जिज्ञासा सिन्हा, सौम्या लाखानी – response.lokprabha@expressindia.com

तिचं वय अवघं १९ वर्षांचं. सप्टेंबर महिन्यात तिला तिच्या शिवणकाम करण्याच्या मशीनशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं, एवढं शिवणकाम पडलं होतं. २६ ऑगस्टला तिची तिसरी भाची, भावाची तिसरी मुलगी जन्माला आली होती. नेहमीच्या एम्ब्रॉयडरीच्या कामाबरोबरच तिला जुनी धोतरं, साडय़ा यांच्यापासून बाळासाठी कपडे, दुपटी शिवायची होती. शिवणकामात ती वाघ होती. आता ते सगळे बाळासाठीचे कपडे अर्धवट शिवून पडले आहेत. शिवणाचं मशीन कोपऱ्यात ढकलून ठेवलं आहे. बाकीचे अर्धवट राहिलेले कपडे गुंडाळून जवळच्याच कोनाडय़ात ठेवून दिलेले आहेत. तिच्या तीन खोल्यांच्या घरातलं चित्र आता पार विस्कटून गेलं आहे.

बाळाच्या जन्माच्या तीन आठवडय़ांनंतर त्याच्या १९ वर्षांच्या आत्यावर घरापासून पाचेक मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बाजरीच्या शेतात वरच्या जातीतल्या पुरुषांकडून सामूहिक बलात्कार आणि जीवघेणी मारहाण झाली. त्यानंतर दोनच आठवडय़ांनी २९ सप्टेंबर रोजी त्या खेडय़ातल्या वाल्मीकी समाजातल्या पाच कुटुंबांपैकी एका कुटुंबातील या दुर्दैवी मुलीचा तिच्या घरापासून, आईपासून, भावंडापासून, भाचरांपासून दूर असलेल्या दिल्लीमधल्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तिची परवड संपली नाही. तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात न देताच तो परस्पर, गुपचूप जाळून टाकण्यात आला. तिच्या गावाला पोलिसांचा वेढा पडला. उत्तर प्रदेश सरकारमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या आहेत, असा तिच्या कुटुंबाचा आरोप आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. हाथरसमधल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

या अवघ्या १९ वर्षांच्या एके काळी जिवंत असलेल्या मुलीला आता अस्तित्व उरलं आहे ते निव्वळ आकडेवारीमध्ये. तरीही ‘संडे एक्स्प्रेस’ने हाथरसमधल्या तिच्या खेडय़ात जाऊन तिचा शोध घ्यायचं ठरवलं.

तिचा जन्म शेतमजूर कुटुंबातला. ती पाच भावंडांमधली एक. शाळेत पाऊल टाकणारी ती तिच्या कुटुंबातली पहिलीच स्त्री. ‘प्राथमिक शाळेत जाण्यासाठी तिला हायवे ओलांडावा लागायचा. त्या रस्त्यावरून ट्रक, बसेस किती वेगाने जातात. ती पाचवीत असताना आम्ही तिचं नाव काढलं शाळेतून. आम्ही तिला कधीच एकटीला जाऊ दिलं नाही. आम्हाला भीती वाटायची की, कुणी तरी तिला पळवून नेईल किंवा ती अचानक वेगाने येणाऱ्या कारखाली जाईल. शेवटी आमची भीती खरी ठरली. आम्ही तिला सांभाळू शकलो नाही.’ डोक्यावरचा घुंगट सांभाळत तिची आई वेदनांनी तळमळत बोलते.

तिची आई सांगते, ‘सप्टेंबर १४ रोजी त्या दोघी जणी बाजरीच्या शेतात गेल्या. त्यांच्याकडे असलेल्या सहा गाईम्हशींसाठी त्यांना चारा आणायचा होता. गवत कापताना दोघींमध्ये थोडंसं अंतर होतं. आईपासून काही मीटरवर असलेल्या तिला अचानक कुणी तरी शेतात खेचून नेलं. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. बेदम मारहाण झाली. हे करणारे चौघंजण होते- संदीप (२०), रवी (३५), लवकुश (२३) आणि रामू (२६).’ ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिच्या आईला सापडली. कुटुंबीयांनी तिला घेऊन आधी ताबडतोब पोलीस स्टेशन आणि नंतर रुग्णालय गाठलं. गावापासून तासभर अंतरावर असलेल्या अलीगढ रुग्णालयात तिला नेण्यात आलं आणि त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी तिला दिल्लीमधल्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने जगाचा निरोप घेतला.

‘तो प्रसंग घडला त्याच्या आदल्या रात्री मी आणि माझी मुलगी नेहमीसारख्या घराच्या अंगणात झोपलो होतो. मी जवळ नसेन तर तिला झोप येत नाही, असं ती मला रोज सांगायची आणि माझं दुर्दैव बघा, ती गेली तेव्हा आणि गेल्यानंतरही मी तिचा चेहरादेखील बघू शकले नाही. आता यापुढे मी एक सेकंदही शांतपणे झोपू शकेन का?’ तिची आई विचारते.

बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता अंधारात बुडालेल्या त्या गावाने आपापल्या घरांच्या लहान लहान खिडक्यांमधून चितेतून निघालेला, आकाशात जात असलेला धूर बघितला.  उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासन त्या १९ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह चितेवर ठेवून, पेट्रोलचा शिडकावा करून जाळत होते, त्याचा तो धूर होता.

‘आता लोक म्हणतात हे कुटुंब किती धाडसी आहे. आम्ही अजिबात धाडसी नाही आहोत. माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्याचा आमचा हक्क सरकारने हिरावून घेतल्यानंतर आमच्याकडे दुसरा काही पर्याय तरी होता का? आता न्यायासाठी लढा देणं ही एकच गोष्ट आम्ही करू शकतो.’ तिच्या भावंडांपैकी एक जण सांगतो.

जवळजवळ दोन दिवस ३०० पोलिसांनी गावात घातलेला वेढा शनिवारी उठवण्यात आला. दोन-तीन दिवस गावाबाहेर ठाण मांडून बसलेल्या आणि तिच्या मृत्यूची बातमी जगभर पोहोचवणाऱ्या माध्यमांनी आता या छोटय़ाशा गावावर आणि तिथल्या साठेक कुटुंबांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. अर्थात या ६० पैकी पाच घरं वाल्मीकी कुटुंबाची आणि उरलेली ब्राह्मण आणि ठाकूर समाजाची आहेत. ती मुलगी आणि आरोपी यांच्या घरांना जोडणारा किंवा वेगळं करणारा एक छोटासा मातीचा रस्ता दिसतो. गेल्या काही आठवडय़ांमध्ये घडलेल्या घडामोडींनी या जुन्या वैऱ्यांमधली दरी खूप मोठी केली आहे.

‘तिने आमच्या गावाचं नाव खराब केलं. आम्हाला मान खाली घालायला लावली. आता आमच्या गावात कोण आपल्या मुलींची लग्नं करेल? कोण देईल आता आमच्या गावात मुली?’ गावातला एक ठाकूर विचारतो.

तिच्या घरी गेल्यावर तिचा एक भाऊ सांगतो, ‘सगळ्या वावडय़ा, अफवा आमच्यापर्यंतदेखील येऊन पोहोचत आहेत. पोलीस आयुक्त राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर जाऊन सांगतात की, तिच्यावर बलात्कार झालाच नव्हता.  तर ‘बलात्कार झाला असं ती खोटं सांगत होती’ असं म्हणणाऱ्या गावातल्या ठाकुरांकडून काय वेगळ्या अपेक्षा बाळगायच्या? तिने पोलिसांसमोर जबानी दिली आहे. ती खोटं का सांगेल?’

त्या मुलीची वहिनी सांगते, ‘गावातल्या इतर मुलींप्रमाणे तीही जास्तीत जास्त वेळ घरातच असायची. अगदी कधी तरी ती दुकानात काही आणायला वगैरे गेली तर काही ना काही तरी असं व्हायचं की ती त्रासून परत यायची. चिडून सांगायची की, ते वरच्या जातीतले लोक आपल्याबद्दल वाईटसाईट बोलतात. तिच्याबद्दल घाणेरडं बोलतात. तिचं नाव घेऊन हाका मारत बसतात. वगैरे वगैरे.’

‘ती जन्माला आली त्या वर्षीची म्हणजे २००१ च्या वर्षी गहू कापणीच्या काळातली गोष्ट. संदीप ठाकूरच्या आजोबांनी कु ऱ्हाडीने तिच्या आजोबांचं डोकं फोडलं होतं. त्यामुळे पोलीस केस झाली होती. संदीप ठाकूरच्या आजोबांना काही काळ तुरुंगात घालवावा लागला होता. तेव्हापासून संदीपच्या कुटुंबाचा आमच्यावर राग होता. ते नेहमी जातीवाचक शिवीगाळ करायचे. संदीपने तर तिला काही दिवसांपूर्वी धमकीही दिली होती.’ तिच्या कुटुंबातील एक जण सांगतात.

वेढा घातला त्या काळात पोलिसांनी गावातल्या गल्ल्या, शेतं, घरांचे सज्जे यांचा जणू ताबाच घेतला होता. त्यांनी कलम १४४ लावलेलं असल्यामुळे बहुतेक गावकरी घरात बसून होते. कुणीही घराबाहेर पडलं नाही. तिच्या कुटुंबालाही घरातच बंद करण्यात आलं होतं. शनिवारी पोलिसांनी बॅरिकेड्स काढली तेव्हा गावाबाहेर असलेल्या सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिच्या त्या छोटय़ाशा घरात धाव घेतली. त्या छोटय़ाशा घरातला अगदी इंच न इंच कॅमेरे आणि माइक यांनी व्यापला. प्रश्नांची सरबत्ती झाली. ‘आम्ही काही खाल्लेलं नाही. लहान मुलांनी जेवण म्हणून पाण्यात बिस्किटं बुडवून खाल्ली आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या,’ असं म्हणत तिची भावजय विनंती करताना दिसत होती.

ऑगस्टमध्ये तिची भाची जन्मली त्यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलं होतं. तिच्या दोन विवाहित बहिणीदेखील आपापल्या मुलांना घेऊन बाळाला बघायला आल्या होत्या. आपल्या तिसऱ्या भाचीच्या जन्मानंतर ती फार खूश झाली होती. घर माणसांनी भरलं होतं. बाळ एकाच्या मांडीवरून दुसऱ्याच्या मांडीवर असं फिरत होतं.

तिची भावजय सांगते, ‘गावातल्या स्त्रिया फारशा घराबाहेरच पडत नसल्यामुळे आम्ही घरातच असायचो. माझं लग्न होऊन मी आले तेव्हा ती अगदी लहान होती. आमची दोघींची एकमेकींशी चांगली मैत्री झाली होती. आम्ही नवराबायकोत काही भांडणं झाली तर ती येऊन आमची भांडणं सोडवायची. घरातल्या लहानसहान गोष्टींवरून मी चिडले तर मला समजावून सांगायची. घराबाहेर पडताना माझ्या चेहऱ्यावर घुंगट आहे की नाही याकडे तिचं लक्ष असायचं. खेडय़ात अशाच पद्धतीने मुली वाढतात. आता ती गेल्यानंतर मला एक क्षणभरही झोप येत नाहीये की अन्न जात नाहीये. आमच्यावर काय वेळ आणून ठेवली आहे बघा. आम्ही गरीब जरूर आहोत, दलित जरूर आहोत, पण आमच्या जिवाभावाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार आम्हाला आहे की नाही? त्यांनी आम्हाला तिचं अंत्यदर्शनदेखील घेऊ दिलं नाही.’ ती सांगते.

गावात सगळ्यांचे ओठ शिवलेले आहेत. तिच्याबद्दल विचारलं तर तुम्ही कुणाशी बोलता आहात त्यानुसार ‘वो बहोत भोली थी’ आणि ‘ती खोटं बोलली’ ही दोनच उत्तरं मिळतात. उत्तर प्रदेशमध्ये एका दलित कुटुंबात वाढताना जात, लिंग याशिवाय आणखी किती तरी दबावांना एखाद्या तरुण मुलीला तोंड द्यावं लागत असेल हे यावरून लक्षात येतं.

ही १९ वर्षांची मुलगी कोण होती? तिच्या घरच्यांच्या नजरेतून बघितलं तर ती एकदम उत्तम पोळ्या (रोटी) करायची. तिची भाचरं हेच तिचं जग होतं. ती फारशी घराबाहेर पडत नसे. मुलींना म्हणून ज्या काही वस्तू लागतात, त्यादेखील बाजारातून आणायला ती भावांनाच सांगायची. तिच्या मृत्यूनंतर काही तासांतच एका राजकारणी व्यक्तीने तिची जबानी असलेल्या व्हिडीओवर शंका उपस्थित केल्या. तिची खरी गोष्ट, घडलेल्या घटनांबद्दलचं तिचं म्हणणं आता कुणालाच समजणार नाही.

तिची आई सांगते, ‘ती अलीगढ रुग्णालयात होते तेव्हा माझं तिचं जे काही बोलणं झालं तोच आमचा शेवटचा संवाद. तिने मला सांगितलं की तिला माझी, तिच्या भाच्यांची फार आठवण येते आहे. तिला घरी परत यायचं होतं. तिला इतक्या वेदना होत होत्या, तरीही त्या विसरून ती माझ्या तब्येतीविषयी, तिची भाचरं नीट खातात-पितात ना याविषयीच विचारत होती.’

तिची आई सांगते की, जिथं तिच्या मृतदेहाचं दहन केलं, तिथं तिची राख, अस्थी अजूनही तशाच पडून आहेत. त्या ठिकाणी जाण्याचं माझ्यात धाडस नाही. आमची गरिबी, रोजची धकाधकी याबद्दल मी बोलायला लागले, की ती मला सांगायची की, एक दिवस सगळं नीट होणार आहे. इतक्या लहान वयात आणि अशा पद्धतीने तिचं आयुष्य संपल्यानंतर आता यापुढे कुठले दिवस चांगले असणार आहेत?

एक आयुष्य अवघ्या १९ व्या वर्षी संपलं, एका आईने आपली मुलगी गमावली एवढंच सत्य आता उरलं आहे.

… तर त्यांना फाशी द्या — अमील भटनागर

गेले काही दिवस हाथरसमध्ये पोलीस, माध्यम प्रतिनिधी यांचा राबता आहे. संबंधित मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी दबाव वाढत असताना उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते म्हणालेकी आरोपींची, मुलींच्या नातेवाईकांची तसंच या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची पॉलीग्राफ तसंच नार्को चाचणी घेतली जाऊ शकते. तर आरोपींचे नातेवाईक सांगतात की त्यांना हा खटला नि:पक्षपातीपणे चालवणं अपेक्षित आहे.

तीन आरोपींपैकी संदीप (२०), त्याचा काका रवी (३५), आणि राम (२७) एकमेकांचे नातेवाईक आहेत तर चौथा आरोपी लवकुश हा संदीपचा मित्र आहे. हे चारही जण शेखावत ठाकूर आहेत. त्यांची कुटुंबं पिढय़ानपिढय़ा शेती व्यवसायात आहेत. हे लोक मुख्यत: भात आणि बाजरी पिकवतात.

पीडित मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की सकाळी साडेआठ वाजता मुलगी गवत कापत असताना तिच्यावर या चार जणांनी बलात्कार केला आणि तिला मारहाण झाली. मुलीच्या आईने सांगितले आहे की तिने आरडाओरडा केला तेव्हा हे चारही आरोपी शेतातून बाहेर पडले आणि तिथून निघून गेले.

सहा महिन्यांपूर्वी संदीपला दिल्लीमध्ये एका खासगी कुरियर कंपनीत ड्रायव्हरची नोकरी मिळाली होती. त्याला महिना सहा हजार रुपये पगार होता. सप्टेंबर १४ रोजी (हा प्रसंग घडला त्या दिवशी) संदीप व्हरांडय़ातच झोपला होता, असं संदीपचा ३० वर्षांचा भाऊ हरीओम सांगतो. या चौघांपैकी रामूला काही महिन्यांपूर्वी गावापासून दहा किलोमीटरवर असलेल्या दूध प्रकल्पात रोजंदारीवर काम मिळालं. तो सकाळी साडेसात ते दीड आणि संध्याकाळी साडेचार ते साडेआठ असा रोज कामाला जात असे. तो दहावीपर्यंत शिकला आहे आणि कानाने बहिरा आहे असं त्याचे कुटुंबीय सांगतात.  हा प्रकार घडला तेव्हा रामू काम करत होता. तो कुठे होता हे त्याच्या मोबाइल लोकेशनवरून शोधता येऊ शकतं. तो साडेअकरानंतर सायकलवरून परत आला असं त्याची आई सांगते.

संदीपच्या घरापासून जवळच त्याच्या काकाचं रवीचं घर आहे. तो रोजंदारीवर काम करतो. त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की हा प्रसंग घडला तेव्हा तो कामाच्या शोधात बाहेर गेला होता. हा प्रसंग घडला तेव्हा लवकुश जवळच्याच शेतात त्याच्या आईला मदत करत होता असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

‘काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमचे वपर्यंत लागेबांधे आहेत आणि त्यामुळे पोलीस आम्हाला वाचवत आहेत. पण आमचे असे काहीही लागेबांधे नाहीत. त्यामुळे आम्ही पोलिसांवर कसा दबाव आणणार ? रामू आणि रवी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधी हाथरसच्या बाहेर गेलेले नाहीत. लोक म्हणतात आम्ही वरच्या जातीमधले आहोत. पण आम्ही फक्त मजूर आहोत.’ संदीपचा भाऊ  हरीओम सांगतो.

आम्हाला नार्को चाचण्यांकडून अपेक्षा आहेत असं ही कुटुंबं सांगतात. तुम्ही खरं सांगता की नाही हे ठरवणारी चाचणी असली तरी आम्हाला नि:पक्षपातीपणे खटला चालवला जाणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना फाशी द्या आणि नसेल तर त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. हरीओम सांगतो.
‘संडे एक्स्प्रेस’मधून
अनुवाद – वैशाली चिटणीस