एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात वसंत ऋतू संपतो आणि ग्रीष्म सुरू होतो. या ऋतूसंधीच्या काळात प्रकृतीला फार जपावे लागते. कितीही इच्छा झाली तरी या काळात थंडगार पेये टाळावीत.

एकेकाळी मानवी स्वास्थ्याची व्याख्या तुलनेने सोपी होती. शहरी व ग्रामीण भागात सर्वसामान्य माणसाला; दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्याकरिता पुरेसा रोजगार, धंदापाणी हवा होता. जगण्याकरिता ‘दोनवेळचे अन्न’ पुरेसे होते. दिवसभराच्या श्रमानंतर रात्री पुरेशी झोप मिळावी अशी माफक अपेक्षा होती. आता तुमची आमची सर्वाचीच जीवनशैली खूप ‘फास्ट’ झाली आहे. आपणच आपले शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक प्रश्न वाढवत आहोत. मार्च महिना गेला, वसंत ऋतूची बहार संपली!
७ एप्रिलला जागतिक आरोग्यदिन झाला, त्याचे स्मरण करत दिवसेंदिवस भूमिती श्रेणीने वाढणाऱ्या कफ, खोकला, आम्लपित्त, मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग अशा अनेकानेक विकारांपासून स्वत:ला लांब ठेवू या. एप्रिल महिन्याचे वैशिष्टय़ असे की महाराष्ट्रातील तीन थोर समाजसुधारकांची जयंती या महिन्यात येत आहे. ११ एप्रिल महात्मा फुले, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी केली जाते. भारतातील लोकसंख्येच्या वाटय़ातील खूप खूप छोटा भाग असणाऱ्या; पण आपल्या कर्तृत्वाने मोठे स्थान मिळवणाऱ्या जैन धर्मीयांच्या; श्री महावीरांची जयंती १३ तारखेला आहे. काही मंडळी १३ तारीख अशुभ समजत असतील, पण महावीर जयंतीचा दिवस अशुभ कसा असू शकेल? १५ एप्रिल हनुमान जयंती व छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटे लवकर उठून सूर्यनमस्कारासारखा जोरदंड बैठका असा सुलभ व्यायाम करू या.
आपल्या देशातील सर्वात अल्पसंख्य असणाऱ्या पारसी धर्मीयांचा ‘आदर मासारंभ’ १५ एप्रिल रोजी आहे, तर १७ एप्रिल रोजी श्रीधरस्वामी पुण्यतिथी आहे. भारत हा आपल्या बहुविध धर्मीयांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. ख्रिश्चन धर्मीयांचे आदराचे दोन महत्त्वाचे दिवस १८ एप्रिल गुडफ्रायडे व २० एप्रिल ईस्टरसंडे म्हणून ख्रिश्चन बांधव मोठय़ा श्रद्धेने साजरा करतात. भारतीय सरकारच्या सरकारी पंचांगानुसार १८ एप्रिलला या वर्षी वैशाख सुरू होत आहे. २७ एप्रिल संत गोरोबा कुंभार व २८ एप्रिल थोरली बाजीराव पेशवे पुण्यतिथी निमित्ताने; वेगवेगळय़ा क्षेत्रातील या थोर महापुरुषांना वंदन करू या! हिंदू पंचांगानुसार ३० एप्रिल रोजी वैशाख मासारंभ होतो. कोणी त्याला ‘वैशाख वणवा’ म्हणून गमतीदार आठवण करून देत असतात.
एप्रिल महिन्याची हवामानानुसार फार गमतीदार विभागणी आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झालेला मोठा आनंदी वसंत ऋतू एप्रिलच्या पहिल्या पंधरवडय़ात संपतो. साहजिकच त्या ऋतूतील रात्रीचा किंचित गारवा व पहाटेची गुलाबी थंडी; जेमतेम पहिले आठ-दहा दिवस तुम्हा आम्हाला सुखावह वाटते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या शेवटासच ग्रीष्म ऋतूचा उन्हाळा सुरू झाला आहे याची आठवण हवामानातील बदलाने लगेच जाणवते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या चार-पाच महिन्यातील वापरावयास काढलेले लोकरीचे उबदार कपडे, ब्लँकेट, जादा पांघरूणे यांना सर्वच जण पुन्हा एकदा बासनात टाकतात. घरातील पंखे, अतिभाग्यवंताच्या, धनवंतांच्या घरातील वातानुकूलित यंत्रणा लगेचच सुरू होते. आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाप्रमाणे एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करत असताना ‘ऋतुसंधी’ या संज्ञेकडे वाचकांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. जेव्हा एक ऋतू संपून दुसरा सुरू होतो, त्या वेळेस वातावरणात बदल होऊ लागतो व हा बदल हळूहळू होत राहतो. उदाहरणार्थ हिवाळय़ानंतर उन्हाळा येताना, थंडी हळूहळू कमी होत जाऊन उन्हाळय़ाची चाहूल लागते, क्रमाक्रमाने उकाडा वाढत जातो. अचानक एक दिवशी हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला असे कधीच घडत नाही. सामान्यत: पूर्वीच्या ऋतुचक्रातील शेवटचे आठ दिवस व आगामी ऋतुकालातील पहिले आठ दिवस असा पंधरवडय़ाचा काल हा ऋतुसंधीचा काल असे समजण्यास हरकत नाही.
या ऋतुसंधीच्या काळातच आरोग्यास फार जपावे लागते. मार्च महिन्यात हवेत खूप खूप बदल झाले, कोकणातला काही भाग वगळता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यतही अभूतपूर्व गारपिटीमुळे समस्त ग्रामीण शेतकरी बागायती खल्लास झाली. लहान मोठय़ा शेतकऱ्यांचे ‘होत्याचे नव्हते’ झाले. आपल्या मानवी शरीरातही अचानक बदलत्या हवामानामुळे खूप खूप रोग-आपत्ती येऊ शकतात. आईसक्रिम, लस्सी, खूप खूप थंड पेय, उसाचा रस, विविध फळांचे थंड ज्यूस प्यायची ज्यांना हौस असते अशी मंडळी एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ातल्या गरम हवेची सबब सांगून वर सांगितलेले थंड पदार्थ घाईघाईने ‘आपलेसे’ करतात. त्यामुळे ते अकारण सर्दी, पडसे, खोकला, कफ, दमा अशा आजारांना आमंत्रण देतात. खूप थंड ऋतूतील डिसेंबर, जानेवारी महिन्यातील कफविकार तुलनेने सुस असतात. कारण तो काल विसर्गकाल म्हणजे, भगवान सूर्यनारायणाने माघार घेतलेला दक्षिणायनाचा विसर्गकाल असतो. याउलट तुम्ही एप्रिल महिन्यात चुकीचे वागलात, अकारण खूप थंड पदार्थाचा अस्वाद घेऊ लागलात तर तुम्हाला हे प्राणवह स्रोतसाचे विकार आगामी पावसाळय़ात नक्कीच त्रास देतात, याचे भान असावे. थोडक्यात वैद्यकीय सल्ला म्हणजे एप्रिल महिन्यात उसाची गुऱ्हाळे, आईस्क्रिम पार्लर, रस्त्यावरची कोल्ड्रिंक, पेय, ज्यूसची दुकाने आपलीशी करू नयेत.

एप्रिल महिन्यानंतर येणारा उन्हाळा हा ज्येष्ठांना, समाजातील अतिवृद्धांना खूपच त्रासदायक ठरू शकतो. एप्रिलसारख्या तुलनेने समशीतोष्ण महिन्यात ज्येष्ठाने आहारातील पथ्यपाणी अवश्य, कटाक्षाने पाळावे.

एप्रिल महिन्यात आपल्या आसमंतात बहावा वृक्ष आपल्या पिवळय़ाजर्द आकर्षक फुलांच्या शृंगाराने बहरलेला असतो. या बहाव्याला प्रथम हिरव्यागार शेंगा येतात. थोडय़ा काळाने त्या काळय़ा होतात, पिकतात. त्यांचा मगज खूप खूप गोड असतो. आसपासच्या अनेकानेक प्राणिमात्रांना भुंग्यांना, किडय़ांना या शेंगातील गोड मगज खुणावत असतो. या मगजाची गमतीची बाब, तुम्ही-आम्ही नेहमीच लक्षात ठेवावी अशी आहे. माणसाच्या पूर्वजांना, माकडांना विविध शेतातील काकडय़ा, टमाटू, फळे फस्त करून ‘अजीर्ण’ होते. ही माकडे तुमच्या आमच्यासारखी दवाखाने न ढुंढता, बहाव्याच्या शेंगातील मगज खातात. त्यांचे पोट तेवढय़ाने साफ होते. ‘माकडांना जे कळते, ते माकडांच्या वंशजांना-तुम्हा आम्हाला कळत नाही.’ आणि आम्ही गंधर्व हरीतकी, कॅस्टर ऑईल, सोनामुखी, इसबगोल यांचा सहारा ढुंढतो. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे बहाव्याचा मगज हे समस्त मानवजातीला, नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून जख्खड म्हाताऱ्यापर्यंत एक अनमोल, विनासयाने शरीरशुद्धी करणारे एक वरदान आहे. एप्रिल महिन्यात बहरत येणाऱ्या बहावा वृक्षाला-राजवृक्षाला अनेक अनेक प्रणाम!
एप्रिल महिन्यात आपल्या आसमंतात आणखी एक मोठा वृक्ष, चिंचेचा वृक्ष तुम्हा आम्हाला खुल्या दिलाने पूर्ण पिकलेल्या चिंचांची भेट देत असतो. आपल्या लहानपणी तुम्ही आम्ही खूप आंबट गोड चवीच्या चिंचा; अधाशासारख्या खाल्ल्या असतील, पण मोठेपणी दात आंबतात या भयाने आपण ओली चिंच खाणे टाळतो. पण मित्रांनो, भारतीय संस्कृतीत खूपखूप महत्त्व असलेल्या चिंचेचे गूळ घालून तयार केलेले सरबत अनेकानेक ‘कोला, थम्सअप’ अशा महागडय़ा सरबतांपेक्षा तुम्हाला उत्तम रुचीचा आनंद तर देतेच, पण तुम्ही कमी जास्त वेळी अवेळी वा राक्षसकाली रात्री जेवलात तर ते निश्चयाने पचवण्याचे उत्तम काम करते. या चिंचेच्या सरबतात गुळाबरोबर थोडी जिरेपूड मिसळावयास हवी हे मी सांगावयास नकोच. ज्यांना दीर्घकाळच्या आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांनी गोरखचिंच ह्य चिंचेच्या नामसदृश वृक्षाची मोठी शेंग फोडावी. ही शेंग खूप हलकी असते. त्याच्या गराचे सरबत घ्यावे. त्याने आम्लपित्त तर बरे होतेच, शिवाय शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढायला मदत होते. थोर संत गोरखनाथांचे नाव घेतलेल्या वृक्षाला प्रणाम!
नुकतीच दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या. पण ज्यांना भावी आयुष्यात खूप खूप उच्च दर्जाच्या नोकऱ्यांची संधी मिळवायची आहे, त्यांचेकरिता ‘एम.बी.ए.- इंजिनीअरिंग, फार्मसी इत्यादीसारख्या परीक्षांचा ताणतणाव खूप असतो. पालकांच्या आग्रहाने अशी निरागस मुले खूप जागरण करतात. दिवसाचे १२-१२ तास अभ्यास करत बसतात. इथेच ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हा मंत्र अवश्य लक्षात ठेवावा. रात्री खूप उशिरा जागून अभ्यास करण्यापेक्षा पहाटे ५ ते ७ भरपूर शांततेमध्ये उत्तम अभ्यास करावा. आयुर्वेद शास्त्रातील अनेकानेक प्राचीन ग्रंथांतील, उत्तम उत्तम श्लोक मी मुखोद्गत केलेले आहेत. हे पाठांतर पहाटेच जमू शकते. त्याकरिता बदाम, ब्राह्मासारख्या ब्रेनटॉनिकची अजिबात गरज नसते.
एप्रिल महिन्यानंतर येणारा उन्हाळा हा ज्येष्ठांना, समाजातील अतिवृद्धांना खूपच त्रासदायक ठरू शकतो. एप्रिलसारख्या तुलनेने समशीतोष्ण महिन्यात ज्येष्ठाने आहारातील पथ्यपाणी अवश्य, कटाक्षाने पाळावे. खाण्यापिण्याबाबत घरातील तरुणाई व बालबच्चे यांचेशी स्पर्धा करू नये. बाहेरची जेवणे, लग्न, मुंज, वाढदिवसनिमित्ताने होत असलेल्या जेवणावळी टाळाव्यात. म्हणजे पोट ठीक राहते. उत्तम आरोग्य लाभते. अशा उत्तम आरोग्यामुळे सदा आनंदी राहता येते. नुकतेच स्वर्गवासी झालेले दाजीकाका गाडगीळ शेवटपर्यंत मिताहारी असूनही सदा आनंदी होते. सर्वानाच सहवासानंद देत होते. शंभरीच्या उंबरठय़ावरील वैकुंठवासी दाजीकाकांना अनेक अनेक प्रणाम. संयम से स्वास्थ्य!