हरिद्वारच्या परिसरात हरियाणामधला एक आंबा व्यापारी भेटला. त्याचं एकूण वर्षभराचं चक्र ऐकल्यावर फळं हा मान्सूनचा आणखी एक निर्देशक लक्षात आला. परिसरात फुललेला बहावाही मान्सूनची साक्ष देत होता.

एकाच नदीच्या दोन घाटांवर दोन भिन्न चित्रं ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाने वाराणसीमध्ये पाहिली. एक चित्र अतिशय उत्साहाचं, जल्लोषाचं, आपलं जगणं साजरं करणारं, जगण्यासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी आरती करणारं आणि दुसरं जगणं संपल्यानंतर मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठीची धडपड करणारं. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या या टप्प्यात हिमालयातली धरणं आणि त्यांचा येथील जनजीवनावर, पर्यावरणावर होणारा परिणाम यावर काम सुरू झालं. गंगेबद्दल माहिती घेण्यासाठी गटाने जगदीश पिल्लई यांची भेट घेतली. पिल्लई यांचा गंगा, वाराणसी या सगळ्या भागावर अनेक वर्षांचा अभ्यास आहे. त्यांनी इथल्या घाटांबद्दल काही माहितीपटही तयार केले आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. तर गंगेच्या धार्मिक महत्त्वाबद्दल माहिती घेण्यासाठी पांडेय यांची भेट घेतली. पांडेय हे वाराणसी येथील काही प्रमुख पुजाऱ्यांपैकी आहेत.
गंगा अस्तित्वात नाही?
पांडेय यांच्याशी भारत सरकारच्या गंगाशुद्धी प्रकल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकारने कोणतीही नवी स्कीम आणली, प्रकल्प राबवला तरी त्यांना गंगा शुद्ध करता येणार नाही. कारण आता मुळात गंगाच अस्तित्वात नाही! कारण वेगवेगळ्या धरणांमुळे गंगेचं पाणी हे हिमालयातच रोखलं गेलं आहे. आपल्याला जे दिसतं आहे ते आहे यमुनेचं आणि काही उपनद्यांचं पाणी. गंगेच्या पाण्यात शुद्धीकरणाची तत्त्व आहेत. ते पाणीच जर इथे येत नसेल तर ही नदी शुद्ध होणार तरी कशी? पूर्वी पावसाळ्यामध्ये गंगा प्रचंड प्रवाहानिशी वाहायची. वर्षभरात साठलेली घाण वाहून जायची. पण आता असं होत नाही. आज पाणीच प्रवाही नाही, त्यामुळे घाण ही साठतच राहणार आहे. आपण काठ कितीही स्वच्छ केले, बंद केले तरी जोपर्यंत पाणी प्रवाही होत नाही तोपर्यंत पाणी शुद्ध होणारच नाही!
पण हे धरणातलं पाणी सोडलं तर उत्तरेकडील लोकांच्या पाण्याचा प्रश्न अनुत्तरित राहणार! पाण्याबरोबर विजेचं काय? तिथे घातलेल्या बांधांमुळे संपूर्ण दिल्लीला वीज मिळते आहे. त्याचं काय? शास्त्रीयदृष्टय़ा ही गोष्ट खरी असली तरी ती अतिशय गुंतागुंतीची आहे. हे सगळं सांगितल्यावर ते थोडे धार्मिक होतात. गंगासागरला भेटलेल्या नागा साधूप्रमाणेच, हेही या सर्व घटनांचं कारण माणसाने केलेली दुष्कृत्यं आणि त्यामुळे शंकराने आपला तिसरा डोळा उघडला आहे असं सांगतात. धार्मिक अंगाने काय किंवा आज आपण शास्त्रीयदृष्टय़ा पाहिलं तरी काय? आपण निसर्गाशी खेळ केला तर तो आपल्याला भोगावा लागणार आहे, हे सत्यच आहे. याचं एक उदाहरण पाटण्यात पाहिलंच होतं. थेट नदीच्या पात्रात, म्हणजे गाळाच्या बेटावर मोठमोठ्ठाल्या इमारती उभ्या करत आहेत. नदीला एक पूर आला की काय होणार आहे या इमारतींचं? अशीच गोष्ट श्रीनगरची. नुकसान होतं ते आपण निसर्गाशी खेळतो त्याच्यामुळे आणि त्याचं खापर निसर्गावर फोडायचं. नदी आणि तिच्या स्वच्छतेच्या बाबतीत जर नदी प्रवाही असली तर ती स्वच्छ राहू शकते, त्यामुळे नदी स्वच्छ करण्यासाठी तिला प्रवाही करणं सगळ्यात गरजेचं आहे.
राजकारणातूनही मुक्तता हवी!
नदीच्या अभ्यासामध्ये आयआयटी कानपूरला भेट देणं अनिवार्य होतं. कानपूर हे गंगेच्या काठावर वसलेलं शहर. त्यामुळे सुरुवातीच्या काळी जेव्हा राजीव गांधी यांनी गंगा स्वच्छता अभियान सुरू केलं तेव्हापासून आयआयटी कानपूर या अभ्यासामध्ये हातभार लावत आहे. त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या काळात गंगा स्वच्छतेसाठी कानपूर आयआयटीला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आलं. डॉ. विनोद तारे हे या अभियानाच्या विभागाचे मुख्य आहेत. हा हाडाचा शास्त्रज्ञ माणूस. मोजकंच पण नेमकं बोलणारा माणूस. त्यांच्या कामाचा उल्लेख गंगा परिक्रमा केलेल्या काही जणांच्या लिखाणामध्येही आहे. यांनी गंगा स्वच्छतेच्या मोहिमेसाठी सुचवलेल्या उपायांपैकी एक उपाय हा काशीचे पांडेय पुजारी यांच्याशी मिळताजुळता आहे. वाराणसीमधले विद्वान आणि हे शास्त्रज्ञ गंगेच्या आणि ओघानेच आपल्या भल्यासाठी सारखेच उपाय सांगताना दिसत आहेत.
दुसरा उपाय म्हणजे गंगेमध्ये घाण न टाकणं हीच तिची स्वच्छता आहे. आपण घाण टाकली नाही तर नदी स्वत:ची स्वच्छता स्वत: करायला सक्षम आहे. हे आणि असे काही उपाय घेऊन ते अनेक वर्षे भारत सरकारबरोबर काम करत आहेत. गंगेमध्ये खराब पाणी मिसळले जाऊ नये यासाठी ते जवळपासच्या उद्योगांना सांडपाणी शुद्ध करणारी यंत्रणाही पुरवत आहेत. याच्याच बरोबरीने त्यांचे आणखी काही अभ्यास सुरू आहेत. बॅक्टेरिओफेज (bacteriophage) या गंगेच्या पाण्यात सापडणाऱ्या विषाणूंवरदेखील ते अभ्यास करत आहेत. या विषाणूंमुळे गंगा ‘शुद्ध’ राहते, असा काही लोकांचा तर्क आहे.
कानपूरमध्ये असताना नदीच्या अभ्यासासाठी जसं सगळीकडून नमुने गोळा केलं गेलं तसंच ते इथूनही करायचं होतं. डॉ. तारे यांनी सांगितलेला भाग अगदीच वेगळा होता. तिथे जातानाच्या वाटेवरच पाटय़ा लागल्या होत्या. ‘घातक, धोकादायक रसायने- प्रवेशबंदी!’ (Dangerous Hazardous Chemicals – No Entry!). एका पुलाच्या जवळून नमुने गोळा केले. शूटिंगसाठी गट वर थांबला होता, अंधार व्हायला लागला होता. त्या संधिप्रकाशातही नदीवरचे लाल तवंग स्पष्ट दिसत होते. ज्या कंपनीमध्ये शिरताशिरताच अशी वॉर्निग दिली गेली, तिथली सर्वच्या सर्व रसायने नदीत सोडली जात होती. अनेक वर्षे आयआयटीने सांगितल्यानुसार असे कारखाने बंद करणं हा खरंतर पहिला उपाय आहे. कारण त्यावरच अनेकांचं आरोग्य अवलंबून आहे. पण हा उपाय लागू करण्यासाठी अनेक राजकीय गणितं आड येतात आणि रसायनयुक्त पाणी नदीत सोडणं चालूच राहतं. या पाण्याचे नमुने गोळा करून गट रात्रीचा प्रवास करून हरिद्वारला रवाना झाला.
हरिद्वार
हरिद्वार हे सपाट प्रदेशामधलं गंगेच्या अभ्यासासाठीचं शेवटचं ठिकाण. गंगा, त्यानंतर पुढे पाहायची असेल तर हिमालयाचा भाग सुरू होतो. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या प्रत्येक अभ्यास दौऱ्यातून एक गोष्ट नक्की बघायला मिळते. ती म्हणजे विविधता. निसर्ग, उंची बदलली कीजैवविविधता बदलते, जमीन बदलते. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सीमेवरचा बिजनोर नावाचा जिल्हा आहे. इथे शिरल्या शिरल्या अनेक आंब्याची झाडे दिसली. मध्ये मध्ये भात शेती होती थोडी, पण ९० टक्के फळझाडच होती. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांमध्ये अनेक वेळा असा गैरसमज असतो की आंबे हे फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक इथलंच फळ आहे. पण आंबे इथे उत्तरेमध्येही पिकतात हे माहीत नसतं. बोलता बोलता एक जण त्याच्या आमराईत घेऊन गेला. तो खरंतर तिथला स्थानिक शेतकरी नव्हता. होता तो हरियाणामधला व्यापारी. या व्यापाऱ्यामुळे मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणारा आणखी एक नैसर्गिक निर्देशक सापडला. हा व्यापारी साधारण एप्रिलमध्ये आपलं आंब्याचं काम सुरू करतो. एप्रिलमध्ये तो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आंबे आणतो. मे महिन्याच्याच दरम्यान तो मध्य भारतातून आंबे विकत घेतो आणि जून व जुलै महिन्यांमध्ये तो हरिद्वार आणि उत्तराखंडमधून आंबे विकत घेतो. जुलैच्या शेवटाला श्रीनगरमधून आंब्यांचा व्यापार करतो. त्यामुळे एप्रिल पासून जुलैपर्यंत तो हरियाणामधील आपला आंब्यांचा व्यापार सुरू ठेवतो. यामधून आंबे किंवा आंब्यांचा मोहोर हा एक चांगला पावसाचा निर्देशक आहे हे लक्षात आलं.
याबरोबरच आणखी एक असाच निर्देशक कळला. तो म्हणजे बहावा. बिहारपासून उत्तर प्रदेशपर्यंत आणि आता हिमालयामध्ये बहावा आता फुलला आहे. जो महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात फुलतो. या दोन झाडांची जर नीट निरीक्षणे नोंदवली तर आपल्या मान्सूनच्या आगमनाबद्दल माहिती मिळू शकते.
यापुढे, जसं जसं आपण उत्तरेकडे जातो तसं तसं गंगेचं पात्र अधिकाधिक लहान होत चाललं आहे असं लक्षात येतं. हरिद्वारला येताना ती अलकनंदा, मंदाकिनी आणि भागीरथी अशा तीन नद्यांमध्ये वाहते. मुख्य गंगा म्हणजे इथली भागीरथी. ही भागीरथी गंगोत्रीमधून येते. तिला अलकनंदा मिळते आणि या अलकनंदेला आधीच मंदाकिनी मिळालेली असते. या नद्यांचा संगम होऊन तयार झालेली नदी हरिद्वारमध्ये येते. यामुळे या जागेचंही महत्त्व काशीसारखंचं आहे. इथेही श्राद्धकर्मे केली जातात. इथेही रोज संध्याकाळी आरती होते. लोक मोठय़ा प्रमाणात इथे दर्शन घ्यायला आलेले असतात. सध्या हिमालयात पाऊस झाल्याने पाणी वाढायला लागलं होतं, त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. हरिद्वारला गट फार काळ थांबला नाही. पण इथेही गंगेचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करणारी अनेक दृश्यं दिसत होती.
इथून पुढचा रस्ता मोठय़ा चढाईचा होता. गटातला एक जण माघारी फिरणार होता. त्यामुळे गाडीतली आवराआवरी करून, रस्ता घाटाचा असल्यामुळे, जड सामान गाडीच्या पुढच्या भागात ठेवून प्रवासाला परत सुरुवात झाली. हा सगळा प्रवास खरोखरच आव्हानात्मक होता. परिस्थिती सपाट भागापेक्षा संपूर्ण वेगळी. इकडचं वातावरण पूर्ण वेगळं. खाली असताना पश्चिम बंगालपासून उत्तर प्रदेशपर्यंत बऱ्याचदा गाडीमध्ये एसी लावायला लागायचा. पाऊस पडून गेलेला होता. त्यामुळे वातावरणात आद्र्रता होती आणि उकाडा प्रचंड होता. पण आता इथे हीटर लावायला लागत होता. सात दिवसांच्या टप्प्यांमध्ये हा विरोधाभास. पाऊस देणाऱ्या ढगांच्या उंचीवरून गट प्रवास करत होता. इथून नरेंद्र नगरच्या मार्गाने हृषीकेशपासून गंगोत्रीपर्यंत प्रवास सुरू झाला.
प्रज्ञा शिदोरे – response.lokprabha@expressindia.com