05 June 2020

News Flash

गणेशपूजनाची परंपरा

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते, गणेशपूजनाची परंपरा २३०० ते २५०० वर्षे प्राचीन आहे.

वैदिक संप्रदाय हा गाणपत्य संप्रदाय आहे, कारण गाणपत्य संप्रदायात उपासनेला महत्त्व असल्याने त्याचे नाते वैदिक वाङ्मयाशी जोडले जाते.

भालचंद्र गुजर – response.lokprabha@expressindia.com

वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, मंत्रशास्त्र आणि योगशास्त्र या सर्व ज्ञानशाखांनी गणेशाचे स्तवन आणि पूजन केले आहे.

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते, गणेशपूजनाची परंपरा २३०० ते २५०० वर्षे प्राचीन आहे. वैदिक संप्रदाय हा गाणपत्य संप्रदाय आहे, कारण गाणपत्य संप्रदायात उपासनेला महत्त्व असल्याने त्याचे नाते वैदिक वाङ्मयाशी जोडले जाते. या संप्रदायाचा उदय इ.स. पाचव्या शतकानंतर किंवा नवव्या शतकापूर्वी झाला असावा, असे मत आहे. ऋ ग्वेदात गणपतीला ‘ब्रह्मणस्पति’ असे म्हटले आहे. ऋ ग्वेदातील २३व्या सूक्ताचे नावच मुळी ‘ब्रह्मणस्पतिसूक्त’ असे आहे. गुत्समद शौनक या ऋ षीने हे सूक्तरचले, ते असे –

‘गणानां त्वां गणपतिं हवामहे

कवि कवीनां मुपश्रवस्तमम्।

जेष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणास्पत्

आन: शृण्वन्मतिभी: सीद सादनम्॥’

(ऋ ग्वेद: २-२३-१)

याचा अर्थ तो गणांचा पती आहे; ‘ब्रह्मणस्पति’ आहे, मार्गदर्शक आहे. जो द्रष्टा आहे त्यालाच कवी म्हणायचे, असा वेदकालीन संकेत आहे. म्हणजे हा कवींचा कवी आहे- द्रष्टय़ांचा महाद्रष्टा आहे; आत्मज्ञानाचा मूलस्रोत आहे. ‘ब्रह्मणस्पति’च्या रूपात गणेश हीच वैदिक देवता आहे. असेच स्तवन कृष्ण आणि शुक्ल यजुर्वेदातही आलेले आहे. ते असे –

‘ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे।

प्रियाणां त्वां प्रियपति: हवामहे॥

निधिनाम् त्वां निधीपति हवामहे।

वसो मम्॥’

येथे गणपतीला सर्वाचे मंगल कर, असे मागणे आहे. ‘गणपति उपनिषद’ हे अथर्व वेदाचेच उपनिषद गणपती स्तवनालाच वाहिलेले आहे. आपल्या सर्व ब्राह्मणग्रंथांनी गणेशाचे स्मरण केले आहे. याशिवाय मैत्रयिणी संहिता, तैत्तरीय, अथर्ववेदीय शांतिकल्प आणि स्मृतींतही गणेशस्तवन केले आहे. मैत्रयिणी संहितेमध्ये,

‘तत् करादाय विद्महे।

हस्तिमुखाय धीमहि।

तन्नो दन्ति प्रचोदयात्॥’

असा उल्लेख आढळतो. तैत्तरीय आरण्यकामध्ये आणि नारायणेपनिषदामध्ये ‘तत् पुरुषाय विदमहे। वक्रतुंडाय धीमहि। तन्नो दन्ति प्रचोदयात्॥’ अशी गणेशगायत्री दिली आहे.

‘ॐ इति ब्रह्म’ या तैत्तरीयातील उल्लेखाप्रमाणेच मांडुक्य, नारद, प्रश्नोपनिषद अशा प्राचीन वाङ्मयातूनही ग्रंथारंभी ‘ॐ’ या प्रणवरूपाचे स्मरण केलेले आहे. याचा अर्थ ओंकार आणि गणेश एकच आहेत. ‘ॐ गणेशोवैब्रह्म’ हे गणेशतापिनी उपनिषदातील वचन त्याची साक्ष देते. मांडुक्य उपनिषद आणि त्यावरील गौडपादांच्या कारिका यामध्ये ‘ॐ’ हे गणेशाचे विशेषनाम असल्याचे सांगितले आहे, तसेच या एकाक्षरी नामाचा विचार करताना सगळे शब्द ॐकारापासून निर्माण झाले असल्याचा निष्कर्ष निघतो. छांदोग्य उपनिषदातही प्रणवाची उपासना सांगितली आहे. अथर्वशीर्ष उपनिषदातही ‘ॐ गं ॐ’ हेच गणेशब्रrयाच्या उपासनेचे प्रतीक असल्याचे नमूद केले आहे. महर्षी व्यासांनीही आपल्या पुराणांमध्ये वैदिक ‘ॐ’ या बीजमंत्राचा अनुवाद ‘श्री गणेशाय नम:’ असा केला आहे.

‘वराहपुरणा’त गणेशाचे संपूर्ण आख्यान दिले गेले आहे, तर ‘गणेशपुराणात’ गणेशाचे समग्र स्वरूप प्रकट झाले आहे. गणेशपुराणात उपासनाखंडात गणेशसहस्रनाम ही गणेशाने शंकरांना सांगितलेली सहस्रनामावली आहे. दुसऱ्या क्रीडाखंडात गणेशचरित्र तसेच ‘गणेशगीता’ आहे. गणेशपुराणाच्या १२ व्या अध्यायात गणेश म्हणजे कोण; तर ओंकाररूप नादब्रह्म जेव्हा मायेने मुक्त होऊन पुनश्च सर्व सृष्टी निर्माण करतो तोच परमात्मा गजानन होय, असे म्हटले गेले आहे. गज हा शब्द ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि लय सूचित करतो. अर्थात श्रीगणेशाचे हे स्वरूप काही नवीन नाही. कारण अथर्वशीर्षांमध्ये

‘र्सव जगदिदं त्वत्तो जायते।

सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।

सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति।’

असे वर्णन आलेले आहे.

गाणपत्य संप्रदायात ‘मुद्गलपुराणा’ला अतिशय महत्त्व आहे. मुद्गलपुराण हे पारंपरिक १८ महापुराणे वा उपपुराणे यांच्यात समाविष्ट नाही. केवळ गणपतीसंबंधाने विस्ताराने लिहिलेले गणेशपुराण असतानाही हे एक स्वतंत्र पुराण लिहून मुद्गल ऋ षींनी गणेशतत्त्वाचा परिपूर्ण विचार मांडला आहे. नऊ खंडात मिळून ४२८ अध्यायांत एकूण २३ हजार श्लोक आहेत. मुद्गलपुराणातील ‘त्वं पदं तत्पदं गजश्च एतयोरभदात्मको गणेशदेह: प्रत्यक्षब्रह्मात्मकत्वात्’ या उक्तीनुसार प्रत्यक्ष महावाक्यातच गणेश ब्रह्मरूप आहे. आपल्या या सूत्राचा विस्तार सैद्धान्तिकदृष्टय़ा मुद्गल ऋ षींनी या पुराणात केला आहे. नैमिषारण्यात सुरू असलेल्या ज्ञानयज्ञात शौनक ऋ षींच्या विनंतीवरून रोमहर्षक नावाच्या सूताने कथन केलेल्या या कथा आहेत. या पुराणात दक्ष आणि मुद्गल ऋ षी यांचा संवाद आहे. प्रत्येक खंडात एक याप्रमाणे वक्रतुण्ड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण या आठ अवतारांची आठ खंडात विस्ताराने कथानके आलेली आहेत. त्या कथानकांत गणेश हे परब्रह्म असल्याचे आग्रहपूर्वक सांगितले आहे. अनेक रुपककथा, स्तोत्रे, चतुर्थीचा पूजाविधी आणि फलश्रुती, गणपतीशी संबंधित तीर्थक्षेत्रांची आणि पुण्यक्षेत्रांची माहिती तसेच निरनिराळ्या गाणपत्यांच्या कथा या पुराणात आढळतात. गणेश पुराणात जशी गणेशगीता तशीच मुद्गल पुराणात योगगीता आहे. शेवटी स्वत: धूम्रवर्ण गणेशाने स्पष्ट केले आहे, की मुद्गलपुराणाशिवाय माझे यथार्थ स्वरूप कळणार नाही, कारण त्यात माझे पूर्ण आणि सर्वप्रकाशक रूप प्रकट झाले आहे.

याबरोबरच स्मृतिग्रंथ आणि रामायण-महाभारतासारख्या आर्ष महाकाव्यांतून गणेशपूजन केले आहे. पाराशर स्मृतिग्रंथात गणेशाला ‘गणेश्वर’ असे म्हटले आहे. याज्ञवल्क्य स्मृतिगं्रथातही गणेशाची विविध रूपे उलगडून दाखवली आहेत. शालकंटक, कुष्मांड, राजपुत्र, स्वस्तिन, यजन ही त्यापैकी काही रूपे. रामायणात वाल्मिकी ऋ षींनी आरंभी गणेशपूजन केले आहे. महाभारताचा लेखक स्वत: गणपतीच आहे. व्यासांनी महाभारताचे निवेदन केले आणि त्याचे प्रत्यक्ष लेखन केले श्रीगणेशाने- ‘ओमित्युक्ता गणेशोऽपि बभूव किल लेखक:॥’ (महाभारत- १:७९). आदिगणेशाने व्यासांना सांगितले होते, की लेखनाला आरंभ केल्यावर मी क्षणभरही थांबणार नाही. त्यावर व्यास म्हणाले, की मी सांगितलेले प्रत्येक शब्द समजल्यानंतरच लिहायचे. गणेशासाठी व्यासांनी महाभारतात अधूनमधून अवघड श्लोक घातले. क्षणभर विचार करण्यासाठी गणेश थांबल्यावर तेवढय़ा अवधीत व्यासांनी मनातल्या मनात पुढच्या श्लोकांची जुळवणी केली. संपूर्ण महाभारतात सुमारे आठ हजार ८०० कूट श्लोक आहेत.

योगसाधनेत गणेश ही मूलाधार चक्राची देवता समजली जाते. अथर्वशीर्षांत ‘त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्।’ असे म्हटले आहे. मूलाधार चक्रातच कुंडलिनी वेटोळे घालून बसलेली असते. तिला उलगडून वरच्या चक्रात नेण्यासाठी प्रचंड सामथ्र्य लागते. योगशास्त्राच्या म्हणण्यानुसार कुंडलिनीच्या जागृतीनंतरची ज्ञानमूर्ती म्हणजे गणपती होय. अष्टांग योगाने जे गणेशाशी एकाकार पावतात तेच मुक्त किंवा योगिन्द्र होतात, असे म्हटले आहे. योगशास्त्रामध्ये पंचमहाभूतांची काही प्रतीके एकावर एक ठेवली तर गणेशमूर्ती तयार होते. एकूण काय, तर वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती मंत्रशास्त्र आणि योगशास्त्र या सर्व ज्ञानशाखांनी गणेशाचे स्तवन आणि पूजन केले आहे. गणेश ही स्वयंभू, स्वयंप्रज्ञ आणि आदिदेवता आहे, हे त्याचे कारण!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2019 1:05 am

Web Title: ganeshutsav 2019 traditation of ganesh poojan
Next Stories
1 ‘हा’ आहे गौरी आगमनाचा मुहूर्त
2 …जाणून घ्या गौरी आवाहनाची परंपरा
3 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
Just Now!
X