगमनकाळात विधिवत पूजाअर्चा राऊळ कुटुंबीय करीत आलेले आहेत. देवी विसर्जन व गौरी पूजन या प्रसंगी नऊवारी साडी नेसून या कुटुंबातील सुमारे २०० महिला एकत्रित उत्सवात भाग घेतात. सहाव्या दिवशी गणपतीकडे कुटुंबीयांतील सर्वाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मुलांना बक्षिसे दिली जातात. अग्रपूजेचे मानकरी मंगेश राऊळ यांच्या मते ७०० वर्षांपासून पूर्वजांनी घालून दिलेली ही परंपरा एकत्र कुटुंब पद्धती टिकविण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे गणपतीच्या उत्सव काळात सामाजिक बांधीलकी, एकात्मता, एकत्र कुटुंब पद्धत हे टिकवितानाच महागाईच्या काळात आíथक भारही सहज पेलू शकतो, असे राऊळ म्हणतात.२१ गोळ्यांचा गणेशोत्सव</strong>
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यतील सावंतवाडीनजीक माजगाव या गावी सातसावंत खोत घराणे हे पूर्वापार गणपती उत्सव साजरा करीत आलेले आहे. ही परंपरा सुमारे आठ पिढय़ांपासून सुरू आहे. या घराण्याच्या मूळ पुरुषाचे नाव सातसावंत होते. त्यावरून या घराण्याला सातसावंत असे नाव पडलेले आहे. या घराण्याच्या गणपती उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा गणपती गावातील सांगवेकर हे कलाकार करत. त्यासाठी मोबदला स्वरूपाने त्याला सातसावंत घराण्याने आपल्या मालकीची जमीन दिलेली आहे. तसेच गणपतीचा रंग, तेल, वात त्या वेळचे दुकानदार व्यापारी नाटेकर देत असत. गणपतीसमोर नाचगायन करणाऱ्या कलावंतांना जमिनी दिलेल्या आहेत. यामागील मूळ हेतू गणपतीची सर्व व्यवस्था परंपरागत चालू राहावी असा होता. परंतु पूर्वीची पद्धत आता कालबाह्य़ झाली असली तरी त्याचा सद्यकालीन उत्सवावर काहीही अनिष्ट परिणाम झालेला नाही.
गणपतीची मूर्ती करण्याचे काम सांगवेकर यांच्याकडे होते, पण त्यांच्याकडे कोणी कलाकार न उरल्याने १९६७ पासून सातसावंत घराण्यातील लोकांनी स्वत:च मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. गणपतीची मूर्ती आता तेलरंगाने रंगविण्यात येत असली तरी ती पारंपरिकरीत्या २१ गोळ्यांची केली जाते. त्यासाठी सातसावंत घराण्यातील चंद्रकांत सावंत व तरुण वर्ग परिश्रम घेतो. ही भलीमोठी मूर्ती उत्सवाकरिता घरात आणणे व विसर्जनाकरिता महादेव मंदिरानजीक दोन फर्लाग अंतरावर नेणे हे जिकिरीचेच काम आहे. गणपती विसर्जन फारच उत्साहाने केले जाते. प्रथम मुख्य घरातून मूर्ती अंगणात आणली जाते. मूर्तीच्या चौरंगाला दोन्ही बाजूंनी लाकडी वासे बांधून सुमारे २० ते २५ तरुण मूर्ती खांद्यावर घेतात. नंतर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने ही गणपतीची विसर्जनाची मिरवणूक सातेरी मंदिरमाग्रे महादेव मंदिराकडील तलावाकडे जाते.
या घराण्यात स्वतंत्रपणे राहणारी ३५ कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबाची उत्सवाची ठरलेली वर्गणी ही मात्र २०० रु. आहे. यामुळे आजच्या महागाईत या प्रत्येक कुटुंबाचा वार्षकि खर्च प्रत्येक दोन ते तीन हजार एवढा वाचू शकतो. पूर्वी या सातसावंतांच्या कुटुंबात एकूण चार भाऊ होते व ते एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असत. आजचा दिसणारा उत्सव पूर्वीही ते तसाच साजरा करीत. त्या वेळी कुटुंबप्रमुख म्हणून राघू अर्जुन सावंत काम पाहत. त्यांच्यानंतर काकू सावंत, नंतर रामचंद्र सावंत, नंतर वामन सावंत व त्यांच्या पश्चात आता के. व्ही. सावंत हे घराण्याचे प्रमुख म्हणून आहेत. त्यांच्या सल्ल्याने या सातसावंत घराण्याचे सर्वच प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात.
सामाजिक ऐक्याचे प्रतीक
कुडाळ बाजारपेठेतील वर्दम कुटुंबीयांच्या गणपतीच्या आरास पूजेपासून ते विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंतच्या सर्व कार्यामध्ये शहरातील मुस्लिम समाजातील इसाफ इब्राहिम शेख ही व्यक्ती न चुकता मदत करत असून िहदू-मुस्लीम जातीभावाची बंधने झुगारून ऐक्य टिकविणारा कुडाळच्या वर्दम कुटुंबीयांचा गणपती सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे.
समाजात सर्वधर्मसमभावाची भावना वाढीस लावण्याचे कार्य वर्दमांच्या या गणेशोत्सवातून दर वर्षी केले जात आहे. बाजारपेठेमध्ये वर्दम कुटुंबाचे मूळ घर आहे. येथे या सर्व कुटुंबीयांचा एकत्र गणपती आहे. या कुटुंबीयांच्या मागील बाजूसच इसाफ इब्राहिम शेख हे मुस्लीम समाजबांधव राहतात. ते सर्व शहरात सदरोदीन या टोपणनावानेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. शेजारी-शेजारीच घरे असल्याने वर्दम व शेख कुटुंबीयांचे एकमेकांकडे येणे-जाणे असायचे. सदरोदीन यांनादेखील वर्दम कुटुंबीयांच्या उत्सवाबद्दल श्रद्धा होती. हळूहळू ते गणेशभक्तच बनले. वर्दमांचा हा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. त्याला सदरोदीन यांचा हातभार लागतोच लागतो. गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या अंगावरील आभूषणेही सदरोदीन यांच्याच हाताने काढली जातात.
विसर्जनप्रसंगीही सदरोदीन शेवटपर्यंत गणपतीशेजारी असतात. गेली काही वष्रे ते ही जबाबदारी इमानेइतबारे सांभाळत आहेत. िहदू-मुस्लीम यांच्यातील ऐक्य टिकविणारा हा गणेश उत्सव शहरवासीयांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. मुस्लीम बांधवांच्या सणातही आम्ही आनंदाने सहभागी होतो असे या कुटुंबाचे सदस्य सतीश वर्दम अभिमानाने सांगतात.लाल गणेश
सावंतवाडी संस्थानला साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. या राजघराण्याने दक्षिण कोकणात आपली ओळख वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवली. या राजघराण्यात लाल रंगाच्या अवाढव्य मूर्तीचे पूजन केले जायचे. १० किलोचा एक गोळा अशा २१ मातीच्या गोळ्यांची ही मूर्ती असायची. संस्थान विलीनीकरणानंतर या मूर्तीचा आकार लहान होत गेला. सन १६९२ पासून संस्थानकालात प्रजेसह गणेशाचे आगमन व्हायचे.
लाल रंगाच्या गणपतीच्या डोक्यावर नागाचा छत्रधारी मुकुट असायचा. त्या काळात गणपती उचलण्याचे काम भोई करायचे. गणेशमूर्ती छत्रधारी असते. फणाधारी तुरे खोवलेला नाग गणेशमूर्तीवर असतो. नागाला संस्थानामध्ये महत्त्व आहे. सावंतवाडी संस्थानचे राजपुरोहित कोळंबेकर कुटुंबीय श्रीदेव पाटेकर मंदिर व गणेशाचे पौरोहित्य करतात.
सावंतवाडी संस्थानचा श्रीदेव पाटेकर देवस्थान व गणेशोत्सवात संस्थानचे चाहते कायमच अग्रभागी असतात. संस्थान विलीन होऊनही शेकडो वर्षांची परंपरा आजही संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले व त्यांचे चिरंजीव खेमसावंत भोसले यांनी सुरू ठेवली आहे. संस्थानचा गणेश उत्सव दीड दिवसाचा असतो. पण गणेशाची सेवा ही पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे केली जाते. हे संस्थान सिंधुदुर्ग जिल्हा व गोव्यातील पेडणे तालुक्यापर्यंत विस्तारले होते. संस्थानच्या राजघराण्याने कायमच देवावर भक्ती केली, ती आजही कमी झालेली नाही. या संस्थानात नागाला महत्त्व आहे.