00sbआपल्या घरात एक लहान मूल जन्माला आल्यावर त्या म्हाताऱ्या माणसाला काय आनंद झाला होता. जणू काही आपलाच पुनर्जन्म झाला आहे, असंच त्याला वाटत होतं. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला मला नातू झाला बरं का हो असं सांगत होता. त्या इवल्याशा जिवाला पाहून काय करू आणि काय नको अशी त्याची अवस्था झाली होती. सकाळी लवकर उठल्यावर त्याचा पहिल्यांदा प्रश्न असे, ‘नीट झोप लागली का त्याला’ आणि लगेच ‘उठला का?’ पहिल्यांदा त्याचं तोंड पाहून मग बाकी कामांना सुरुवात. त्याचे आईवडील कामावर गेल्यावर दिवसभर त्याला सांभाळायची जबाबदारी यांचीच. मग तासन् तास त्याच्याशी बोलताना वेळ कसा गेला हे कळत पण नव्हतं. संध्याकाळी त्या मुलाचे आईबाबा घरी आल्यावर त्याचं कौतुक रंगवून सांगण्यात उरलेला वेळ जायचा. म्हातारपणाच्या या अज्ञात प्रवासात त्यांना नातवाच्या रूपाने आनंदाचा झरा मिळाला होता आणि त्यात त्यांना न्हाऊन जायचं होतं. बघता बघता वर्ष झालं आणि एक दिवस अचानक या म्हाताऱ्या माणसाला त्या लहान मुलानं अतिशय ओळखीची हाक मारली, ‘आ.. जो.. बा..’ हे ऐकल्यावर मात्र इतके दिवस ज्या प्रयासाने त्याने दडवून ठेवले होते ते अश्रू मात्र त्याच्या नकळत ओघळायला लागले.

बघता बघता र्वष सरली. ते मूल शाळेत जाऊ लागलं. रोज त्याची शाळेत जायची धावपळ.. येताना मातीने माखलेला शर्ट, हरवलेली पेन्सिल, तुटलेली पट्टी, सुटलेली लेस या सगळ्या गोष्टी आईबापांना त्रासदायक वाटत असल्या तरी आजोबांना मात्र खूप कौतुक आणि अप्रूप. त्याला बसणारा ओरडा आणि त्याचे आईबाप यांच्यामध्ये त्याचे आजोबा मात्र भिंतीसारखे खंबीर उभे. कारण त्यांच्याही उतारवयातलं बालपणच चालू होतं. त्यामुळे नातू आणि ते दोघेही ओरडा खाण्याच्या एकाच पायरीवर उभे. यांनी असं का केलं म्हणून आणि त्यांनी असं का केलं नाही म्हणून. या सगळ्यात नातवाला रात्री झोपवताना गोष्टी सांगण्यात खंड मात्र कधी पडला नाही. त्या गोष्टींची गरज दोघांना तितकीच होती.
आता नातू अजून मोठा झाला होता. मोठय़ा शाळेत जाऊ लागला होता. आजोबांचंही वय दिसू लागलं होतं. एक वयात येत होता आणि दुसरा वयात जात होता. आता गोष्टींमध्ये नातवाचं मन रमत नव्हतं. कारण गोष्टीतल्या भाबडय़ा खोटेपणापेक्षा बाहेरचा खरेपणा त्याला जाणवू लागला होता. आजोबाही आता जाता जाता त्यांच्या अनुभवातल्या काही गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवत होते. नातवाला खरं तर अपेक्षांचेही चटके बसत होते. घरातल्यांचे आणि बाहरेच्यांचेही. फुंकर मारायला आजोबा होतेच, पण त्या फुंकरीतली ताकद थोडी कमी झाली होती.
आता मात्र नातवाच्या आणि आजोबाच्या वयात खऱ्या अर्थाने अंतर पडत चालले होते. नातू मोठा होत होता आणि आजोबा मात्र लहान. अलीकडे थोडे आजारपणही जाणवत होते. ज्याच्या बळावर आजपर्यंत खंबीरपणे उभे राहिले ते शरीर मात्र जास्तीत जास्त विश्रांती मागत होतं. नातू मात्र आता डिग्री वगैरे घेऊन पुढे काय करायचं हे ठरवत होता आणि आजोबांना मात्र आता बाहेरचं सगळं बंद करून घरातल्या घरात काय करता येईल ते करावं, हे सांगितलं जात होतं. नातवाचे नित्य व्यवहार त्याच्याकडून आता नियमित सांगितले जात नसले तरी आजोबांना मात्र त्याच्या चेहऱ्यावरून काय झालं याची कल्पना यायची. अनेक वेळा उतारवयासाठी जपून ठेवलेली पुंजी नातवासाठी कधीही खुली करायला त्यांची तयारी होती. इच्छा असूनही आता पुढच्या पिढीपासून ते विचारांनी लांब पडत चालले होते.
नातवाची आता चांगलीच प्रगती झाली होती. आजोबा मात्र अनेक गोष्टी विसरत चालले होते. नुकताच प्यायलेला चहासुद्धा त्यांना आठवत नव्हता. अनेक वेळा नेमका नातू काय करतो हे ठाऊक असूनसुद्धा आता तो नेमका काय करतो हा त्यांचा प्रश्न असायचाच.
आता घरात फार तर काही क्षणांपुरताच त्यांचा संवाद होत असे. बाकी वेळ ऐकून घेण्यातच जाई. टीव्ही बघताना तसा समोरच्या पात्रामध्ये सीन घडत असतो आणि आपण त्यात असूनसुद्धा त्यात नसतो असं काहीसं त्यांचं झालं होतं.
नेटवरच्या अनेक साइट्समुळे आणि बदललेल्या तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ येत चाललं होतं. पण आजोबा मात्र खूप दूर निघून चालले होते. पुन्हा वाट पाहात होते की, कुणीतरी यावं आणि म्हणावं,
आ.. जो.. बा.. !
 सुबोध भावे

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…